पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ अंतरिक्षांतील चमत्कार. नुसत्या डोळ्यांनी शनि पहिल्या प्रतीच्या ताऱ्याप्रमाणें तेजस्वी दिसतो. परंतु दुर्बिणीवांचून शनीचीं कडीं आणि त्याचे चंद्र मुळींच दिसत नाहींत. आकारानें शनि गुरूपेक्षां लहान आहे, परंतु इतर ग्रहांपेक्षां तो मोठा आहे. शनि आपल्या पृथ्वीच्या ७१९ पट मोठा आहे. २७ व्या आकृतींत शनि व पृथ्वी यांचें परस्पर आकारमान दाखविलें आहे. त्यावरून शनीचा आकार पृथ्वीच्या आकारापेक्षां किती मोठा आहे, हें सहज लक्षांत येईल. शनि आकारानें पृथ्वीपेक्षां जरी इत- का मोठा आहे, तरी त्याचें वजन त्या मानानें जितकें असेल असे वाटतें तितकें नाहीं. पृथ्वी ज्या द्रव्यांची बनलेली आहे, तीं द्रव्यें हल्लीं ज्या भरींव स्थितींत आहेत, तशीं शनीचीं द्रव्यें जर असती, तर शनि वजनांतहि पृथ्वीच्या ७१९ पट अधिक भरला असता. परंतु जरी शनि आकारानें पृथ्वीपेक्षां ७१९ पट मोठा आहे, तरी वजनांत तो पृथ्वीपेक्षां सारा ८० पटच अधिक भरतो ! यावरून हे उघड आहे कीं, शनीवरील द्रव्यें पृथ्वीवरील द्रव्यांपेक्षां फार हलकी आहेत. ह्या ग्रहावरील द्रव्यें इतर सर्व ग्रहांवरील द्रव्यांपेक्षां इतकीं हलकीं आहेत कीं, त्यांचें वजन पाण्यापेक्षांहि कमी आहे असें ह्मणतात. आकारानें शनीएवढा मोठा असा जर एक पाण्याचा गोल केला, तर तो देखील शनीपेक्षां जड़ येईल ! एका प्रचंड महासागरांत जर आपणांस शनिग्रह ठेवितां आला, शनीचा गोळा पाण्यांत नबुडतां त्याचा भाग पाण्याच्या वर तरंगत राहील !