पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहिल्यांदा शरद जोशींना मी पत्र लिहिलं. 'मी नोकरी सोडली आहे. शेतकरी संघटनेच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा पहिला हक्क, तुमचा एक विद्यार्थी म्हणून, माझा आहे. मला तो द्यावा ही आग्रहाची विनंती.' लगेच चार-पाचदा त्यांचा मला फोन आला. फोन दुसरीकडे असल्याने मला निरोप मिळायला उशीर झाला. जेव्हा मिळाला तेव्हा धावतपळत त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले, 'अरे, तू मोठा झालास. तीन-चार निरोप पाठवायला लागतात.' मी सत्य परिस्थिती सांगितली. जाहिरातींचं एस्टिमेट दिलं आणि सांगितलं, 'मी नुकतीच एजन्सी सुरू केली आहे, त्यामुळे काही ठिकाणी आधी पैसे द्यावे लागतील.' तेव्हा ते म्हणाले, 'जर आम्ही तुला पैसे दिले नाहीत, तर आम्ही सगळे तुझ्या घरी भांडी घासायला येऊ.' मी म्हणालो, 'पण सर, माझ्या घरी घासायला भांडी असली पाहिजेत ना!' त्यावर ते मंदसं हसले आणि त्यांनी मला आपल्या वैयक्तिक खात्यातून काही रकमेचा चेक दिला. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं.

सुरुवातीला वर्गात शिकवण्यापलीकडे जोशींनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात फारसे कधी डोकावून बघितले नव्हते. दुसऱ्याच्या जीवनात फार दखल घेण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता. पण नंतरच्या एका अनुभवाने त्यांना एक वेगळी दृष्टी दिली. एकदा गेस्टहाउसवर रात्रीचे जेवताना त्यांना वाढणाऱ्या मुलाने चाचरत चाचरत विचारले. "सर, मला ओळखलंत का?" त्यांनी मुलाकडे नीट मान वर करून बघितले, पण त्यांना काहीच ओळख पटेना. त्यांच्या कोऱ्या चेहऱ्याकडे बघून मुलानेच खुलासा केला. म्हणाला, "सर, मी तुमच्या वर्गातलाच एक विद्यार्थी आहे. खांडेकर माझं नाव." आपल्याच कॉलेजातला एक गरीब विद्यार्थी इथे चक्क वाढप्याचे काम करतो आहे, हे लक्षात येताच जोशी काहीसे हादरलेच. त्यांना एकदम आपल्या वडलांची आठवण झाली. एकेकाळी तेही ह्याच कोल्हापुरात वाढले होते; एक अनाथ विद्यार्थी म्हणून. कसेबसे माधुकरी मागून, वार लावून इकडेतिकडे जेवत. लहानपणी वडलांकडून ऐकलेले ते दिवस अचानक आठवले आणि जेवता जेवता जोशींना गलबलून आले, घासही गिळवेना. आपल्या वर्गातल्या इतर मुलांचे चेहरे त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. त्यांचीही परिस्थिती काही फारशी वेगळी असणार नव्हती. ते म्हणतात, “मी, माझी परीक्षा, माझे भविष्य, माझी स्वप्ने यांच्यापलीकडे असलेल्या एका जगाचा पडदा खांडेकरने उघडून दाखवला होता."

यानंतर काही दिवसांनी ते कॉलेजच्या वसतिगृहावरच राहू लागले; कारण वसतिगृह सांभाळणे ही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. त्याकाळी ग्रामीण तरुणांनी शहरातील कॉलेजात शिकायला यायचे प्रमाण तसे कमी होते; पुढे सरकारने सर्वांच्या फीची व्यवस्था केल्यावर व इतरही सवलती उपलब्ध झाल्यावर ते वाढले. त्यावेळी जी मुले शहरात शिकायला येत, त्यांना वसतिगृहात किंवा अशीच कुठेतरी स्वतःची सोय करावी लागे. आता

४४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा