Jump to content

पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कादंबरीविश्वाला (आणि म्हणून मराठी साहित्यविश्वाला) दिलेले अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे योगदान आहे. प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून श्री. देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या विषयाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आहे. ही कादंबरी अफगाणिस्तानसारख्या अति संवेदनशील राष्ट्राच्या भौगोलिक परिसरातून निर्माण झालेल्या दहशतवादी राजकारणातून निर्माण होते; त्यामागे असलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धागे-दोरे दाखवून देते. इथल्या दहशतवादाचे व्यक्ती - समाज आणि राष्ट्रजीवनावर झालेले विपरीत आणि उद्ध्वस्त करणारे परिणाम सांगते आणि असे करताना अफगाणिस्तानचा वैशिष्ट्यपूर्ण भूगोल, इतिहास, संस्कृती, कुटुंब व्यवस्था, धर्माचा पगडा, सामाजिक जीवन, परंपरा, राजकारण, अर्थकारण, इथला निसर्ग, वेळोवेळी झालेल्या क्रांत्या, आक्रमण, त्यांचे रक्तरंजित स्वरूप, सत्तांतरे, ती घडवून आणणाऱ्या व्यक्ती, दहशतवादाचा उदय आणि तो निर्माण करणाऱ्या संघटना, त्यांना मिळालेले छुपे आणि उघड पाठबळ, दहशतवादाचे हिंस्र स्वरूप आणि एकूणातच एका संपूर्ण राष्ट्राची झालेली शोकांतिका श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी फार फार समर्थपणे व प्रभावीपणे चित्रित केली आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेला 'रूपबंध' (form) ही नावीन्यपूर्ण आहे. ही कादंबरी नुसती 'फिक्शन' (Fiction) नाही, तर ‘फॅक्शन' (Faction) आहे. याचा अर्थ अफगाणिस्तानाशी संबंधित असलेल्या अधिकृत ‘फॅक्टस' आणि सृजनशीलतेने निर्माण केलेल्या कल्पितांच्या (fiction) संयोगातून या कादंबरीची निर्मिती झाली आहे, म्हणून ही कादंबरी म्हणजे 'फॅक्शन.' हा एक प्रयोग आहे आणि तो यशस्वी झाला आहे. अनेक पात्रे, प्रसंग, घडामोडी, उलथापालथी यांची रेलचेल असणारी ही कादंबरी समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग दाखवणारी मराठीतली एकमेव कादंबरी आहे, कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा आवाका केवढा मोठा असतो, त्याचे सामर्थ्य आणि सौंदर्य कसे असू शकते याचा एक वस्तुपाठच या कादंबरीने घालून दिला आहे.
 'एक लेखक म्हणून मी हे जग बदलू शकणार नाही; पण बदलणारे जग कसे असायला हवे, यासाठी भूमिका घेणाऱ्यांमधला मी एक निश्चितच असेन' असे अल्बेर कामूने म्हटले आहे. श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचीही अशीच दृष्टी आहे, असे त्यांचे साहित्य वाचून वाटते.

अन्वयार्थ । २३