पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मातीत पाय रोवताना


 शरद जोशी स्वित्झर्लंड सोडून सहकुटुंब भारतात परतले १ मे १९७६ रोजी.
 ते आणीबाणीचे दिवस होते. २५ जून १९७५मध्ये पुकारलेल्या आणीबाणीला सुरुवातीला झालेला थोडाफार विरोध थोड्याच दिवसांत मावळला होता. काही लोकशाहीप्रेमी सरकारविरुद्ध लढा देत होते, पण तो बहुतांशी छुप्या स्वरूपातला होता; जाहीररीत्या सरकारविरुद्ध कारवाया अशा होत नव्हत्या. 'गाड्या बघा आता कशा अगदी वेळेवर धावतात!' हे कौतुक सारखे कानावर पडायचे.
 योगायोग म्हणजे त्या दिवशी जोशींनी पुण्याला जाण्यासाठी डेक्कन क्वीन पकडली. तेव्हा ती नेमकी अर्धातास उशिरा सुटली होती! आणीबाणीसमर्थकांचा निदान एक दावा तरी चुकीचा होता ह्याचा त्यांना प्रत्यय आला!  आपले बहुतेक घरगुती सामान त्यांनी युरोपातून बोटीने मागवले होते व ते येण्यास अजून काही दिवस लागणार होते. कपडे वगैरे आवश्यक तेवढ्या सामानाच्या चार बॅगा घेऊन, पत्नी लीला आणि गौरी व श्रेया ह्या दोन मुली यांच्यासह ते टॅक्सीने विमानतळावरून दादर स्टेशनवर आले होते व तिथेच त्यांनी व्हीटीहन नेहमी संध्याकाळी पाच दहाला निघणारी डेक्कन क्वीन पकडली होती. प्रथम वर्गाची तिकिटे असल्याने गाडीत जागा तर मिळाली, पण पूर्वीप्रमाणे गाडीत कुठेच कोणाच्या गप्पा रंगल्या नव्हत्या. सगळा शुकशुकाट.
 "कधीच लेट न सुटणारी गाडी आज चक्क अर्धा तास लेट सुटली!" शेजारच्या माणसाला ते सहज काहीतरी गप्पा सुरू करायच्या म्हणून म्हणाले, तशी त्याने व आजूबाजूच्या दोन-तीन जणांनी चमकून त्यांच्याकडे पाहिले. सगळ्यांचेच चेहरे सावध दिसत होते. भारतात सध्या प्रचंड सरकारी दहशत आहे हे त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असताना वाचले होते व ते खरेच असावे हे त्या पहिल्याच संध्याकाळी जाणवले. पुढचा प्रवास जोशी कुटुंबीयांनी आपापसातच वरवरच्या गप्पा मारत पार पाडला.

 त्यांच्यासारख्या कमालीच्या स्वातंत्र्यप्रेमी आणि त्यातही पुन्हा स्वित्झर्लंडसारख्या देशात आठ वर्षे राहून परत येणाऱ्या गृहस्थाला ही दहशत बोचणारी होती. पण त्याचवेळी कसाही असला, तरी हाच आपला देश आहे आणि यापुढे आपण इथेच राहायचा निर्णय स्वखुशीने घेतला आहे ह्याची जाणीव त्यांना होती. सगळ्या राजकीय घडामोडींपासून आपण अगदी अलिप्त राहायचे आहे व फक्त शेतीवरच आपले सर्व लक्ष केंद्रित करायचे आहे, ह्याची

८४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा