पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


इ.स. १९८४ च्या पराभवाचे दुःख शमले तरी या यशाकरिता आपण काय करून बसलो आहोत याची थोडीफार जाणीव भाजपाच्या नेत्यांना होऊ लागली आहे. यांपैकी अनेक शिवसेनेच्या बाळ ठाकरे यांचे वर्णन,खाजगीत, "हलक्या कानाचा. छोट्या मनाचा, फाटक्या तोंडाचा-इ.इ." असे करतात; पण या दुष्कर परिस्थितीत जोडलेल्या दोस्तांचा बंदोबस्त कसा करावा याची त्यांना चिंता लागली आहे. राममंदिराबद्दल दिलेल्या बेफाट आश्वासनातून थोडीफार सुटका कशी करून घ्यायची ही त्यांची आज मोठी चिंता आहे.
{[gap}}पण त्यांनी पाय हळूहळू मागे घ्यायला सुरुवात केली आहे. असे करण्यापलीकडे त्यांना काही गत्यंतरही नाही. दूरदर्शनवर दिलेल्या मुलाखतीत अडवाणी म्हणाले,
 "राममंदिर ही काही महत्त्वाची गोष्ट नाही; पण राममंदिराच्या निमित्ताने खोटा निधर्मवाद उजेडात आणण्याचे काम आम्ही साध्य केले आहे."
 भारतीय घटनेत महत्त्वाचे स्थान असलेला निधर्मवाद हा दिखावू आहे? खोटा आहे? फाळणीनंतर पाकिस्तान मुसलमान राष्ट्र झाले पण, भारताने मात्र निधर्मवाद स्वीकारला याचे कारण भारत बहुसंख्य हिंदू आणि म्हणून सहिष्णू आहे हेच होय. हिंदूवाद हाच खऱ्या अर्थाने निधर्मवाद आहे आणि हा हिंदूवाद देशाच्या परंपरेशी, इतिहासाशी व संस्कृतीशी सुसंगत आहे. याउलट, घटनेतील निधर्मवाद हा पाश्चिमात्य तोंडवळ्याचा आहे. राजकीय क्षेत्रात धर्माला स्थान नाकारण्याची एक युरोपीय परंपरा आहे. राजसत्ता व धर्मसत्ता यांच्यात शतकानुशतके चाललेल्या भीषण संघर्षाचा, युरोपीय निधर्मवाद हा परिणाम आहे. या पाश्चिमात्य निधर्मवादाऐवजी हिंदुराष्ट्रवाद स्वीकारला जावा कारण तो एतद्देशीय आहे, लोकांच्या प्रवृत्तीस जुळणारा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरेस जुळणारा आहे.
 हिंदुराष्ट्रावादाची गंभीर मांडणी अशाप्रकारे केली जाते. आपल्याला हीच मांडणी विचारात घ्यायची आहे. निरर्गल आणि अश्लील भाषा वापरणाऱ्या अनभ्यस्त हृदयसम्राटांची नाही.

 पहिला महत्त्वाचा मुद्दा, भारतीय घटनेतील निधर्मवाद पाश्चिमात्य तोंडवळ्याचा आहे काय? याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. निधर्मवादाच्या शब्दकोशीय अर्थातही धार्मिक सत्याविषयी केवळ उदासीनताच नव्हे तर काहीशी कुत्सितताही गृहित धरली आहे. भारतीय राजकारणात मध्य प्रवाहातील नेतेमंडळीत तरी धर्माविषयी जाहीररित्या अनादर दाखविणारासुद्धा महापुरुष कुणी झाला नाही. अगदी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उद्घोष करणारे आणि एकविसाव्या शतकाची

भारतासाठी । २८