पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पातळीवर त्यांना जे आकलन झाले होते, ते त्यांच्या स्वतःच्या मनात स्वानुभवातून अधिक खात्रीपूर्वक सिद्ध झाले. आपल्या विचारांवरची त्यांची निष्ठा त्यामुळे कमालीची दृढ झाली. कुठलाही विचारवंत, कुठलीही अन्य मांडणी आता त्यांच्या ह्या वैचारिक निष्ठेला धक्का पोचवू शकणार नव्हता. पुढील आयुष्यात त्यांना भेटणाऱ्या अनेकांना त्यांचा हा विचारांचा ठामपणा - जो काही जणांना अहंकार वाटत असे तो - प्रकर्षाने जाणवत असे.
 दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्यक्ष शेतकऱ्याशी आता ते पूर्णतः समरस होऊ शकत होते; कारण अनुभवाच्या ह्या समान धाग्याने आता त्यांना शेतकऱ्यांशी जोडले होते. अन्य अर्थतज्ज्ञ आणि शरद जोशी ह्यांच्यातील हा एक फार महत्त्वाचा फरक होता. त्यांचे आकलन आता केवळ मेंदूच्या पातळीवर नव्हते; शेतात स्वतः गाळलेला घाम, चिखलात स्वतः बरबटून घेतलेले हात, आकाशाकडे डोळे लावून स्वतः केलेली पावसाची प्रतीक्षा, बाजारपेठेत आपल्या मालाला किती भाव मिळेल ह्याची रात्रंदिवस स्वतः वाहिलेली काळजी ह्या सगळ्याची आता ह्या आकलनाला जोड मिळाली होती. शेतकऱ्याबरोबर साधलेल्या ह्या भावनिक ऐक्यामुळेच हा ऐषारामात जगलेला विचारवंत एकाएकी तापलेल्या रस्त्यावर बसून रस्ता रोको करू शकला, शेतकऱ्यांना अधिक भाव मिळावा म्हणून उपोषण करू शकला, असंख्य अडचणी सहन करत खेडोपाडी भाषणे देत फिरू शकला, मानसन्मान, प्रसिद्धी, कीर्ती, पैसा लाभेल की नाही ह्या सगळ्याचा विचारही त्या रणरणत्या उन्हात पायपीट करताना, रस्त्यावर मांडी ठोकून बसताना त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यामुळेच जन्माने ब्राह्मण असलेला, शिक्षणाने अर्थतज्ज्ञ असलेला, कर्माने उच्च नोकरशहा असलेला, वृत्तीने विचारवंत असलेला आणि घराण्यात शेतीची काहीही पार्श्वभूमी नसलेला हा माणूस लक्षावधी शेतकऱ्यांचे पंचप्राण बनू शकला.

 शेतकरी संघटनेने आपला कार्यक्रम फक्त एक-कलमी ठेवला - शेतीमालाला उत्पादनखर्च भरून निघेल असा रास्त भाव मिळवणे. शासनाकडे ते रास्त भावाची मागणी करतात तीदेखील आज तो शेतकरी अगदी खचला आहे, शक्तिहीन झाला आहे, पराधीन बनला आहे म्हणून; आणि मुख्य म्हणजे त्याचा सर्व शेतीव्यवसाय सरकारच्याच नियंत्रणाखाली आहे म्हणून. मरणोन्मुख रुग्णाला सलाइनवर ठेवावे तसाच हमीभाव हा तात्पुरता उपाय आहे. अंतिमत: त्यांना हवे आहे ते घामाचे रास्त दाम. अनुदान, करुणा यांवर त्यांचा विश्वास नाही. त्यांची खात्री आहे की एकदा हा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला, की मग त्याला कुठल्याही कुबड्यांची गरज पडणार नाही. आपला हा मुद्दा जोशींनी अनेकदा मांडला आहे.

 समाजापुढे तसे असंख्य प्रश्न असतात – बेरोजगारी, प्रदूषण, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार इत्यादी; पण आपण सध्या ह्या एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, कारण एकदा आपण तो भाव मिळवला, की मग त्यातून येणाऱ्या समृद्धीमुळे आपले अनेक इतर प्रश्न सुटणार आहेत, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. ते म्हणतात,

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी२४५