पान:अंगारमळा (Angarmala).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनात ती कायम राहते. मला मात्र एवढ्या दुर्लभ गोष्टींचा एकत्र समुच्चय आपल्या बाबतीत झाला आहे, हे काही पटेना आणि मी जन्माने माझ्या असलेल्या गोष्टी खरोखरच सर्वोत्तम आहेत काय? याचा शोध घेऊ लागलो.

 भारत देश सर्वश्रेष्ठ कसा? त्यात काही वीरमणी, नारीरत्ने, साधुसंत झाले हे खरे; पण या सगळ्या जगात जी काही राष्ट्रे गुलाम आहेत, पारतंत्र्यात आहेत; त्यांच्यात भारताची गणना आहे. जगातील अत्यंत गरीब, दुष्काळाने गांजलेल्या देशांत भारत मोडतो. मग असे राष्ट्र सर्वश्रेष्ठ कसे असेल?

 महाराष्ट्रात शिवछत्रपती जन्मले असतील, ज्ञानेश्वरांनीही प्रतिभेचा चमत्कार मराठीत करून दाखवला असेल; पण इतर प्रदेशातही अशी माणसं जन्मतात आणि अशा नररत्नांचा अभिमान त्यांच्या त्यांच्या प्रदेशातील लोकांना पिढ्यानपिढ्या असतोच. इतर कोणत्या राज्यात जन्मलो असतो तर त्या राज्याबद्दल अशीच अभिमानाची भावना बाळगली नसती काय?

 आणि हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ असे काय आहे? माझ्या शाळेतील नकाशांचे पुस्तक दाखवत होते, की जगात जास्तीत जास्त उपासक असलेले धर्म बुद्ध आणि ख्रिस्त यांचे आहेत. इस्लामही अनेक देशांत पसरला आहे. एकाच भूखंडात मर्यादित असलेल्या या धर्माला सर्वोत्तम म्हणणे खोट्या अभिमानाचे लक्षण नाही काय?

 आणि ब्राह्मण जाती श्रेष्ठ आहे असे मानणे तर किती मूर्खपणाचे, ब्राह्मण जातीत काय सगळे गोखले, रानडे, टिळकच जन्मले? अपकृत्ये करणारे कुणी झालेच नाहीत? आणि इतर जातीत जन्मून अलौकिक कृत्ये करणाऱ्यांची केवढी तरी देदीप्यमान मालिका समोर असताना ब्राह्मण्याचा अभिमान धरावा कसा?

 या उलटतपासणीने मी अगदी हादरून गेलो. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या गोष्टींचा वृथा अभिमान बाळगण्याची आपल्यात प्रवृत्ती आहे आणि ती मोडून काढली पाहिजे, याची मला मोठ्या प्रकर्षाने जाणीव झाली. त्या दिवसापासून मी एक निश्चय केला. जन्माच्या अपघाताने आपल्याला जे जे मिळाले असेल, ते अती कनिष्ठ आहे, असे समजून विचाराची सुरुवात करायची आणि जेथे सज्जड पुरावा मिळेल, तेथेच आणि त्या पुराव्याने सिद्ध होईल तेवढेच, जन्मसिद्ध गोष्टींचे बरेपण मान्य करायचे. अशी शिस्त मी बाणवून घेतली. मला वाटते, माझे विचार शुद्ध राखण्यात या बाण्याचा प्रचंड उपयोग झाला.


 अनेक वर्षे परदेशांत गेल्यामुळे कोण कोणत्या जातीचा आहे, याचा विचारही कधी

अंगारमळा । १७