पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या कादंबऱ्यांतून व्यापक अवकाशात प्रस्तुत केले आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते अशा विविध सुविधांच्या रूपात शहरसुधारणा व विकास करण्याच्या हेतूने नगरपालिका ही संस्था अस्तित्वात आली आणि लोकशाहीच्या मार्गाने लोकांच्या प्रतिनिधींचा त्यामध्ये सहभाग करण्यात आला. कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन यंत्रणा निर्माण करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनवर्गाने परस्परांना पूरक राहून कारभार करावा, असे अपेक्षित होते. कालौघात या संस्थांतही हितसंबंधाचे व सत्तेचे राजकारण सुरू झाले आणि बघता बघता त्याचे स्वरूप निंद्य आणि अमानुष झाले. अशा संपूर्णपणे प्रतिकूल वातावरणात अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि सामाजिक बांधिलकीने काम करणारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. भांगे यांना केंद्रस्थानी ठेवून श्री. देशमुख यांनी 'अंधेरनगरी' या कादंबरीतून नगरपालिका या महत्त्वाच्या संस्थेची सर्जनशील चिकित्सा केली आहे आणि ती आजच्या वास्तवातली प्रातिनिधिक आहे.
 'ऑक्टोपस' या कादंबरीतही हेच दाहक वास्तव आले आहेत. 'ऑक्टोपस'सारखी सर्व बाजूने वेढलेली भ्रष्टाचारी व्यवस्था, व त्यात धैर्याने आणि धीटपणाने प्रशासन करणाऱ्याची होणारी दमछाक या कादंबरीत प्रभावीपणे मांडली आहे. 'अंधेरीनगरी'मध्ये एक शहर आहे; तर या कादंबरीत संपूर्ण जिल्हा आला असून जिल्हाधिकारी, त्यांचे दोन कर्तव्यदक्ष सहकारी कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. महसूल खात्याची संपूर्ण जिल्हास्तरावर वावरणारी प्रशासकीय यंत्रणा, तिच्यात वावरणारे भ्रष्ट नोकरदार, त्यांचा वापर करून घेणारे राजकारणी, हितसंबंधांचे राजकारण, समाजकारण अशा विविध पडताळ्यांवरून यातल्या वास्तवाचा अंतर्वेध घेतला जातो. अशा वास्तवात काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचे कौटुंबिक भावजीवन, त्यातली ओढाताण व ताणतणाव कसे निर्माण होतात, हेही लक्षात येत राहते. अनेक भल्याबुऱ्या व्यक्ती, प्रसंग आणि घटनांतून ही कादंबरी गतिमान होते आणि वाचकाला खिन्न करून टाकते. व्यवस्थेत राहून व्यवस्थेच्याविरुद्ध झुंज देणे किती अवघड आहे, हे या कादंबरीतून पुनः पुन्हा लक्षात येते. ही व्यवस्था ध्येयवादी अधिकाऱ्यांचा पुन: पुन्हा पराभव करण्यातच धन्यता मानते आणि अशा व्यक्तीला व्यवस्थेतून बाहेर पहायला भाग पाडते. गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर वावरणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यवस्थेचे भ्रष्टाचारी स्वरूप आणि त्यात वावरणारी क्षुद्र, स्वार्थी माणसे यांचे अस्वस्थ करणारे दर्शन 'ऑक्टोपस'मध्ये विलक्षण प्रत्ययकारी स्वरूपात घडवण्यात आले आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या सर्व कथाकादंबऱ्या महत्त्वाच्या आहेतच. पण 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही ९३४ पानांची बृहद् कादंबरी हे त्यांचे मराठ

२२ ० अन्वयार्थ