पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा चेहरा करून नुसते ऐकत राहायची. जोशींची एकूण देहबोलीही अशी असायची, की हात वर करून काही शंका विचारायचीदेखील मुलांना भीती वाटायची. कधी कोणी धाडस करून काही विचारलेच तर जोशी 'एवढं कसं कळत नाही तुम्हाला?' असेच जणू सुचवणाऱ्या नजरेने बघायचे. कधी कधी जोशींना वाटायचेदेखील, की मुलांना सगळे समजेल अशा सोप्या भाषेत शिकवावे. पण मग सिडनममधले प्राध्यापक त्यांच्या डोळ्यापुढे येत – मुरंजन, दीक्षित वगैरे. आपण शिकवतो ते सारे विद्यार्थ्यांना समजते आहे की नाही ह्याची काळजी तेही करत नसत. आपल्याच नादात, आपल्याच गतीने ते शिकवत जायचे. जोशींसारख्ने विद्यार्थी जीव मुठीत धरून त्यांच्यामागे धावायचे; पुरती दमछाक व्हायची; पण मग हळूहळू जोशींचा दम वाढत गेला, स्वतःच झेप घ्यायची ताकद आली आणि काही दिवसांनी सगळे प्रयत्नांती समजू लागले. 'मग मीतरी विद्यार्थ्यांच्याच गतीने कशासाठी जायचे? त्यांचे त्यांनाच नाही का हळहळू समजू लागणार?' - जोशी स्वतःला विचारत. त्याचबरोबर आणखीही एक होते; आपल्या इंग्रजीवरील प्रभुत्वाचा व सिडनमसारख्या कॉलेजातील उच्चभ्रू वातावरणात सहा वर्षे काढल्याचा जोशींना, नाही म्हटले तरी, अभिमान होताच. त्यांच्या शिकवण्यातही त्यामुळे थोडासा डामडौल, थोडासा मिरवण्याचा भाग यायचा. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, "मोराने आपलाच पिसारा खुलवून नाचावं आणि त्यातच समाधान मानावं तसा हा प्रकार होता."

त्यांचे त्यावेळचे एक विद्यार्थी शरद देशपांडे लिहितात,

जोशीसर अतिशय कमी बोलायचे. एकूण प्रकृती गंभीर. त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त भीती वाटायची. विद्यार्थ्यांत मिसळणं, त्यांच्याशी गप्पा मारणं वगैरे दूरची बात. एकच वर्ष ते आम्हाला शिकवायला होते. निरोप समारंभात ते म्हणाले, 'माझ्या पहिल्या प्रयोगाचे बेडूक तुम्ही झालात.' आज मी म्हणेन – तुमच्या प्रयोगातून एकतरी बेडूक आज सुखरूप सुटला आहे; तो महासागर तरून गेला आहे. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा त्याने फार काही मिळवलंय. तुम्ही शिकवलेल्या विषयातच-सेल्समनशिप आणि पब्लिसिटी. मराठी जाहिराती वाचायच्या असतात हे पुणेकरांना त्याने दाखवून दिलंय. कोल्हापूरच्या तांबड्या मातीत बीज पेरलं, पण पुण्याच्या सुपीक भूमीत ते बीज रुजलंय. (चतुरंग दैनंदिनी २०१२, पृष्ठ ८७-८८)

शरद देशपांडे यांनी पुढे पुण्यात सेतू नावाची एक जाहिरात एजन्सी काढली, ती उत्तमप्रकारे वाढवली व अनेक वर्षांनी शेतकरी संघटनेशी त्यांचा व्यावसायिक पातळीवरही संबंध आला. याच लेखात त्याबद्दल देशपांडे लिहितात,

व्यावसायिक जगात४३