पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे पाणी पिऊन झाले, की मग पुढील गावाचे नाव पुकारले जाईल. तेव्हा त्यांनी पुढे यावे. अशा प्रकारे सगळ्यांना काहीही गोंधळ न होता पाणी प्यायला मिळेल." हा कार्यक्रम जवळ जवळ तासभर चालला, पण एकही जण आपली रांग सोडून पुढे घुसला नाही. "हा साधासुधा मोर्चा नसून शिस्तबद्ध अशी फौज आहे," असे उद्गार हे अभूतपूर्व दृश्य पाहणारे अनेक लोक काढत होते.

 असेच आणखी एक उदाहरण म्हणजे मोर्चेकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या वैद्यकसेवेचे. मोर्च्यात अनेक बायकामुलेदेखील सामील होणार, त्यामुळे कोणाचे काही दुखलेखुपले तर लगेच औषधपाणी करता यावे यासाठी संघटनेच्या निकटच्या हितचिंतक डॉ. रत्ना पाटणकर आणि डॉ. दाक्षायणी देशपांडे २३ जानेवारीलाच चाकणहून वांद्र्याला दाखल झाल्या. २४ तारखेपासून मोर्च्याबरोबर त्याही संपूर्ण अंतर पायी चालल्या. वाटेत गावोगावी त्यांनी वैद्यकीय तपासण्या केल्या, औषधपाणी केले. मोर्च्यातील स्त्रियांना त्या इतक्या जवळच्या वाटल्या, की दुपारी जेवणाच्या वेळेला, "पोरींनो, जेवलात की नाही? बसा आमच्याबरोबर," असे आग्रहाने त्यांतल्या अनेक जणी या दोघींना सांगत असत. पुढे २६ जानेवारीला मोर्चा चाकणला पोचला तो दिवस सुट्टीचा होता. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होते. पण तरीही ह्या दोघींनी आरोग्यकेंद्रात मुक्काम ठोकला आणि अनेक स्त्रियांवर औषधोपचार केले. या दोघीमुळे सगळ्याच मोर्चेवाल्यांची मोठी सोय झाली.

 संध्याकाळपर्यंत मोर्चा आंबेठाण गावाला पोचला. ग्रामस्थांनी मोर्चेवाल्यांचे प्रेमाने स्वागत केले. रात्रीच्या जेवणासाठी आंबेठाणमध्ये साडेतीन हजार माणसे होती. रात्री पुन्हा भजन व भारुडाचा कार्यक्रम झाला, उशिरापर्यंत रंगला.

 पुढल्या दिवशी २६ जानेवारी रोजी सकाळी आंबेठाणमध्ये झेंडावंदन करून मोर्चा चाकणकडे जाऊ लागला. आता इतर अनेक गावांतून शेतकरी बांधव व भगिनी मोर्च्यात सामील होत होत्या. ढोल, लेझीम, झांजा यांनी वातावरण दुमदुमून गेले होते. प्रत्येक गावाचे मोर्चेकरी एकत्र चालत होते, त्यांच्यापुढे त्यांच्या गावाच्या नावाचे फलक घेतलेले स्वयंसेवक होते, तसेच प्रत्येक गावाचे स्वतंत्र कलापथकही होते. मोर्चा आता इतका लांब झाला होता, की एका टोकापासून मोर्च्याचे दुसरे टोक दिसत नव्हते. प्रत्येकाच्या छातीवर शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला लावलेला होता. प्रत्येकी दोन रुपये देऊन सगळ्यांनी तो विकत घेतला होता व तीच रक्कम संघटनेची वर्गणी म्हणून जमा करण्यात आली होती; तशी पावतीही प्रत्येकाला दिली जात होती.

 दुपारी बाराच्या सुमारास चाकण बाजारपेठेसमोरच्या मोकळ्या पटांगणात मोर्चा पोचला, तेव्हा तिथे जमलेल्या दोन हजार लोकांनी त्याचे स्वागत केले. 'चाकण-वांद्रे रस्ता झालाच पाहिजे', 'शेतकरी संघटनेचा विजय असो', 'मोर्चा आला पायी पायी, रस्ता करा घाई घाई', 'तुम्ही रस्ता करत नाही, आम्ही सारा भरत नाही' अशा घोषणांनी वातावरण भारून गेले होते. प्रत्यक्ष सभा सुरू झाली तेव्हा आठ हजारांचा जनसमुदाय तिथे हजर होता. एवढा मोठा जनसमुदाय चाकणमध्ये पूर्वी कधीच कुठल्या कार्यक्रमासाठी एकत्र आला नव्हता. ऐतिहासिक

१३०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा