पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
क्रांतीच्या ज्वाला आणि धर्मांधतेची राख

अभिजित वैद्य


 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांची कादंबरी आधुनिक मराठी साहित्यातील अनेक अर्थानी एकमेवाद्वितीय, मराठी साहित्याला नवी वाट दाखवणारी धाडसी कलाकृती आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणारी नाही. उच्चशिक्षित अक्षरशत्रूची नवी पिढी वाढत असण्याच्या या काळात सव्वानऊशे पानांची कादंबरी लिहिणं हेच एक धाडस आहे. त्यातही कादंबरीचा पट अफगाणिस्तानसारख्या देशाच्या आणि तिथल्या गेल्या अर्धशतकाच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्थित्यंतराच्या भव्य पाश्र्वभूमीवर बेतणं हेही एक धाडसच मानलं पाहिजे. मराठी साहित्याच्या इतिहासात भारताच्या सीमा उल्लंघून हे धाडस करणारे लेखक अपवादानेच आढळतात. या ठिकाणी विश्राम बेडेकरांची 'रणांगण' आणि रमेश मंत्री यांची ‘महानगर' या कादंबऱ्याचा उल्लेख अपरिहार्य आहे. यातील रणांगण ही छोटेखानी कादंबरी दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात घडणाऱ्या मृत्यूच्या तांडवाच्या पाश्र्वभूमीवर युरोपात फुललेली. एक भारतीय तरुण आणि पाश्चात्त्य तरुणी यांच्यातील विलोभनीय काव्यमय प्रेमकथा आणि शोकांतिका. 'महानगर' लक्षणीय असली तरी वाचकांच्या मनावर साहित्यिक कलागुणांनी दीर्घकालीन ठसा उमटवण्यास असमर्थ ठरते. पाश्चात्त्य लेखकात बालवाङमय लिहिणाऱ्या लेखकांनी देशांच्या सीमापलीकडे जाऊन टारझन, गलिवर्स ट्रॅव्हल्ससारख्या अभिजात कलाकृती निर्माण केल्या. तरीही त्यात निखळ मनोरंजन करणारी अद्भुत सृष्टी निर्माण करण्यापलीकडे दुसरा हेतू नव्हता. मागरिट मिचेलच्या 'गॉन विइथ द विंड'ला अमरिकन यादवी युद्धाची भव्य पार्श्वभूमी लाभली असली तरी ती एक मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा वेध घेणारी कादंबरी होती. मिचेल स्वत: अमेरिकन असल्यानं हे सारे अनुभव तिला परके नव्हते टॉलस्टॉयच्या 'वॉर अॅड पीस' बद्दल असंच म्हणावं लागेल. सॉमरसेट मॉमनं जगभर हिंडून विविध भौगोलिक पटाच्या

२३६ □ अन्वयार्थ