पान:अकबर १९०८.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
खंड २ रें.

 तिचें भाषण ऐकून सिद्धराम प्रेमगद्गदस्वरानें ह्मणाला, “प्रिये, मला तिकडे जितका काळ घालविणें आवश्यक होतें त्याहून एक पळभरही अधिक मला तेथें राहून करमलें असतें असें कां तुला वाटतें ? इकडे येत असतां मार्गांत तुझ्या दर्शनाची माझी उत्कंठा इतकी प्रबळ झाली होती कीं, मला गरुडासारखे पंख कां नाहींत म्हणून खेद होत होता. ते जर असते तर वाटेंतील पर्वत, सरितांचें उल्लंघन करून एका क्षणांत तुला येऊन भेटलों असतों. " इरावतीनें मंदस्मितपूर्वक म्हटलें, “नाथ, आपलें म्हणणें यथार्थ आहे. परंतु, मला आणखी एका गोष्टीमुळें खेद होतो आहे! मी असें ऐकतें कीं, आपलें राहणे याठिकाणी केवळ एक दोन दिवसच व्हावयाचें
असून-”

 सिद्धराम-- प्रिये-

 इतक्यांत तांबूलवाहिनीसह कमला तेथें आली आणि ह्मणाली कीं, "" पिताजी आपलें स्मरण करीत आहेत. कदाचित् त्यांना आपल्याशीं कांहीं विशेष गोष्टीसंबंधानें बोलावयाचें असेल सिद्धरामाला हा निरोप जरी वज्रघातासारखा वाटला तरी त्याला तिकडे जाणें अवश्य होतें. तांबूलवा - हिनीनें इरावतीचें हातांत तांबूल दिला. तेव्हां कमला ह्मणाली “सखें, त्यांना तांबूल दे. असा वृथा संकोच कां करीत आहेस ? ” इरावतीने डोक्यावरील व खांद्यावरील पदर ओढ्न शरीर संकुचित करून लज्जेनें खालीं पाहून आपला तांबूल धारण केलेला हात जरासा पुढे केला आणि सिद्धरामानें स्मितहास्य- पूर्वक त्या तांबुलाचा स्वीकार केला. व कमलेसह तो तेथून बाहेर निघून आला. बाहेर येतांना इरावतीकडे पाहून तो ह्मणाला, प्रिये, मी पुन्ह लवकरच येथें परत येईन तूं कांहीं चिंता करूं नकोस. "
 तेथून निघाल्यावर सिद्धराम सल्हाणाकडे आला आणि नम्रतापूर्वक प्रणाम करून तेथें हंतरलेल्या एका गालिचावर बसला. त्यास सल्हाणानें झटलें, “ तर तूं आतां पादशहा सलामत यांच्या दरबारी सेनानीपद मिळण्याच्या इच्छेनें जात आहेस ? खरोखर तुझा पिता मोठा बुद्धिमान आणि योग्य पुरुष असून अशा उत्तम समयीं त्यानें तुला तिकडे पाठदि-. ण्याचा विचार केला हें तुझें फारच मोठें भाग्य समजलें पाहिजे. मजकडून जें जें सहाय्य होण्यासारखें असेल तें तें देण्यास मी सर्वप्रकारें तयार आहे. '
"