पान:अंगारमळा (Angarmala).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अगदी कसोशीने ठरला होता. जिल्ह्याजिल्ह्यातील प्रतिनिधींनी हमरीतुमरीवर येऊन एक एक दिवस एक एक सभा मिळवली होती. त्यात बदल करायचा म्हणजे मोठाच गोंधळ झाला असता. सभा तर चालू राहिल्या आणि मीही मनाशी मोठा खंत खात राहिलो. एका बाजूला धाकटी मुलगी परदेशी जाणार आहे, तिला निरोप द्यायला जाण्याचीसुद्धा शक्यता नाही आणि दुसऱ्या बाजूला पुण्याला जन्मदात्री आई गंभीर होऊन इस्पितळात आहे, तिला भेटायला जाणेसुद्धा दुरापास्त.

 ७ जानेवारीला गौरी फ्रान्सला परत गेली. दररोज कार्यक्रम संपल्यानंतर कितीही वाजोत, पुण्याला फोन करून खबरबात घ्यायची आणि एक एक दिवसाचा कार्यक्रम पुढे रेटायचा असे चालले होते. ११ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातला कार्यक्रम संपवून शरद बोबड्यांच्या घरी पोचायला रात्रीचे दोन वाजले. पहारेकऱ्याच्या हातीच कामिनी वहिनींनी चिठ्ठी ठेवली होती. 'पुण्याहून निरोप आला आहे. कोणत्याही परिस्थितीत श्रेयास टेलिफोन करावा, रात्री कितीही उशीर झाला असला तरी.' श्रेयाला लगेच फोन केला. ती म्हणाली, "माईच्या जखमा भरून येताहेत; पण तिची जगण्याची इच्छाच राहिली नाही. सगळे भाऊ, बहिणी पुण्यात जमले आहेत, तर मीही कोणत्याही परिस्थितीत पुण्याला येऊन जावे." फोन ठेवला. झोपायच्या खोलीत आलो. झोपणे कठीणच होते. चुकामुकीनेसुद्धा गोंधळ होऊ नये, म्हणून वहिनींनी माझ्या उशीवरही दुसरी चिठी ठेवली होती.

 नागपूर आणि पुणे दोन्हीही महाराष्ट्रातच; पण पुण्याला जाउन यायचे म्हटले म्हणजे किमान तीन दिवसांचा तब्बल प्रवास. एवढे करून आईची भेट घेण्यासाठी फार तर दोन तासांची सवड सापडायची. तीन दिवसांचे कार्यक्रम रद्द कसे करायचे? चंद्रपूर जिल्ह्यातला १२ तारखेचा कार्यकम रद्द करायचे ठरले. ११ तारखेचा तेथला कार्यक्रम अर्धवट सोडून नागपूरला परतलो. तेथे विमान पकडून मुंबईला गेलो. रात्रभर बसमध्ये बसून पहाटे चारसाडेचारला पुण्याला श्रेयाच्या घरी गेलो. तास-दीडतास झोप काढून सकाळी आठ वाजता इस्पितळात गेलो.

 एरवी माईला कधीही भेटायला गेलो, तर ती कामात असायची. तिचे वय आता ८० च्या वर गेले होते. लहानपणापासून डोळे अधू. त्यातील एकाने तिला काहीच दिसत नसे. एका डोळ्याने थोडेफार पुसट पुसट दिसत असावे. त्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून अधिक चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करावे असे आम्ही मुलांनी अनेकदा सुचवून पाहिले; पण त्या डोळ्यानेही दिसेनासे झाले तर आपण पुरे आंधळे होऊ याची माईला फार धास्ती होती. शस्त्रक्रिया करायचीच असेल, तर अगदी बाद झालेल्या डोळ्यावर

अंगारमळा । २५