पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आहे. म्हणजे निदान, ३७ वर्षे देशापुढे हा प्रश्न आहे. ३७ वर्षे आणि विशेषतः गेली १० वर्षे देशामध्ये या विषयावर चर्चा होते आहे, काही चर्वितचर्वण होत आहे. आणखी काही चर्चा होण्यासारखी बाब शिल्लक राहिली होती असं म्हणणं कठीण आहे. तेव्हा चर्चा न करता, विचारविनिमय न करता हा निर्णय घेण्यात आला हे म्हणणं काही फारसं बरोबर नाही; पण तरीसुद्धा, इतर कोणत्याही मुद्द्यावर जितकं प्रखर आंदोलन उभं राहत नाही इतकं मोठं आंदोलन या विषयावर उभं राहत आहे; संघर्ष उभा राहत आहे एवढंच नव्हे, तर या रागातूनच पुन्हा एकदा देशाचे तुकडे पडायची वेळ येते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे.
 देशाचे मुख्य प्रश्न हे आर्थिक आहेत. गरिबी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पण तरीसुद्धा गरिबीच्या प्रश्नावर लोकांच्या भावना जितक्या प्रखर होत नाहीत तितक्या प्रखर भावना जातीवार जागा राखीव ठेवण्याबद्दल तयार होतात. हा काय प्रकार आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. इतक्या मोठ्या प्रखर भावना ज्या विषयावर तयार होतात, ज्याच्यावर महाभारतासारखं युद्ध होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी, की एक बाजू खरी आणि एक बाजू खोटी असं म्हणणं फार कठीण होतं. कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये सर्व बरोबर असं कुणाचंच नव्हतं. दोन्ही बाजूच्या चुका होत राहिल्या; पण दोघांमध्येही एकदा अभिमान आणि अभिनिवेश तयार झाला की मग त्यातून महाभारत युद्ध तयार होतं आणि हताशपणे सर्व धृतराष्ट्र आणि सर्व कृष्णसुद्धा महाभारताच्या युद्धामध्ये सामील होतात. हाच इतिहास थोड्याफार प्रमाणामध्ये इथं पुन्हा घडतो आहे.

 नोकरी ही गोष्ट गेल्या काही वर्षांत, विशेषतः स्वातंत्र्यानंतर मोठी आकर्षक ठरली आहे. उत्तम शेती तर बाजूलाच राहिली, मध्यम व्यापार हीही गोष्ट बाजूला राहिली आणि आता सगळ्यात सुखाचं आयुष्य कुणाचं असेल तर ते नोकरदारांचं आणि विशेषतः सरकारी नोकरदारांचं अशी परिस्थिती तयार झाली आहे. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी प्राथमिक शिक्षक हा सार्वजनिक करुणेचा विषय होता. प्राथमिक शिक्षकांची परिस्थिती थोडीफार सुधारली पाहिजे, नाहीतर गुरुजींनी काम कसं करायचं, नवी पिढी तयार करणं हे ज्याचं काम, त्या नव्या पिढीच्या शिल्पकारांना थोडंफार तरी चांगलं जगता आलं पाहिजे अशी त्यावेळी चर्चा होत असे. आज परिस्थिती अशी आहे की प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीकरिता ज्यांचे अर्ज येतात ते अर्जदार नोकरी मिळावी म्हणून २०/२५ हजारापर्यंत आणि बिहारसारख्या राज्यात ४०/५० हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्याकरिता तयार

भारतासाठी । १०