पाणी! पाणी!!/लढवय्या

विकिस्रोत कडून






२. लढवय्या
 'वाईफ - भल्या पहाटे शेतात जाऊन अंग मोडून काम केल्यानंतर घरी येऊन तुझ्या हातची न्याहरी खाण्यात काही औरच मजा आहे बघ!' महादूचं हे पेटंट वाक्य असायचं. 'सैन्यात सकाळी पी.टी. केल्यानंतर ब्रेकफास्ट, इथं गावी शेतात जाऊन आल्यावर न्याहारी - वा, क्या बात है...' अशा वेळी आवडा खुदकन हसायची - प्रत्येक वेळी !

 ‘धन्याचं सारंच न्यारं असतं बाई' दुपारी चार बायकांत गप्पा मारताना आवडा सांगायची. ‘सारे शेतकरी शेतातच न्याहरी घेऊन जातात, पण त्यांना घरी येऊन गरमागरम खायचं असतं. ब्रेकफास्ट म्हणे...' इतर बायकांच्या आधी आवडाच तोंडाला पदर लावून खुसूखुसू हसायची. 'मला ते ‘वाईफ' म्हणून हाक मारतात सयांनो - विंग्रजीत...'

 आजही महादू नेहमीप्रमाणे भल्या पहाटे उठून शेतात गेला होता. नेहमीच्या वेळेला तो घरी सैन्यातल्या सवयीप्रमाणे लांब लांब ढांगा टाकीत आला तो मान टाकलेल्या बैलावाणी ! कधी नव्हे तो आज त्यानं दाढी करायला फाटा दिला- ‘हे आक्रीतच म्हणायचं बाई-' आवडा स्वतःशीच पुटपुटली. घोटून दाढी करणे व अक्कडबाज मिशा वळवणे, हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा क्रम होता. तो आज त्यानं चुकवला. तेव्हाच आवडाच्या ध्यानी आलं की, कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे.


लढवय्या /१७
 खरं तर आज ती त्याची वाटच पाहात होती. बऱ्याच दिवसांनी तिनं त्याच्या

आवडीची न्याहरी बनवली होती. त्याला दही फार आवडायचं, म्हणून काल म्हशीचं दूध विकत घेऊन दही लावलं होतं. आणि शिळ्या भाकरी कुस्करून दही घालून लसणाची सणसणीत फोडणी दिली होती. महादूला ती फार आवडायची.

 सैन्यातून सेवानिवृत्ती घेतल्यावर गावी आल्यावर पहिल्या बाजारहाटाला तालुक्याहून त्यानं एक टेबलखुर्ची आणली होती. त्यावर बसूनच तो न्याहरी व जेवण करायचा. 'वाईफ, मांडी ठोकून बसत जेवायची सवय गेली बघ. आता टेबल खुर्चीविना जेवता येत नाही.' आवडाला त्याची ही कृतीही आवडायची. कारण खेडेगावात टेबलावर बसून ब्रेकफास्ट घेणारा तोच एकटा आहे, हाही तिच्या अभिमानाचा भाग होता. आपल्या मैत्रिणीला हे पुन्हा पुन्हा सांगताना तिच्या स्वरात अभिमान व नव-याविषयीचा आदर झळकायचा.

 आज तो नेहमीच्या सवयीनं टेबल-खुर्चीवर येऊन बसला. आवडानं वाडग्यात दह्या त कुस्करलेली व लसणाची खमंग फोडणी दिलेली शिळ्या भाकरीची न्याहरी ठेवली. पहिला घास घेताच गडगडाटी हसत तो 'वाईफ वा , क्या बात है!' असे उद्गार काढील अशी तिची अपेक्षा होती; कारण मागच्या मोसमात रोग होऊन बँकेचे कर्ज काढून घेतलेली म्हैस मेल्यापासून त्यांनी बकरीचं दूधच वापरायला सुरुवात केली होती. कारण महादूच्या लान्सनाईकपदाच्या तुटपुंज्या पेन्शनीत तेच परवडायचं. त्याला बकरीच्या दुधापासून बनवलेलं दही आवडत नसे, पण आताशी त्याची सवय झाली होती. पण काल तालुक्यात जाऊन त्यानं पेन्शन आणली तेव्हा तिनं खास म्हशीच दूध विकत घेऊन आजच्या न्याहरीसाठी दही बनवलं होतं.

 पण त्याचं न्याहरीकडे लक्ष नव्हतं. तो कितीवेळ तरी न्याहरीला सुरुवात न करता तसाच मूक बसून होता. मग भानावर येत त्यानं एक घास घेतला, पण काही न बोलता गाईनं संथपणे खाल्लेला चारा रवंथ करावा, तसा तो पहिलाच घास त्याच्या तोंडात फिरू लागला.

 आवडा त्याच्यासमोर गुडघ्यात पाय मोडून बसली होती आणि अस्वस्थपणे त्याच्याकडे एकटक पाहात होती. पण काही बोलायचा धीर होत नव्हता. महादूच आज काहीतरी बिघडलं आहे हे नक्की. त्याला वाटलं तर तो आपणहून सांगेल, नाहीतर तो हुं की चू करणार नाही, हे तिला माहीत होतं.

पाणी! पाणी!! / १८

 सकाळी आपल्या शेतावर जाऊन महादूनं गतवर्षी लावलेल्या फळबागेची पाहणी केली. शासनाच्या रोजगार हमीशी निगडीत फलोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी म्हणून त्याची निवड झाली होती व त्यानं माजी सैनिक म्हणून मिळालेल्या सीलिंगच्या पाच एकर जमिनीच्या दोन एकरावर आंबा व डाळिंबाची झाडे लावली होती. यंदाचं हे दुसरं वर्ष. पुढल्या वर्षी पीक पदरात येईल, तोवर जपलं पाहिजे फळबागेला. पाणी घातलं पाहिजे, झाडे जगवली पाहिजेत.

 उत्तरेला दोन फर्लागावर तीन वर्षांपूर्वी एक पाझर तलाव झाला होता. त्यात मार्च महिन्यातही पाणी शिल्लक होतं. तेथून त्यानं सैनिकी तडफेनं कावडीतून चार-पाच खेपा करीत पाणी आणून झाडांना दिलं होतं. ही फळबाग करपणार नाही एवढंच पाणी जेमतेम देता आलं. येत्या मृगात बरसात झाली की झाडं पुन्हा जोमाने वाढणार, पण तोवर त्यांना जपलं पाहिजे...

 सैन्यात असतानाच त्यानं गावी जमीन मिळावी म्हणून अर्ज केला होता व निवृत्तीच्या एक वर्ष आधी गावातील सरपंच दाजिबा पाटलाची जमीन सीलिंग कायद्याखाली अतिरिक्त म्हणून जाहीर झाली होती. त्यातला पाच एकराचा तुकडा महादूला सहजपणे मिळून गेला होता.

 गावी परतल्यावर त्यानं मोठ्या मेहनत - मशागतीनं ही जमीन जोपासली होती. अक्षरशः खडकाळ असलेली जमीन त्यानं राब राब राबून पिकाखाली आणली होती. आजवर गावकुसाबाहेर त्याच्या वाडवडलांची जिंदगी धर्मांतरापूर्वी म्हारकीची कामं करण्यात गेलेली, पण आज महादू जातिवंत शेतक-याइतकाच जमिनीवर जीव जडवून होता - त्यासाठी त्यानं रक्ताचं पाणी केलं होतं.

 दाजिबानं आपली जमीन सीलिंगमध्ये जाऊ नये म्हणून काय काय लटपटी - खटपटी केल्या होत्या; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तरीही महादूला मिळालेली जमीन त्याला सहजासहजी पचू नये अशा खटपटीत तो नेहमीच असायचा. ताबा मिळाल्यावरही सातबाऱ्यावर नाव लवकर आलं नाही; कारण गावतलाठी दाजिबानं फितवले. त्यासाठी तहसीलला दहा खेपा झाल्या, जिल्हा सैनिक बोर्डाकडे अर्ज केले, तेव्हा कुठे फेरफार होऊन मिळालेल्या जमिनीच्या मालकी व वहितीच्या रकान्यात त्याचं नाव लावलं गेलं.

 तो सातबाराचा निर्जीव कागद व त्यावर मालक म्हणून प्रतिबंधित का होईना, मालक म्हणून असलेलं आपलं नाव पाहाताना कणखर सैनिक असलेल्या महादूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर जिंदगी घालवणाऱ्या त्याच्या घराण्याला मूळ धरायला जमीन नव्हती, ती आज मिळाली होती. खऱ्या अर्थाने आज तो भूमिपुत्र झाला होता ! ‘वाईफ, क्या बात है...' एवढंच कसंबसं डोळे पुसत महादू म्हणाला आणि आपलं नित्याचं गडगडाटी हसू हसला.


लढवय्या / १९

 पहिली दोन वर्षं निसर्गानंही चांगलीच साथ दिली. त्याला हिरवा नजराणा भरघोस मिळाला; पण मागच्या वर्षी अपुऱ्या पावसानं सूर्यफूल व ज्वारी पूर्णपणे करपून गेली... त्याच्यासाठी हा फटका जबर होता. पण महादू आघाडीप्रमाणे जीवनाच्या क्षेत्रातही लढवय्या होता. आपलं सैनिकी तत्त्वज्ञान सांगताना आवडाला तो म्हणाला : होता, ‘वाईफ, अगं, एक लढाई हरली म्हणजे युद्ध हरलं असं समजायचं नसतं !'

 आणि त्याचवेळी त्याची फळबागेच्या योजनेसाठी निवड झाली. शासनाच्या खर्चाने आपल्या जमिनीवर फळझाडे लावण्याची अनोखी योजना. मेहनत आपण करायची आपल्याच शेतामध्ये. मजुरी शासन देणार. पुन्हा फळबागाचं उत्पन्नही आपलं. खरिपाचं पीक गेल्यामुळे नाउमेद बनलेल्या महादूच्या मनाला त्यामुळे उभारी आली.

 दीड वर्षानंतर त्याच्या जमिनीच्या दोन एकरात आंबा - डाळिंबाची झाडं चांगलीच तरारून आली होती ! त्याची कड़ी निगराणी व सक्त मेहनत कामाला आली होती. पण दिवाळी गेली तशी जमिनीतली ओल कमी झाली, झाडांना पाणी कमी पडू लागलं. तसं महादूनं दररोज दोन फर्लागावर असलेल्या पाझर तलावातून कावडीनं ‘लेफ्ट-राईट' करीत पाणी आणून झाडांना द्यायला सुरुवात केली.

 दाजिबानं त्याच्याविरुध्द हा पाझर तलाव बांधणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे तक्रार केली होती. पण शासनाची लाल फीत इथं महादूच्या पथ्यावर पडली. खरं तर त्या पाझर तलावाखाली जवळपास अर्धा - एक किलो मीटर क्षेत्रात एकही विहीर झालेली नव्हती; तलावाचं पाणी पाझरून खालच्या क्षेत्रात विहिरीचे पाणी वाढावं यासाठी पाझर तलाव बांधले जातात. पण खाली विहिरी नसल्यामुळे निव्वळ धूप होऊन जाणारं पाणी झाडांना पाजलं तर बिघडलं कुठं? हा त्याचा सवाल होता.

 पण यंदा दुष्काळाचं सावट गावावर आलं होतं. रब्बी पेर न झाल्यामुळे शेतमजुरांना व दुष्काळाचा फटका बसून खरीप गेलेल्या छोट्या - छोट्या शेतक-यांनाही पोटाची खळगी भरण्यासाठी काम हवं होतं. त्यात महादू - आवाचाही समावेश होता!

 गावक-यांनी गावातच दुष्काळी काम निघावं म्हणून अर्ज केला होता. त्यात दाजिबाचा सरपंच या नात्यानं पुढाकार होता. या अर्जावर महादूनंही सही केली होती - लफ्फेदार इंग्रजीत. बरेचसे सहीचे अंगठे, काही मराठीत तोड़कीमोड़की सही यामध्ये त्याची ऐटबाज सही उठून दिसत होती !

 काही दिवसांतच सर्व्हेसाठी डेप्युटी इंजिनिअर आले. पाझर तलावाची जागा निश्चित करून अलाईनमेंट घेण्यासाठी.... आणि महादूच्या अंगाचा तिळपापड झाला दाजिबाचा कावा त्याच्या ध्यानी आला.

 या पाझर तलावात जवळपास बारा एकर जमीन जाणार होती. त्यात महादूला सीलिंगमध्ये माजी सैनिक म्हणून मिळालेली पूर्ण पाच एकर जमीन जात होती. इंजिनिअरनी जेव्हा अलाईनमेंट केली, तेव्हा त्याच्या हे ध्यानी आलं. आणि


पाणी! पाणी!! / २०
नुकतीच जमिनीत रुजू लागलेली व जमीन धरू लागलेली आपली मुळे उखडली

जाताहेत या जाणिवेनं तो हादरून गेला...

  हा दाजिबाचाच डाव होता हे निश्चित. याची महादूला पूर्ण खात्री होती. त्याच्या शेजारी त्याचीच जमीन सीलिंगमध्ये मिळून आपणही शेतमालक बनलो, हे त्याला सहन होत नाही. अजूनही त्याच्या डोक्यात व मनात आपली - धर्मांतर करून बौद्ध झालो असलो तरी म्हारकीची भावना घर करून आहे, हे महादूला दाजिबाच्या शब्दातून नव्हे, तर कृतीतून जाणवत होतं.

 त्यानं तालुक्याला जाऊन सर्व्हेक्षण करणा-या इंजिनिअरची भेट घेतली व तळमळीनं सांगितले,

  ‘साहेब, मी रिटायर्ड लान्सनाईक आहे महार रेजिमेंटचा. मला एकाहत्तर युद्धात पराक्रमाबद्दल वीरचक्रही मिळालं आहे सर. शासनानं आमचं पुनर्वसन व्हावं म्हणून ही जमीन दिली, ती पूर्णपणे तुम्ही घेणार? यात शासनाने त्याच्या खर्चानं मला फळबाग रोजगार हमीतूनच करून दिली आहे... आणि आमची पेन्शन किती कमी असते हे तुम्हाला मी सांगायला नको. त्यावर आणि या जमिनीच्या उत्पन्नावर आमचं कुटुंब कसंतरी जगतंय, तेच तुम्ही हिरावून घेतल्यावर आम्ही पोट कसे भरावं?"

 पण तो उपअभियंता हा बिनचेह-याचा निर्जीव - बथ्थड नोकरशहा होता. त्यानं थंडपणे उत्तर दिलं, “अलाईनमेंटप्रमाणे या पाझर तलावाच्या बुडीत क्षेत्रात तुमची जमीन येते, त्याला मी काय करू?"

 तो निराश होऊन बाहेर आला. आपण पुन्हा भूमिहीन होणार ही भावना त्याला सहस्र इंगळ्या डसाव्यात, तशी वेदना देत होती !

  महादूला मागून कुणीतरी हाक मारली, तसा भानावर येत त्यानं वळून पाहिलं, या कार्यालयातील सव्हेंअर होता, जो गावामध्ये पाझर तलावाच्या सर्व्हेसाठी आला होता. त्यानं चहा पीत जी माहिती दिली, ती ऐकून त्याला वेड लागायची पाळी आली आणि दाजिबा व त्या उपअभियंत्याची मनस्वी चीडही आली. कारण मूळच्या सर्वेक्षणाप्रमाणे निश्चित झालेल्या अलाईनमेंटमध्ये महादूच्या शेताला लागून असणारी दाजिबाची बारा - तेरा एकर जमीन जात होती, तर महादूच्या जमिनीचा एक इंचही जात नव्हता. उलटपक्षी तिथपर्यंत आठ-दहा महिने पाणी राहणार असल्यामुळे महादूला रब्बीसोबत उन्हाळी पीकही त्यामुळे घेता येणार होतं. आपली जमीन बुडीत क्षेत्रात जाणं आणि त्याचा भरघोस फायदा महादूला होणं, हे दोन्ही दाजिबाला नको होतं. त्यानं आपल्या सरपंचकीच्या जोरावर मूठ गरम करीत उपअभियंत्याशी हातमिळवणी केली आणि चक्क पाझर तलावाची अलाईनमेंट बदलली होती. त्यामुळे खर्चही वाढत होता. या नव्या अलाईनमेंटप्रमाणे महादूची पूर्ण जमीन पाण्याखाली जाणार होती!

 ‘ब्लड़ी सिव्हिलियन साला. महादूच्या ओठातून अस्सल शिवी आली. ‘साहेब, आम्ही सैनिक सीमेवर लढतो, पहारा देतो तो हा देश व या देशाची माणसं सुरक्षित राहावीत म्हणून. आणि हे आमची जमीन लुबाडतात, आमच्या जगण्याचं

लढवय्या । २१
साधन हिरावून घेतात - का, का म्हणून आम्ही सैनिकांनी आपला जीव धोक्यात

घालायचा ? या... या क्षुद्र स्वार्थी ब्लडी सिव्हिलियनसाठी?'

 "मी आपलं दुखणं समजू शकतो कांबळे साहेब-" तो सर्व्हेंअर म्हणाला. 'माझा मोठा भाऊ पण सैन्यात होता आणि एकाहत्तरच्या युद्धात बांगला देशात त्याला वीरगती प्राप्त झाली...'

 क्षणभर महादूही गंभीर झाला. सर्व्हेंअरचा भाऊ त्याचा परिचित होता. एवढंच नव्हे, तर त्याच्याच तुकडीत जवान होता आणि युद्धाच्या धुमश्चक्रीत तो महादूच्या डोळ्यासमोर मारला गेला होता.

 ‘पण अलाईनमेंट बदलणं हा घोर अन्याय आहे साहेब-' काही वेळानं महादू म्हणाला, 'तुम्हीच सांगा, आता मी काय करू?'

 'त्यासाठी तुम्हाला वरपर्यंत गेलं पाहिजे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कलेक्टर, पण तूर्त तुम्ही पाझर तलावाच्या कामासाठी तुमची संमती मागायला अधिकारी येतील, तेव्हा त्यांना ती देऊ नका. मग त्यांना तेथे काम करण्यासाठी जमीन भूसंपादन कायद्याप्रमाणे कार्यवाही करून संपादित करावी लागेल. त्यासाठी कायद्यानं तीन वर्षे लागतात. तोवर तुम्हाला प्रयल करता येतील...'

 सर्व्हेअरच्या मार्गदर्शनानं थोड़ी उमेद घेऊन महादू गावी परतला होता.

 त्या दिवसापासून तो वेड्यासारखा आपल्या शेतामध्ये वेळी - अवेळी काम असो - नसो चकरा मारत होता. जमिनीचा तसू तसू निरखून पाहात बसायचा. एक एक आंबा - डाळिंबाचं झाड हळुवारपणे पानाफुलांना स्पर्शत कुरवाळायचा. ही काळी आई आपणास पारखी तर होणार नाही ना? या विचारानं मन व डोकं जड व्हायचं त्याच्या गावातच नव्हे, तर सबंध तालुक्यात त्यावर्षी दुष्काळ जाहीर झाला होता आणि मोठ्या प्रमाणावर रिकाम्या हातांना काम आणि पोटाला अन्न मिळावे म्हणून रोजगार हमीची कामं सुरू करण्यात आली होती. शेजारच्या गावात बंडिंगचे एक काम चालू होतं, तिथं मजुरीही चांगली पडत होती. महादूच्या गावचे जवळपास साठ-सत्तर मजूर कामावर जात होते. त्यामुळे महादूची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाच्या कामाला मागणी नव्हती. त्यामुळे महादू काहीसा निवांत होता.

 पण सुमारे दीड महिन्याने बंडिंगचं ते काम संपलं. त्या गावातलं पाणलोट क्षेत्रातलं पूर्ण काम झाल्यामुळे आता तिथं या हंगामात तरी काम निघणं शक्य नव्हते. त्यामुळे त्या गावचे व महादूच्या गावचे जवळपास सव्वाशे मजूर कामाअभावी बेकार बसून राहिले होते.

 याचा फायदा घेऊन दाजिबानं गावातलं पाझर तलावाचं मंजूर असलेले काम सुरू करावं, असा अर्ज तहसीलदारांकडे दिला. तेव्हा जमीन जाणा-या शेतक-याचा जमीन घेण्यासाठी संमती मिळवण्यासाठी तहसीलदाराच्या आदेशावरून तो उपअभियंता गावी आला, महादूसगट चार शेतक-यांची जमीन बुडीत क्षेत्रात जात होती. महादू वगळता इतरांनी दाजिबाच्या सांगण्यावरून व त्यांची थोडी थोडी जमीन जात

पाणी! पाणी!! / २२
असल्यामुळे व उर्वरित जमीन बागायत होण्याची शक्यता असल्यामुळे संमती लिहून

दिली. मात्र महादूनं साफ इन्कार केला !

 आणि ज्या गावानं एकेकाळी बांगला देश युद्धात अतुलनीय पराक्रम केल्याबद्दल वीरचक्र मिळालं म्हणून त्याचा सत्कार केला होता आणि ग्रामपंचायतीनं ‘जय जवान - जय किसान' कीर्तिस्तंभ उभारला होता, त्यांच्या नजरेतून तो यामुळे एकाएकी उतरला गेला. कारण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न होता, भुकेचा प्रश्न होता !

 त्यानं खूप तळमळून यातला गैरप्रकार व दाजिबाचा दुटप्पीपणा सांगायचा प्रयत्न केला, पण दाजिबा गावक-यांना बहकावण्यात चांगलाच यशस्वी झाला होता. त्यांचा उलट असा समज झाला की, गावचं विकासाचे - पाझर तलावाचं काम महादूच्या आडमुठेपणामुळे होत नाही आणि तोच मजुरांच्या उपासमारीला जबाबदार आहे.

 गावक-यांची बदललेली नजर महादूला विद्ध करीत होती, पण तो ठाम होता. त्यानं या अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढायचं ठरवलं होतं. गावचा रेशन दुकानदार त्याचा बालमित्र होता. त्याच्याशी बोलताना महादू निश्चयी सुरात म्हणाला होता -

 'मी लढवय्या आहे. माझ्यावर पाझर तलावाची अलाईनमेंट बदलून मुद्दाम अन्याय करण्यात आला आहे. त्याविरुद्ध मी लढत आहे; पण वाईट याचं वाटतं की, हे गावकरी का समजून घेत नाहीत? त्यांच्या हाताला काम नाही हे मलाही फील होतं, पण मी तरी काय करू? गावासाठी त्याग करा म्हणणारे हे भोंदू - पोट भरलेले पुढारी स्वतःची जमीन का देत नाहीत?'-

 आज गावात तालुक्याचे तहसीलदार व बी. डी. ओ. साहेब येणार होते, पाझर तलावासाठी महादूची संमती मिळवण्यासाठी. मघाशी शेतातच कोतवाल येऊन खबर देऊन गेला होता.

 म्हणून आज न्याहरीत त्याचं मन नव्हतं. घास तोंडात फिरत होता. आवडानं केलेली फर्मास दही - भाकरी त्याला जात नव्हती. घुम्यासारखा तो बसून होता आणि त्याची ही अवस्था पाहून आवडा अवघडली होती.

 कशीबशी त्यानं न्याहरी आटोपली. नेहमीच्या सवयीनं आंघोळ केली आणि कपडे करून तो समोरच्या खोलीत बाजेवर अस्वस्थ पडून राहिला.

 काही वेळानं तो भानावर आला, तो आवडीच्या हाकेनं. ‘धनी, कोतवाल आलाय जनू. तुमास्नी चावडीवर बोलविलंय... बिगी बिगी.'

 'ठीक आहे, मी येतो म्हणून सांग!' बाजेवरून तो उठत म्हणाला. दारातूनच परत आला आणि कसल्याशा विचारानं त्यानं पेटीतून आपला कडक लष्करी ड्रेस काढला, वीरचक्र पदक काढलं. ते छातीवर लावून ऐटबाज चालीनं तो काही क्षणांतच चावडीमध्ये पोचला.

 तिथं चावडीसमोरच्या पटांगणात खुर्चीवर तहसीलदार व बी. डी. ओ बसले होते. त्यांच्या बाजूला सरपंच दाजिबा पाटीलही बसला होता.

 महादूनं कडक सॅल्यूट ठोकला व आपला हात पुढे करीत म्हणाला,


लढवय्या /२३
"गुड मॉर्निग सर, आय अॅम लान्सनाईक महादेव कांबळे - विनर ऑफ

वीरचक्र मेडल इन बंगलादेश वॉर ...!"

 तहसीलदार तरुण, पोरगेलेले होते. त्यांनी हस्तांदोलन करीत त्याला बाजूची रिकामी खुर्ची देऊ केली. ते दाजिबाला तितकंसं आवडलं नाही. त्याच्या टक्कल पडलेल्या कपाळावरचं आधीच असलेलं आठ्यांचं जाळं जास्तच विस्तृत झालं.

 'महादेव कांबळे, तुम्ही एक सैनिक आहात. तुम्हाला यावर्षी किती भयानक दुष्काळ पडला आहे, हे मी सांगायला नको.' तहसीलदार बोलत होते. 'इथं या गावात कलेक्टर साहेबांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत पाझर तलावाचं काम मंजूर केलं आहे. ते सुरू करणं आवश्यक आहे. कारण इथल्या मजुरांना काम नाही. त्यासाठी तुमची संमती हवी आहे. तुम्हाला भूसंपादन होऊन रीतसर मावेजा मिळेलच. पण नव्या नियमाप्रमाणे ऐंशी टक्के मावेजा आगाऊ मिळेल. मी स्वतः प्रयल करून तुम्हाला दोन महिन्यात तो मिळवून देईन. तरी आपण संमती द्यावी.'

 'सर, याबाबतीत माझ्यावर घोर अन्याय झाला आहे' महादू म्हणाला, 'माझी अशी माहिती आहे की, या पाझर तलावाची अलाईनमेंट बदलण्यात आली आहे. त्यामुळे माझी पूर्ण जमीन बुडीत क्षेत्रात जातेय. मूळच्या अलाईनमेंटमध्ये केवळ अर्धा-पाऊण एकर जाईल, त्यासाठी माझी आजही तयारी आहे; पण या सरपंचाने - दाजिबा पाटलानं त्या डेप्युटी इंजिनिअरशी हातमिळवणी करून चक्क अलाईनमेटच बदलून टाकली आहे. त्यामुळे त्याची जमीन वा ते व माझी पूर्णपणे जाते, हा घोर अन्याय आहे माझ्यावर.'

 तहसीलदार व बी.डी.ओ. दोघेही अवाक् होऊन महादूकडे पाहात राहिले. ताइकनु उठत दाजिबा म्हणाला, 'हे-हे समदं झुट हाय साहेब, यो कांबळे झूट बोलतोया. अलाईनमेंट विजेनिअर साहेब करतात, ती मह्यासाठी ते कामून बदलतील ? तुमास्नी तरी ते खरं वाटेल? तुमीच बोला साहेब, हे आक्रीत नाय वाटत?”

 'कांबळे... बी. डी. ओ म्हणाले, हे खरं नाही वाटत. अशी अलाईनमेंट बदलून डेप्युटी इंजिनिअरला काय मिळणार आहे?'

 'ते मी सांगायला हवं साहेब?" महादू म्हणाला. मग तो तहसीलदाराला उद्देशून म्हणाला, 'सर, तुम्ही तरुण आहात. डायरेक्ट मामलेदार झालेले आहात, ' म्हणून न्यायाची अपेक्षा करतोय मी तुमच्याकडून. मी पूर्ण जबाबदारीनं बोलतो आहे, खरंच असा प्रकार घडला आहे. तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला ते दिसून येईल, ' असं मला वाटतं. माझं म्हणणं बरोबर असेल तर न्याय करा, चूक असेल तर तुशाल । जमीन घ्या.'

 त्याच्या या स्पष्ट व निर्भीड बोलण्यानं तहसीलदाराचं मत महादूबद्दल अनुकूल झालं होतं. असे अलाईनमेंट बदलण्याचे प्रकार होत असतात, हे त्यांना अनुभवाने ठाऊक होतं. आणि त्या संबंधित डेप्युटी इंजिनिअरबद्दल ब-याच तक्रारी होत्या. पण


पाणी! पाणी! / २४ ।
ही बाब पूर्णतः तांत्रिक असते. त्यासाठी पुन्हा सर्व्ह करणा-या त्याच डेप्युटी इंजिनिअरला

विचारावं लागणार. पण तो हे कधीच कबूल करणार नाही, हेही उघड होतं. तेव्हा रोजगार हमी शाखेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यामार्फत तपासणी करून घ्यावी लागेल...

 तहसीलदार काही न बोलता विचारात गर्क झाले होते. पण या साच्या बाबीत फार वेळ जाणार होता. तोवर रिकाम्या हातांचं काय? हा प्रश्न होता. तहसीलदारांना ती चिंता होती. कारण या भागात शेतकरी - शेतमजूर पंचायत प्रबळ होती. त्यांच्यामार्फत मजुरांनी लेखी अर्ज विहित नमुन्यात करून काम मागितलं तर कुठलं द्यायचं ? ही अवघड समस्या होती. जवळपासच्या आठ किलोमीटर परिसरात दुसरं कोणतंही काम तातडीने उपलब्ध होण्यासारखं नव्हतं! म्हणून हे काम सुरू होणं गरजेचं होतं, त्याचा हा असा वांधा झाला होता.

 महादेव कांबळे हा खरंच बोलत असावा हे तहसीलदारांना जाणवत होतं, पण ते चौकशीत सिद्ध होईल का? मूळच्या सर्व्हेक्षणाची कागदपत्रे तर डेप्युटी इंजिनिअर ठेवणार नाही - कंटुरमॅपप्रमाणे पुन्हा इतर यंत्रणेमार्फत सर्व्ह करावा लागेल...

 ‘साहेब, ह्यो कांबळे तुमास्नी येड पांघरून पेडगावला नेत हाय...' दाजिबा म्हणाला. 'म्याबी म्हंतो, हून जाऊ द्या, तुमी चवकशी करा....' त्याने थंड डोक्यानं विचार करीत महादूचं आव्हान स्वीकारण्याची घोषणा केली. त्याचाही हिशोब तहसीलदारांच्या विचाराप्रमाणे होता !

 काहीच निर्णय न घेता तहसीलदार व बी. डी. ओ. जीपमध्ये बसून निघून गेले. महादूही उपस्थित गावक-यांकडे पाहात घरी परतला.

 पण दाजिबानं गावक-यांना थांबवून धरलं व महादू दृष्टिआड झालेला पाहून तो मधाळ स्वर पेरीत बोलू लागला,

 ‘म्हटलं हाय ना, चोर तो चोर, वर शिरजोर... महादूची तीच गत हाय बाबांनो. तेस्नी मिलिटरीची लई ढोस हाय. पन तुमीच बगा, माजी सीलिंगची जिमीन निघाली, ती महादूला मिळाली, आजून दोघांना मिळाली... त्या मी मनात आणलं अस्तं तर रोकू शकलो असतो, कोर्टकचेरी करता आली असती, पण म्या नाय तसं केलं... असा हा दाजिबा आपुली सोताची जिमिन वाचावी म्हणूनशानी असं वंगाळ काम करेल? छ्या छ्या, नाय बाबांनू नाय, म्या असं करेन तर माह्या सात पिढ्या नरकात जातील... महादू झूट बोलतोया...' त्याच्या समोर हातांना काम नसल्यामुळे व पोटाला फाके पडू लागल्यामुळे समस्त गावकरी होते. ‘अलाईनमेंट बदलणं व पाझर तलावाची साईट सरकावून घेणं' या तांत्रिक बाबी, जाणाऱ्या होत्या हे धूर्त दाजिबा जाणून होता, म्हणून त्याला स्पर्श न करता त्यांच्या काळजाला हात घालीत तो पुढे म्हणाला,

 ‘तुम्ही आमचे मायबाप मतदार - तुमच्या जीवावर तर म्या सरपंच झालो... म्या तुमच्याशी कदी सुदीक बेइमानी करणार नाय... आता खरा सवाल हाय तुमास्नी काम देण्याचा... मला तुमीच सांगा, योका माणसाच्या आडमुठेपणापायी साठ-सत्तर

लढवय्या /२५
मजुरांना मंजुरी मिळत नाय. चारीचं कुपन मिळत नाय.. योच खरा अन्याय हाय...

तो तुमी चालू देणार ? - नाय, शाप नाय -! या - या महादूला लई ढोस चढलीया... तेस्नी चांगलाच धडा शिकवाया हवा-'

 सारे उपस्थित गावकरी त्याच्या प्रभावाखाली आले होते आणि दाजिबाने त्यांच्याकडून खुबीनं महादूला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर सामाजिक बहिष्कार : टाकण्यासाठी कबूल करवून घेतलं होतं !

 आणि गावक-यांचा महादूवर अलिखित सामाजिक बहिष्कार सुरू झाला. दोन दिवस महादूला त्याची जाणीव झाली नाही. पण गिरणीत पीठ आणण्यासाठी जेंव्हा त्याचा मुलगा गेला, तेव्हा गिरणीवाल्यानं त्याला शिव्या हासडून परत पाठवलं , तर पाणवठ्यावर आवडाशी कोणी बोललं नाही. महादू स्वतः जेव्हा गावातल्या एकमेव किराणा दुकानात सामान आणायला गेला, तेव्हा दुकानदारानंही त्याला सामान दिलं नाही. तेव्हा तो खवळला आणि थेट सरपंचाच्या घरी गेला आणि गरजला,

 ‘सरपंच, हे बरं नाही. हा असा सामाजिक बहिष्कार टाकणं हा कायद्यान गुन्हा आहे. मी जर लेखी तक्रार केली तर तुमच्यासह सर्वानाच त्रास होईल व गंभीर परिणाम होतील...'

 झोपाळ्यावर मंद झोके घेत सरपंच तंबाखू दाढेखाली धरून बैठकीत बसलेल्या गावक-यांशी व ग्रामपंचायत सदस्यांशी बोलत होते. क्षणभर त्यांनी थंडपणे महादूकई व उपस्थितांकडे पाहिलं व मग शांतपणे म्हणाले,

 'अरे बाबा महादू, म्या नाई सांगितलं बहिष्काराचं. म्या सोता त्याच्या इरुद्ध हाय... म्या सरपंच हाय, कायदाकानून ठाव हाय मला. म्या असं कसं करेन? या नाय टाकला तुझ्यावर बहिष्कार....!' आणि क्षणभर थांबून नाटकी स्वरात म्हणाले, 'अरे बाबा, असा उभा का? ये, असा बस - माझ्या शेजारी - बकळ जागा हाय झोपाळ्यावर.... कारभारी, जरा च्या सांगा- वीरचक्रवाले महादेव कांबळे आलं हाईत... महादू - ये बाबा, असा ये जवळ ...."

 महादू त्यांच्या या पवित्र्यानं सर्द झाला होता. चार लोकांदेखत सरपंचान त्यांना आपल्या शेजारी झोपाळ्यावर जागा देऊ केली होती, चहाचा आग्रह केला होता आणि समोर उपस्थितांमध्ये काही दलितही होते. हा सारा बेत दाजिबानं व्यवस्थितपणे जुळवून आणला असणार, यात काही शंका महादूला उरली नव्हती.

 ‘महादू, दोन दिस म्याबी इथं नव्हतो.... गाववाल्यानं असा सामाजिक बहिष्कार टाकायला नाय पायजे... म्या सा-यांनी सांगतो - तुला काई तरास होणार नाय... बहिष्कार टाकला असेल गाववाल्यांनी, तर तो आग उठेल... म्या त्येंना हात जोडून इनंती करेन बाबा तुझ्यासाठी. तू आमच्या गावची शान हायेस- वीरचक्र मिळाल हाय ना तुवास्नी... तोवर तुला मीठ - मिर्ची देतो - कारभारी, ज्वारीचं पीठ द्या बांधून महादूला... अन् त्या गिरणीवाल्या जावयाला सांगावा धाडा- म्या बोलवलंय म्हनून..." महादू - मी तेला व दुकानदाराला सांगेन...'


पाणी! पाणी!! / २६
महादू हतबुद्ध होऊन परतला. परतताना त्याला दाजिबानं हलकेच

टोकलंसुद्धा 'जरा इचार कर बाबा - गावापुढे कुनाचं चालतं ? तेस्नी काम पायजे. म्या तुजी भावना जाणतो - समदी जिमीन जाणं लई दुख देणारं हाय - पन कोशीश करून तुवास्नी जादा किंमत - जादा पैका मिळवून दीन ... पन संमती दे बाबा... उभ्या गावाशी दावा करून जगणं मुश्किल हाय....!'

 आता मात्र वेळ गमावून चालणार नव्हतं. काहीतरी केलंच पाहिजे. महादू विचार करीत होता. त्यानं सरळ कलेक्टरांना जाऊन भेटायचं ठरवलं.

 त्या दिवशी कलेक्टर घरीच होते. बरीच वाट पाहून महादूनं त्यांना घरीच जाऊन भेटायचं ठरवलं. कारण जिल्ह्याला एक चक्कर म्हणजे पन्नास रुपयांचा चुराडा व्हायचा. पुन्हा येणं अवघड व खर्चाचं होतं ! कलेक्टरांनी अनिच्छेनंच त्याला भेटायची परवानगी दिली.

 त्यानं कलेक्टरला एक कडक सॅल्यूट ठोकला.

 'अरे, तू सैन्यात होतास?'

 'होय सर, मी महार रेजिमेंटला होतो आणि एकाहत्तरच्या युद्धात मला वीरचक्र मिळालं आहे.'

 ‘म्हणजे तू लान्सनायक महादेव कांबळे ना?'

 ‘होय सर, पण तुम्हाला कसं माहीत?'

 'अरे मीही सैन्यात कमिशन घेतलं होतं. मीही मेजर होतो बाबा." पाहता पाहता कलेक्टर मोकळे झाले. त्या जिल्ह्यात वीरचक्र मिळवलेला महादू एकमेव होता, हे सैन्यात मेजर म्हणून काम केलेल्या व नंतर डेप्युटी कलेक्टर म्हणून भरती झालेल्या, पदोन्नतीनं आज या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून आलेल्या त्यांना माहीत होतं ! 'बोल कांबळे, काय काम काढलंस?'

 ‘सर, माझ्यावर अन्याय झाला आहे, त्याविरुद्ध दाद मागायला आलो आहे. सर.' महादू म्हणाला, 'मी गावच्या सरपंचानं केलेल्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. आपल्या आर्मीची शिकवण आहे - मी लढवय्या आहे सर.'

 'येस - येस् - वुई आर्मी पीपल आर ऑलवेज फायटर...' मला तुझी जिद्द आवडली कांबळे.

 महादूनं सारी हकीकत सांगितली, तसे कलेक्टर गंभीर झाले. “तू सांगतोस ते खरं असेल तर मी जरूर लक्ष घालतो. उद्याच मी माझ्या रोजगार हमीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला तपास करायला सांगतो, त्यांना गावी इन्स्पेक्शनला पाठवतो. तुझ्यावर खरोखर अन्याय झाला असेल तर तो निश्चितपणे दूर करीन मी!'

 कलेक्टरांनी आपला शब्द पाळला. महादू खराच होता, म्हणून त्याची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाची जागा बदलून मूळ अलाईनमेंटप्रमाणे ज्यात दाजिबाची पंधरा एकर जमीन जात होती, या पाझर तलावाला मंजुरी देण्यात आली.


लढवय्या / २७
 आता दाजिबानं वेगळाच पवित्रा घेतला,

 ‘काय सांगू बाबानू, ह्यो महादू धेड... आन कलेक्टरबी त्येच्याच जातीचा - दोगे योक झाले! या नव्या आदेशापरमाने पाझर तलाव झाला तर सरकारचा खर्च जादा व्हईल, पन तेचा गावास्नी कायसुदिक फायदा व्हनार नाय. योक महादूची जिमीन सोडली तर गाववाल्याला कायबी फायदा नाय. उगीच आपुन बोरगावचं धन कामून करायचं?'

 ...आणि त्यानं आपली जमीन पाझर तलावासाठी देण्यासाठी नकार दिला, तेव्हा कलेक्टरांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तातडीने जमिनीचे त्वरित अधिग्रहणाचे - रिक्विझिशनचे आदेश दिले. पण हिकमती दाजिबानं धावपळ करून हायकोर्टातून स्थगिती आदेश मिळवला.

 ‘पाहिलंत गावक-यांनो, इतरांनी जमीन द्यावी असं सांगणं किती सोप असत. पण आपल्यावर पाळी आली की कोर्टबाजी पण करायची. ह्या दाजिबाकडे शंभर सव्वाशे एकर जमीन आहे, त्याची दहा - पंधरा एकर जमीन गेली तर काय बिघडणार आहे? - पण नाही, तेव्हा मारे सांगत होता - गावासाठी, गावच्या विकासासाठी माणसानं त्याग करावा - मजुरांना काम मिळावं, त्यांचे हाल कमी व्हावेत म्हणून झीज सोसावी वगैरे वगैरे ! आता जा त्याच्याकडे व त्याला जाब विचारा...'

 महादूनं गावक-यांना सडेतोडपणानं सांगितलं. तेव्हा आधीच दुष्काळानं करपून गेलेले व हात रिकामे राहिल्यामुळे रिकाम्या पोटाचे मजूर भडकले. त्यांनी मोर्चाने जाऊन सरपंच दाजिबा पाटलाला जाब विचारला व पाझर तलावाचे काम होण्यासाठी त्यानं जमीन द्यावी, अशी मागणी केली.

 असा प्रसंग कधीतरी येऊ शकतो हे धूर्त दाजिबाला माहीत होतं व त्यासाठी त्यानं कावेबाजपणानं उपाययोजनाही करून ठेवली होती.

 ‘माझ्या गाववाल्यांनो - म्या जानतो की यामागे त्यो महादू हाय ते. तुम्हास्नी समजत नाही. बापहो, तुमचे हात आन पोटबी रिकामं हाय, हे सरपंच म्हनूनशानी मला वळखता येत नसेल तर म्या नालायक हाय असं म्हना लोक हो... म्या कोर्टात गेलो, पण कोर्टानं स्टे कामून दिला? इचार करण्याजोगी बाब ही. कोर्टाला वाटलं की, मह्यावर अन्याय झाला हाय... एवढं भारी हायकोर्ट औरंगाबादचं. लई इचार करून स्टे दिला असेल नव्हं? आता, त्यो म्हादू जमीन द्याया खळखळ करतो? झूट - सम्दं झूट -! याचं योकच परमाण देतो - म्या दुसरं रोजगार हमीचं काम मंजूर करून आणलं हाय. सडकेचं हाय, त्यात माजी जिमीन जात हाय. ती जिमीन मी फुकट दिली हाय सरकारला दानपत्र करूनशानी...आता तुमीच न्याय कराया हवा मायबापहो. माजं मन साफ हाय. तुमास्नी काम मिळावं म्हनूनशानी हें सम्दं केलं. उद्यापासून सडकेचं काम सुरू होईल, चांगले दोन अडीच महिने साऱ्यांना काम मिळेल - तोवर मंग बरसात हुईल...' जाब विचारायला आलेला तो जनसमुदाय सरपंचाचा जयजयकार करीत व आपली जमीन दानपत्र करून सडकेचं काम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना दुवा देत निघून गेला.

 मंदपणे झोपाळ्यावर बसून झोके घेत व आपल्या मिशा कुरवाळीत माघारी जाणारा तो जनसमुदाय पाहात स्वतःशीच दाजिबा पुटपुटला, ‘मूर्ख लेकाचे, खरं हाय - दुनिया झुकती है, बस् झुकानेवाला चाहिये!'

 या नव्यानं मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामामुळे दाजिबाच्या बारा एकरच्या ‘शेंद्री' या नावाने ओळखल्या जाणा-या बागायती जमिनीच्या तुकड्यापर्यंत बारमाही पक्का खडीचा रस्ता होणार होता. या शेतावर आजवर ट्रक वा दुसरी वाहनं पांदणीमुळे व दलदलीमुळे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तिथला ऊस तोडून मोळीनं अर्धा किलोमीटर अंतरावर मजुरांकरवी आणावा लागत होता. तो जादा खर्च आता कमी होणार होता. हे गावक-यांच्या लक्षात आलं नव्हतं. ते हातांना काम, मजुरी आणि धान्य मिळतंय यातच खुश होते !

 आपल्यावरचं संकट टळल्यामुळे महादूनंही त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

 आता त्याची फळबाग चांगलीच वाढली होती, विकसित झाली होती. आणखी दोनेक वर्ष निसर्गानं चांगली साथ दिली तर शेतावर विहीर घेता येईल व पूर्ण क्षेत्र बागायत करता येईल, याची त्यानं स्वप्नं पाहायला सुरुवात केली!

 पण दाजिबानं त्याला पुन्हा चांगलाच तडाखा दिला. कलेक्टरांची काही दिवसांनी बदली झाली व नवीन डायरेक्ट आय. ए. एस. असलेले बिहारी असलेले तरुण कलेक्टर आले. त्यांना दाजिबानं भेटून आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी तिखट - मीठ लावून सांगितली, वर साखरपेरणीही केली,

 'काय सांगू सायेब, तुमी डायरेक्ट आय. ए. एस. कलेक्टर. मागचे तसे नव्हते. पुना ते पडले महादूचे जातभाई - हे लोक एकच असतात. त्यामुळे मह्यावर घोर अन्याव झाला सायेब.'

 नव्या कलेक्टरांना थेट निवड झालेल्या आय. ए. एस. अधिका-यांप्रमाणे पदोन्नतीने आय. ए. एस. झालेल्या अधिका-यांबद्दल जसा सूक्ष्म आकस व तुच्छता असते, तसा आकस व तुच्छता होतीच. पुन्हा ते बिहारी खत्री जमातीचे. त्यांच्यात उच्चवर्णीयांचा दर्पही होता. त्यांनी फारसं खोलात न जाता दाजिबाची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाचे आदेश रद्द केले व नव्या अलाईनमेंटप्रमाणे - ज्यात महादूची पूर्ण जमीन जात होती - त्या तलावाचे नव्याने आदेश दिले !

 हा घाव जिव्हारी होता. महादूला तो घायाळ करून गेला. पण मूळच्या . लढवय्या असलेल्या महादूनं पुन्हा त्याच तडफेनं प्रयत्न करायचं ठरवलं !!

 पण हे नवीन कलेक्टर त्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. जिल्हा सैनिक बोर्डाच्या अधिका-याची मध्यस्थीही असफल ठरली. पुन्हा मिलिटरीवाल्या


लढवय्या /२९
कलेक्टरांच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी स्थळ पाहणी करून महादूची जमीन जाणा-या पाझर तलावाची अलाईनमेंट चुकीची आहे असा अहवाल दिला होता, ते रोजगार हमी शाखेचे कार्यकारी अभियंताही सेवानिवृत्त झाले होते, तर ज्यांनी मूळचा सर्व्हे व अलाईनमेंट बदलली, ते जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे उपअभियंता बढती मिळवून कलेक्टर कचेरीतच रोजगार हमी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांचा ताजा अहवाल महादूच्या विरुद्ध व दाजिबांच्या बाजूने होता.

 आता महादृच्या हाती एकच उरलं होतं. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जमिनीची कामं करायला संमती न देणं, आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कोटात भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देऊन 'जैसे थे' चा आदेश मिळवणं; पण वकिलांची फी परवडणारी नव्हती, म्हणून अजूनही महादू त्या दिशेनं गेला नव्हता !

 यावर्षी रबीची पिके हातची गेल्यामुळे फेब्रुवारी - मार्चपासूनच रोजगार हमीच्या कामाची मागणी सुरू झाली. पुन्हा तहसीलदारांचा प्रयत्न, महादूचा ठाम नकार आणि मग तातडीने भूसंपादनाची सुरू झालेली कार्यवाही...

 दाजिबानं पुन्हा महादूवर दबाब यावा आणि तो कोलमडून पडावा म्हणून पुन्हा त्याच तंत्राचा व अस्त्राचा वापर केला. मजुरांचा मोर्चा त्याच्या घरावर नेण्यात आला व त्यानं राजीखुशीनं जमिनीची संमती लिहून देऊन पाझर तलावाचं काम सुरू नाही करू दिलं तर त्याला गावक-यांच्या सामुदायिक बहिष्काराची धमकी देण्यात आली.

 महादू संमती देणं शक्य नव्हतं, तेव्हा गावक-यांनी त्याच्याविरूद्ध बहिष्कार पुकारला.

 त्यानं तहसीलदारांकडे धाव घेतली. पण तेही आता बदलले होते. हे पहा कांबळे, कुठली गोष्ट किती ताणावी यालाही काही मर्यादा असते ! दोनदा पाझर तलावाची अलाईनमेंट बदलली, या साऱ्या तांत्रिक बाबी असतात. पण अस वाटतं की, तुम्ही राईचा पर्वत करीत आहात. ठीक आहे, तुमची संमती नाही म्हणून यावर्षी पाझर तलावाचं काम होऊ शकणार नाही; पण भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली आहे. पुढील वर्षी रीतसर जमीन ताब्यात येईलच, तेव्हा तुम्ही काय कराल? कोर्टबाजी? हायकोर्टाचा स्टे? तो तुमचा अधिकार आहे कांबळे; पण यामुळे काम नसल्यामुळे उपाशीपोटी मजुरांनी तुमच्याशी चिडून जाऊन असहकार पुकारला तर त्यांना का म्हणून दोष द्यायचा? मी त्याला जातीयवादी दृष्टीने घातलेला सामाजिक बहिष्कार म्हणणार नाही.'

 सुन्न होऊन महादू ऐकत होता.

 'तुम्ही म्हणत असाल तर मी तुमची तक्रार ठेवून घेतो. गावातही येतो, लोकांना समजावून सांगतो. त्यांनी ऐकलं नाही, बहिष्कार उठवला नाही तर पोलीस कार्यवाही पण करीन. तुम्ही बोट दाखवाल त्या एकेका व्यक्तीला अटक करायला

पाणी! पाणी!!/३०
पोलिसांना सांगेन.... पण तुमचं काय? तुम्ही गावापासून अलग पडाल आणि अलग पडून - फटकून तुम्ही जगू काल?'

 टी.व्ही.वर पाहिलेल्या 'महाभारत' या मालिकेतील चहुबाजूंनी कौरवांनी घेरलेल्या व कोंडी झालेल्या अभिमन्यूची महादूला आठवण झाली. आपलीही आज तीच अवस्था झाली आहे. अभिमन्यू तर खैर मरून गेला, पण आपल्याला मरताही येत नाही. हे जिवंत सामाजिक मरण त्याहून भयंकर आहे.

 ‘साहेब, सैन्यात महार रेजिमेंटचं नाव गौरवानं घेतलं जातं; कारण त्यांचा इतिहास हा पराक्रमाचा - लढायांचा व देशप्रेमाचा आहे ! तेथे महार हे आदरार्थी नाव आहे, पण इथं माझ्या गावी, कार्यवाही पण करीन. तुम्ही बोट दाखवाल त्या एके भारतातील खेड्यात ती शिवी आहे, शाप आहे. तो शाप वाहातच रोज थोडं थोडं मरत का होईना जगायचं आहे. पण... पण मी लढवय्या आहे तहसीलदार साहेब. मी लढणं जाणतो - हार-जितीची पर्वा नाही करत ! आणि ही हरणारी लढाई आहे, तरीही लढेन...'

 संतापानं आणि वेदनेनं महादूचा आवाज थरथरत होता. त्याचा कणखर लष्करी देहपण कापत होता.

 ‘शांत व्हा कांबळे, शांत व्हा. मी तुमची भावना समजू शकतो. पण तहसीलदार म्हणून रोजगार हमीचं काम पुरवणं माझं कर्तव्यच आहे. त्यासाठी...'

 ‘पुरे साहेब, तुमच्या दिलाशाची मला आवश्यकता नाही. स्वतःला सावरीत घसा खाकरत महादू म्हणाला,

 ‘सीमेवर लढताना जीव झोकून लढायची सवय आहे या सैनिकाला साहेब. तिथं काश्मिरात - सायचीनमध्ये लढताना देशावरून जीव ओवाळून टाकला होता - या देशातील लोकांच्या सुरक्षेसाठी. आज मी माझी जमीन ओवाळून टाकीत आहे - मजुरांना काम मिळावं म्हणून! कारण त्यांच्याशी माझं भुकेचं नातं आहे ! पण या दाजिबासारखे घरभेदी - लोकांचे शत्रू आहेत, त्यांच्याविरूद्ध मात्र मी लढत राहीन. कारण तेही एका अर्थानं देशाचे शत्रूच आहेत. त्यांच्याविरूद्ध लढणं हा माझा धर्म आहे. मी लढत राहीन - हार - जितीची पर्वा न करता; कारण मी लढवय्या आहे साहेब, लढवय्या...!'

☐☐☐





लढवय्या / ३१