Jump to content

पाणी! पाणी!!/भूकबळी

विकिस्रोत कडून






४. भूकबळी



 ‘सर - कलेक्टर साहेब लाईनवर आहेत'
 टेलिफोन ऑपरेटरने सांगितलं, तेव्हा तहसीलदार शिंदेची झोप खाडकन उडाली व ते घाईघाईने म्हणाले ‘जोडून दे.'

 काल रात्री त्यांना झोपायला बराच उशीर झाला होता, काल दिवसभर त्यांनी साक्षरता अभियानाच्या प्रचारासाठी दहा-बारा खेड्यांना भेटी देऊन मिटिंगा घेतल्या होत्या व शेवटी मांजरीला सरपंच व साक्षरता अभियानाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी बसवलेल्या कलापथकाच्याही कार्यक्रमाला थांबले होते. साहजिकच घरी परतायला रात्रीचा एक वाजून गेला होता व आज जाग आली तेव्हा आठ वाजून गेले होते..

 मूड अजूनही आळसावलेलाच होता. रेणुकेनं दोनदा बजावूनही शिंद्यांनी अद्याप ब्रश केला नव्हता. त्यांची बेड - टीची सवय लग्नानंतर तिने मोडून काढली होती. आजही तिनं तेच बजावलं होतं, ‘ब्रश केल्याशिवाय चहा मिळणार नाही' पण उठावसं वाटत नव्हतं, ते तसेच पडल्या पडल्या कालची वृत्तपत्रे वाचत होते. त्यांच्या तालुक्याला जिल्हा व प्रमुख वृत्तपत्रे सायंकाळी चारला येत असत. कारण मुख्य रस्त्यापासून तालुका दूर होता. त्यामुळे रोज सकाळी ताजी वृत्तपत्रे वाचायचा आनंद शिंद्यांना इथे तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यापासून मिळत नव्हता. तेव्हा सायंकाळी आलेले पेपर्स रात्री ऑफिस किंवा दौरा करून आल्यानंतर वाचणे किंवा परतायला खूप उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी वाचणे व्हायचे.


भूकबळी / ४५
 कालची वृत्तपत्रे चाळत असतानाच टेलिफोनची रिंग वाजली, तेव्हा पडल्या पडल्याच हात लांबवून पलंगाच्या कडेला असलेल्या टेबलावरील फोनचा रिसीव्हर उचलला व ते जड स्वरात म्हणाले. 'हॅलो...'

 ‘सर कलेक्टर साहेब लाईनवर आहेत. शिंद्यांचा आळस क्षणार्धात उडाला. काही महत्त्वाचे काम असल्याखेरीज कलेक्टर सकाळी सकाळी घरी फोन करणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असल्यामुळे ते ताडकन उठून बसले व म्हणाले 'जोडून दे.'

 खटकन् आवाज झाला, 'हॅलो चंद्रकांत?'

 ‘गुडमॉर्निग सर !” शिंद्यांनी आवाजात आदब आणीत अभिवादन केलं.

 'व्हॉट इज गुड़ इन धिस मॉर्निग, चंद्रकांत?'

 कलेक्टरांची रोखठोक स्वर कानी पडताच ते चमकले, सावध झाले. काहीतरी अघटित घडलंय, जे तहसीलदार असून आपल्याला माहिती नसावं किंवा आपण रिपोर्ट न केल्यामुळे इतर मार्गानी त्यांना काहीतरी समजलं असावं अन्यथा ते तसे शांत व खेळकर आहेत. पण आजचा नूर काही वेगळा दिसतोय. शिंद्याच्या मनाला एक अल्प भीतीची लहर स्पशून गेली.

 ‘पार्डन सर - माझं काही चुकलं का?' कलेक्टरांना काय म्हणायचं होते हें माहीत नसलं तरी नोकरशाहीच्या शिरस्त्याप्रमाणे वरिष्ठापुढे - आपली असलेली नसलेला चूक कबूल करत शिंदे हळुवारपणे आवाजात नसलेली नम्रता आणीत म्हणाले.

 'आजचा 'मराठवाडा' वाचला आहे',

 ‘नाही सर तो इथं दुपारी येतो चार नंतर -' शिंद्यांनी खुलासा केला, “काही विशेष सर?'

 ‘भयंकर आहे - तुमच्या तालुक्यात भूकबळी पडल्याची बातमी आहे समजलं !'

 आता कुठे कलेक्टराच्या तीक्ष्ण स्वराचे मर्म शिंद्यांच्या लक्षात आलं होत.महसूल खात्यात जरी ते नवीनच थेट तहसीलदार म्हणून लागले असले तरी खात्यासाठी भूकबळी पडणं ही किती नामुष्कीची गोष्ट आहे हे ते जाणून होते. यावर्षी पूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी आवर्षण परिस्थिती होती, तर त्यांच्या तालुक्यात शासनानं मागच्याच आठवड्यात दुष्काळ जाहीर केला होता. रोजगार हमीची कामे फार मोठ्या प्रमाणावर सुरू होती, त्याच्या संदर्भात मजुरी - भ्रष्टाचाराच्या तक्रारी, धान्य कुपनावर धान्य न मिळणे किंवा जादा भाव लावणे इत्यादी तक्रारीही त्या प्रमाणात वाढल्या होत्या याखेरीज दररोज कुठल्याना कुठल्या गावातून नवीन कामाची मागणी येत होती. पुन्हा


पाणी! पाणी!! / ४६
त्यांच्या तालुक्यात 'शेतकरी शेतमजूर पंचायत’ प्रभावी होती, त्यांच्या मार्फत लेखी फॉर्म भरून कामाची मागणी व्हायची. अशावेळी कायद्याप्रमाणे त्यांना त्वरित रोजगार हमीचे काम देणे भाग पडायचे. अन्यथा बेकार भत्ता देणे बंधनकारक होते व ते 'मागेल त्याला काम ' देणा-या राज्यशासनासाठी नामुष्कीची बाब होती. त्यामुळे शिंद्यांना फार दक्ष राहावं लागत होतं, पण रोजगार हमीचं प्रत्यक्ष काम करणारी मृदसंधारण, बांधकाम वा सिंचन विभागाची यंत्रणा मात्र तेवढी जागृत नव्हती, त्यांना दुष्काळाचे

म्हणावे तेवढे भान नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य शिंद्यांना मिळत नव्हतं. समन्वयक म्हणून त्यांना प्रसंगी स्वतःची तहसीलदारकी विसरून थेट कनिष्ठ अभियंता वा मस्टर असिस्टंटपर्यंत संपर्क साधावा लागत होता.

 शिंदे तरुण होते, उत्साही होते व यावर्षीचा पडलेला दुष्काळ हे एक आव्हान समजून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते, हे कलेक्टर जाणून होते व प्रसंगी मिटिंगमध्ये इतर तालुक्यांच्या तहसीलदारांना सांगत, 'शिंद्याप्रमाणे तुम्हीही सामाजिक बांधिलकीची भावना मनात रुजवा. थोडा रेहेन्यू खाक्या विसरून काम करा...'

 आणि या पार्श्वभूमीवर कलेक्टर जे फोनवर सांगत होते, त्यामुळे शिंदे अक्षरशः सुन्न झाले होते!

 त्यांच्या तालुक्यातील काळगाव दिघी या गावची एक मध्यमवयीन स्त्री रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मृत्युमुखी पडल्याची बातमी आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. सध्या राज्य विधि मंडळाचे अंदाजपत्रकीय अधिवेशन चालू होते व तालुक्याचे आमदार विरोधी पक्षाचे व रोजगार हमी योजनेच्या विधि मंडळ समितीचे सदस्य होते. त्यामुळे असेंब्लीमध्ये प्रश्न किंवा लक्षवेधी सूचना मांडली जाण्याची शक्यता होती.

 कलेक्टरांची काळजी व रागही रास्त होता. वृत्तपत्रात बातमी येईपर्यंत शिंद्यांना माहिती नव्हती, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कलेक्टरांना तोंड देणे अवघड होऊन बसले होते.

 'सर, या क्षणी मी काही सांगू शकत नाही पण मी एक दीड तासात सर्व माहिती घेऊन फोन करतो आय अॅम एक्स्ट्रिमली सॉरी सर पण - पण...'

 'ओके - इटस् ऑल राईट : चंद्रकांत पण हे मॅटर तुला, मला जड़ जाणार आहे. मी आज रामपूरला आहे तिथं मला फोन करून कळव. किंवा फोन नाही लागला तर, चारनंतर सरळ माझ्याकडे हेडक्वार्टरला ये...'

 अक्षरश : दहा मिनिटाच्या आत रेणुकेच्या आग्रहाला न जुमानता शिंद्यांनी ब्रेकफास्टही न घेता कार्यालयात येऊन माहिती मिळवायला प्रारंभ केला. त्यांनी जीप


भूकबळी / ४७
पाठवून रोजगार हमीचे नायब तहसीलदार भालेरावांना तातडीने येण्यास सूचित केले व एक शिपाई पाठवून शेतकरी - शेतमजूर पंचायतीचे तालुका चिटणीस विसपुतेंना बोलावून आणण्यास सांगितले.

 कार्यालयात नेहमी नवाच्या आत येणारा एम. ए. जी. विभागाचा क्लर्क वाघमोडे सोडता शिंदे एकटेच होते व विचार करीत होते...

 गेल्या दोन महिन्यात ज्या ज्या गावातून कामाची मागणी आली होती, तेथे तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथील मजुरांना त्या गटातच शक्यतो रोजगार हमीचे काम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्या ज्या मजुरांनी त्यांना काम मागितले होते, त्यांना लेखी पत्र देऊन सोईच्या कामावर पाठवले होते.

 तरीही कोळगाव दिघीची एक महिला काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मृत्युमुखी पडली होती व ही वार्ता खरी असेल तर तो भूकबळी ठरणार होता. ही शिंद्यांसाठी वैयक्तिक व तालुक्याचा तहसीलदार म्हणून नामुष्की होती.

 विचार करूनही त्यांना आपण कुणाला कामाला नाही म्हणाल्याचं आठवतं नव्हतं. पुन्हा पुन्हा ते आपली डायरी चाळत होते, पण अवघ्या एकशेवीस गावांच्या तालुक्यात आजमितीला पंचाहत्तर काम चालू होती, तरीही काळगाव दिघीची एक महिला काम नसल्यामुळे उपासमारीनं मृत्युमुखी पडली होती !

 शिंदे काहीसे भावनाप्रधान होते, त्यामुळे भूकबळीची बातमी त्यांना अस्वस्थ करून गेली होती. वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओ मॅगेझिनवर त्यांनी कलहांडी या बिहार मधील उपासमारीच्या बातम्या ऐकल्या - पाहिल्या होत्या. सध्या तर सोमालिया देशातील भूकेची तीव्रता टी. व्ही. द्वारे अनुभवली होती. ती भुकेने चिपाड झालेली व सारी भूक डोळ्यात व सुन्न नजरेत सामावणारी काळी मुले पाहून त्या रात्री त्यांना जेवणही गेलं नव्हतं. रेणुकेनं टी. व्ही. बंद करून म्हटलं होतं, ‘कान्त एवढं काय ते मनाला लावून घ्यायचं? तुम्ही तर पुरुष आहात, मन घट्ट हवं. पुन्हा ज्या खात्यात नोकरी करता तिथं दुष्काळाशी घडोघड़ी सामना करावा लागतोय. हा तालुका त्याबाबत अग्रेसर आहे. अशा वेळी काम करताना मन शांत ठेवायला हवं.!"

 तरीही त्यांची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यानंतर टीव्हीवर किंवा 'द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम पाहाताना सोमालियाची बातमी आली की ते टीव्ही सरळ बंद करायचे. खरंच रेणू मला कळतं की हा पळपुटेपणा आहे, मी नाही पाहू शकत. सहन करू शकत ती नजरेतली भूक आणि जीवघेणी सुन्नता त्या लोकांची -- आपण अशा वेळी सुस्थितीत आहोत, पोटात रोज गरम अन्न जातं, याची लाज वाटते. पण ती वांझोटी असते....'   दुष्काळाशी सामना करताना उजाड खेडी, शुष्क रखरखीत प्रदेश पाहून त्यांना आपली सुस्थिती ही वाळवंटातील ओअॅसिसप्रमाणे वाटायची व ती मन विदीर्ण करून जायची. त्यामुळेच की काय ते अधिक तडफेनं व जिद्दीनं दुष्काळावर मात करायच्या विचारानं प्रेरीत होऊन काम करायचे.

 पण यातला तोकडेपणा व मर्यादा त्यांना प्रकर्षाने जाणवायच्या. अजस्त्र पसरलेल्या प्रशासनातले तहसीलदार म्हणून ते फार छोटे चक्र होते, जे त्यांच्यापेक्षा मोठ्या चक्रात व त्यांच्यापेक्षा लहान चक्रात गुंफले गेले होते, त्यामुळे स्वतःची गती राखता येत नव्हती.

 तसंच दुष्काळ पडला की टैंकरने पाणी द्यायचे, रोजगार हमीचं काम पुरवायचं, धान्य द्यायचं, हे उपाय दुष्काळाची तीव्रता कमी जरूर करणारे आहेत. पण त्यामुळे तो कायमचा हटत नव्हता. बहात्तरचा दुष्काळ ते फक्त ऐकून होते, पण त्यामानाने तीव्रता कमी आहे, असं अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेले शिंदे अनुमान जरूर काढू शकत होते. तरीही झालेले फार कमी आहे वे करायचं तर एवढे प्रचंड आहे की छाती दडपून जावी, या विचारानं ते बेचैनही व्हायचे.

 मागेपुढे कधी सवड मिळाली तर 'दुष्काळाचे अर्थशास्त्र व व्यावहारिक उपाययोजना' अशा त-हेचा विषय पीएच. डी. साठी घ्यायचा वे अधिक खोलात जाऊन त्याचा अभ्यास करायचा, अस त्यांनी मनोमन ठरवूनही टाकलं होतं.

 शिंद्याची विचारधारा थांबली ती भालेरावच्या येण्यामुळे, तहसीलदारांच्या चेंबरमध्ये येण्यापूर्वी ते आपल्या कार्यालयात गेले होते, तेव्हा कलेक्टर कचेरीचा वायरलेस नुकताच आला होता व तो वाचून आपल्याला कशासाठी तातडीने बोलावलंय याचा भालेरावांना अंदाज आला होता.

 'भालेराव, मघाशी कलेक्टर साहेबांचा फोन होता. काळगाव दिघीची एक महिला रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे मरण पावली...'

 ‘आताच त्यासंबंधी वायरलेस आला आहे सर!' भालेराव म्हणाले, 'मी सोबत काम मागितलेल्या व्यक्तींची नावे असलेले रजिस्टर आणले आहे. त्यांनी रजिष्टर उघडीत एक एक पानं उलटायला सुरुवात केली.

 शिंदे अस्वस्थपणे पेपरवेटशी चाळा करीत होते. काही वेळानं भालेराव म्हणाले 'सर मागील आठवड्यात काळगाव दिघीच्या एका कुटुंबानं लेखी अर्ज करून कामाची मागणी केली होती. त्यांची नावे आहेत राघु ननावरे, त्याची पत्नी पारू व बहीण ठकूबाई - आणि वायरलेस मध्ये भूकबळी म्हणून ठकूबाईचं नाव आहे...!'


भूकबळी / ४९
 आता शिंद्याना थोडासा उलगडा झाला होता. त्यांच्याकडे राघूनं ‘शेतकरी व शेतमजूर पंचायती' मार्फत कामाच्या मागणीसाठी लेखी अर्ज दिला होता, पण काळगाव दिघी पॉकेट मध्ये, ज्यात चार ग्रामपंचायतीचा समावेश होता, एकही काम चालू नव्हते. एक पाझर तलाव मंजूर होता, त्याच्या एका भरावाचं कामही मागच्या वर्षी पूर्ण झालं होतं. त्याचा दुसरा भराव शेतक-यांनी अडवला होता व भूसंपादनाची कार्यवाही अपूर्ण होती. शेतक-यांना किमान ऐंशी टक्के मोबदला, अॅडव्हान्स हवा होता. त्यासाठी स्वतः शिंदे प्रयत्नशील होते. पण शासनाकडून पतमर्यादा न आल्यामुळे तो

देता येत नव्हता व त्यामुळेच हे पाझर तलावचे काम बंद पडले होते.

 म्हणून त्यांनी सहा किलोमीटर अंतरावर नाला बंडिंगचे एक काम चालू होते, तिथे राघू व त्याच्या कुटुंबियांनी जावे असे लेखी आदेश दिले व त्याची एक प्रत शिपायामार्फत बंडिंगचे अधिकारी चव्हाण यांनाही पाठवली.

 आज राघूची बहीण ठकूबाईचा भूकबळी पडला होता. कागदावर तर शिंद्यांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. तरीही कुठेतरी काहीतरी चुकतेय, ही त्यांची टोचणी कमी होत नव्हती.

 ‘राम राम रावसाहेब...'

 शिंद्यांनी पाहिलं, विसपुते आले होते. त्यांनी अभिवादन स्वीकारून त्यांना बसायला सांगितलं.

 ‘मी आज तुम्हाला भेटणार होतोच. पण तुमचं पकड वॉरट आलं शिपायामार्फत म्हणा ना, मग काय करता? तसाच आलो... झालं !' आणि विसपुते गडगडाटी हसले.

 तसं कारण काहीही नव्हतं, पण शिंद्यांना विसपुते हा पहिल्यापासूनच आवडला नव्हता. त्याचं अघळपघळ बोलणं, गडगडाटी हसणं आणि त्याचे मांजरासारखे हिरवे - घारे डोळे. सारचं त्यांना खटकायचं. वाटायचं हा ज्या शेतकरी व शेतमजूर संघटनेचं काम करतोय, तिथं हा शोभत नाही, ही ती संघटना आपल्या पुढारीपणासाठी वापरतोय. त्याला शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांशी काही देणं - घेणं नाही. खर तर हा त्यांचा स्वतःचा, व्यक्ती पाहून झालेला ग्रह होता. त्याला काही ठोस आधार पुरावा नव्हता.

 पण आज मात्र शिंद्यांची खात्रीच झाली की, आपला हा ग्रह चुकीचा नाही कारण आज त्यांना आपण का बोलावलं आहे हे माहीत असणारय. तरीही ते गडगडा हसत होते... कारण नसताना व विनोदाचं प्रयोजनही नसताना.


पाणी! पाणी!! / ५०
 ‘आपल्या पंचायतीमार्फत काम मागण्यासाठी अर्ज केलेल्या राघूच्या बहिणीचा भूकबळी झाल्याची वार्ता आलीय पेपरमध्ये. तुम्हाला काही माहीत आहे त्याबद्दल...?!

 ‘वा ! माहीत तर आहे. अहो कालच मला पेपरचा वार्ताहर किनाळकर भेटला होता. त्याला मीच सांगितलं हे! तसचं राघूही होता माझ्या बरोबर -!

 ‘विसपुते...!' तीव्र स्वरात शिंदे म्हणाले, 'हे... हे मला सांगता आलं नसतं तुम्हाला मी कधी तुमची भेट चुकवली आहे? किंवा सांगितलेल्या कामासंबंधी कार्यवाही केली नाही? तरीही...'

 ‘त्याच असं आहे रावसाहेब, गेले दोन दिवस तुम्ही सतत दौ-यावर होता साक्षरता अभियानाच्या कामासाठी. मग कशी भेट व्हायची?' विसपुते म्हणाले, “अहो, इथे दुष्काळात लोकांचे हाल आहेत आणि शासनाला हे काहीतरीच खूळ सुचतंय.. आधी हाताला काम द्या, पोटाला भाकरी द्या व मग त्यांना शिकवा.'

 आपल्याला विसपुत्यांनी आधी का कळवलं नाही हे खोलात जाऊन विचारण्यात आता काही अर्थ नव्हता व त्यांचा साक्षरता अभियानावरील रागही त्यांना माहीत होता.

 'ठीक आहे. पण मी त्यांना रांजणीच्या नालाबंडिंगच्या कामावर पाठवलं होत.'

 ‘त्याचं असं झालं साहेब...' जरा पुढे सरसावत विसपुते म्हणाले, 'इथे माझ्या सोबत राघू आहे. तो बाहेर उभा आहे, तोच तुम्हाला सांगेल.'

 राघू जेव्हा त्यांच्यासमोर आला, शिंद्यांच्या मनात एक अपराधी भाव चमकून गेला. आपण याच्या बहिणीच्या भूकबळीला जबाबदार आहोत, असं त्यांना वाटत होतं.

 त्यांनी राघूकडे निरखून पाहिलं - मध्यम वय, अंगावर मळकट धोतर व सदरा, दाढी वाढलेली, रापलेला काळाकभिन्न चेहरा, त्यावर सुन्नतेचा लेप...!

 ‘राघू... काय झालं बाबा? मी तर तुला व तुझ्या घराच्यांना रांजणीच्या कामावर पाठवलं होतं ना?'

 ‘तेचं आसं हाय सायेब...' अडखळत राघू सांगू लागला...

 राघू ननावरे गाडीलोहार या भटक्या जमातीत मोडणारा. पण जहागीरदार किशनदेव रायांनी निजामाच्या आमदानीत त्याच्या आजोबाला बैलगाडी बनवण्याच्या कसबावर खुश होऊन काळगाव दिघी परिसरातली पाच एकर जमीन दिलेली. आज वाटण्या होऊन राघूच्या वाट्याला जेमतेम दीड एकर आलेली.


भूकबळी / ५१
 मुळात तालुकाच डोंगराळ, म्हणून कठीण, खडकाळ जमीन, तिथे नैसर्गिक पाण्यावर बाजरीखेरीज काही पिकायचं नाही. बाजरीचं पीकही दुष्काळात पुरेसं येत नाही. यावर्षीही असंच झालं. पावसाळा लांबला. मृग पूर्ण कोरडा गेला, त्यानंतर दोन जेमतेम पाऊस झाले. त्यावर कशीतरी तीन क्विंटल बाजरी पदरात आली. त्यातली एक बाजारात दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे पडत्या भावात ताबडतोबीने विकून आलेल्या पैशात किरकोळ उधार - उसनं देणं व मीठ - मिरचीची तरतूद करणं भाग होत. उरलेले धान्य राघू, त्याची बायको व दोन मुले आणि विधवा होऊन त्याच्याकडेच राहायला आलेली बहीण ठकूबाई एवढ्या प्रपंचाला कितीस पुरणार? दिवाळीला तर त्यातला एक कणही राहिला नव्हता.

 दरवर्षी शेजारच्या रामपूर तालुक्यात तो सर्व कुटुंबकबिल्यासह साखर कारखान्यावर उसतोडीला जायचा. यंदा ऊसही पावसाअभावी कमी झालेला, म्हणून फेब्रुवारीतच गळीत हंगाम संपला. ठेकेदाराकडून परततानाच पुढील वर्षाची आगाऊ रक्कम घेतली, तीही हां हां म्हणता संपून गेली आणि त्या कुटुंबाला आता रोजगार हमीच्या कामाखेरीज जगण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता.

 राधूनं कामासाठी शोधाशोध सुरू केली, तेव्हा सुदैवानं शेजारच्या गावी तांड्याला जोडणा-या जोडरस्त्याचे काम नुकतंच सुरू झालं होतं. या काम आवश्यकता असूनही जास्त मजूर मिळत नव्हते. कारण डोंगराळ भाग असल्या जवळपास माती नव्हती, खडक होता. तो फोडणं अवघड काम होतं.

 याचा प्रत्यय राधूला व त्याच्या पत्नीला - बहिणीला आला. पहिल्याच दिवशी खडी फोडून हाताला फोड आले होते. पण इतर कामापेक्षा मजुरीचे दर जादा होते. आसपास दुसरे कोणतेही कामे सुरू नव्हते. म्हणून शरीर साथ देत नसतानाही त्या कामावर जाणे भाग होते.

 घरधनी गेल्यानंतर पांढरं कपाळ घेऊन भावाकडे आल्यानंतर त्याच्या कमीत कमी भार पडावा म्हणून अहोरात्र राबणं, रानात कामाला जाणं व उपासाच्या नावाखाली एकदाच दुपारी भाकर तुकडा खाणं, त्यामुळे ठकुबाई कमालीची रोडावलेली होती. तिला हे खडी फोडण्याचं काम झेपणारं नव्हतं. पहिल्या आठवड्यानंतर रोजगाराचं वाटप झालं, तेव्हा तिची मजुरी तिच्या भावजयीपेक्षा अर्धीच भरली होती. ‘वयनी, काय करू बघा' कपालीचं कुंकू गेल्यानंतर कुडीत जीवच नाय राहिला..'

 राघूची बायको मैनाचे गावातल्या व समाजातल्या बायका कान फुंकत असल्यातरीं, जात्याच प्रेमळ असल्यामुळे तिला ठकुबाईकडे पाहिलं की पोटात कसतरी व्हायचं. आपल्याच उमरीची ही आपली नणंद. कुंकवाचा आधार गेला आणि बिचारीची


पाणी! पाणी!! / ५२
जिंदगी बर्बाद झाली. समाजात पुन्हा विवाह होत असे पण तिची खचलेली कुडी व गेलेली रया पाहून कोणी तयार होत नव्हता. दोन मौसम प्रयत्न केल्यानंतर, राघूनं अलीकडे नाद सोडून दिला होता. बहिणीला माहेरी जन्मभर पोसावं एवढी काही त्याची ताकद नव्हती, तरीही तो व मैना जमेल तेवढं व तसे तिला सांभाळीत होते. पण तीही आपल्यापरीनं भार होऊन नये यासाठी कामाची पराकाष्ठा करायची.

 हे कठीण काम तिला झेपणार नाही, हे राघू व मैनेला पण ठकुबाईप्रमाणे समजत होतं. तिची मजुरीपण फार कमी पडत होती. तरीही ते चूप होते. कारण तेवढीच मजुरी प्रपंचाला मिळत होती व मुख्य म्हणज मजुरी कितीही असली तरी दररोज एक किलो गव्हाचे कुपन मिळत होते. त्यामुळे त्यांच्याकडे आता दोन क्विंटल गव्हाएवढे कुपन साचले होते. ते वटवून गहू घ्यायचा व तो बाजारात विकून पैका करायचा राघूचा बेत होता. कारण घरी गहू परवडणारा नव्हता व त्याला परत तेल णार होतं... ते त्यांना शक्यच नव्हतं.

 जोडरस्ता अवघ्या दीड किलोमीटरचा असल्यामुळे ते काम तीन आठवड्यात संपलं तेव्हा राघू तिघांचे कुपन एकत्र करून शेजारच्या गावात बोरसला गेला; पण ते दुकान मागच्याच आठवड्यात धान्याचा काळाबाजार केला असता तहसीलदारांनी रंगेहाथ पकडून निलंबित केलं होतं व ते गाव काळगावच्याच दुकानाला जोडलं होतं.

 सारा दिवस व चक्कर वाया गेली होती, पण राघूला त्याचं फारसं काही वाटले नव्हतं. कारण खेडेगावात रेशन दुकानं कधीच नीट चालत नाहीत, जावं तेव्हा उघडी असतातच असे नाही आणि उघडी असली तर धान्य कधी असतं, कधी नसतं. त्यामुळे आपल्या हक्काचंही धान्य नीटपणे वेळच्या वेळी मिळणं अवघडच होतं. हे सारं राधूला माहीत होतं. म्हणून तो निमूटपणे परत आला.

 पण काळगावचं रेशन दुकानाला कुलूप पाहिल्यावर मात्र त्याचा धीर खचला. घरातलं सारं धान्य व पैसा संपला होता. अक्षरशः दोन वेळा पोटात घासही जात नव्हता. रानात कुठेच काही काम नव्हतं. तेव्हा जाणकार ठकुबाईनं डोंगरमाथा हुडकून कसलातरी पाला तोडून आणला होता व दोन दिवस त्यावरच ते कुटुंब पोट भरत होतं.

 आज गहू मिळायला हवा होता, पण दुकान बंद. दुकानदार अचानक बालाजीच्या यात्रेला गेला होता व आठ दिवस येणार नव्हता. तेव्हा तो गावात सरपंच-पोलीस पाटलाच्या उंबऱ्याशी गेला व कुपन दाखवून त्यानं थोडे जोंधळे व बाजरी उसनी मागितली. सरपंच उर्मट होता. त्यानं भिकाऱ्याप्रमाणे राघूला हाकलून


भूकबळी ! ५३
लावलं. पाटलाचा बाप माळकरी होता. त्याने दोन पसे बाजरी दिली. तेवढाच पोटाला दोन दिवस आधार झाला.

 अशातच वणवणताना राघूला विसपुते भेटले. त्यानं संकोचानं रामराम घातला, तसे खुश होऊन त्यांनी राघूची अघळपघळ चौकशी केली आणि त्याचा प्रश्न जाणून घेतला. त्याच्याकडून निम्मी कुपनं घेऊन पन्नास रुपये दिले व एका फॉर्मवर अंगठा घेतला व आपल्या मोटारसायकलवर मागे बसवून त्याला तहसील कचेरीत नेलं. तिथे त्याच्यासमक्ष तो अर्ज रावसाहेब शिंद्यांना दिला. त्यांनी लगोलग त्याला रांजणीच्या बंडिंगच्या कामावर जाण्याचा हुकूम दिला.

 विसपुते तालुक्यालाच राहात असल्यामुळे त्याला एस. टी. चे पाच रुपये खर्चून परत यावं लागलं. पण त्यांनी दिलेल्या पैशातून राघूनं दोन दिवस पोटापाण्याची सोय केली.

 मग रात्री त्यानं हा विषय मैना व ठकुबाईपुढे काढला,‘कारभारणे, रांजणी चागंली चार - सा कोस हाय पग जायला. पन तितं जायला पाहिजे, नाय तर जगण कठीण हाय बघ.'

 ‘जाऊ की कारभारी-पण ननंदबायला यवढं चालणं झेपेल का? काल सांजेपास्नं त्येच आंग मोडून आलंया आन् गरमबी जालंय...'

 'मैनानं विचारलं तसा काहीसा गहिवरून राघू म्हणाला,

 ‘व्हय-म्या पघतो ना- ठकुबाय लई बीमार हाय, पन् म्या असा करटा भाऊ--जो भणीचं दवादारू करू नाय शकत. आसं कर ठकुबाय - तु पोरास्नी घिऊन इथचं रहा -एक हप्त्यानंतर म्या तुला नेतो.'

 ‘नाय दादा - म्या बरी हाय -- म्या येते तुमासंगट- तेवढीच रोजी पदरी पडेल.. जायला जरा येळ लागेल - पन म्याबी येते दादा --' ठकूबाई संकोचून म्हणाला.

 राघू व मैना दोघांनाही तिची प्रकृती माहीत होती; पण प्रश्न रोजीचा होता, जगण्याचा होता, त्यांनी तिथंच विषय संपवला.

 दुस-या दिवशी सकाळी भाकर-तुकडा फडक्यात बांधून ते मुलासह निघाले, रांजणीला जाणारा रस्ता रेशन दुकानावरून जाणारा होता त्याने थोडं थांबून चौकशी केली, पण अजूनही बालाजीला गेलेले शर्मा दुकानदार परत आले नव्हते. त्याच्या नातवाचं जावळ व बारसं तिथं होतं, असं घरातल्या मुनिमानं सांगितलं तेव्हा अजिजीन त्यानं म्हणलं,

 ‘पन मुनीमजी, तुमी दुकान उघडाना. मह्या जवळ लई कुपनं हायती गव्हाची ती त्यवढी मोडून दिवा की - पोरंबाळं आन् भण भुकेली हायत हो...'


पाणी! पाणी!! / ५४
 'हे बघ राघू, - शेटजी दुकान बंद ठेवायला सांगून गेले आहेत, मला उघडता येणार नाही. पुन्हा तुझी कुपनं ही बोरसरची. त्या गावचा माल अजून आणला नाही. समजलंस? जा आता, माझा जीव खाऊ नको.'

 'पन - शेटजी' न राहावून मैना मध्येच म्हणाली, 'म्या म्हंते - आसं दुकान न सांगता सवरता बंद ठिवता येतं? जंतेचे हाल हो केवढे? आमचंच बघा ना. जवळ लई कुपनं हायती - पण ती काई पोटास्नी घालता येत नाहीत - कसे भरावं खळगं? ल्हानी पोरं हायती- बीमार ननंद हाय - पोटाला नगो...?"

 'ए भवाने मला जाब विचारतेस ?' संतापून आपल्या चिरक्या आवाजात मुनीमजी फणफणले, 'राघू तुझ्या बायकोला सांग - माझ्याशी नको बोलू म्हणून, मी बाईमाणसांशी नाही बोलत!

 सोशिक राघू आपल्या कारभारणीवरच चिडला, 'ए गप बये, तुला काई समजता का? उगी आपली पिरपिर... गप्प... गप रहा पघू!' आणि लाचारीच्या स्वरात तो मुनीमजीकडे वळून म्हणाला.

 'गलती जाली मुनीमजी - कारभारनीला काई अक्कल नाय -माफी असू दे... म्या नंतर येतो कुपन मोडायला...!

 त्याला लाचारी पत्करून शांत राहणे भाग होते. कारण नेहमी रेशन दुकानात ज्वारी साखरेसाठी जावं लागत असे. त्यानं फटकन् देणं बंद केलं तर ?' हा प्रश्न होता, पुन्हा आज नाही, चार आठ दिवसांनी का होईना परत त्याच्या दारी जाणं भाग होते. कुपनावरचे गहू घेण्यासाठी, अनेकदा तर शर्माच ते गहू विकत घेत असे. अर्थातच पडत्या भावानं, राघूची वा इतर गावकऱ्यांची त्याबद्दल काही तक्रार नसे.

 दम खात, अडखळत आपली शक्तिविहीन कुड़ी खेचत ठकुबाई आपल्या भावासंगे कशीबशी रांजणीला पोचली, तेव्हा ऊन उतरणीला लागलं होतं. आणि तिथलं नालाबंडिगचं काम संपायला आलं होतं. ठकुबाईनं मैनाच्या आधारानं तिथल्या एका झाडाखाली गलितगात्र होऊन बसकण मारली.

 राघू तिथल्या मुकादमाकडे गेला. कामावरचा, कृषी सहायक केव्हाच तालुक्याला निघून गेला होता. राघूनं तहसीलदाराचं पत्र मुकादमाला दिलं, ते वाचून तो म्हणाला, "पण मंगळवारीच हप्ता सुरू झाला. हजेरीपटावर त्याच दिवशी नावं लिहिली जातात. आता पुढच्या मंगळवारी ये...!"

 'नाय मुकादमदादा, म्या लई लांबून आलो हाय... आनी विसपुते सायेबांनी तुमास्नी त्यांचं नाव सांगाया सांगितलंय. तेंच्या पंचायतीमार्फत अर्ज दिलाय कामासाठी तवा --!

भूकबळी / ५५
 'अच्छा - अच्छा तूही आता हक्कानं काम मागतो आहेस' मुकादम त्याच्याकडे आरपार संशयानं पाहात म्हणाला, 'ठीक आहे, आजचं तर काम संपलं. उद्या सकाळपासून घेतो तुला कामावर.'

 त्या रात्री तिथंच झाडाखाली ते कुटुंब झोपलं, सकाळ होताच तयार होऊन ते मुकादम येण्याची वाट पाहू लागलं.

 मुकादम व कृषी सहायक एकदमच आले, तोवर सारे मजूर कामासाठी

जमा झाले होते. त्याच वेळी ज्या शेतात नाला बंडिंगचं व सपाटीकरणाचे काम चालले होतं, त्याचा मालक आला आणि म्हणाला, 'रामराम साहेब, आजपासून काम बंद करा. मला इथे उन्हाळी भुईमूग घ्यायचं आहे, त्यासाठी पंचायत समितीनं बियाणे व खताची पिशवी पण दिलीय. विहिरीत थोडे पाणी आहे, त्यावर घेण्यासाठी शासनाने सांगितलं बघा !'

 साऱ्या मजुरांचे चेहरे काळवंडले. राघूच्या पोटात तर धस्स झालं. जमीन सपाटीकरणासाठी शेतकऱ्याची संमती आवश्यक असते, ती नसेल तर काम करता येत नाही. या शेताचा मालक महादेव चेडे पाटलाला उन्हाळी भुईमूग घ्यायचा होता तेव्हा काम बंद करणे क्रमप्राप्त होतं.

 कृषी खात्याच्या नवीन धोरणाप्रमाने एका काऊडेपमध्ये नालाबंडिंग, जमीन सपाटीकरण ही कामे घेता येत असत. यापैकी या गावच्या एकमेव काऊडेपमधलं नालाबंडिंगचं काम नुकतचं संपलं होतं व मंगळवारपासून चेडे पाटलाच्या जमिनीतले सपाटीकरणाचे काम चाललं होतं व आता ते काम त्यांच्या संमतीअभावी बंद ठेवण भाग होतं.

 रांजणीत दुसरा काऊडेप नसल्यामुळे त्या गावी आता रोजगार हमीचं काम संपुष्टात आलं होतं.

 राघू, मैना व ठकुवाई सारेच सुन्न झाले. काल दिवसभर वणवण करीत जवळपास सहा कि. मी. अंतर पायी मोठ्या जिकिरीनं तुडवलेलं, रात्री केवळ पाण्यावर पोटं मारून झोपली होती. आज मात्र काम नसल्यामुळे पुन्हा तेवढंच जीवघेणं अंतर परत तुडवीत गावी जाणं आलं.

 हातावर पोट असलेल्यांना फारसं बोलता येत नाही की आपल्या भावनांचे प्रदर्शनही करता येत नाही. परिस्थितीचं भान कधीही हरवत नाही. राघूनं परतायच ठरवून त्याप्रमाणे परतीची वाट धरली.

 कालच्यापेक्षा आज ठकुबाईला जास्ती त्रास होत होता. अंग चांगलंच तापले होत, सारेजण तीन - चार दिवसापासून उपाशी होते, ते त्याही आधी दोन दिवस


पाणी! पाणी!! / ५६

जेवले नव्हते. कारण जंगली पाला उकडून खाल्ल्यामुळे पोट दुखत होते. चालण्याचे श्रम व अंगात मुरलेला ताप यामुळे एक एक पाय उचलणं तिच्या जीवावर येत होतं.

 आणि दोन - एक किलोमीटर अंतर त्यांनी जेमतेम कापलं असेल नसेल, साधी ठेच लागल्याचे निमित्त होऊन ठकुबाई अडखळून पडली आणि राघू मैना तिच्याकडे धावले. तिचं डोकं रस्त्यावरच मैनेनं आपल्या मांडीवर घेतलं, ठकुबाई नुस्ती तडफडत होती !

 'दादा, वयनी, लई तरास होतोय. म्या आता नाय जिंदा हात न्हाय आन् तेच बरं हाय म्या अशी कपाळकरंटी तुमास्नी भार!'

 ‘असं बोलू नये ठकुमाय, तू मह्या पाठची भण - आगं, जीवात जीव हाय तोवर म्या सांभाळीन तुला. आसं बोलू नये - जरा दम खा इथंच!' राघू कळवळून म्हणाला.

 जवळच एक वडाचं जंगली झाडं होतं, तिच्या सावलीत त्यानं व मैनानं तिला आधार देत आणलं व फडतरावर निजवलं, 'म्या पानी आनतो, जरा दम खा. ऊन कमी जालं म्हंजे निघू गावास्नी.'

 पाणी प्याल्यामुळे व विश्रांतीमुळे ठकुबाईचं कण्हणं जरा कमी झालं होतं; थोड्या वेळानं तिचा डोळा लागला. तिच्या बाजूलाच मैनाही जरा लवंडली राघू समोर खेळणा-या मुलांकडे लक्ष देत गुमान बसून राहिला.

 उन्हें उतरत होती तेव्हा मैना उठली आणि सहज म्हणून तिनं ठकुबाईच्या कपाळावर हात ठेवला, मघाशी चटके देणारं कपाळं आता थंडगार पडलं होतं. ती चरकली, तिच्या मनात भीतीची शंका उमटली व ती किंचाळली, ‘धनी, जरा इकडं या पगा, पगा - ननंदबाईचं कपाळ आक्षी थंडगार लागतंया,

 राघूनं पुढे होऊन ठकुबाईच्या कपाळावर हात ठेवला, तिचा हात हाती घेतला आणि गदगदून म्हटलं, 'कारभारणे, आपली ठकुमाय गेली - मेली गं...'

 तहसीलदार शिंदे सुन्न झाले होते. सकाळपासून त्यांना छळणारी टोचणी अधिक तीव्रतेने दंश करू लागली होती.

 राघू सांगतांना अडखळत होता, थांबत होता, एवढं एका वेळी प्रदीर्घ बोलायची त्याला सवय नव्हती. शब्द आठवत नव्हते आणि बहिणीच्या आठवणीनं तो गदगदून येत होता, पण डोळे कोरडे होते! नजर सुन्न होती...!

 'ऐकलंत ना रावसाहेब । - सरळ सरळ भूकबळीचा प्रकार नाहीतर काय आहे!' विसपुते म्हणाले, 'त्या दिवशी म्हणजे परवा एका पत्रकार मित्राला घेऊन मी

भूकबळी / ५७
चाललो होतो. रस्त्याच्या शेजारी हा राघू व त्याचे कुटुंब भेटलं ठकुबाई तिच मृतावस्थेत पडलेली...!'

 वर्तमानपत्रात 'ठकुबाईचा भूकबळी' या मथळ्याखाली आलेल्या बातमीचा उलगडा आता शिंद्यांना झाला होता. त्यांच्या नजरेसमोर न पाहिलेल्या ठकुबाईचा चेहरा भूक आणि वेदनेचं रूप घेऊन येत होता आणि त्यांचं मन अस्वस्थ बेचैन होत होतं!

 पण त्यांना असं स्वस्थ बसून भागणार नव्हतं. प्रयलपूर्वक त्यांनी मन शांत केलं आणि पेशकाराला बोलावून सांगितलं, 'जीप घेऊन जा - काळगावच्या दुकानदाराला गाडीत घालून आणा...! तसंच त्यांनी भालेरावला सांगून तालुक्याचे दोन्ही डेप्युटी इंजिनिअर बंडिंगचे मृदसंधारण अधिकारी यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितलं.

 इरिगेशनचे डेप्युटी इंजिनिअर पाटील रामपूरला राहात व इथे तालुक्याला येऊन - जाऊन करीत. आजही ते अपेक्षेप्रमाणे कार्यालयात नव्हते. कसल्यातरी मिटिंगसाठी जिल्ह्याला गेले होते. त्यांचा ऑफिस सुपरिंटेंडंट आला व त्यानं हे सांगितलं.

 "पण सर, काळगावचं तर काम सुरू झालं आहे. तिथं मजुरांची उपस्थिती फारच कमी आहे. तिथे हे आले असते तर हा प्रकार झाला नसता!"

 शिंदे चकित व त्याचबरोबर उद्विग्न झाले! राघूच्या गावातच बंद पडलेल्या पाझर तलावाचं काम सुरू होतं आणि तरीही त्यांनी राघू व त्याच्या मृत झालेल्या बहिणीला रांजणीला पाठवलं होतं व चालण्याचे श्रम सहन न होऊन ती वाटेतच मेली होती.

 त्यांनी क्षुब्ध नजरेनं भालेरावकडे पाहिलं, तसे ते चाचरत म्हणाले, 'सर, मागच्या आठवड्याच्या वीकली रिपोर्टमध्ये काळगाय दिघीचं पाझर तलावाचं काम बंद असल्याचे पाटील साहेबांनीच दाखवलं होतं.

 ‘बरोबर आहे सर-' इरिगेशनचा ऑफिस सुपरिंटेंडंट मान खाली घालून म्हणाला, 'काम मागच्या आठवड्यात सुरू झालं होतं. त्यासाठी पाटील साहेब गावात गेले होते. संबंधित शेतक-यांची समजूत घालून संमती घेतली व काम सुरू केलं होतं'

 ‘पण वीकली रिपोर्टमध्ये ते का आलं नाही'? आवाज चढवीत शिंदे म्हणाले.

 ‘त्याचं असं आहे सर, काम सुरू झाल्याचं मला ऑफिसमध्ये माहीत नव्हतं, मागच्या गुरुवारी काम सुरू करून पाटील साहेब डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला इ. इ. साहेबांनी बोलवलं म्हणून परस्पर गेले. शनिवार - रविवार सुट्टी होती जोडून - ते थेट सोमवारीच आले, पण दर शुक्रवारी रिपोर्ट करायचा असतो आपल्याकडे कामाचा, म्हणून मी मागच्या आठवड्यात रिपोर्ट तसाच रिपीट केला...'


पाणी! पाणी!! / ५८
 शिंद्यांनी वैतागानं आपली मूठ टेबलावर आदळली, पण त्यामुळे त्यांच्या हाताला झिणझिण्या आल्या एवढंच. ते हतबुद्ध होऊन ऑफिस सुपरिंटेंडंटकडे पाहात राहिले.

 दर आठवड्याला शुक्रवारी सांयकाळपर्यंत कलेक्टर ऑफिसला रोजगार हमी कामाचा आठवडी अहवाल तहसीलदारांना सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी सर्व कार्यपालन यंत्रणांनी गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी त्यांच्या खात्यामार्फत कोणती रोजगार हमीची कामे चालू आहेत व कोणती बंद आहेत हे लेखी कळवायचं असतं. बऱ्याच वेळी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मस्टर असिस्टंट किंवा ज्युनिअर इंजिनिअर्सकडून वेळेवर अहवाल प्राप्त होत नाहीत, म्हणून मागच्या आठवड्याचा रिपोर्ट रिपीट केला जातो. इथं हाच प्रकार घडला होता. प्रत्यक्ष काळगाव दिघीत वर्षापासून बंद पडलेलं पाझर तलावाचं काम सुरु झालं होतं. तरीही त्याची माहिती कार्यालयात वेळेवर न आल्यामुळे ते काम बंद असल्याचं साप्ताहिक अहवालात नमूद केलं गेलं. ही माहिती तपासण्याची यंत्रणा तहसीलदाराकडे नसते, त्यामुळे कार्यालयात यंत्रणेची माहिती ग्राह्य धरून जिल्ह्याला व जिल्ह्यातून शासनाकडे अहवाल पाठवला जातो.

 ‘इथंही नेमकं हेच घडलं होतं काम चालू असूनही माहिती न प्राप्त झाल्यामुळे ते काम बंद आहे' असं अहवालात नमूद केलं गेलं आणि त्या माहितीच्या आधारे राघूला रांजणीला दूरवर कामावर जाण्यासाठी शिंद्यांनी हुकूम दिला होता. त्याच्या गावात काम सुरू होतं, पण ते कुणालाच माहीत नसल्यामुळे राघूला व त्याच्या बहिणीला रांजणीला बरं नसताना जावं लागलं होतं.

 जर काळगाव दिघीचं काम सुरू असल्याचं माहीत झालं असतं, तर राघूच्या बहिणीला सहा किलोमीटर रांजणीला जाण्याचे व परत येण्याचं काम पडलं नसतं व कदाचित तिचा बळीही गेला नसता.

 त्याच वेळी बंडिंगचे गोसावी आले त्यांनी राघूनं जी माहिती रांजणीच्या कामाबद्दल सांगितली होती तिला दुजोरा दिला. त्यांचाही काही दोष नव्हता, असेल तर परिस्थितीचा व ठकुबाईच्या गरिबीचा होता.

 शिंद्यांची मात्र घुसमट होत होती. मनोमन ते विलक्षण क्षुब्ध होते. जिवाला तीव्र टोचणी लागून राहिली होती. या भूकबळीला एक शासकीय अधिकारी म्हणून मीच जबाबदार आहे.


भूकबळी / ५९
 एका घंटयामध्ये जीप परत आली. आणि तहसीलदारांच्या चेंबरमध्ये हात जोडीतच शर्मा दुकानदाराने प्रवेश केला, 'जय रामजी की! त्यांच्यासमवेत गावचे सरपंच होते.

 शिंद्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतलं. शर्माला पाहताच त्यांचा सारा क्षोभ व संताप उफाळून आला, 'लाज वाटली पाहिजे तुम्हाला शर्माजी, खुशाल आठ आठ दिवस दुकान बंद ठेवता, मजुरांना कुपनावर धान्य देत नाही - होत नसेल दुकान चालवणं तर राजीनामा द्या!'

 'रावसाहेब, माझं दुकान बंद नव्हतं. माझ्या मुनिमाकडे माझ्या गैरहजरीत दुकान चालवण्याचे अधिकारपत्र आहे. मी बालाजीला गेलो असता त्यांनी काळगाव दिघीमध्ये वाटप केलं होतं. पाहिजे तर तुम्ही रेकॉर्ड तपासा, या सरपंचांना विचारा हुजूर... आम्ही कधीही दुकान बंद ठेवलेलं नाही. रोज वाटप चालू आहे. राघू कधी दुकानावर आलाच नाही!"

 पुन्हा एकदा तीच हताशता शिंद्यांना जाणवली. शर्मानी रेकॉर्ड नीट ठेवलं असणार यात काहीच शंका नव्हती. पुन्हा त्यांना सरपंचाची साथ होती, त्यामुळे तपासात दुकान बंद होतं हे निष्पन्न होणं रेकॉर्डवर तरी शक्य नव्हतं.

 त्याचं दुकान सस्पेंड केलं तरी काही दिवसांनी तो सहसिलामात खात्रीपूर्वक सुटला असता...!

 'आणि हुजूर, बोरसरचं दुकान नुकतंच आपण सस्पेंड केलंय. ते काळगाव दिघीला म्हणजे माझ्या दुकानाला जोडलंय - ते पत्र परवा तलाठ्यानं आणून दिलय मुनिमाकडे - पत्राच्या ओ. सी. वर त्यांची सही व तारीख आणि तलाठी अप्पाचा तामिली रिपोर्ट पहा - त्याप्रमाणे काल त्यांनी चलनानं पैसे भरले व आज गोडाऊनकडे मेटॅडोर पाठवलाय साहेब धान्य आणण्यासाठी...!'

 शर्माच्या राज्यात सारं काही आलबेल होतं, हाच याचा मथितार्थ होता. शिंद्यांना काही बोलणं शक्य नव्हतं.

 ते सारे गेल्यानंतर भालेराव म्हणाले, 'सर, मी वयाच्या वडिलकीनं सांगतो. आपण एवढा त्रास करून घेऊ नका जिवाला. तुमचा काहीएक दोष नाही. प्रत्येक कार्यकारी यंत्रणेचे काही नियम असतात, त्याप्रमाणे ते काम करतात. रांजणीला कुटुंब राहिलं असतं तर हा प्रकार घडलाही नसता, पण शेतक-यांनी अडविल्यावर जबरदस्तीन कामही करता येत नाही - पाटील साहेबाविरुद्ध रिपोर्ट करता येईल - पण त्यांच्या खातेनिहाय चौकशीत ते जरूर सुटतील!'

पाणी! पाणी!! / ६०
 ‘भालेराव, ते सारं खरं, पण ठकुबाई उपासमारीनं मेली हे सत्य काही नाकारता येणार नाही आय फिल गिल्टी - मला विलक्षण शरमिंदं वाटलं....!'

 “आपण नुकतेच या खात्यात आला आहात सर! हा पहिलाच क्रायसिसचा प्रसंग आहे, पण इथं टफ झालंच पाहिजे. आणखी एक सांगतो, माझ्यापुढे म्हणालात पण चुकूनही यानंतर कुणापुढे ठकुबाईचा भूकबळी झाला असं म्हणू नका - ती अतिश्रम, आजारानं मेली, असाच आपण रिपोर्ट द्यायचा, मी तो तयार करतो व तो सारे जण मान्य करतील - कोणीही आक्षेप घेणार नाही, याची मी गॅरंटी देतो...!'

 भालेरावांनी तयार केलेला अहवाल वाचताना शिंद्यांचं मन त्यांना सांगत होतं, 'हे पांढ-यावर केलेलं काळं आहे, हा शब्दांचा खेळ आहे, रंगसफेदी आहे - खरं एकच आहे - ठकुबाईचा भूकबळी पडला आहे...!' पण मन आवरीत त्यांनी त्या रिपोर्टवर स्वाक्षरी केली.

 ‘सर, मी स्वतः हा अहवाल घेऊन कलेक्टर साहेबाकडे जातो व त्यांना सविस्तर माहिती देतो. तुम्ही रेस्ट घ्या. तुमच्या मनावर बराच ताण पडलेला आहे...!

 भालेराव जीप घेऊन कलेक्टरांकडे गेले व शिंदे घरी परतले. ‘किती उशीर हा कान्त? भूक लागली असेल ना? मी अन्न गरम करते....'

 ‘नको रेणू. मला जरा पडू दे शांतपणे. मग पाहू जेवणाचं. डोकं सुन्न झालं आहे...!'

 शांतपणे रेणू त्यांच्याजवळ आली व त्यांना तिनं पलंगावर झोपवलं व बाम घेऊन त्यांचे कपाळ आपल्या नाजूक - गो-यापान हातांनी हळुवारपणे चोळू लागली.

 तिचं निकट सान्निध्य व तिचा हळुवार स्पर्श मात्र आज त्यांच्या क्षुब्ध मनाला सांत्वना देण्यास असमर्थ होता. तिचा गोरापान हात पाहाताना न पाहिलेल्या ठकुबाईचा वाळलेला कष्टानं रापलेला हात त्यांच्या नजरेसमोर येत होता.

 ...आणि जागच्या जागी अस्वस्थपणे ते क्षणाक्षणाला कूस बदलत होते, वा हात आपल्या कपाळावर घट्ट दाबून धरीत होते... तरीही ते शांत होत नव्हते. त्यांचा क्षोभ कमी होत नव्हता...!

☐☐☐





भूकबळी / ६१