Jump to content

पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करायला गेलो तर ४५ टक्के गुणांची किंमत काही जास्त आहे किंवा नाही? समाजाचा सबंध तराजूच हा मुळी दीडदांडीचा आहे. आणि आतापर्यंत त्या दीडदांडीच्या तराजूमध्ये त्यांना मापलं जात होतं; पण सर्व सामाजिक अडचणी लक्षात घेऊन त्यांनी मिळविलेल्या ४५ टक्के गुणांचं मूल्य हे दोघांची तुलना करून पाहता किती मानलं पाहिजे? सरळ मार्गावरून धावणारा खेळाडू आणि अनेक अडथळे पार करत तितकेच अंतर धावावे लागणारा खेळाडू यांना लागणारा वेळ सारखाच मोजणार का? तसा तो मोजणं योग्य होणार नाही. मी ब्राह्मण घरात अगदी गरीब अवस्थेतल्या कुटुंबात जन्मलो. तरीसुद्धा, घरामधल्या ब्राह्मणी, सुशिक्षित वातावरणाचा परिणाम माझ्या शिक्षणावर झाला आणि बाकीची सर्व गरिबी असूनसुद्धा शिक्षणामध्ये मी इतर विद्यार्थ्यांपेक्षा दोन पावलं पुढं राहू शकलो. माझ्या वर्गामध्ये ब्राह्मण नसलेले, अस्पृश्य असलेले, घरची परिस्थिती आमच्यापेक्षा बरी असलेले असे बरेच विद्यार्थी होते; पण त्यांच्यापेक्षासुद्धा शिक्षणामध्ये मला काही फायदा मिळत होता. मग त्या मुलाने मिळविलेले ४५ टक्के गण माझ्या ९२ टक्क्यांइतके नसतील; पण त्याचे ४५ गण हे काही केवळ ४५ नाहीत. ते निदान ५०/६०/७० पर्यंततरी आहेत हे आपल्याला पहिल्यांदा मानलं पाहिजे आणि गुणवत्तेने शासनातल्या सर्व जागा भरायच्या हा जर मुद्दा मान्य केला तर मला वाटतं इंग्रजांना काढून लावणं हे मुळातच चूक होतं. कारण शासकीय कर्तबगारीच पाहायची झाली तर सध्याच्या शासनव्यवस्थेपेक्षा इंग्रजांची शासनव्यवस्था चांगली चालली होती हे मान्यच करायला हवं; पण 'स्वराज्याची तहान सुराज्याने भागणार नाही, आमची माणसं तिथं असणं आवश्यक आहे.' असं म्हणून आपण इंग्रजांना काढलं आणि आमची म्हणून जी माणसं बसवली ती समाजातल्या एका विशिष्ट थरातीलच बसवली. त्यानंतर उरलेल्या लोकांनी जर आता असं म्हणायला सुरुवात केली की इंग्रजांचं राज्य गेलं, त्याच्यापेक्षा कमी कुशलतेचं, कमी कर्तबगारीचं असं राज्य आम्ही स्वीकारलं; पण या राज्यामध्ये आमचीसुद्धा माणसं तिथं बसली पाहिजेत, भले ती आणखी कमी कर्तबगार असली तरी चालतील. इंग्रजी आणि सवर्णांचं शासन यांच्या कर्तबगारीमध्ये जी काही तफावत होती तितकीच, कदाचित् जास्त तफावत सवर्णांचं शासन आणि मागासलेल्या जातींचं शासन यांच्यात असेल; पण भले असो. आमची स्वराजाची तहान सुराज्याने भागणार नाही. आमची माणसं तिथं आली पाहिजेत, असा जर आग्रह धरला तर त्यात काय चूक आहे?

 पण तरीसुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न राहतो. आमचं काय चूक आहे, आम्हाला

भारतासाठी । १७