पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व आजारी माणसांच्या देखभालीसाठी आवश्यक असतील तेवढ्याच माणसांनी आपापल्या घरात थांबावे व बाकीच्या सर्वांनी मोर्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रत्येक गावात जाहीर सभा घेऊन करण्यात आले होते. 'शक्य असूनही जे शेतकरी मोर्ध्यात सहभागी होणार नाहीत, त्यांना आपल्या शेतकरीबांधवांशी द्रोह केल्याचा दोष लागेल, असेही भावपूर्ण आवाहन प्रत्येक सभेत केले गेले होते. २३ जानेवारीलाच स्वत: जोशी व त्यांचे सहकारी वांद्रे येथे जाऊन राहिले.

 रात्री जेवणे झाल्यावर कुतूहलाने काही तरुण गावकरी त्यांना भेटायला आले होते. त्यांच्यात भोसले नावाचा एक जण होता. बोलता बोलता तो म्हणाला, "ज्या समाजाची प्रगती खुंटलेली आहे, त्याची स्थिती साचलेल्या डबक्याप्रमाणे होते." ते ऐकून जोशी एकदम चमकले. कारण संघटनेविषयी ते वारकरीमध्ये लिहीत असलेल्या लेखमालेतील ते वाक्य होते. "हे वाक्य तू कुठं वाचलंस?" जोशींनी विचारले. तो उत्तरला, “साहेब, तुमच्याच लेखातलं आहे हे वाक्य." "तुम्ही वाचता हे लेख?" जोशींचा प्रश्न. त्याचे उत्तर होते,

 "आमच्या गावात तुमच्या लेखांचं आम्ही सार्वजनिक वाचन करतो. माझी तर त्यातली वाक्यंच्या वाक्यं पाठ आहेत," असे म्हणत त्यानी लेखांतली अनेक वाक्ये घडाघडा म्हणून दाखवली. ते ऐकून जोशींना खूप आनंद झाला. कारण त्यापूर्वी आपण इतक्या कष्टाने हे साप्ताहिक चालवत आहोत, पण प्रत्यक्षात ते कोणी वाचत असेल का, ह्याविषयी त्यांना काहीशी शंका होती. जोशी यांनी लिहिले आहे, “इतक्या उपद्व्यापाने फेकलेले बियाणे, मावळातील सगळ्या डोंगरमाथ्यात एका ठिकाणी जरी रुजत असेल, तरी सगळ्या कष्टांचे चीज झाले असे वाटून गेले."

 दुसऱ्या दिवशी सकाळी मोर्च्याला सुरुवात झाली. सुरुवातीला सुमारे शंभर पुरुष व स्त्रिया मोर्च्यात सामील होत्या. पण जसजसा तो पुढे सरकू लागला, तसतशी त्यांची संख्या वाढू लागली. रात्रीच्या मुक्कामासाठी शिवे गावी मोर्चा आला, तेव्हा त्यात दोन हजार माणसे सामील झालेली होती. शिवेकरांनी त्या सर्वांना जेवण घातले. दुपारच्या एकूण तीन जेवणांसाठी प्रत्येकाने आपापल्या भाकऱ्या बांधून आणल्या होत्या व रात्रीच्या जेवणांची वाटेतल्या गावकऱ्यांनी एकत्रित व्यवस्था केली होती. २४ तारखेच्या रात्री संघटनेच्या कलापथकाने कार्यक्रम सादर केला. त्यानंतर बाहेर शिवारातच सगळे झोपले. २५ जानेवारीला सकाळी मोर्चा शिवे गावाहन पुढे सरकला. मोर्च्याचे वाढते स्वरूप पाहन सर्वांनाच उत्साहाचे भरते आले होते. पण तरीही मोर्च्यातली शिस्त विलक्षण होती. त्याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे.

 साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत मोर्चा भांबोली गावात पोचला. रणरणत्या उन्हात चालून चालून सगळ्यांचे गळे सुकले होते. गावच्या विहिरीवर मामा शिंदे यांनी सगळ्यांसाठी प्यायच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पण भांडी-लोटे खूप कमी होते. गडबड होऊ नये म्हणून सगळ्या मोर्चेकऱ्यांना रस्त्यावरच बसण्यास सांगण्यात आले. आयोजकांनी घोषणा केली की, “एकेका गावाचे नाव पुकारताच फक्त त्या गावच्या मोर्चेकऱ्यांनी विहिरीपाशी यावे.

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१२९