पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जिनिव्हाला जाऊन कॉम्प्युटर व टेलेकम्युनिकेशन्स शिक्षणाचा एक तीन महिन्यांचा कोर्स करायची त्याची इच्छा होती. त्यासाठी बरीच धडपड करून त्याने ऑफिसची परवानगी मिळवली व तो कोर्स पूर्णही केला. हा कोर्स करणारे त्यावेळी आमच्या ऑफिसात अगदी थोडे लोक होते. संध्याकाळी घरी गेल्यावरदेखील तो वेगवेगळे पार्ट्स जोडून इलेक्ट्रॉनिकची ट्रेन तयार करायचा खेळ खेळण्यात रंगन जायचा. त्यासाठी त्याने बरीच महागडी साधनंही खरेदी केली होती."
 जोशींची तंत्रज्ञानाची ही आवड पुढे आयुष्यभर कायम राहिली. म्हातारपणी ज्यावेळी हात कापत असल्यामुळे संगणकावर अक्षरलेखन करणे त्यांना जमेना त्यावेळी नुकतेच बाजारात आलेले Dragon Naturally Speaking या नावाचे एक आवाज ओळखून कळफलक वापरणारे सॉफ्टवेअर त्यांनी कुठूनतरी मिळवले, ते आत्मसात केले व पुढची तीन-चार वर्षे त्याचा वापर करून आपले इंग्रजी लेखन केले. पुढे पुढे मात्र अर्धांगवायूच्या झटक्यानंतर त्यांच्या आवाजात संदिग्धता आली व त्यानंतर मात्र त्यांना इंग्रजी लेखनासाठीही लेखनिकावर अवलंबून राहावे लागले.
 १९७२-७३ या कालावधीत लोझान ह्या मोठ्या स्विस शैक्षणिक शहरात शनिवार-रविवार जाऊन-येऊन त्यांनी एक कोर्सही केला होता – Diploma in Data Processing, Computer Programming and SystemsAnalysis. यानंतर ऑफिसात 'हेड. डेटा प्रोसेसिंग सेंटर' या पदावर त्यांची नेमणूक झाली. नोकरी सोडली, तेव्हा ते ह्याच पदावर होते.
 जिनिव्हा येथे राहणारे मोरेश्वर ऊर्फ बाळ संत नावाचे एक इंजिनिअर मला तिथे भेटले. जोशींना ते चांगले ओळखत होते. इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियन ह्या युएनच्या घटकसंस्थेत ते नोकरी करत होते. जोशी यांनी जिनिव्हाला जाऊन जो कोर्स केला होता, तो संत ह्यांच्या संस्थेनेच युएनच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून खास तयार केला होता. जोशी तो कोर्स करण्यात किती रमले होते, बाजारात येणाऱ्या कुठल्याही नव्या संशोधनाबद्दल ते किती उत्साहाने चौकशी करत ह्याबद्दल संतदेखील सांगत होते. "मी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा विद्यार्थी, जोशी मात्र अर्थशास्त्राचे विद्यार्थी; पण आमच्या गप्पा नेहेमी तंत्रज्ञानाबद्दल असत," ते म्हणाले. युपीयुच्या कामासाठी जोशी यांना जिनिव्हाला वारंवार यावे लागे व त्यामुळे दोघांच्या भेटीही वरचेवर होत.

 तंत्रज्ञानाचे व्यापक सामाजिक महत्त्व कोणाच्याही सहज लक्षात यावे अशीच स्वित्झर्लंडमधली परिस्थिती होती. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या दूधशेतीत तंत्रज्ञानाचा वापर पावलोपावली होत होता. एका प्लॅटफॉर्मवर गाय उभी राहायची, तिच्या आचळांभोवती यांत्रिक दुग्धशोषक (suckers) जोडले जायचे, ठराविक वेळात दूध काढले गेले की ते आपोआप मोकळे व्हायचे, सरकत्या प्लॅटफॉर्मवरून ती गाय पुढे जायची व तिच्या जागी पुढची गाय यायची. पुढे हे दूध पाइपलाइनीतून एकत्र करणे, ह्या दुधावर प्रक्रिया करणे, त्याचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करणे, ते साठवणे, त्याचे पॅकिंग, वितरण इत्यादी सर्व प्रक्रियांमध्ये मानवी हस्तस्पर्श अजिबात नाही.

८२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा