पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वांना द्यायला हवे. लेखनात काही चुका वा उणिवा राहून गेल्या असतील, तर त्यासाठी मात्र सर्वस्वी मी जबाबदार आहे. प्रकाशक म्हणून एखाद्या पुस्तकाच्या निर्मितीत सहभागी व्हायचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. त्याबाबतही थोडा खुलासा करणे उचित होईल. एखादा चांगला प्रस्थापित प्रकाशक या पुस्तकासाठी मिळाला नसता अशातला भाग नव्हता. पण पुस्तकाच्या लेखनाव्यतिरिक्त त्याचे संपादन, मुद्रितशोधन, पृष्ठरचना, फोटोंची निवड, मांडणी या सर्वांची जबाबदारी मी हौसेने पार पाडली होती. त्याचबरोबर अधिकाधिक वाचकांपर्यंत, विशेषत: ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत, हे पुस्तक जावे व त्यासाठी पुस्तकाची किंमत छायाचित्रांची बत्तीस पाने असूनही शक्य तितकी कमी असावी अशीही खूप इच्छा होती. निर्मितीचा अपेक्षित दर्जा विचारात घेता व्यावसायिकदृष्ट्या एखाद्या प्रकाशकाने या पुस्तकाची किंमत बरीच अधिक ठेवली असती व आत्ताचे बाजारभाव विचारात घेता ते तसे गैरही ठरले नसते. हे सर्व विचारात घेता मग हे पुस्तक अंतर्नादतर्फे म्हणजेच ऊर्मी प्रकाशनतर्फे प्रकाशित करावे अशी इच्छा सर्व संबंधितांनी व्यक्त केली. या सगळ्याचा परिपाक म्हणजे (या पुस्तकापुरता ) मीच प्रकाशक बनलो. एखादी साहित्यकृती वाचकांच्या हाती देणे म्हणजे नदीच्या विशाल पात्रातल्या दीपदानाप्रमाणे आहे असे म्हणतात; तो दीप कुठवर आणि कसा पोचेल ते लेखक कसे सांगणार ? पण एवढे नक्की की रावसाहेबांच्या या चरित्रातून निदान काही वाचकांना जरी आपले विचारविश्व व भावविश्व समृद्ध झाल्यासारखे वाटले, सांस्कृतिक व नैतिकदृष्ट्या उच्चतर जगण्याची ओढ लागली, समाज बदलायला हवा असेल तर त्यासाठी आधी माणूस शहाणा झाला पाहिजे आणि त्यासाठी ज्याने त्याने स्वत:पासूनच सुरुवात करायला हवी याची जाणीव झाली, तर हा लेखन प्रवास सार्थकी लागला असे वाटेल. भानू काळे १३