पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माध्यमावर भर द्यायचे ठरवले तर पालकांना आनंदच होईल, जादा फी द्यायलाही ते तयार होतील, पण त्या मुलांना चांगले इंग्रजी शिकवू शकणारे शिक्षक कुठून आणायचे हा आमच्यापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल; कारण रयतकडे असे इंग्रजीवर प्रभुत्व असणारे शिक्षक नाहीत आणि ग्रामीण भागात असे शिक्षक मिळणेही खूप अवघड आहे.” पण ह्या सर्व अडचणींवर काही ना काही मार्ग शोधावाच लागेल, कारण रयतच्या भावी वाटचालीच्या संदर्भात हा खूप कळीचा प्रश्न असणार आहे. १७ एप्रिल २०१४च्या उपरोक्त लेखात रावसाहेबांनी या संदर्भातले शरद पवार यांचे काही विचार उद्धृत केले आहेत. रावसाहेब लिहितात : " दरवर्षी ९ मेच्या 'कर्मवीर स्मृतिदिना' च्या सोहळ्याच्यावेळी आम्ही एकत्र असताना नामदार पवार आवर्जून विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणाविषयी तसेच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाविषयी माझ्याशी संवाद करीत असत. त्याचबरोबर ते कळकळीने सांगत असत, की आपल्या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र अवगत झाले नाही, तसेच इंग्रजी भाषा चांगली आली नाही, तर त्यांना नोकरी, व्यवसायासाठी कोणीही विचारणार नाही. जीवन जगणे त्यांना मुश्कील होऊन जाईल. इतकेच नाही तर शिक्षणक्षेत्रात आम्ही फार मोठे काम करतो अशी आत्मप्रौढी मारून आपण समाजाची, विशेषतः बहुजन ग्रामीण समाजाची, घोर फसवणूक करू.' श्री. पवार यांनी अधोरेखित केलेल्या दोन गरजांपैकी संगणकशिक्षणाच्या बाबतीत एमकेसीएलच्या सहकार्याने रयतमध्ये कामाची चांगली सुरुवात झाली आहे. परंतु इंग्रजी शिक्षणाच्या बाबतीत मात्र फारसे काही घडल्याचे दिसत नाही. }) कौशल्यविकसन (स्किल्स डेव्हलपमेंट), संगणकप्रशिक्षण, आधुनिकीकरण आणि गुणवत्तावर्धन ही रयतपुढची चारी आव्हाने तशी पेलायला खूप अवघड आहेत. खरेतर ही केवळ रयतपुढचीच आव्हाने नसून आपल्या एकूणच शिक्षणक्षेत्रापुढची आव्हाने आहेत. यातल्या कुठल्याही क्षेत्रात केवळ चार-दोन पावले उचलण्याने, प्रतीकात्मक स्वरूपात काही वरवरची उपाययोजना केल्याने फारसे काही बदल घडणार नाहीत. वर्षानुवर्षे जिद्दीने प्रयत्न करत राहिल्यावर थोडेसे कुठे यश हाती पडेल अशीच ही आव्हाने आहेत. वेतन आयोगांमुळे पगारात झालेली भरीव वाढ, नोकरीतील सुरक्षितता, तणावरहित कामकाज व शिक्षकाच्या नोकरीत मिळणारे इतर अनेक लाभ यांमुळे रयतमध्ये नोकरी मिळावी यासाठी हजारो तरुण आज उत्सुक असतात. आशा करू या, की रयतच्या शाळांचा एकूण दर्जा उद्या इतका उंचावलेला असेल, की आपल्या स्वतःच्या अजुनी चालतोची वाट... ३७०