पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/241

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





स्वातंत्र्य म्हणजे न्याय, न्याय म्हणजे स्वातंत्र्य


 लाल किल्ल्यावरून  भारतीय स्वातंत्र्याचा पंचावन्नावा वाढदिवस, जणू सर्व देशभर छुपी लढाईच चालू आहे अशा, कडक बंदोबस्तात, पण पार पडला. अगदी आणीबाणीसारख्या परिस्थितीतही शासन स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदनाचे औचित्य आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखू शकते हे सिद्ध झाले.  खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवानी आणि संरक्षणमंत्री यांच्यावर हल्ला करण्याचे मनसुबे काही दहशतवादी संघटनांनी खुलेआम जाहीर केले होते. कितीही कडेकोट बंदोबस्त असला तरी जीवावर उदार होऊन निघालेल्या आत्मघाती घातपात्यांना निश्चयपूर्वक थांबवणे कठीण असते. या स्वातंत्र्यदिनी देशापुढे काय ताट वाढून ठेवले आहे याची मोठी धाकधूक सर्वांनाच वाटत होती. प्रधानमंत्रीसुद्धा आपल्या निवासस्थानातून लाल किल्ल्याकडे निघाले ते, परत दर्शन होईल किंवा नाही अशा भावनेत कुलदैवताला प्रणाम करूनच निघाले असले पाहिजेत.

 पण, सगळे काही व्यवस्थित पार पडले. घड्याळांच्या काट्यांबरहुकूम पंतप्रधानांचे आगमन झाले, मानवंदना झाली, झेंडा फडकावला गेला, पंतप्रधानांनी भाषण केले; दहशतीच्या वातावरणामुळे भाषण आटोपते घेतले असा अपवाद नको म्हणून काहीसे लांबटच भाषण केले. काश्मीरबद्दल पाकिस्तानला उद्देशून खंबीर भाषा वापरणे अपेक्षितच होते. पंतप्रधानांच्या भाषणाचा हा भाग भोवतालच्या दहशतवादाच्या वातावरणात अधिक प्रकर्षाने ओजस्वी वाटला. मग, आर्थिक, सामाजिक प्रश्नांकडे ते वळले. थोडेथोडके नाही, दहा नवीन कार्यक्रम त्यांनी जाहीर केले. त्यात अभिनव किंवा प्रतिभाशाली असे फारसे काही नव्हते. अभ्याससमित्या नेमल्याने आता कोणी फसत नाही म्हणून कार्यदले नेमून झाली;

भारतासाठी । २४१