पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


उद्रेक हेच स्पष्ट करतात आणि समाजवादी रशियाचे सगळे साम्राज्यच कोसळून पडल्यामुळे समाजवाद या संकल्पनेलाच काही प्रतिष्ठा राहिली नाही; एवढेच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय संघर्षातील एक पक्षच नाहीसा झाल्यामुळे तटस्थता या शब्दालाही काही अर्थ उरला नाही. नेहरूंनी ज्याला ज्याला हात लावला त्याची त्याची आज माती झालेली आहे. अशी वास्तव परिस्थिती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जयंती असो वा पुण्यतिथी असो, इतर काही प्रयोजन असो नसो, नेहरूंचे सर्व क्षेत्रातील कर्तबगारीबद्दल गुणगान असा मोठा विचित्र व्यतिरेक दिसून येतो.
 इतिहासाने ज्यांना सर्वस्वी खोटे पाडले अशांच्या नशिबी नेहरूंचे हे भाग्य सहसा येत नाही. जुनी गाडलेली प्रेते उकरूनसुद्धा त्यांच्यावर रागरोष व्यक्त केला जातो. गेल्या दोन तीन वर्षांतच पूर्व युरोपातील अनेक देशांत हे घडले. स्टॅलिनचे पुतळे केव्हाच उखडले गेले. लेनिनचे पुतळे आता खाली येत आहेत. त्यांची नावे दिलेली गावे, संस्था इत्यादींची नावे बदलून पुन्हा नवीन नावे दिली जात आहेत; पण भारतात असे काही घडताना दिसत नाही. नेहरूंनी हात लावलेली प्रत्येक संकल्पना इतिहासाने भली खोटी पाडलेली असो, अजून कोठे नेहरूंचे पुतळे पाडल्याचे किंवा उतरविल्याचे ऐकिवात नाही. उलट, नव्या नव्या विमानतळांना, बंदरांना आणि प्रतिष्ठेच्या संस्थांना नेहरूंचे नाव नव्याने देण्याची पद्धत अजून चालूच आहे.
 याचे एक कारण नेहरूंचे व्यक्तिगत भाग्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील राजबिंडेपणा हे आहे. सुवेज कालव्यावरील आक्रमण फसले आणि इंग्लंडचे पंतप्रधान अँथनी ईडन यांना चोवीस तासांत पंतप्रधानाची खुर्ची खाली करून चालते व्हावे लागले. ईशान्य सरहद्दीवर भारतीय सैन्याला मोठी अपमानास्पद शरणागती स्वीकारावी लागली. चीनसंबंधीचे सर्व धोरण पंडित नेहरूंनी व्यक्तिशः आखलेले होते; पण संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांना जावे लागले. पंडित नेहरूंना त्याचा धक्का बसला नाही. एवढेच नव्हे तर उलट लोकांची उदंड सहानुभूती मिळाली. मोठे भाग्य असल्याखेरीज हे शक्य नाही!

 नेहरूंचा राजबिंडेपणाही त्यांचे स्थान अबाधित राहण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यांच्या हातून कितीही मोठ्या चुका घडल्या असोत, अनेक वेळा त्यांच्या मनाचा कोतेपणाही उघड झाला; पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी विक्राळ भाव आला नाही एवढेच नव्हे तर चेहऱ्यावरचे हसूही कधी मावळले नाही. भारतीयांची ही एक विशेषता आहे; कोणा राजबिंड्याने हंसत हंसत कितीही मोठी गफलत केली तरी लोकक्षोभ होत नाही. रौद्र मुद्रा असल्याखेरीज ते कोणाला खलपुरुष

भारतासाठी । ३६