तुतारी वाजविणारे नेतेसुद्धा मोठे तोलून मापून शब्द वापरतात. विज्ञानाबरोबर आध्यात्मिक अंगाकडे पुरेपूर लक्ष देणे आवश्यक आहे अशी निदान तोंडदेखली, सारवासारव करतात. शासकीय आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवर सर्व धर्मांच्या संबंधीचे भजनकीर्तनांचे कार्यक्रम होतात. खुद्द पंतप्रधानही वेगवेगळ्या प्रार्थनामंदिरांत आणि वैष्णोदेवी, तिरुपती अशा मंदिरांत विशेष भक्तिभावाने जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भवानी मातेची आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा मोठ्या थाटामाटाने पार पाडतात. बहुतेक उद्घाटन इत्यादी प्रसंगी काही ना काही धार्मिक विधी होतातच आणि आजपर्यंत चार आजी आणि दोन माजी पंतप्रधानांचे हिंदू अंत्यविधी अगदी विस्तारा-विस्ताराने रेडिओ आणि दूरदर्शनवर दाखविण्यात आले आहेत. भारतीय राज्यव्यवस्था धर्माविषयी उदासीन नाही. ती गांधीवादी तोंडवळ्याची आहे. सर्व धर्मांना समान मानण्याची आहे. किंबहुना, भारतीय घटनेतील निधर्मवाद खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभावच आहे. घटनेतील निधर्मवाद खरा नाही; पण अडवाणी म्हणतात त्या अर्थाने नव्हे तर त्याच्या नेमक्या उलट्या अर्थाने.
या सर्वधर्मसमभावात अल्पसंख्याकांच्या अनुनयाची एक प्रवृत्ती आहे काय? शहाबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राजीव गांधी शासनाने फिरवला हे मुस्लिम अनुनयाचे एक मोठे उदाहरण म्हणून सांगितले जाते. ख्रिस्ती किंवा पारशी यांचा अनुनय होत असल्याची तक्रार कुणी करीत नाही. पंजाबातील बहुसंख्य शेतकरी असलेल्या शिखांची, त्यांचे शोषण होत असल्याची उलट तक्रार आहे.
शहाबानो प्रकरणी राजीव गांधींची भूमिका फारशी समर्थनीय होती असे मला वाटत नाही; पण ती भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. मध्यपूर्वेतील संघर्षमय सामाजिक वातावरणात लिहिले गेलेले इस्लामचे सामाजिक नियम स्त्रियांना काही बाबतीत मोठे जाचक आहेत. बदललेल्या परिस्थितीत यातील अनेक नियम अगदी दुष्ट आणि विक्राळ वाटतात; पण सामाजिक परिवर्तन काही केवळ कायद्याने होत नाही. उलट, समाजाच्या विरोधात केलेले कायदे निष्फळ ठरतात; एवढेच नव्हे तर त्याचे दुष्परिणामही होतात. शहाबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पोटगीसंबंधी भारतीय दंडविधानाचा स्पष्ट अर्थ लावला या निर्णयाबद्दल मुस्लिम सनातनी पुरुषांनी आरडाओरड सुरू केली यात काही आश्चर्य नाही. आश्चर्याची गोष्ट ही की मुसलमान स्त्रियाही अन्यायकारक कुराणप्रणीत नियमच आम्हाला हवेत, असे बोलू लागल्या. असे अनेकदा होते. राजस्थानातील देवराला