देवा ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> .... अरे ! जिन्यांत तर अगदीं अंधार आहे ! अजून आठही वाजले नाहींत, तोंच जिकडे तिकडे अगदीं सामसूम ! ही कोठें बाहेर तर नाहीं गेली ? - छेः ! दाराच्या फटींतून दिव्याचा अंधुक अंधुक उजेड तर दिसत आहे. आणि अशा रात्रीच्या वेळेला ती कशाला उगीच बाहेर - पण हें काय ? कोणाच्या बरें फुटक्या हदयांतून हा रडका हुंदका बाहेर पडला ! - माझें हदय कसें धडधडायला - चला, हळूच वर जाऊन दाराच्या फटींतून, आपल्या फाटत चाललेल्या संसाराचें चित्र पाहूं ! - जिवा, असा मधेंच खचून जाऊं नकोस ! आधीं वर चल ! - पहा ! आपला हा संसार नीट डोळे उघडून पहा ! - दारिद्यानें संतापून जाऊन अगदीं त्रासानें अंगावर फेंकलेलें तें फाटकेंतुटकें लुगडें नेसून माझी बायको कशी हुंदके देऊन रडत आहे ती ! तो पहा ! ढणढण जळणार्‍या त्या घासलेटच्या डबड्याशेजारी, आगपिणीनें खाजवून - बाळ ! नको रे आपल्या चिमुकल्या जिवाला असा नखांनीं ओरबडूंस ! - रक्तानें न्हालेल्या, व मधून मधून आपल्या आईकडे, व दोन - तीन वर्षानीं वडील अशा आंधळ्या बहिणीकडे, केविलवाण्या मुद्रेंनें रडत रडत पाहणार्‍या, माझ्या त्या दोन वर्षाच्या लेंकराकडे पाहिलेंस का ? - काय म्हटलेंस ? माझी गोदी कशानें अशी आंधळी झाली ? दोन अडीच वर्षे झाली, देवीच्या तडाख्यांतून अगदी मरतां मरतां वांचली ! पण बिचारी जिवाऐवजी डोळेच घालवून बसली आहे ! - एकंदरींत, माझें आयुष्य या गरीब बिचार्‍या आत्म्यांचे हाल हाल करण्यांतच चाललें आहे कीं नाहीं ! - ऐकलेंस ? तिघेंही माझ्या या अस्तित्वाच्या लोखंडी चरकांत सांपडून, कशीं रडक्या स्वरानें मोठमोठ्यानें कण्हत आहेत तीं ! - हा ! - आगपिणीनें कुरतडला जाणारा, अहोरात्र अंधारांत तळमळणारा, व माझ्या हदयाचें हें भिकार डबडें मिळाल्यामुळें हा ढणढण जळणारा ! - अरेरे ! असे हे तीन आत्मे देवाला काय बरें म्हणत असतील ? - जिवा ! तुला नाहीं का रे ऐकूं येत ? - अरे ! ते म्हणत आहेत कीं, ' देवा, हा नरक लोक निर्माण झाला ! म्हणूनच आम्ही असे तडफडत आहों बरें ! ' - खरेंच ! माझी बायको लग्नापूर्वी आपल्या श्रीमंत पित्याच्या घरीं, कशी सुखांत आणि आनंदांत होती नाहीं ? पण शेवटी, स्वर्गात हंसणार्‍या व येथें रडविणार्‍या मंगळानें - या आनंदानें चिरकाल हंसूं इच्छिणार्‍या मुक्या प्राण्याचा, आपल्या पापकर्मात चिलबिळणार्‍या या दुरात्म्याशी विवाह - मंगल विवाह ! - लावून दिला ! परमेश्वरा ! तुझी स्वर्गात आनंदानें प्रकाशणारी नक्षत्रें, आह्मां माणसांच्या दृष्टीला, आमच्या मेंदूलाच, रडकी कशीं रे दिसतात ! - बाळांनो ! आपला बाप जन्माला कां आला, म्हणून देवाला विचारीत असेच निरंतर रडत बसा ! - पण मी म्हणतों, या मुलांचें तरी आयुष्य असें दुःखांत कां बरें जावें ? बरोबर ! - कां नाही या मुलांनी तडफडावें ! - अरे ! निष्प्रेमाच्या अत्यंत विषारी जागेमध्ये दारिद्यरसानें अधिकाधिक फोंफावणार्‍या कामवासनेला गोड फळें येतील, का ' कडू जहर ? - नासकीं अशीं फळें येतील ? हां, बरोबर विचारलेंस. मला जर येवढें कळत होतें तर मीं या गरीब बिचारीशीं विवाह करुन तिला अशी दुःखसागरांत कां लोटली ? - पण जिवा ! या घरांत निर्माण झालेल्या दुःखाला मीच कारण आहें असें मी कधी बरें म्हणत नाहीं ? - आतां मी विवाहच कां केला, तर बाबा रे, मीच तुला उलट असें विचारतों कीं, पापकर्मात गटांगळ्या खाणार्‍या प्राण्याला कधीं एकटें मरावेंसें वाटेल का ? - जितके आपल्या मिठींत सांपडतील, तितक्यांना घेऊन तो रसातळाला जाणार ! मग मीच एकटा या जगांत कसा बरें तडफडूं ! देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! !....


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.