पान:अंगारमळा (Angarmala).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या मनात येत नाही. वर्गवादी विचारसरणी मी कधी मानत नाही; पण लोहियांसारखे विचारवंतही इतिहासाचा किंवा प्रचलित घटनांचा अर्थ लावताना जातीवर आधारलेले विवेचन करतात. सध्याच्या काळात तरी हे विवेचन अगदी गैरलागू आहे, अशी माझी धारणा आहे. अगदी अलीकडे अलीकडे दिल्लीतील एका लोहियावादी विद्वानाने शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांत कोणकोणत्या जातीचे लोक आहेत असा प्रश्न विचारला होता, तेव्हा मी गडबडून गेलो. माझे निकटचे सहकारी कोणत्या जातीचे आहेत, हे जाणून घेण्याची माझ्या मनात कधी इच्छाच झाली नाही; पण माझ्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याने माझी अडचणीतून सुटका केली आणि उच्चाधिकार समितीत तीन मराठा, एक माळी, एक धनगर, एक मारवाडी, एक भटक्या जमातीचा... अशी आकडेवारी देऊन माझी सुटका केली.

 निपाणीच्या आंदोलनाच्या शेवटी गोळीबार झाला. तेरा शेतकरी मारले गेले, २०२५ शेतकऱ्यांचे हातपाय मोडले. सगळ्या कार्यकर्त्यांना अटक झाली, त्या वेळी पुण्याचे काही विषमता निर्मूलनवादी तेथे भेटीसाठी गेले आणि मेलेल्यांत आणि जखमी झालेल्यांत किती कोणत्या जातीचे होते याची आकडेवारी गोळा करण्यातच त्यांनी सगळ्यात जास्त रस घेतला. त्या वेळी, इतक्या गंभीर परिस्थितीतही, मला हसू आल्याशिवाय राहिले नाही.

 प्रत्येकाच्या मनात जातीचा विचार खूप खोलवर रुजलेला अजूनही आढळतो. या जातीचा विचारही मनात न आणता, महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांनी मला आपले मानले हा खरोखरच एक चमत्कार आहे; पण या चमत्काराला गालबोट लावणारे मंबाजी काही थोडे थोडके निघाले नाहीत. या खेरीज कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मधूनमधून माझ्या ब्राह्मण्याचा प्रश्न निघत असतोच.

 १९८० मध्ये भामनेरच्या रस्त्याचा मोर्चा निघाला त्या वेळी, "या बामणाच्या मागे १० शेतकरी आले तरी.." आपले पद सोडून देण्याची फुशारकी त्यावेळच्या पंचायत समितीच्या सभापतीने मारलीच होती. १० च्या ऐवजी १०,००० शेतकरी आले, तरी त्याने राजीनामा दिला नाही ही गोष्ट वेगळी.

 अगदी संघटनेबद्दल सहानुभूती असणाऱ्यांच्या मनातसुद्धा अशी भावना कधी कधी दिसून येई. कांदा आंदोलन यशस्वी झाले त्या वेळी आसपासच्या गावांपैकी अनेकांनी माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार घडवून आणला. सत्काराच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांना सरसकट फेटे बांधले जात आणि मला मात्र शाल देण्यात येई.यातील श्लेष

अंगारमळा । १८