पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/175

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेआणि तिरंगी झेंड्याच्या पताका लावलेलं चिन्ह दिसत आहे, गावोगाव सभा होताहेत.
 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी गेले, त्यांच्याबरोबर त्यांचं नेतृत्व गेलं, विचारही गेला, सगळंच गेलं. स्वातंत्र्यानंतर देशानं पंडित नेहरूंचं नेतृत्व स्वीकारलं आणि नेहरू रशियाला जाऊन आले होते, त्यांनी सांगितलं की, "समाजवादानं देशाचं भलं होईल." म्हणजे, उद्योगधंदा करणारे खोटे, फायद्याकरिता काम करतात ते खोटे! देशाचं भलं व्हायचं असेल तर दिल्लीमध्ये बसून नियोजकांनी देशाचे नियोजन केलं पाहिजे आणि तुम्हा आम्हा जनसामान्यांनी सरकार सांगेल त्याप्रमाणे जी काही नोकरी असेल ती सकाळी दहा ते पाच करायची. हा विचार आपण सगळ्यांनी स्वीकारला. समाजवाद ही फार मोठी गोष्ट आहे. असं अजूनही बहुतेकांच्या मनात आहे. नेहरू रशियाला जाऊन आले असा नमुना हिंदुस्थानात तयार व्हावा म्हणून आपण प्रयत्न केला; पण आता त्या रशियाचंच दिवाळं वाजलं. म्हणजे, आमच्या स्वप्नातला आदर्शच मुळी फुटून गेला. ज्या रस्त्यानं आपण चाललो होतो तो रस्ताच मुळी चुकीचा आहे असं कळलं आणि आज स्वातंत्र्य मिळाल्याला पन्नास वर्षे झाल्यानंतर, पुढारी सोडून द्या, पक्ष सोडून द्या, पण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, तुमच्यारख्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निदान हा प्रश्न आला पाहिजे की, "हे काय झालं आहे? आपण जायला निघालो देवाच्या आळंदीला आणि येऊन पोहोचलो चोरांच्या आळंदीला हे झालं कसं काय? रस्ता चुकला कुठे?"
 गंमत म्हणजे हे असं होणार हे सांगणारे निदान दोन लोक होऊन गेले.

 पहिले, इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान चर्चिल. त्यांनी स्वातंत्र्य देण्याच्या वेळी सांगितलं होतं की, "हिंदुस्थानच्या लोकांना स्वातंत्र्य देऊ नका. यांचे पुढारी बसतात. काडीची तोशीस सोसायची यांची ताकद नाही, हे सगळे पेंढा भरलेले पुढारी आहेत; यांची नैतिक ताकद कमी, देशातल्या गोरगरिबांविषयी कळवळा कमी, देशातल्या गोरगरिबांविषयी कळवळा कमी; इंग्रज गेले म्हणजे त्यांच्या जागी बसावं आणि देशाचा सगळा फायदा आपण घ्यावा एवढीच त्यांची लालसा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे पन्नास वर्षांच्या आत जातीच्या आणि धर्माच्या नावानं भांडणं लागतील; हे माझं, हे माझं म्हणून लोक भांडतील; नोकरी मला पाहिजे, मला पाहिजे असं म्हणून भांडतील आणि देशामध्ये पुन्हा एकदा ठगांचं राज्य तयार होईल, रक्ताचे पाट वाहतील." असं ज्यानं सांगितलं त्यांचं नाव चर्चिल, इंग्लंडचे प्रतप्रधान.

भारतासाठी । १७५