पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




आपापसांत भांडणे चालली असली तरी आम जनता मुख्यत: इस्लामविरोधी कम्युनिस्ट राजवटीचा तिरस्कार करीत असते. करिमुल्ला हे सर्व इस्लामवादी व्यक्तींना एकत्र येण्याचे आवाहन करतात. ते यशस्वी होत नाहीत. त्यामुळे कडवे मूलतत्त्ववादी तालिबान प्रभावी होऊ लागतात. अमेरिकेतील सत्ताधीश तालिबानला शस्त्रे आणि पैसा याचे अफाट साहाय्य करतात. आणि करमाल यांची राजवट संपुष्टात येते. दरम्यान रशियन सत्ताधीश गोर्बाचेव्ह हे अफगाणिस्थानातून फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतात. रशियाचे विघटन झाल्यामुळे महासत्ता म्हणून अमेरिका निरंकुश होते. या आंतरराष्ट्रीय उलथापालथीमुळे अफगाणिस्थानामधील कम्युनिस्ट राजवट कोलमडू लागते. डॉ. नजीब यांनी सत्ता हातात घेऊन काही काळ तडजोडी करीत कारभार केला, परंतु त्यांनाही सत्ता सोडावी लागते. तालिबान सत्ताधीश होतात. नजीब यांना ठार मारून त्यांचे मुंडके काबूलच्या चौकात टांगण्यात येते. हा सर्व रक्तरंजित इतिहास वस्तुनिष्ठपणे या कादंबरीत रेखाटलेला आहे. सत्ताधाऱ्यांचे क्रूर वर्तन, कार्यकर्त्यांची ससेहोलपट, जनतेचे अनन्वित हाल यामुळे अफगाणिस्थान हा एक 'हरवलेला देश' हे बदलण्यासाठी तालिबान इस्लामवर आधारित हुकमत स्थापन करतात. येथेही शस्त्रबळच महत्त्वाचे असते. थोडा विरोध दर्शविणाऱ्याला ठार मारण्यात येते. स्त्रियांना बुरख्यात कोंडण्यात येते. घरात डांबण्यात येते. जमीलाच्या निघृण हत्येत या कादंबरीची अखेर होते. अफगाणिस्थानच्या राजकारणातील ही भीषण हत्याकांडे, त्यात वावरणाऱ्या प्रमुख नेत्यांनी सत्ता मिळविण्यासाठी कम्युनिझम वा इस्लाम यांचा उद्घोष करीत विरोधकांना नेस्तनाबूत करून सत्ता बळकावणे, हा सारा रक्तलांच्छित घटनाक्रम यथातथ्य रीतीने या कादंबरीत दाखविला आहे. एकीकडे इतिहासाचे फिरणारे हे गतिमान चक्र आणि दुसरीकडे अन्वर, करीमुल्ला, सलमा, तराकी, अमीन, करमाल, जमीला आदींच्या जीवनाची वाटचाल यांची गुंफण लक्ष्मीकांत देशमुख यांनी अत्यंत कुशलतेने आणि कलात्मकतेने केली आहे. या प्रमुख व्यक्तिरेखांच्या भोवतालच्या साध्यासुध्या पण संवेदनशील स्त्रीपुरुषांच्या भावविश्वातील वादळे आणि त्यांच्या जीवनाच्या प्रवाहाला मिळणारी अनपेक्षित वळणे यांचेही चित्रण या कादंबरीत प्रभावीपणे केलेले आहे. भाषेचा सुयोग्य वापर आणि वातावरणनिर्मिती हे या कादंबरीचे विशेष गुण. ही कादंबरी लिहिण्यासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांनी किती गाढ व्यासंग केला आहे आणि राजकारणातील विचारप्रवाहांचे आणि इस्लामच्या स्वरूपाचे किती अचूक आकलन केले आहे याचा प्रत्यय कादंबरी वाचताना येतो. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील राजकारणाच्या जाणकारीने केलेल्या चित्रणामुळे ती केवळ ऐतिहासिक कादंबरी राहात नाही. तिचे रूप मुख्यत: राजकीय कादंबरी असे आहे. परदेशातील राजकीय

अन्वयार्थ □ १८९