पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



घडामोडीचे चित्रण करणारी मराठीतील ही पहिलीच कादंबरी असावी. श्री. विश्वास पाटील यांच्या 'महानायक' या कादंबरीतील सुभाषबाबूंच्या जपानमधील वास्तव्याचे व कार्याचे केलेले व्यासंगपूर्ण चित्रण हा एक अपवाद. अफगाणिस्थानमधील राजकीय जीवनातील रशियाच्या प्रवाहामुळे आलेला कम्युनिस्ट विचार आणि त्याला इस्लामच्या प्रभावामुळे झालेली तीव्र प्रतिक्रिया आणि या दोहोंच्या संघर्षात इस्लाम धर्माची जागा कडव्या मूलतत्त्ववादी इस्लामने घेणे यांचे चित्रण आहे. त्याचप्रमाणे सत्तेच्या राजकारणातील असहिष्णू प्रवृत्तींचा निघृण कत्तलीत होणारा भीषण आविष्कारही लेखकाने दाखविला आहे. मूलतत्त्ववादी इस्लाम आणि कम्युनिझम ही विचारांची तसेच जीवनपद्धतीची दोन टोके असली तरी एका बाबतीत त्यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. तालिबान आणि कम्युनिस्ट हे दोघेही स्वपक्षातील वा स्वत:चे जे लोक किंवा जे नेते शंभर टक्के त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना शत्रू मानून नष्ट करतात. त्यामुळे तालिबान हे हिकमतयार आणि रब्बानी यांच्याशी लढतात. आणि त्याचप्रमाणे तराकी दाऊद खानाला सफा करतो, अमीन तराकीला ठार मारतो आणि करमाल अमीनला संपवतो. या भीषण सत्तासंघर्षाचे वास्तव चित्रण लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. अशा अमानुष सत्तासंघर्षाच्या वातावरणात मानवतावादी भूमिका असणाऱ्या करिमुल्लांना तालिबान राजवटीत स्थान नाही. तेथे मुल्ला ओमरसारखा धर्माध नेता श्रेष्ठ ठरतो आणि दुसरीकडे तराकी, अमीन आणि करमाल या सर्वांना इलियास आणि अन्वर दुबळेच वाटतात. कम्युनिस्ट आणि तालिबान या दोघांनाही लोकशाही अमान्य असते. शांततेच्या मार्गाने समाजपरिवर्तन हेही त्यांना मान्य नाही. मूठभर फॅनॅटिक सत्ता हाती घेऊन आपला विचार समाजाला स्वीकारण्याची सक्ती करणे हीच त्यांना क्रांती वाटते. ही भूमिका मानवतावादी विचारांना पूर्णपणे विरोधी आहे आणि या भूमिकेचे पर्यवसान जुलमी रक्तपिपासू राजवट हेच आहे.

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' हा अफगाण जनतेच्या जीवनातील अत्यंत खडतर प्रवास. तीव्र राजकीय संघर्षामुळे जीवनाची जी उलथापालथ होते त्यात शेतीचे अतोनात नुकसान होते. हे मानवनिर्मित दु:ख कमी आहे की काय म्हणून निसर्गही कोपतो. भीषण दुष्काळ पडतो आणि हजारो माणसे मरण पावतात. जगण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून इस्माइलसारखा इमानदार शेतकरी अफूची लागवड करणाऱ्या शेतावर कामाला जातो. अफू - चरस विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळ्या यातूनच निर्माण होतात आणि या तस्करीचा आधार घेऊन गुलबुद्दीन हिकमतयार, रब्बानी आणि सर्व तालिबान नेते शस्त्रास्त्रे खरेदी करतात. अमेरिकेचे कुटिल राजकारणी धर्माध तालिबानांना कोट्यवधी डॉलर्स देतात आणि अफूच्या

१९० □ अन्वयार्थ