पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेही इथे आले होते. जोशी आणि परुळकरांच्या पाठोपाठ दोन-तीन तासांतच बीबीसी टेलेव्हिजनची व्हॅन तिथे पोचली. जोशींनी फोनवर सांगितल्यानुसार सरळ सुभाष जोशींच्या घरी ती इंग्रज टीम आली. शरद जोशींच्या पाठोपाठ हा परदेशी टेलेव्हिजनवाल्यांचा ताफा आलेला पाहून निपाणीतील प्रतिष्ठित मंडळी चांगलीच अवाक् झाली होती! त्यांच्या नजरेत शरद जोशींचा भाव त्यामुळे वधारला होता! या टीमने शरद जोशींची तिथेच मुलाखत घेतली व नंतर तिचा समावेश असलेला एक माहितीपटही बीबीसी टेलेव्हिजनवर दाखवला गेला.

 दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ फेब्रुवारी १९८१ रोजी, निपाणीतल्या नेहरू चौकात शरद जोशींची निपाणीमधली पहिली जाहीर सभा झाली. तुडुंब गर्दी झाली होती. आठ-दहा हजार विडी व तंबाखू कामगार स्त्रिया हजर होत्या व सुमारे दोन हजार तंबाखू शेतकरीदेखील.
 आपल्या निपाणीतल्या त्या पहिल्या भाषणात शरद जोशी म्हणाले :
 "शेतकरी आंदोलनाचं किंवा तुमच्या येथील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचं मी नेतृत्व करावं असा माझा अट्टहास मुळीच नाही. ह्याउलट मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, की कुणी जर अशा प्रकारे नेतृत्व करतो म्हणू लागला, तर सर्वप्रथम त्याला नीट तपासून खात्री करून घ्या व ती पटल्यावर मगच त्याच्यावर विश्वास ठेवा."
 ह्यानंतर नेहमीप्रमाणे गरिबीचे मूळ शेतीमालाच्या अपुऱ्या किमतीत कसे आहे, शेतीमालाला योग्य किंमत मिळाली की बाकीचे प्रश्न कसे सुटतील, उत्पादनखर्च कसा काढायचा, इंडिया विरुद्ध भारत, दारिद्र्यामुळे त्याच्या आयुष्यात येणारी लाचारी वगैरे आपले मुद्दे त्यांनी मांडले. सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन त्यांचा शब्दन्शब्द कानात साठवत होते. टाळ्यांच्या प्रचंड गजराने श्रोत्यांनी त्यांना अभिवादन केले व एकप्रकारे त्यांच्या नेतृत्वावर ह्या पहिल्या सभेतच शिक्कामोर्तब झाले.
 सुभाष जोशींना निपाणीत किती आदराचे स्थान आहे हे निपाणीत पाऊल टाकल्यापासूनच शरद जोशींना जाणवले होते. म्हणूनच आपण सुभाष जोशींना त्यांच्या स्थानावरून दूर करून शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वतःकडे घेत आहोत, ती आपली महत्त्वाकांक्षा आहे हे चित्र त्यांना निर्माण होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळेच त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नेतृत्वाचा मुद्दा विस्ताराने स्पष्ट केला होता.
 पण तरीही ह्या पहिल्या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद शरद जोशींना सुखावून गेला व मुख्य म्हणजे स्वतः सुभाष जोशींनीसुद्धा त्यांचा वडील भाऊ म्हणूनच जणू स्वीकार केला. अनौपचारिक गप्पांमध्ये दोघांना एकमेकांची अधिक जवळून ओळख पटत गेली, कौटुंबिक पातळीवरचा परिचयही दृढ होत गेला.

 नंतरचे काही दिवस शरद जोशींचा मुक्काम सुभाष जोशींच्या घरीच होता. दोघांनी एकत्रित सगळ्या परिसरात दौरे केले. चिकोडी तालुक्यातील ५१ खेड्यांमध्ये तसेच हुक्केरी व गोकाक ह्या तालुक्यांमध्ये, आणि बेळगाव व कोल्हापूर ह्या शहरांमध्येही त्यांनी शेतकरी व शेतमजूर यांचे अनेक मेळावे घेतले.

१७२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा