पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६. शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील दुसरा ग्रह होय. आकाराने हा ग्रह बहुतेक आपल्या पृथ्वीएवढा मोठा आहे. याचा व्यास ७८९० मैल आहे, ह्मणजे आपल्या पृथ्वीपेक्षां हा ग्रह किंचित् लहान आहे. शुक्रापेक्षां फारच मोठे असे गुरु, नेप्च्यून वगैरे ग्रह सूर्यमालेत आहेत. शिवाय, शनि ग्रहाला जसे चंद्र आणि विलक्षण कडीं आहेत, तशा प्रकारचा चित्तवेधक देखावा या ग्रहासंबंधानें मुळींच पाहण्यांत येत नाहीं. याप्रमाणें हा ग्रह विशेष महत्वाचा व चित्तवेधक नसतां याकडे लोकांचें लक्ष फार प्राचीनकालापासून लागले आहे, हे पाहून प्रथम कांहींसें आश्चर्य वाटतें. पण, दुसऱ्या दृष्टीनें थोडासा विचार केला असतां असें समजून येईल कीं, सर्व ग्रहांपेक्षां शुक्राकडे लोकांचें लक्ष विशेष लागावें, हें साहजिक आहे. कारण, सूर्य आणि चंद्र हे जर सोडले, तर शुक्राइतका तेजस्वी तारा सर्व