पान:अंगारमळा (Angarmala).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



शंकरराव गेले


 शंकरराव वाघ गेले. फुप्फुसाचा असाध्य कॅन्सर झाल्याचे तीन महिन्यांपूर्वीच लक्षात आले होते. तीन महिन्यांपासून तसा दिवस मोजण्याचाच कार्यक्रम चालू होता.७ ऑगस्ट १९९५ रोजी दुपारी ३.१५ वाजता शेवट आला. दुपारपर्यंत हिंडते फिरते असलेले शंकरराव एकदम निघून गेले. पावणेचार-चारच्या सुमारास पुण्याला मला बातमी कळली. हातातली सारी कामे सोडून चाकणला शंकररावांच्या घरी जायला निघालो. शवयात्रा घरातून निघून गेली होती. आम्ही पाठोपाठ चक्रेश्वराच्या स्मशानभूमीत पोचलो. गर्दी दूर करून दर्शनाला गेलो. शंकररावांचा चेहरा पाहिला तेव्हा पहिल्यांदा खरी जाणीव झाली, की शंकरराव आता कायमचे गेले.

 चेहऱ्यावर इतक्या प्रदीर्घ आजारानंतरसुद्धा काहीच फरक दिसत नव्हता. त्यांच्या अंगावर मांस असलेले मी कधी पाहिलेलेच नाही. नुसती हाडे आणि कातडी आणि त्यांच्या आधाराने न मावणारी चेतना आणि शक्ती. माझ्या अठरा वर्षांच्या परिचयात त्यांचे वजन दहा ग्रॅमनेसुद्धा कधी वाढलेले पाहिले नव्हते. एका रतीभरानेही वजन कमी होण्याची काही शक्यताच नव्हती. शंकररावांची एक खास बढाई असायची. ते म्हणायचे, 'मी आणि हेलन, दोनच माणसं अशी, की ज्यांचे वजन कधी बदलत नाही.' अलीकडे दूरदर्शनवर हेलन दिसली. चांगल्यापैकी टुणटुणीत दिसली; शंकरराव मात्र शेवटपर्यंत तसेच राहिले.

 समोर शंकरराव पहुडलेले, फुलांच्या आवरणाखाली. तेव्हा खात्री पटली, शंकरराव खरेच गेले. चाकणच्या, नाशिकच्या, निपाणीच्या आणि चंडीगडच्या आंदोलनांत असे कित्येक प्रसंग आले; शंकरराव कुठे बेपत्ता, कुठे गेले कोणालाच माहीत नाही आणि मग एकदम अपेक्षा नसताना ते अवतारायचे. नाशिकच्या तुरुंगात असेच कधी मध्यरात्री प्रकट झाले. बल्लारीच्या तुरुंगात मुंबईच्या वार्ताहरांना घेऊन खोट्या नावाखाली, जेल अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन आले. चंडीगडच्या तुरुंगात आतंकवाद्यांच्या वेढ्यात, तूप ओसंडून पाघळणारा ट्रॅक्टरभर शिरा घेऊन आले. पुण्याला बातमी ऐकली तेव्हा मनांत कोठेतरी असे भासत होते की, गेलेत म्हणजे काय एकदम कुठंतरी अवतीर्ण होतील. शंकररावांना उचलायला दोन माणसेसुद्धा पुरी झाली असती. सहा जणांनी उचलून त्यांना सरणाकडे नेले तेव्हा खाडकन जाणीव झाली शंकररावांच्या या जाण्याला परत येणे नाही.

अंगारमळा । ६२