पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/315

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एरवी २१ वे शतक चीन आणि भारत या दोन देशांचे आहे असे दिवसरात्र ओरडून सांगणाऱ्या मंडळींना चीन अमेरिकेशी स्पर्धा करीत सुवर्णपदके मिळवतो आणि भारताला एकाच सुवर्णपदकावर समाधान मानावे लागते याची खंत वाटत नाही. भारतीय तसे समाधान मानतात. कोणत्याही क्षेत्रात तेजस्वीपणे आणि आक्रमकतेने जग पादाक्रांत करण्याची प्रवृत्ती भारतीयांना फारशी सोसत नाही असे दिसते.

 इतिहासकाळात राजपूत वीरांची सारी मर्दुमकी परकीयांचा हल्ला झाला, आता तो हल्ला परतवण्याची काहीही शक्यता नाही असे स्पष्ट झाल्यानंतर सर्व स्त्रियांना जोहारासाठी पाठवून देऊन त्यानंतर 'जय एकलिंग जी' अशा घोषात शत्रूवर तुटून पडून अतुल पराक्रम दाखवणे इतपतच मर्यादित होती. असे प्रसंग सर्व इतिहासात भरून राहिले आहेत. या शौर्याचा उपयोग दिल्लीश्वरांवर स्वारी करण्यापर्यंत कधी फारसा पोहोचला नाही. विजिगिषुपणाच्या या अभावाला सामाजिक, आर्थिक आणि इतरही कारणे असतील. कदाचित, या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीयांच्या मनात मरण स्वीकारून हौतात्म्याची तयारी होते, पण 'मारू आणि जिंकू' अशी आक्रमकता भारतीयांना पेलत नाही, पचत नाही; किंबहुना, अशी आक्रमकता ही अनैतिक आहे अशी सर्वदूर भावना या भारतात पसरली आहे.

 ढक्रकेटच्या खेळातसुद्धा जागतिक विक्रम करणारे वीर भारतात अनेक झाले; पण, भारतीय संघाची सगळ्यात चांगली कामगिरी अनेक वेळा 'फॉलो ऑन' मिळाल्यानंतर डावाचा पराभव वाचवण्याकरिता दिसून आली आहे. या उलट, श्रीलंकेसारख्या छोट्या देशानेसुद्धा अलीकडच्या कसोटी सामन्यात भारतातील रथीमहारथी खेळाडूंची कशी त्रेधातिरपीट करून टाकली हे सर्वांनी पाहिले आहे.

 अगदी अलीकडे, बंगलोर आणि अहमदाबाद शहरात आतंकवाद्यांनी लागोपाठ बॉम्बस्फोट घडवले. अहमदाबादमध्ये पन्नासावर माणसे मेली, शंभरावर जखमी झाली. ज्या कुटुंबांतील माणसे गेली, अपंग झाली त्या कुटुंबातील लोकांना प्रचंड संताप येऊन अंगाची लाहीलाही झाली असेल; पण, ती चीड आणि संताप क्षणभरच टिकला. गुजरातमध्ये भेट देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आले, स्वतः प्रधानमंत्री आले. त्यांनी गुजराथी जनतेची पाठ थोपटली आणि आतंकवाद्यांच्या प्रक्षोभक कृत्यांनंतरही मनाची शांती ढळू न देता संयम ठेवल्याबद्दल प्रशंसा केली. गुजरातचे मुख्यमंत्री स्वतः नरेंद्र मोदी यांनीही अशीच शाबासकी दिली. आपल्या घरची माणसे मारली गेली तर त्याबद्दल दुःख ठीक आहे; पण, संताप

भारतासाठी । ३१५