पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सतत काही तरी नवं शिकत राहणं हा अनेकांचा स्वभाव असतो. असे लोक कोणत्याही परिस्थितीसत टिकाव धरण्यास सक्षम असतात. संस्थांबाबतही हे तत्व लागू पडतं. शिक्षण म्हणजे केवळ कुणाकडून तरी मिळविलेलं ज्ञान असं नसून स्वतःच्या चुकांतून मिळणारा अनुभवही बरंच काही शिकवून जातो. किंबहुना अनुभवांतून मिळालेलं ३िक्षणच महत्त्वाचं मानलं जातंं.याबाबत मला माहिती असलेला एक प्रसंग सांगतो.
 एका यशस्वी व्यवस्थापकाला विचारण्यात आलं,
 'आपल्या यशाचं रहस्य काय?'
 तो म्हणाला,'चांगले निर्णय.'
 ‘चांगले निर्णय आपण कसे घेता?’
 'माझ्या अनुभवाच्या आधारावर.'
 'आपल्याला अनुभव कसा मिळाला?’
 'वाईट निर्णयातून.'
 याचा अर्थ एवढाा की, अनुभवांतून मिळणाऱ्या शिक्षणातून माणूस बदलत जातो. हा बदल केवळ संख्यात्मक नाही,तर गुणात्मकही असावा लागतो. संस्थांच्या बाबत बोलायचं तर तो केवळ प्रक्रिया पध्दतीत किंवा कार्यपध्दतीत नव्हे तर उत्पादनांमध्ये, केवळ संस्थेच्या विस्तारात नव्हे, तर संरचनेत, केवळ व्यक्तीमध्ये नव्हे तर व्यावसायिक संबंधामध्ये आणि संस्थेच्या केवळ स्थानांमध्ये नव्हे तर संस्कृतीमध्ये व्हावा लागतो.
 हे बदल घडविण्यासाठी प्रयोगाक्षम वृत्ती असावी लागते. नवी उत्पादनं तयार करणं, नवे ग्राहक शोधणं, उत्पादन क्षमता वाढविणं, नवंं संशोधन इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये या प्रयोगक्षम वृत्तीचं प्रतिबिंब पडलं पाहिजे.विशेषतः संशोधनावर अधिक भर दिला गेला पाहिजे. अमेरिका,युरोप येथील संस्थांचा पसारा सर्व जगभर विस्तारला, तो मुख्यतः संशोधनावर भर दिल्यानेच. याउलट भारतीय कंपन्यांची वाढ संशोधनावर भर न देता केवळ उत्पादनवाढीवर भर दिल्यानं खुंटली.

 यश मिळविण्यासाठी प्रयोग करणं आवश्यक आहे. प्रयोग करताना अपयशाला तोंड देण्याची तयारीही असणं आवश्यक आहे. हजार प्रयोग केले जातात तेव्हा त्यातील एक यशस्वी ठरतो आणि अशा शंभर यशस्वी प्रयोगांपैकी एक व्यापारी दृष्टिनं यशस्वी होतो.त्यामुळे प्रयोगात अनेक अपयशं आली तरी तो न थांबवणं आवश्यक आहे. इथंच संस्थेच्या प्रयोगाक्षम वृत्तीची कसोटी लागते आणि अशी शिक्षणक्षम संस्थाच जागतिक दर्जाची समजली जातेे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२३२