पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वागणे, कसलाच तुटवडा नसल्याने आणि म्हातारपणाची उत्तम सोय सरकारने केलेली असल्यामुळे वागण्यात सहजतःच आलेले औदार्य, व्यक्तिस्वातंत्र्याची पराकोटीची जपणूक, लोकांचे निसर्गप्रेम, त्यांचे क्रीडाप्रेम, सर्व सोयींनी युक्त अशी मैदाने, प्रशस्त तरणतलाव, घराघरातून फुललेली रंगीबेरंगी फुले, सुदृढ व टवटवीत चेहऱ्यांचे नागरिक हे सारेच खूप आनंददायी होते. इथे आठ वर्षे काढल्यावर आर्थिक समृद्धीचे सर्वंकष महत्त्व त्यांना पूर्ण पटले. उर्वरित आयुष्यात व्यक्तिगत पातळीवर ते बहुतेकदा साधेपणेच राहिले; पण त्यांनी अर्थवादाचे महत्त्व कायम अधोरेखित केले व कधीही दारिद्र्याचे उदात्तीकरण केले नाही.
 मनावर ठसलेला दुसरा मुद्दा म्हणजे देशाच्या या एकूण समृद्धीत समृद्ध शेतीचे असलेले पायाभूत महत्त्व.
 स्वित्झर्लंडच्या समृद्धीमागे अनेक घटक आहेत हे नक्की, पण शेतीतील समृद्धी हा त्यांतील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. शेतीतील फायद्यातूनच तिथे आधी शेतमालावर प्रक्रिया करणारे छोटे कारखाने उभे राहिले, त्यातून इतर ग्रामोद्योग, विकसित अशी ग्रामीण बाजारपेठ, ग्रामीण समृद्धी व त्यातून मग मोठाले उद्योग असा तेथील विकासाचा क्रम आहे. त्याच्या मुळाशी आजही शेती हीच आहे. ह्याची स्पष्ट कल्पना असल्यामुळेच तेथील सरकार शेतीला सर्व प्रकारे उत्तेजन देते. शेतीत वापरता येतील अशी अत्याधुनिक उपकरणे शेतकऱ्याला उपलब्ध असतात. शेतीमालाची साठवणक करण्यासाठी गदामे, शीतगहे वाहतूक करण्यासाठी वाहने व रस्ते, विक्रीसाठी सुसज्ज बाजारपेठ, भांडवली खर्चासाठी अत्यल्प व्याजदरात कर्जाची उपलब्धता, वीज व पाणी ह्यांचा अनिर्बंध पुरवठा या व अशा इतरही अनेक कारणांमुळे तेथील शेती आजही अतिशय किफायतशीर आहे – विशेषतः दूध शेती (Dairy Farming). या छोट्याशा देशामध्ये, ज्याची लोकवस्ती जेमतेम ८० लाख, म्हणजे आपल्या मुंबईच्या निम्म्याहून कमी आहे अशा देशात, आज २६,००० सहकारी दूध संस्था आहेत व त्यातील बहुतेक सर्व चांगल्या चालतात. इथे गायींना कोणीही गोमाता म्हणून पूजत नाही, पण इथल्या गायी धष्टपुष्ट असतात, उत्तम काळजी घेऊन निरोगी राखल्या जातात आणि रोज सरासरी तीस-चाळीस लिटर दूध देतात. ह्या दुधापासून दही, लोणी, चीज, दूध पावडर वगैरे अनेक उत्पादने मोठ्या प्रमाणावर तयार होतात व त्याला जगभरातून प्रचंड मागणी आहे. ह्या समृद्ध शेतीतूनच पुढे त्यांनी देशाचा औद्योगिक विकासदेखील केला; पण औद्योगिकीकरण करताना त्यांनी शेतीकडे कधीच दर्लक्ष केले नाही. हे सारे जोशी यांना तिथे जवळून बघता आले, अभ्यासता आले.
 तिसरा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचे मानवी विकासातील पायाभूत महत्त्व.
 इथल्या वास्तव्यात जोशी यांना स्वतःला तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. कदाचित ती उपजतदेखील असू शकेल, पण इथे तिला भरपूर वाव मिळाला असेही म्हणता येईल. टोनी सांगत होते,

 "ऑफिसात कुठलंही नवं उपकरण आलं, की ते कसं वापरायचं हे शिकून घेण्यात तो आघाडीवर असायचा. कॉम्प्युटरचा वापर त्यावेळी बराच मर्यादित होता, पण तरीही

डोंगरकुशीतल्या नंदनवनात८१