पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहील ह्याची दक्षता घेतली जायची. अगदी लाखालाखाची सभा असली, तरी व्यासपीठ म्हणून एखादा उंचवटा बघायचा व त्यावर तात्पुरते स्टेज उभारायचे; बाकी शामियाना, सुसज्ज मांडव वगैरे प्रकार फारसा नसायचा. शेतकरी नेहमीच आपली भाकरी स्वतः बांधून आणायचे किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम असायचा तिथले स्थानिक लोक ती जबाबदारी घ्यायचे. त्यातूनही जो काही थोडाफार खर्च व्हायचा, तो कार्यकर्ते त्या-त्या वेळी आपापसांत पैसे गोळा करून भागवायचे.
 नेता बनण्यासाठी जोशींनी कधी पारंपरिक उपायांचाही अवलंब केला नाही. अन्य नेत्यांप्रमाणे त्यांनी कधीच खादीचा कुर्ता-पायजमा घातला नाही; आपली जीन आणि पांढरा मनिला किंवा टी-शर्ट हाच पोशाख कायम ठेवला. आपण खूप कार्यमग्न आहोत असा आभास निर्माण केला नाही; प्रतिमानिर्मिती केली नाही. त्यांच्या अवतीभवती पीए, शिपाई वगैरेंचे जाळे कधीच नसे. सर्व पत्रव्यवहार ते स्वहस्तेच करत; फोन स्वतःच करत व कोणाचा आला तरी स्वतःच रिसिव्हर उचलत. कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी सहज भेटत. त्यामागे कुठचाही नाटकी आविर्भाव नसे. एवढेच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांच्या घरच्या कार्याला वा मयताला आवर्जून हजर राहावे असा अट्टहासही त्यांनी कधी ठेवला नाही. अगदी आंदोलनात जखमी झालेल्या एखाद्या कार्यकर्त्यालाही बघायला ते ताबडतोब जातीलच असे नसायचे. म्हणजे शक्य तेव्हा ते जायचे, नाही असे नाही, पण इतर काही महत्त्वाचे काम निघाले, तर आज जनसंपर्कासाठी अत्यावश्यक मानल्या गेलेल्या असल्या औपचारिकतेला त्यांनी खूपदा फाटाही दिला. पण त्यांची शेतकरीहिताची कळकळ इतकी उघड असे, की त्यांच्याविषयी कोणाही कार्यकर्त्यांचे गैरसमज होत नसत.
 त्यांचे भाषणही कृत्रिम चढउतारांनी, घोषणाबाजीने रंगवलेले नसे. ते उगाचच ग्रामीण ढंग बोलण्यात आणत नसत; प्रमाणभाषाच वापरत. संथ, गंभीर आवाजात बोलत. ते नेहमीच उत्स्फूर्त बोलत. मुद्दे लिहिलेल्या कागदाचा किंवा अन्य कुठला आधार घेऊन त्यांनी कधीही भाषण केले नाही. पण त्यांचे बोलणे इतके मनापासूनचे असे, की ते शेतकऱ्यांच्या अंतःकरणाला थेट भिडत असे. विचारच इतके स्पष्ट, प्रभावी असत, की अन्य सजावटीची वा वक्तृत्वतंत्राची गरज भासत नसे. त्यांच्यावर जितके प्रेम शेतकऱ्यांनी केले तितके क्वचितच कधी कोणाला लाभले असेल.

 इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. शेतकऱ्याच्या व पर्यायाने एकूणच भारताच्या दारिद्र्याचे मूळ हे कोरडवाहू शेतीत आहे ह्याची जाणीव खरे तर स्वित्झर्लंडमध्ये असतानाच जोशींना झाली होती. मग भारतात येऊन तीन वर्षे प्रत्यक्ष शेती केल्यामुळे नेमके काय साध्य झाले?
 त्यातून बहुधा दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या असाव्यात -

 पहिली म्हणजे, शेतीत भरपूर भांडवल गुंतवले, खते-औषधे वापरली, जिवापाड मेहनत घेतली तरीही भारतातली शेती किफायतशीर होत नाही हे त्यांना कळून चुकले. वैचारिक

२४४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा