परिचय/१८५७ च्या वीर महिला

विकिस्रोत कडून



९. १८५७ च्या वीर महिला



भारताच्या आधुनिक इतिहासात १८५७ साली घडलेल्या घटनेचे एक विशिष्ट स्थान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इ. स. १९०८ साली या विषयावर एक लोकविलक्षण पुस्तक लिहिले. तेव्हापासून आजतागायत भारतीय विवेचकांनी आपली लेखणी या विषयावर सतत चालविली आहे. विशेषतः १९५७ साली स्वतंत्र भारतात आपल्या सरकारने १८५७ हे पहिले स्वातंत्र्यसमर होते ही गोष्ट अधिकृतरीत्या उद्घोषित करून स्वातंत्र्यसमर शताब्दी साजरी केली. या निमित्ताने पुन्हा एकदा सत्तावन्न सालाविषयी नव्याने पुष्कळसे ग्रंथ बाहेर पडले. माननीय ह. वा. देशपांडे यांचा ग्रंथ जरी दोन वर्षे नंतर प्रकाशित झालेला असला तरी त्या निमित्तानेच लिहिण्यासाठी हाती घेतलेला होता. १८५७ विषयी परस्परविरोधी

अशा दोन भूमिका घेतल्या जातात. पहिली भूमिका, उठावाच्या आधी काही वर्षे त्या उठावाची पूर्वतयारी चालू होती; तो एक नियोजनपूर्ण उठाव होता; या उठावात भाग घेणारे लोक देशाच्या स्वातंत्र्यांसाठी हौतात्म्य पत्करण्यास सिद्ध झालेले वीर पुरुष होते असे मानते. आणि पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करताना होता होईतो दुर्दैव हे एकमेव कारण पराभवाचे कसे ठरेल या दृष्टीने विवेचन करते. याच्या अगदी विरोधी असणारी दुसरी भूमिका, शिपायांचा हा उठाव, शिपायांच्या तक्रारी,धार्मिक गैरसमज, चिडलेले पराभूत संस्थानिक यांचा गोंधळपूर्ण उठाव होता; त्याला फारसे नियोजन नव्हते; स्वार्थ आणि लुटीचा मोह त्यात अधिक होता, जनतेचा फारसा पाठिंबा या घटनेला नव्हता म्हणून फार तर शिपाईगर्दी

असे या प्रसंगाचे वर्णन करता येईल असे मानते. माझी स्वतःची भूमिका याबाबतीत इतिहासकारांच्या दृष्टीने पुराव्याच्या विरोधी व देशभक्तांच्या दृष्टीने पूर्वग्रहदूषित अशी काहीशी आहे. सत्तावनच्या एकूण उठावणीला शिपायांच्या अनेकविध तक्रारी कारण झाल्या; या उठावणीला एकही चांगला नेता मिळाला नाही; अदूरदर्शी स्वार्थ या उठावणीत सर्वत्र होता; ह्या सर्व बाबी जरी मान्य केल्या तरी सत्तावन्न साली इंग्रजांच्याविरुद्ध या देशात प्रक्षोभाची एक प्रचंड लाट उचंबळून वर आली होती हे नाकारता येणार नाही. मागासलेल्या देशात परकीय राज सत्तेच्याविरुद्ध होणारा पहिला लढा या स्वरूपाचा असणे भाग असते, असे मला वाटते. भारतापुरते बोलावयाचे तर हा देश इंग्रजांना जिंकता आला याची कारणे म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडींसंबंधी आमचे प्रचंड अज्ञान, राष्ट्रीय भावनेचा अभाव, आपापसांतील दुफळी, मागासलेली शस्त्रसंघटना, जुनाट युद्धतंत्र वगैरे वगैरे बाबींचा उल्लेख करावा लागेल. अशा या देशाने एखादे राजकीय तत्त्वज्ञान सुसूत्रपणे आत्मसात करावे, त्या तत्त्वज्ञानाच्या आधारे अखिल भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नियोजन करावे व लढ्याला निश्चित धोरण, निश्चित कार्यक्रम, निश्चित राजकीय सामाजिक दृष्टिकोण द्यावा ही अपेक्षा चूक आहे. मागासलेले देश जेव्हा पारतंत्र्यात जातात, तेव्हा पहिले उठाव असेच अनियोजित, प्रक्षोभाच्या स्वरूपाचे असणार. म्हणून १८५७ ची तुलना इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया, आयर्लंड यांच्या स्वातंत्र्यलढयाशी करण्यापेक्षा आफ्रिकेतील उठावण्या, चीन मधील सन्यत्सेनपूर्वकालातील शेतकरी उठावण्या, यांच्याशी करणे इतिहासत: न्याय्य होईल. सत्तावन्न सालच्या उठावाने, पुढे देशभर ज्या चळवळी सुरू झाल्या, त्यांना प्रेरणा दिली नाही. ही गोष्ट खरी आहे. ज्यांच्या सामाजिक चळवळींतून पुढे चालून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत मोठी संस्था निर्माण झाली त्या काँग्रेसच्या जन्मदात्यांच्या मनात सत्तावन्न सालाविषयी फारशी आत्मीयता नव्हती ही गोष्ट खरी आहे. प्रत्यक्ष लोकमान्यांनासुद्धा सत्तावन्न सालाविषयी फारसे प्रेम नव्हते हीही गोष्ट खरी आहे. पण हे सत्य अपूर्ण आहे. या सत्याला अजून एक बाजू आहे. ती म्हणजे, सावरकरांनी ज्या वेळी भारतव्यापी सशस्त्र उठावाची योजना केली त्या वेळी प्रेरक शक्ती म्हणून सत्तावन्न साल त्यांच्यासमोर उभे होते. भारतीय स्वातंत्र्यलढा ज्या टप्प्यांनी चालला त्यांत दीर्घकाळ कुणी उठावणीच केली नाही, पण ज्यांनी ज्यांनी इंग्रज राज्यसत्तेच्या विरुद्ध सशस्त्र उठावणीचा विचार मनात आणला त्यांना सत्तावन्न सालाने काही प्रेरणा निश्चित दिल्या आहेत.
 माननीय हरिहरराव देशपांडे या बाबतीत सरकारी धोरणाला अनुकूल म्हणजेच सावरकरांचे विवेचन मानणारे आहेत. या भूतलावर असणाऱ्या संस्कृतींच्यापैकी भारतीय संस्कृती ही काहीतरी विशेष आहे. पराक्रम, त्याग इ. सद्गुणांत  आम्ही काही तरी विशेष करून दाखविलेले आहे अशा प्रकारची प्रेरणा इतिहासातून घेऊन वर्तमानकालात जगणारे जे लोक असतात त्यांच्यांत त्यांची गणना करता येईल. एक ध्येयवादी जीवन त्यांनी घालविले आहे. जन्मभर काही निष्ठा मनात बाळगून त्यांना जोपासण्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. स्पष्ट-अस्पष्टपणे, हिंदूंच्या लष्करीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते वागले आहेत. प्राचीन भारतातील विक्रमादित्याविषयी, मध्ययुगातील रजपूत, शीख व मराठे यांच्याविषयी आणि मध्ययुगाच्या समाप्तीवर उभे असणाऱ्या सत्तावन्न सालाविषयी त्यांना ज्वलंत अभिमान असावा ही गोष्ट स्वाभाविक आहे. या दृष्टीनेच त्यांच्या सदर पुस्तकाकडे पाहिले पाहिजे. सत्तावन्न साली ज्या स्त्रियांनी आपले कर्तृत्व दाखविले त्यांना दिलेली ही एक प्रकारे पुढच्या शतकाची अभिवंदना आहे. अशाही पुस्तकांची नेहमीच राष्ट्राला गरज असते. सत्य ही जीवनातील फार मूल्यवान निष्ठा आहे हे मान्य करूनही माणूसप्राणी राष्ट्र म्हणून जिद्दीने जगात तो उभा राहतो तो केवळ पुरावा आणि तर्क यांनी उभ्या केलेल्या सत्याच्या आधारे नव्हे. अभिमानस्थाने, श्रद्धास्थाने, भावनेला आवाहन करणाऱ्या काही जागा यांची समाजाला गरज असतेच. या दृष्टीने ह. वा. देशपांडे यांनी एक वाचनीय, स्फूर्तिप्रद पुस्तक लिहिले आहे, यावर दुमत होण्याचे कारण नाही. पण त्याबरोबरच समाजातील प्रौढ विचारवंतांना दरक्षणी निर्भेळ सत्य उघड्या डोळ्यांनी पाहण्याची तयारी ठेवावी लागते हे विसरता येणार नाही. म्हणून या पुस्तकाच्या बाबतीत हे ध्यानात ठेवले पाहिजे की, हे पुस्तक प्रेरक आहे. निर्भेळ सत्य तावून सुलाखून मांडणे हे कार्य देशपांडे यांच्यासारखे ध्येयवादी लोक बहुधा करू शकत नाहीत. जगातील सर्व ध्येयवाद्यांची हीच अडचण आहे. त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट, त्यांच्या निष्ठा, त्यांचे व्यक्तिमत्त्व आपणाला नतमस्तक करते, पण निर्भेळ सत्य यांच्या ठिकाणी बहूधा वास करीत नाही. सत्याला भावनांचे रंग चढवून ते अपेक्षित दृष्टीकोणातून आकर्षक रंगात रंगविलेले दिसते.
 या ग्रंथातील देशपांडे यांचे मुख्य प्रतिपाद्य असे की, १८५७ हे एक राष्ट्रीय स्वातंत्र्य-समर होते. भारतीय महिलांनी या रणसंग्रामात जो भाग घेतला यावरून ही गोष्ट अधिक तीव्रतेने जाणवते. आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा किती तरी पटीने या समरात स्त्रियांनी भाग घेतलेला आहे. त्यांच्यातील काही स्फूर्तिदात्या नेत्या होत्या, काही प्रत्यक्ष लढताना धारातीर्थी पडल्या, काहींनी युद्ध चालू असताना पिछाडी सांभाळली, आणि काहींनी फार मोठे हौताम्य पत्करले.मागासलेल्या वर्गातील महिला यांनीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात या संग्रामात भाग घेतलेला आहे. ज्या काळात इंग्लंडमध्ये अजून स्त्रियांची खरेदी-विक्री होत होती आणि ज्या काळात भारतात अजून आधुनिक शिक्षण आलेले नव्हते त्या काळातील भारतीय महिलांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी, पराक्रम, देशभक्ती ही खरोखरच मन थक्क करून टाकणारी आहे. स्थूलमानाने देशपांडे यांचे प्रतिपाद्य मान्य करण्यास हरकत नाही. तपशिलात शिरण्याचा प्रयत्न करताना मात्र या प्रतिपादनातील अनेक कच्चे दुवे उघडकीला आल्याशिवाय राहत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या संपूर्ण इतिहासात लढवय्या, कर्तबगार, मुत्सद्दी अशा स्त्रिया तुरळक का होईना पण आढळत आलेल्या आहेत. पेशवाईचे उदाहरण जरी घेतले तरी गोपिकाबाई, आनंदीबाई, अहिल्याबाई होळकर इ. नावे; त्या आधीची जिजाबाई, येसूबाई, ताराबाई इ. मराठेशाहीतील नावे; त्या आधीची बेगम नूरजहान, चांदबिबी, रोशन आरा इ. नावे; त्याही आधीची राणी कर्णावतीसारखी स्त्रीरत्ने नोंदविता येतील. अगदी अशोकाच्या काळी गेले तरी अशोकाच्या पत्नींपैकी तिश्शरक्षितेच्या आख्यायिका बुद्ध वाङमयात आहेत. पण अशा तुरळक उदाहरणांनी काहीही सिद्ध होणार नाही. नाव घेण्याजोग्या व्यक्तिमत्त्वाच्या दोनच महिला सत्तावन्न साली चमकल्या आहेत. पैकी एक म्हणजे अयोध्येची बेगम हजरात महाल आणि दुसरी म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. उरलेल्या स्त्रियांचे कर्तृत्व पुष्कळसे असे आहे की, ज्यांचा संबंध देशनिष्ठेपेक्षा इतर बाबींशी अधिक येईल. सामान्यपणे आजही ज्या प्रदेशात लुटारूंचे प्रस्थ आहे तिथे त्यांच्या बायका पिछाडी सांभाळताना आढळतात. केवळ सत्य म्हणून पाहिले म्हणजे ज्या संग्रामात लढणाऱ्या पुरुषांच्या व पुरुषनेत्यांच्या देशनिष्ठेविषयी खात्री वाटत नाही, तिथे धारातीर्थी पडलेल्या महिला केवळ धारातीर्थी पडल्या म्हणून स्वातंत्र्यवादिनी होत्या हे म्हणणे काहीसे अतिरंजित वाटते. उठाव करणाऱ्या शिपायांनी ज्या बहादुरशाहला भारताचा सम्राट घोपित केले तो शिपायांना सतत कंटाळलेला होता आणि सारखा इंग्रजांशी हातमिळवणी करण्याच्या उद्योगात गढलेला होता व ज्या नानासाहेबाच्या नावे पेशवाई घोषित केलेली होती त्याला सक्तीने शिपायांनी उठावात भाग घ्यावयाला लावले होते व तोही सारखा माफीचे आश्वासन मिळविण्याच्या प्रयत्नात होता, ही कट ऐतिहासिक सत्ये आहेत. इंग्रजांच्या विषयी प्रक्षुब्ध होऊन जगण्या-मरण्याची लढाई खेळावयाला तयार झालेल्या जनतेला त्यांच्या मध्ययुगीन श्रद्धेप्रमाणे मोगलसम्राट आणि पेशवे नेते म्हणून हवे होते. आणि या नेत्यांना जमले तर स्वातंत्र्य, न जमले तर माफी हवी होती. अशी ही रस्सीखेच आहे. ढासळत चाललेल्या बुरजाचे दगडगोटे वर चढण्यासाठी शिपायांनी दर वेळी दोन्ही हातांनी धरण्याचा प्रयत्न केला. उभयपक्षी असणाऱ्या स्वार्थानी दोघेही एकमेकाला कंटाळलेले होते; व भीती त्यांना एकत्र सांधीत होती. केवळ भावना आंधळी असते. तिला अधूनमधून विचारांची जोड द्यावी लागते.
 स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वश्रेष्ठ अशा ज्या तीन महिला, त्यांचे जीवन केवळ  इतिहास म्हणून पाहिले तर पुष्कळसा भ्रमनिरास होऊन जातो. या तीन महिला म्हणजे बेगम झीनत महल, बेगम हजरत महल आणि राणी लक्ष्मीबाई. पैकी झाशीपुरते बोलावयाचे तर पहिल्या बाजीरावने छत्रसालाला जी मदत केली त्याबद्दल छत्रसालाकडून बाजीरावाला बुंदेलखंड मिळाला. या बुंदेलखंडात त्या वेळी नेवाळकर घराण्याला मिळालेली जहागीर म्हणजे झाशी. इ. स. १८३५ साली या घराण्याचा अधिपती रामचंद्रराव याला, संस्थानाने इंग्रजांना दर वेळी जी मदत केली तिचा मोबदला म्हणून, 'महाराजाधिराज फिदवी बादशहा-जमाइंग्लिश्तान' ही पदवी मिळाली व झाशी हे संस्थान झाले. लक्ष्मीबाईंचा पती गंगाधरराव हा इंग्रजांच्या मेहरबानीने संस्थानाधिपती झालेला होता. १८४३ साली गंगाधररावला राजेपदाचे हक्क मिळाले. याची दूसरी बायको म्हणजे राणी लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाईंचे वय ५८ साली त्यांच्या मृत्यूच्या सुमारास फार तर २३-२४ वर्षांचे होते. लग्नसमयी त्यांचे वय ११-१२ वर्षांचे होते हे गृहीत धरले म्हणजे ' संसार'या शब्दाला या स्त्रीच्या जीवनात काय अर्थ असावा ही बाब वादग्रस्त होते. १८५३ साली गंगाधरराव वारला. त्यानंतर लक्ष्मीबाईने आपला दत्तक पुत्र दामोदर याला झाशीचा वारसा मिळावा यासाठी कसून प्रयत्न केला. ह्या प्रसंगीचा तिचा मुख्य मुद्दा वंशपरंपरेने आपले संस्थान इंग्रजांशी किती एकनिष्ठ राहिले, किती प्रेमाचे संबंध आपापसात राहत आले यावर बोट ठेवणे हा होता. १८५४ साली राणीला ६० हजारांचा तनखा मंजूर करून संस्थान खालसा करण्यात आले. त्या वेळी तिने मुकाटयाने किल्ला रिकामा केला व गावात राहणे पत्करले. असे सांगतात की, त्या वेळी ती म्हणाली, “ मेरी झाशी मै कभी नहीं दूंगी," तिचे हे उद्गार तिचीच पूढची वागणूक फोल ठरवतात. सत्तावन्न सालापर्यंत गडबड न करता अर्ज, विनंत्या, तक्रारी या चक्रात ती फिरत होती. प्रथम तिने पेन्शन नाकारले. पुढे नाइलाज म्हणून स्वीकारले. सत्तावन्न साली ६ जूनला झाशीला उठाव झाला. हा उठाव झाल्यानंतर लक्ष्मीबाई हिने झाशीचा कारभार ताब्यात घेतला व शिपाई दिल्लीला चालते झाले. बाईने या घटनेसंबंधी इंग्रजांच्याकडे स्पष्टीकरण दिले. यानंतर कमिशनरच्या हुकमान्वये ती इंग्रजांच्या वतीने झाशीची कारभारीण बनली. फेब्रुवारी अठ्ठावन्नपर्यंत झाशीच्या राणीने इंग्रजांच्या संबंधी मित्रत्वाचे धोरण बदलले नव्हते, असे मानण्यास जागा आहे. मार्चमध्ये इंग्रजी फौजा झाशीकडे कूच करून निघाल्यानंतरसुद्धा लक्ष्मीबाईने फिरोजला आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. आणि शेवटी ज्या वेळी तिच्यासमोर निश्चित स्वरूपात अशी वस्तुस्थिती उभी राहिली की, झाशी संस्थान परत मिळणार नाही, इंग्रजांचा आपल्यावर विश्वास नाही, इंग्रजांना शरण जाऊन मानहानिकारक जिणे जगावे अगर फासावर चढावे हा एक मार्ग; किंवा लढून विजय प्रस्थापित करावा अगर हौतात्म्य पत्करावे हा दुसरा मार्ग, त्या वेळी त्या शूर स्त्रीने दुसरा मार्ग स्वीकारला व तिने इथून पुढे अतिशय शौर्याने लढाई दिली. मृत्यू पत्करला. असा इतिहास आहे. तेव्हा शेवटच्या हौतात्म्यामुळे त्यांच्या जीवनाच्या एकूण ग्रंथाला झळाळी आलेली आहे, ही गोष्ट उघड आहे. मी स्वतः शेवटच्या क्षणी दाखविण्यात आलेले शौर्य गौण असते असे मानणारा नाही. व्यवहाराच्या पातळीवर सामान्यांच्यासारखी जगणारी माणसे असामान्य क्षणी तापलेल्या सुवर्णाप्रमाणे उजळून उठतात हा सर्व स्वातंत्र्यलढयाचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही जिचा गौरव करतो ती राणी आपल्या नव्या रूपात शेवटचे किती महिने होती हा प्रश्न गौण असतो. हुतात्म्यांचा भूतकाळ पाहत नसतात. ज्या दिव्य कालखंडाने त्यांचे जीवन पवित्र होते तेवढाच पाहण्याजोगा असतो. पण सत्य म्हणून जेव्हा विचार करू तेव्हा सारे चित्र डोळ्यांसमोर असले पाहिजे. हीच गोष्ट बहादुरशाहाची लाडकी राणी झीनत महल हिची आहे. तिचा सर्व प्रयत्न आपला मुलगा जवानबख्त याला गादी मिळावी हा होता. त्या दृष्टीने तिची कारस्थाने चालू होती. फखरुद्दीन याच्या मृत्यूच्या प्रकरणी तिच्यावर विष दिल्याचा संशय होताच. बादशाहने फौजेच्या खर्चासाठी खटपटीने मिळविलेला पैसा झीनत महलने मधल्यामध्ये गडप केला, असा शिपायांचा तिच्यावर आरोप होता. शेवटच्या क्षणापर्यंत इंग्रजांशी तह करून पाहण्याची तिची धडपड चालूच होती. हेच हजरतमहल हिच्याविषयी म्हणता येईल. फार तर हजरत महलने झीनत महलप्रमाणे आपला जीव वाचावा यासाठी काही लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला नव्हता, असे म्हणता येईल. हजरत महल ही एक सामान्य नर्तकी. स्त्रैण वाजतअलीशहाने तिला आपली बेगम केले. ही कर्तृत्ववान स्त्री आपला मुलगा बिर्जीशकद याला गादीवर बसवून अयोध्येच्या प्रचंड उठावाची सूत्रधार झाली. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा तिने शिपायांना जी धमकी दिली, तिच्यावरून तिच्या मनोवृत्तीवर प्रकाश पडतो. ती म्हणाली, 'जर शिपाई प्राणपणाने लढणार नसतील; तर आपण इंग्रजांकडे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बोलणी सुरू करू.' तिच्या जाहीरनाम्याचासुद्धा मुख्य रोख माझे संस्थान परत मिळेल काय हा आहे. खरी गंमत तर ही आहे की, इंग्रजांचा आपल्या शक्तीवर प्रचंड विश्वास होता. ते चिवट होते. ढासळणाऱ्या बुरुजांचे हे दगड ढासळून पडावेत हीच त्यांचीही इच्छा होती. त्यांनी ठिकठिकाणी संस्थानिकांच्या माफीनाम्याच्या अटी फेटाळल्या. हे संस्थानिक स्वातंत्र्य मागत नव्हते. इंग्रजांच्या दयाळ पंखाखाली आपला तनखा, मानमरातब वंशपरंपरा अबाधित राहावा इतकीच त्यांची इच्छा होती. पण इंग्रजांना या निमित्ताने जितकी संस्थाने संपतील तितकी हवी होती. इंग्रज तहाला तयार नव्हता. माफी द्यावयाला तयार नव्हता. आमचे क्रांतिवीर मरेपर्यंत लढले, लढताना मेले, याचे हे एक महत्त्वाचे कारण होय. ही वस्तुस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहण्याइतके धैर्य आपणाजवळ पाहिजे. मागासलेल्या जनतेत संस्थानिकांच्या विषयी आदर असतो. त्याची कारणे मध्ययुगीन श्रद्धांत आहेत. बस्तरची जनता, बस्तरच्या महाराजामागे बहुसंख्येने उभी आहे; म्हणून तिला घटनाद्रोही म्हणणे तितके असमंजसपणाचे होईल; तितकेच हजरतमहलच्या मागे उभी असणारी अयोध्येची जनता राष्ट्रप्रेमी होती हे म्हणणेसुद्धा असमंजसपणाचे होईल.
 एका बाबतीत मात्र देशपांड्यांची स्तुती करणे आवश्यक आहे. ती बाब म्हणजे केवळ कर्तृत्व या दृष्टीने पाहिले तर ज्या स्त्रियांनी हा लढा लढला त्यांचे कर्तृत्व तर मान्य करावेच लागेल; पण ज्यांनी आपल्या भागात उठावच होऊ दिला नाही, होऊ घातलेला उठाव आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर दडपून टाकला अगर ज्यांनी लढताना शक्य ती अंधारातून मदत केली व बाजी बदलताच सर्वात आधी शरण जाऊन माफी मिळवली त्यांचेही कर्तृत्व मान्य करावे लागेल. हे देशपांड्यांनी मार्मिकपणे ओळखलेले आहे. या दृष्टीने नागपूरकर भोसल्यांची बाकाबाई व अहिरीची गौंड राणी लक्ष्मीबाई हयांचे चरित्र या पुस्तकात त्यांनी दाखल केले आहे. मांडणी करताना देशपांडे कधी कधी चांगल्याच गमती करतात. त्यांतील निदान काही तरी नोंदविल्या पाहिजेतच. एक म्हणजे एखाद्या वीर रमणीचे चरित्र सांगताना ते इतर कुठला पुरावा मिळत नसेल तर पंडित सुंदरलाल अगर सावरकर यांची विधानेच पुरावा म्हणून वापरतात. ही इतिहास सांगण्याची पद्धती नव्हे. अझीझनचे सगळे चरित्र अशा प्रकारचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रीने १८५७ साली काहीही भाग घेतल्याचे नमूद नाही; इतकेच नव्हे, तर जिने भाग घेतला असा फारसा संशयही कुणाला आलेला दिसत नाही अशा व्यक्तींच्या संबंधाने काही तुरळक संशय व्यक्त झालेले असतात. तुरळकपणे असा एखादा उल्लेख येतो. एखादा साक्षीदार हवालदार बालमुकुंद असे सांगतो की, अमक अमुक ऐकण्यात आले होते. इतक्या आधारे देशपांडे ती व्यक्ती देशप्रेमी ठरवतात. असा प्रकार ग्वाल्हेरची बायजाबाई आणि कोल्हापूरची ताईबाई हयांच्या बाबत झालेला आहे, कुठल्या तरी एका गीतात कुणी तरी एक स्त्री आपल्या प्रियकराची कुचेष्टा करते. ती म्हणते, माझ्या प्रियकराला लूटही करता येत नाही 'आवरोने लुटे शाले दुशाले । मेरे प्यारे ने लूटे रुमाल.' देशपांडे यांनी हे गीत सत्तावन्न साली स्त्रीवर्ग किती देशप्रेमी झाला होता याचा पुरावा म्हणून उद्धृत केले आहे. असो.
 सदर पुस्तकाला कु. मालती जोशी यांची अतिकृत्रिम अशी प्रस्तावना आहे; ज्या प्रस्तावनेत निरर्थक विशेषणांची खैरात केली आहे. अशा प्रकारे खैरात करून एखाद्या पुस्तकाची स्तुती होत असते असे वाटत नाही. मालती जोशी यांच्या मते या ग्रंथांत खोल व चतुरस्र व्यासंग, स्वतंत्र विचारसरणी, व्युत्पन्नता ह्यांचा परस्पर पोषक प्रादुर्भाव झालेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आजपर्यंत कोणी पाडलेला स्वतंत्र प्रकाशझोत या ग्रंथात आहे. लोकनायक अणे यांच्या मते हा : अपूर्व व मौलिक आहे. प्रत्यक्ष लेखकाने मात्र हे नोंदविलेले आहे की, प्रस्तुत ग्रंथ प्रायः स्वातंत्र्यवीर सावरकर व पंडित सुंदरलाल यांच्या सुविख्यात ग्रंथांती उच्छिष्टेच वेचण्यात आली आहेत, हे कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच पाहिजे. एकत्र या परस्परप्रशंसा समोर ठेवाव्यात यावर भाष्याची गरज नाही. एवढे मात्र मी केलेच पाहिजे की, या ग्रंथाच्या रूपाने स्वदेशाभिमानं जागा करणारी, देशप्रेमा प्रेरणा देणारी चरित्रे एका ध्येयवादी व्यक्तीच्या हातून लिहिली गेली आहेत व एक अवश्य वाचनीय ग्रंथ निर्माण झाला आहे.



 (१८५७ च्या वीर महिला :- ले. ह. वा. देशपांडे. प्रकाशक ठाकूर आणी कंपनी, अमरावती.)