पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/189

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वातंत्र्य म्हणजेच प्रगती


 डॉक्टर ज्युलियन सायमन ८ फेब्रुवारी १९९८ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन पावले. गेल्या वर्षी ते हिंदुस्थानात आले होते. शेतकरी संघटनेच्या सहकार्याने देवळाली येथे भरलेल्या एका परिसंवादात त्यांनी भाग घेतला होता. त्याही वेळी त्यांचे नाव अर्थशास्त्रातील नोबल पारितोषकाचे उमेदवार म्हणून घेतले जात होते.
 डॉ सायमन आशावादी अर्थशास्त्री म्हणून ओळखले जात. या पृथ्वीवरील सर्वात निर्णायक साधनसंपत्ती माणूस ही आहे. माणूस प्रगतीच्या मार्गात येणारे सारे अडथळे दूर करतो, जमिनीची सुपिकता तसेच धातू, तेल इत्यादी खनिजे देण्याची क्षमता मर्यादित असेल पण, त्यामुळे माणसाची प्रगती थांबणार नाही; 'जगाचा अंत मनुष्यप्राण्याच्या लालसेपोटी येत आहे' असे शतकानुशकते धर्मवादी, पर्यावरणवादी कंठशोष करीत असले तरी प्रत्यक्षात माणसाची प्रगती प्रचंड वेगाने आणि वाढत्या गतीने होतच आहे. अशी डॉक्टरसाहेबांची मांडणी.
 ख्रिस्तपूर्व ८००० वर्षापासून ते इसवी सन १७५० सालापर्यंत माणसाचे जीवनमान २० वर्षांपासून फक्त २४ वर्षांपर्यंत वाढले. आणि, १७५० सालापासून जीवनाचा आलेख सरळच झेप घेतो आहे. या अडीचशे वर्षात ते ७० वर्षांपर्यंत वाढले.

 कच्चा मालाचा निसर्गातील साठा संपत जाईल आणि त्यामुळे खनिजेही माहगतील ही भीतीही खोटी ठरली आहे. बहुतेक सर्व धातूंच्या किंमती सतत उतरत आहेत. १८०१ सालच्या किंमतीच्या तुलनेने आज तांब्याची किंमत एक दशांशदेखील राहिलेली नाही. २०० वर्षापूर्वी एक टन तांबे विकत घेण्यासाठी साधारण माणसाला किती दिवस काम करावे लागे याची तुलना आजच्या परिस्थितीशी केली तर हे स्पष्ट होते.

भारतासाठी । १८९