परिपूर्ती/गौराई

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchगौराई

'मुले खेळत होती. मधूनमधून गौरीचा

आवाज ऐकू येई, “माधव, आता तुझी पाळी.
आता तू मास्तर हो, आम्ही मुलं होतो... अरे,
असं काय? ताठ उभं राहून मोठ्यानं बोल ना?
असं तोंडातल्या तोंडात का बोलतात
मास्तर?...' मध्येच कशानेसा चंदू रडू लागला.
परत गौरीचा आवाज ऐकू आला, “बघू रे,
लागलं का आहे? हात्तिच्या! काहीसुद्धा लागलं
नाही, आणि आपला उगीच गळा काढून काय
रडतोस? सांगते ना? ऊठ बघू." तिचा स्वर
उंचावला, मी मुलांना हाक मारली, त्यांच्या
हातावर खाऊ ठेवला आणि गौरीला म्हटले,
‘गौरे, का ग सारखी त्या चंदूला दटावतेस?
पाहावं तेव्हा आपलं तुझं गुरकावणं चालू असतं.
नीट खेळावं." “अगं, पण मी काही उगीच
बोलत नाही. सारखा एवढंसं झालं म्हणजे यँ-यँ
करतो म्हणून म्हटलं..." असे पुटपुटून ती
आपल्या मित्रांना घेऊन पळालीसुद्धा. आणि रोज
हे असेच चालायचे. तिघेजण बरोबरीचीच, पण
जेव्हा पाहावे तेव्हा ही त्यांना शिकवायची,
त्यांची समजूत घालायची, प्रसंग पटल्यास त्यांचा

कैवार घेऊन आमच्याशी भांडेसुद्धा. “गौराई
५० / परिपूर्ती
 

आमची बाळाई-सकरुबा आमचा जावाई." मला बायकांचे गाणे आठवले. गौरी महाराष्ट्राचे माहेरवाशिणीचे प्रतीक, तर भोळा शंकर जावयाच्या स्थानी योजलेला.
 आमच्या शेजारीच पाहा ना! तीन भोळे रागीट शंकर आहेत. थोरला भोळसर, मधला रागीट व धाकटा हेकट. पण त्यांच्या घरची गौराई तिघांना पुरून उरते. दिसायला कशी नाजूक दिसते! जयदेवाची सगळी मृदु व्यजने घालावी तिच्या वर्णनासाठी! ठेंगणी, गोरी, नाजुक हसणे, मृदू बोलणे, बोलताना किंचित मान खाली घातलेली, टपोऱ्या डोळ्यांवर पापणी अधवट मिटलेली; पण अशी पक्की आहे! बोलता बोलता जरा मान उचलून तिने डोळे पूर्ण उघडले म्हणजे लक्षात येते की, मांजरडोळ्यांची ही पोर चांगली वस्ताद आहे. थोरल्याच्या दादागिरीला ती दाद देत नाही: मधल्याचा रागीटपणा तिच्यापुढे चालत नाही; धाकट्याला ती नीटपणे प्रेमाने सांभाळील, पण हट्टबिट्ट मुळीच चालायचा नाही हो तिच्यापुढे!... तसेच ते समोरचे बिऱ्हाड सगळी मुले काळी-सावळी, पण मुली दिसायला हशार, हसतमुख, तोंड भरून बोलणाऱ्या, आणि मुलगे सगळे संकोची, मागे-मागे राहणारे!
 जी स्थिती मुलींची तीच मोठ्या बायांची. आमची गया आली म्हणजे फाटकातच तिची सलामी होई. कुत्र्याच्या अंगावर हात फिरवील, मांजराला उचलून घेईल, “काय भागूजी, बागेत काय लावलं आहेस?" म्हणून माळ्याला विचारील. घरात आली म्हणजे धाकटीला गाणे म्हणून दाखवील. “वा ताईबाई! माझ्यापरीस मोठ्या दिसता की!" म्हणून ताईला म्हणेल. आणि मग चहा पिता पिता आपल्या घरच्या सगळ्या हकीकती सांगेल. चार महीने झाले, आली होती. मी म्हटले, "अग या इतक्या लांब कशाला आलीस एवढ पोट घेऊन?... तोंड कसं सुकलं आहे?" ती म्हणाली, "बाई, मी निरोप पाठवला म्हणजे एवढी अंगणातली खाट द्या पाठवून तीन महिन्यांसाठी.", "हात्तिच्या! एवढ्यासाठी का इथंवर आलीस? निरोप का नाही लावलास? ती हसली, “तुम्हाला माहीत नाही का घरधन्याचा सोभाव? ते काही यायचे नाहीत. मग काय करू? 'बाईंनी कबूल केलं तर खाट न्यायला येईन! अस बोललेत मात्र." ती गेल्यावर आठ दिवसांतच तिचा नवरा छकडा घेऊन खाट न्यायला आला. बाहेरच्या बाहेरच जात होता, पण मी थांबवले व विचारले, "कधी बाळंत झाली गया?" “काल." त्याने उत्तर दिले. “काय झाल?"

त्याने तोडातल्या तोंडात पटपटत खालच्या मानेने उत्तर दिले ते मला नीट ऐकुच
परिपूर्ती / ५१
 

आले नाही. “ठीक आहे न गया?" “होय जी.” असे तो परत पुटपुटला व आता ही बाई विचारणार तरी काय-काय या भीतीने खालच्या मानेने आपला चालू लागला. गया बाळाला घेऊन आल्यावर मी तिला ही हकीकत सांगितली. तशी ती पोटभर हसली व मान वेळावून म्हणाली, “तसेच हैत ते. कोणाशी बोलायचं म्हंजे जिवावर येतं त्यांना. मी एवढी घरात बोलते ना, पण ते निसते हं म्हंतील. नाही तर नाही म्हंतील. आन निसते भोळे सांब! माजी सासू सांगेल ते ऐकायचं. आता कुटं चार पोरं झाल्यावर मी काय सांगते ते ऐकतात.”
 बजाबाई तर आली म्हणजे सगळ्या घरादाराला जाहिरात लागते. “अहो माळीदादा, बाई हैत का?" अशी खणखणीत आरोळी ऐकू आली की, घरातली माणसे मला म्हणतात, "हं. आला वाटतं तुझा पठाण!" उंचनिंच, हाडाने रुंद अशी आहे ती. रूपसुद्धा चांगले आहे, पण कष्टाने चेहरा सुकलेला. बिचारी विधवा आहे आणि आपल्या दोन भावांचा संसार करते. भावजय घरात शिजवते, भाऊ धारा काढून गावात दूध विकतो, आणि गोवऱ्या करणे, म्हशी विकणे, विकत घेणे, चार माणसांजवळ गोड बोलून कर्ज काढणे, ते फेडणे, म्हशीचे गवत, पेंड, सरकी विकत घेणे आणि अगदी तिच्या मर्जीतल्या खाशा गि-हाईकांना स्वत: दूध घालणे हे सगळे ती स्वतः करते. मावळातल्या भावांकडून चिंच आली की ती विकणे, काकड्यांची गाडी आली की भावाला घेऊन जाऊन आपल्या मोजक्या गिऱ्हाईकांना पाट्या ओपून त्याला पैसे करून देणे; कशी बाई एकटी एवढी कामे करते कोण जाणे!- भाऊसुद्धा चांगले कामसू आणि देखणे, पण तिच्यासारखा व्यवहार काही त्यांना जमत नाही. तिची सगळ्या कुटुंबावर हुकूमत, पण ती काही नुसती बसून हुकूम सोडणारी नाही. तिचा अधिकार कष्टाने, प्रेमाने मिळविलेला आहे. आज स्वारी संध्याकाळी आली, “बाई, कावो माज्या भावाला परत लावला? मी इचारायला लावला होता ‘बाईंना चीच हवी का?' म्हणून." मी म्हटले, “अग, मला काय माहीत तुझा भाऊ म्हणून! इथे फाटकाबाहेर घोटाळत होता; मुलांनी विचारलं, 'काय पाहिजे?' म्हणून तशी म्हणतो, 'माळीबाबा कुठं हायेत?' भागू घरी नव्हता. मी म्हटलं, 'कोण उगीच रेंगाळतो आहे?' 'जा' म्हणून सांगितलं.” तशी ती अगदी गयाबाईसारखीच हसली नि मान वेळावून म्हणाली, “आता काय करावं?

निसते भोळे सांब हती. तरी म्यां नीट सांगितलं होतं, बाईंना इचार म्हणून." 
५२ / परिपूर्ती
 

 महाराष्ट्रात फिरता फिरता अशा किती गौराया मी पाहिल्या आहेत! किती कष्ट करतात! किती अधिकार गाजवतात! गौरीचा लाडिकपणा, गौरीचा भोळेपणा, गौरीचा प्रेमळपणा, सगळे त्यांच्यात दिसून येते. ती हिमालयाची मुलगी, तर ह्या सह्याद्रीच्या माहेरवाशिणी. वन्य, राकट, पण प्रेमळ. आपल्या तापट रानटी भावांना सांभाळणाऱ्या, आपल्या रागीट नवऱ्यांना ताळ्यावर आणणाऱ्या, भोळ्या सदाशिवांच्या डोक्यावर बसलेल्या अशा पार्वत्या सर्व जातींत सर्व महाराष्ट्र भर दिसतात. त्याना उत्तरेकडील सुसंस्कृत रुबाबी-नबाबी बोलणे-चालणे माहीत नसेल, त्यांच्या हास्यात नाजूकपणा नसेल, त्यांच्या जिभेच्या रासवटपणात प्रेमाचा ओलावा कोणाला दिसत नसेल तर ते पाहणाऱ्यांचे दुर्दैव. बजाबाई विधवा होऊन वीस वर्षे झाली असतील. नवऱ्याचे दुःख ती कधी कोणाला दाखवीत नाही; पण नुकतीच ती नवीन लुगडे नेसून आली होती तेव्हा मी तिला म्हणाले, "बनाबाई, भाऊ अगदी चोज करतात नाही तुझे? काय सुरेख लुगड घेतल आहे!" तशी तिचे हसे मावळले. सुकलेला चेहरा एकदम उदासीन व दु:खा दिसला. ती बोलली तेसुद्धा स्वत:च्या शब्दांत नाही, तर तिच्या देशातील स्त्रियांच्या अनंत अज्ञात पिढ्यांनी दोन ओळींच्या साठवलेल्या त्याच्या हृदयाच्या व्यथेत. ती म्हणाली, "बाई, काय करायची दिराभावाची पालखी? भर्तारावाचुनि नार दिसते हालकी!"
 आमची माळीणबाई अगदी म्हातारी झालेली आहे. तिचा नवरा तर कित्येक वर्षे काम करीत नाही. त्यातून गेले वर्षभर त्याला भ्रम झालेला. तो नाही-नाही ते बायकोकडून मागतो. पण ती बिचारी त्याचे सगळे कोड पुरविते. परवा डोक्यावरची पाटी अंगणात ठेवून जरा विश्रांतीसाठी खाली बसली. मी म्हटले, “काय माळीणबाई, कसं काय माळीबुवा, बर आहेत ना?" ती कावून-थकून गेली होती. "नुसता तरास हाय बाई! आज मला म्हनतात, 'तू कुनाकडे भाजी इकू नकोस. मी नाही तुला जाऊ देणार.' मी त्यांना चुकवून आले बघा. भाजी इकू नको तर खायला काय घालू कपाळ!" आमचा भागू तरुण आणि फटकळ. तो म्हणतो, “काय म्हाताऱ्याचा वनवास आहे तुम्हाला? एकदा गेला तर सुटाल तरी.” “नग-नग. भागुजी, अस म्हनू नये रे राजा. तुला काय ठावं त्यांनी मला किती सुखाचे दिवस दावले ते!" म्हातारीने डोळे टिपले. अशी ही शंकर पार्वतीची सदा भांडणारी, सदा

रुसणारी, गळ्यात गळा घालणारी जोडी आहे. 
परिपूर्ती / ५३
 

 मुलांचा खेळ संपला होता. तिघेजण फाटकाशी उभी होती. गौरी बोलत होती, “माधव, तू इथे उभा रहा. मी चंदूला पोचवून येते बरं का?" तिने चंदूला दहा पावलांवर असणा-या त्याच्या घराच्या फाटकाशी पोचवले. "नीट जा हं चंदू. धावू नकोस. पडशील वाळूवर." असे त्याला बजावून ती परत आली, माधवचा हात धरला आणि म्हणाली, “चल महाद्या, तुला पोचवते." आणि तो महादेव पण मुकाट्याने तिचा हात धरून चालू लागला. मी हसत गुणगुणले, “गौराई आमुची बाळाई, सकरुबा आमचा जावाई."