पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


जवाहरलाल नेहरूंशी प्रत्यक्ष परिचय असलेली काही मंडळी मग
 "पंडितजींचे कैंचें बोलणे,
 पंडितजींचें कैंचें चालणे,
 पंडितजींची सलगी देणे,
 कैंचें असें'
 या सुरावर त्यांच्या शुभ्र वेषापासून मोहक हास्यापर्यंत आणि छातीवरील लाल गुलाबापासून गालावरील रक्तिम्यापर्यंत वर्णन करण्यात रंगून गेली होती.
 जन्मतिथी, पुण्यतिथी असली म्हणजे त्या दिवसाच्या नायकाविषयी सत्य असो, कल्पित असो - चांगले बोलायचे असा शिष्टाचार आहे आणि तो सुसंस्कृतपणास धरूनही आहे. विशेषतः, मृताविषयी काही कोणाच्या मनाला लागेलसे बोलू नये, हे योग्यही आहे; पण तरीही, वास्तवाचे काही भान सुटले तर स्तुतिपर भाषणेसुद्धा हास्यास्पद वाटू लागतात. कोणी उठून म्हणू लागले की पंडित नेहरू बारा फूट उंच होते आणि त्यांनी एकट्यांनी उत्तरेतील सरहद्दीवर जाऊन चिनी सैन्याचा पराभव केला तर ते गुणवर्णन नाही, कुचेष्टाच होईल. शिष्टाचारालाही वास्तवाचे काहीसे कुंपण असलेच पाहिजे.
 देशाच्या इतर थोर नेत्यांबाबत, स्वातंत्र्यसेनानींबाबत, अगदी महात्मा गांधींबद्दल बोलतानासुद्धा वास्तवाचे कांही किमान भान ठेवले जाते. मौलाना आझादांविषयी बोलतांना अखेरच्या वर्षांत त्यांच्या मनात जी कटुता निर्माण झाली होती तिचा तिरकस तरी उल्लेख होतोच. सरदार वल्लभभाईंच्या तथाकथित जातीय दृष्टिकोनाविषयी अगदी उघड उघड लिहिले, बोलले जाते. “देशाच्या शतूचा शतू तो आपला मित्र, गुलाम देशाला परराष्ट्रीय धोरण एवढेच असते." या भूमिकेतून स्वतःच्या आयुष्याची होळी करणाऱ्या सुभाषबाबूंवरसुद्धा त्यांना नेहरूंसारखी आंतरराष्ट्रीय दृष्टी नव्हती अशी टीकाटिप्पणी होतेच आणि महात्माजींवर तर त्यांच्या चरख्यापासून नौखालीतील ब्रह्मचर्याच्या प्रयोगांपर्यंत अनेक गोष्टींवरून हल्ले चढविले जातात.
 आश्चर्याची गोष्ट अशी की आज सगळा नेहरूवाद कोसळून पडला आहे आणि तरीदेखील नेहरूंच्या शुभ्र अचकनीवर कुठे एक डाग पडलेला नाही.

 नेहरू पद्धतीच्या नियोजनाने देशाचे दिवाळे निघाले आणि आजची आर्थिक दुरवस्था उभी ठाकली. नेहरूप्रणित इंग्रजी मुखवट्याची संसदीय लोकशाही कशीबशी लंगडत चालली आहे. देशातील वेगवेगळ्या धर्मां-जातींच्या अस्मितांना मान्यतेची तहान आहे तोपर्यंत युरोपियन तोंडवळ्याची निर्धार्मिकता निरर्थक आहे. अयोध्या, काश्मीर, पंजाब, आसाम, मंडल आयोग यांप्रश्नी उफाळलेले

भारतासाठी । ३५