पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपूर्ण दिवस जोशी या विद्यार्थ्याबरोबरच घालवू लागले; त्यांचे वागणे-बोलणे, उठणे-बसणे जवळून पाहू लागले. वर्गातील बहुतेक विद्यार्थी छोट्या छोट्या गावांतील शेतकरी कुटुंबातील होते. ते बहुसंख्य विद्यार्थी आणि सुशिक्षित कुटुंबातील मूठभर शहरी विद्यार्थी यांच्यातली दरी अनुल्लंघनीय वाटावी इतकी प्रचंड होती. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाची काहीच परंपरा नव्हती, इंग्रजीचा गंधही नव्हता, आर्थिक ऐपतही नव्हती. ते कुपोषित आहेत हे त्यांच्याकडे बघितल्याबरोबरच कळत असे. ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकून ती मुले आता एकदम कोल्हापूरच्या कॉलेजात दाखल झाली होती. अत्यंत मागासलेले त्यांचे कुठलेतरी आडगाव आणि कोल्हापूरसारखे तुलनेने समृद्ध असलेले शहर यांच्यातील फरकच इतका होता, की हे विद्यार्थी अतिशय बुजरे, न्यूनगंडाने ग्रस्त, आपसातच कोंडाळे करून राहणारे असे बनले होते. इतके दिवस कधी जोशींनी त्यांच्याबद्दल असा बारकाईने विचारच केला नव्हता. पण त्या दिवशी खांडेकरबरोबर भेट झाल्यावर त्यांचे डोळे एकाएकी उघडल्यासारखे झाले. दिवसभरात जेव्हा कधी मोकळा वेळ मिळे, तेव्हा जोशी आपल्या विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करू लागले. शहरात आल्यावर कुठल्या कुठल्या अडचणींशी त्यांना झगडावे लागते, कुठले विचार त्यांच्या मनात घोळत असतात ह्याची जोशींना चांगलीच कल्पना आली. जोशी लिहितात,

त्यावेळी माझ्या लक्षात आले नव्हते, की माझ्याबरोबरचे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी यांत महदंतर होते. आर्थिक चणचण असली तरी, सिङनममधला विद्यार्थी जात्याच आणि संस्काराने सर्वांगपरिपूर्ण होता. त्याच्या अवयवांत दोष नव्हता; व्यायाम केल्यास आणि खुराक मिळाल्यास तो बलभीम बनू शकत होता. पण कोल्हापुरात माझ्यासमोर भक्तिभावाने ऐकणारे विद्यार्थी अपंग होते. एका अर्थाने मतिमंद होते. प्राध्यापकाला उड्डाण करताना पाहता पाहता स्वतःही पंख उभारून उडण्याचा प्रयत्न करण्याचेही सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. पिढ्यान्पिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते. तसे ते शिक्षणासाठीही आलेले नव्हते. महाविद्यालयाचा परीस अंगाला लागला तर शेतीच्या खातेऱ्यातून सुटू या आशेने ते आलेले होते. महाविद्यालय, शिक्षण, प्राध्यापक ही त्यांच्या दृष्टीने प्रगतीची साधने नव्हती, अपरिहार्यपणे उल्लंघण्याचे अडथळे होते. आणि हे अडथळे ओलांडत खेड्याच्या जीवनातून जिवंत कसे सुटता येईल हे ते घाबऱ्या डोळ्यांनी निरखत होते.

पुढे अनेक वर्षांनंतर जोशींनी लिहिलेल्या 'महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र' ह्या हृदयस्पर्शी लेखात त्यांचे स्वतःचे त्यावेळचे निरीक्षण व त्यातून स्फुरलेले चिंतन उत्तम प्रतिबिंबित झाले आहे. त्यात जोशी लिहितात :

व्यावसायिक जगात४५