पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानायला तयार होत नाहीत. भारतीय चौकटीत एखाद्या लोहियाला मान्यता मिळणे दुष्कर पण जवाहराची मान्यता अबाधितच राहते.

 स्वातंत्र्याच्या आंदोलनात दरिद्री अडाणी, शोषित-पीडित कोट्यवधी जनतेला इंग्रजांविरुद्ध उभे करण्यासाठी गांधीजींनी सत्य, अहिंसा इत्यादी धर्माधिष्ठित नैतिकतेचा वापर केला. या नैतिकतेच्या आधाराने लोक इंग्रजांविरुद्ध लढायला तयार झाले यात काही तथ्य आहे; पण इंग्रजांची भीती चेपण्याकरिता इंग्रजाइतका गोरा, त्याच्यासारखेच इंग्रजी बोलणारा जवाहरलाल अगदी तुरुंगातसुद्धा चहाचा डबा फेकून देतो आणि जेलरच्या घरून चहाचा ट्रे मागवतो या प्रतिमेचेही महत्त्वाचे स्थान होते.

 चंपारण्यातील न्यायालयात जबाब देताना गांधीजींनी एकदा म्हटले होते की, "खेड्यापाड्यांतील गरीब जनतेवर गोरे इंग्रज आणि एतद्देशीय शहरवासी जे अन्याय करताहेत त्याचा त्यांना ईश्वराच्या दरबारात एकदा जाब द्यावा लागेल." महात्माजींनी हे म्हटले खरे पण स्वातंत्र्याचे आंदोलन चालवताना हे शहरवासी स्वातंत्र्याचा मंगल कलश पळवून नेणार नाहीत याची त्यांनी काही खबरदारी घेतली नाही. जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्याच्या आंदोलनातील या एतद्देशीय 'इंग्रजांचे प्रतिनिधी होते. त्यामुळे सुशिक्षित भद्र लोकांत त्यांची लोकप्रियता मोठी उदंड; इतकी की देशाच्या आर्थिक भवितव्यासंबंधी नेहरूंशी पराकोटीचे मतभेद असतानाही महात्माजींना त्यांनाच आपले राजकीय वारस म्हणून जाहीर करणे भाग पडले.

 स्वातंत्र्य अगदी उंबरठ्यावर आले असताना महात्माजींनी स्पष्टपणे सांगीतले,

 “जवाहरला आज पर्याय नाही, इंग्रजांकडून सत्तेचे हस्तांतरण होत असताना तरी नाही. तो हॅरोत शिकला आहे. केंब्रिजचा पदवीधर आहे बॅरिस्टर आहे. इंग्रजांशी वाटाघाटी करायला त्याची गरज आहे."

 अशा राजबिंड्याच्या स्मतीचा अवमान करण्याचे कोणाला काय कारण आहे? त्याचे पुतळे पाडण्याची काय आवश्यकता आहे? त्याच्या नावाची स्मारके उधळण्याची काय गरज आहे?

 स्टॅलिन, लेनिनचे पुतळे खाली आले कारण स्टॅलिनवाद, लेनिनवाद खोटा पडला एवढेच नव्हे तर, त्या वादांच्या खोटेपणामुळे कित्येकांची आयुष्ये उजाड झाली आणि सर्वसामान्य माणसांना पावाच्या तुकड्यासाठी रात्र-रात्र थंडीत कुडकुडत रांगेत उभे राहण्याची वेळ आली.

 नेहरूप्रणित समाजवादी औद्योगीकरण फसले असेल पण त्याचे दुःख कोणाला?

भारतासाठी । ३७