Jump to content

दासबोध/दशक सतरावा

विकिस्रोत कडून

<poem> ॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक सतरावा : प्रकृति पुरुष समास पहिला : प्रकृतिपुरुषनाम

॥ श्रीरामसमर्थ ॥ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥ सकळ जगाचा ईश्वरु । म्हणौन नामें जगदेश्वरु । तयापासून विस्तारु । विस्तारला ॥ २ ॥ शिवशक्ती जगदेश्वरी । प्रकृतिपुरुष परमेश्वरी । मूळमाया गुणेश्वरी । गुणक्षोभिणी ॥ ३ ॥ क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्त साक्षी । अंतरात्मा सर्वसाक्षी । सुद्धसत्व महत्तत्त्व परीक्षी । जाणता साधु ॥ ४ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वरु । नाना पिंडी जीवेश्वरु । त्यास भासती प्राणीमात्रु । लहानथोर ॥ ५ ॥ देहदेउळामधें बैसला । न भजतां मारितो देहाला । म्हणौनि त्याच्या भेणें तयाला । भजती लोक ॥ ६ ॥ जे वेळेसी भजन चुकले । तें तें तेव्हां पछ्याडिलें । आवडीनें भजों लागले । सकळ लोक ॥ ७ ॥ जें जें जेव्हां आक्षेपिले । तें तें तत्काळचि दिधलें । त्रैलोक्य भजों लागलें । येणें प्रकरें ॥ ८ ॥ पांचा विषयांचा नैव्यद्य । जेव्हां पाहिजे तेव्हां सिद्ध । ऐसें न करितां सद्य । रोग होती ॥ ९ ॥ जेणें काळें नैव्यद्य पावेना । तेणें काळें देव राहेना । भाग्य वैभव पदार्थ नाना । सांडून जातो ॥ १० ॥ जातो तों कळो देईना । कोणास ठाउकें होयेना । देवेंविण अनुमानेना । कोणास देव ॥ ११ ॥ देव पाहावयकारणें । देउळें लागती पाहाणें । कोठेंतरी देउळाच्या गुणें । देव प्रगटे ॥ १२ ॥ देउळें म्हणिजे नाना शरीरें । तेथें राहिजें जीवेश्वेरे । नान शरीरें नाना प्रकारें । अनंत भेदें ॥ १३ ॥ चालतीं बोलतीं देउळें । त्यामधें राहिजें राउळें । जितुकीं देउळें तितुकीं सकळें । कळली पाहिजे ॥ १४ ॥ मछ कूर्म वाराह देउळें । भूगोळ धरिला सर्वकाळें । कराळें विक्राळें निर्मळें । कितियेक ॥ १५ ॥ कित्येक देऊळीं सौख्य पाहे । भरतां आवघें सिंध आहे । परी तें सर्वकाळ न राहे । अशाश्वत ॥ १६ ॥ अशाश्वताचा मस्तकमणीं । जयाची येवढी करणी । दिसेना तरी काय जालें धनी । तयासीच म्हणावें ॥ १७ ॥ उद्भवोन्मुख होतां अभेद । विमुख होतां उदंड खेद । ऐसा अधोर्ध संवाद । होत जातो ॥ १८ ॥ सकळांचे मूळ दिसेना । भव्य भारी आणी भासेना । निमिष्य येक वसेना । येके ठाइं ॥ १९ ॥ ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । तुझी लीळा सर्वोत्तमा । तूंच जाणसी ॥ २० ॥ संसारा आलियाचें सार्थक । जेथें नित्यानित्यविवेक । येहलोक आणी परलोक । दोनीं साधिले ॥ २१ ॥ मननसीळ लोकांपासीं । अखंड देव आहिर्निशीं । पाहातां त्यांच्या पूर्वसंचितासी । जोडा नाहीं ॥ २२ ॥ अखंड योग म्हणोनि योगी । योग नाहीं तो वियोगी । वियोगी तोहि योगी । योगबळें ॥ २३ ॥ भल्यांची महिमा ऐसी । जे सन्मार्ग लावी लोकांसी । पोहणार असतां बुडतयासी । बुडों नेदावें ॥ २४ ॥ स्थूळसूक्ष्मतत्वझाडा । पिंडब्रह्मांडाचा निवाडा । प्रचित पाहे ऐसा थोडा । भूमंडळीं ॥ २५ ॥ वेदांतीचें पंचिकर्ण । अखंड तयाचें विवर्ण । महांवाक्यें अंतःकरण । रहस्य पाहे ॥ २६ ॥ ये पृथ्वीमधें विवेकी असती । धन्य तयांची संगती । श्रवणमात्रें पावती गती । प्राणीमात्र ॥ २७ ॥ सत्संग आणी सत्शास्त्रश्रवण । अखंड होतसे विवर्ण । नाना सत्संग आणी उत्तम गुण । परोपकाराचे ॥ २८ ॥ जे सद्कीर्तीचे पुरुष । ते परमेश्वराचे अंश । धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेंचि वसे ॥ २९ ॥ विशेष सारासार विचार । तेणें होय जग्गोद्धार । संगत्यागें निरंतर । होऊन गेले ॥ ३० ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे देवबळात्कारनाम समास पहिला ॥


समास दुसरा : शिवशक्तिनिरूपण

॥ श्रीराम ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । जैसें गगन अंतराळ । निराकार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥ अंतचि नाहीं तें अनंत । शाश्वत आणी सदोदित । असंत नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥ परब्रह्म तें अविनाश । जैसें आकाश अवकाश । न तुटे न फुटे सावकास । जैसें तैसें ॥ ३ ॥ तेथें ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण । तेथें अखंड निर्गुण । निरावलंबी ॥ ४ ॥ तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोखें ना प्रकाशक । उपाधीवेगळें येक । निरोपाधी ब्रह्म ॥ ५ ॥ निश्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य ऐसें कल्पिलें । गुणासमत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥ गगनीं आली अभ्रछ्याया । तैसी जाणिजे मूळमाया । उद्भव आणी विलया । वेळ नाहीं ॥ ७ ॥ निर्गुणीं गुणविकारु । तोचि शड्गुणैश्वरु । अर्धनारीनटेश्वरु । तयास म्हणिजे ॥ ८ ॥ आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति । तेथेऊन पुढें नाना वेक्ती । निर्माण जाल्या ॥ ९ ॥ तेथून पुढें शुद्धसत्व । रजतमाचें गूढत्व । तयासि म्हणिजे महत्तत्त्व । गुणक्षोभिणी ॥ १० ॥ मुळीं असेचिना वेक्ती । तेथें कैंची शिवशक्ती । ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान असावें ॥ ११ ॥ ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड । अधोर्ध पाहातां निवाड । कळों येतो ॥ १२ ॥ बीज फोडून आणिलें मना । तेथें फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥ फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडीं ॥ १४ ॥ नर नारी दोनी भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध । मुळी नस्तां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥ नाना बीजरूप कल्पना । तींत काये येक असेना । सूक्ष्म म्हणोनि भासेना । येकायेकीं ॥ १६ ॥ स्थूळाचें मूळ ते वासना । ते वासना आधीं दिसेना । स्थूळावेगळें अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥ कल्पनेची सृष्टी केली । ऐसीं वेदशास्त्रें बोलिलीं । दिसेना म्हणोन मिथ्या केली । न पाहिजेत कीं ॥ १८ ॥ पडदा येका येका जन्माचा । तेथें विचार कळे कैंचा । परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥ नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥ २० ॥ नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे । पिंडावरून उमगे । ब्रह्मांडबीज ॥ २१ ॥ नवरीचें मन नवर्यावरी । नवर्याचें मन नवरीवरी । ऐसी वासनेची परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥ वासना मुळींची अभेद । देहसमंधें जाला भेद । तुटतां देहाच समंध । भेद जेला ॥ २३ ॥ नरनारीचें बीजकारण ।शिवशक्तीमधें जाण । देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥ नाना प्रीतीच्या वासना । येकाचें येकास कळेना । तिक्षण दृष्टीनें अनुमाना । कांहींसें येतें ॥ २५ ॥ बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी । उपाधी वाढे जयेचेनी । ते हे वनिता ॥ २६॥ वीट नाहीं कंटाळानाहीं । आलस्य नाहीं त्रास नाहीं । इतुकी माया कोठेंचि ना हीं । मातेगेगळी ॥ २७ ॥ नाना उपाधी वाढऊं जाणे । नाना मायेनें गोऊं जाणे । नाना प्रीती लाऊं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टकिलें ॥ २९॥ ईश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें । लोभाचें गुंडाळें केलें । उगवेना ऐसें ॥ ३० ॥ ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची माहां गोडी । हे मुळींहून चालिली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥ मुळीं सूक्ष्म निर्माण जालें । पुढें पष्ट दिसोन आलें। उत्पतीचें कार्य चाले। उभयतांकरितां ॥ ३२ ॥ मुळीं शिवशक्ती खरें । पुढें जालीं वधुवरें । चौर्यासि लक्ष विस्तारें । विस्तारली जे ॥ ३३॥ येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे आणिलें । विवरलियांविण बोलिलें। तें वेर्थ जाणावें ॥ ३४ ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे शिवशक्तिनिरूपणनाम समास दुसरा ॥


समास तिसरा : श्रवणनिरूपण

॥ श्रीराम ॥ थांबाथांबा ऐका ऐका। आधींच ग्रंथ सोडूं नका । सांगितलें तें ऐका । सावधपणें ॥१ ॥ श्रव्णनामध्यें सार श्रवण । तें हें अध्यात्मनिरूपण । सुचित करून अंतःकर्ण । ग्रन्थामधें विवरावें॥ २ ॥ श्रवणमननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार । रोकडा मोक्षाचा उधार । बोलोंचि नये ॥३ ॥ नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां । उत्तम सोनें पुटीं घालतां । सावधान असावें ॥ ४ ॥ नाना नाणीं मोजून घेणें । नाना परीक्षा करणें । विवेकी मनुष्यासी बोलणें। सावधपणें ॥ ५ ॥ जैसें लाखोलीचें धान्य। निवडून वेंचितां होते मान्य । सगट मानितां अमान्य । देव क्षोभे ॥ ६ ॥ येकांतीं नाजुक कारबार । तेथें असावें अति तत्पर । त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रन्थीं ॥ ७ ॥ काहिण्या कथा गोष्टी पवाड । नाना अवतारचरित्रें वाड । त्या समस्तांमध्यें जाड । अध्यात्मविद्या ॥ ८ ॥ गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काये हातास आलें । म्हणती पुण्य प्राप्त जालें । परी तें दिसेना कीं ॥ ९ ॥ तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रचितीचा विचार । कळतां अनुमानाचा संव्हार । होत जातो ॥ १० ॥ मोठे मोठे येऊन गेले । आत्म्याकरितांच वर्तले । त्या आत्म्याचा महिमा बोले । ऐसा कवणु ॥ ११ ॥ युगानयुगें येकटा येक । चालवितो तिनी लोक । त्या आत्म्याचा विवेक । पाहिलाच पाहावा ॥ १२ ॥ प्राणी आले येऊन गेले । ते जैसे जैसे वर्तले । ते वर्तणुकेचें कथन केलें । इछेसारिखें ॥ १३ ॥ जेथें आत्मा नाहीं दाट । तेथें अवघें सरसपाट । अत्म्याविण बापुडें काष्ठ । काये जाणे ॥ १४ ॥ ऐसें वरिष्ठ आत्मज्ञान । दुसरें नाहीं यासमान । सृष्टीमधें विवेकी सज्जन । तेचि हें जाणती ॥ १५ ॥ पृथ्वी आणी आप तेज । याचा पृथिवीमध्यें समज । अंतरात्मा तत्वबीज । तें वेगळेंचि राहिलें ॥ १६ ॥ वायोपासून पैलिकडे । जो कोणी विवेकें पवाडे । जवळीच आत्मा सांपडे । त्या पुरुषासी ॥ १७ ॥ वायो आकाश गुणमाया । प्रकृतिपुरुष मूळमाया । सूक्ष्मरूपें प्रचित येया । कठीण आहे ॥ १८ ॥ मायादेवीच्या धांदली । सूक्ष्मी।म् कोण मन घाली । समजला त्यची तुटली । संदेहवृत्ती ॥ १९ ॥ मूळमाया चौथा देह । जाला पाहिजे विदेह । देहातीत होऊन राहे । धन्य तो साधु ॥ २० ॥ विचारें ऊर्ध चढती । तयासी च ऊर्धगती । येरां सकळां अधोगती । पदार्थज्ञानें ॥ २१ ॥ पदार्थ चांगले दिसती । परी ते सवेंचि नासती । अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती । लोक तेणें ॥ २२ ॥ याकारळें पदार्थज्ञान । नाना जिनसीचा अनुमान । सर्व सांडून निरंजन । धुंडीत जावें । २३ ॥ अष्टांग योग पिंडदज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञान । त्याहून थोर आत्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ॥ २४ ॥ मूळमायेचे सेवटीं । हरिसंकल्प मुळीं उठी । उपासनायोगें इठी । तेथें घातली पाहिजे ॥ २५ ॥ मन त्यापलिकडे जाण । निखळ ब्रह्म निर्गुण । निर्मळ निश्चळ त्याची खूण । गगनासारिखी ॥ २६ ॥ येथून तेथवरी दाटलें । प्राणीमात्रास भेटलें । पदार्थमात्रीं लिगटलें । व्यापून आहे ॥ २७ ॥ त्याऐसें नाहीं थोर । सूक्ष्माहून सूक्ष्म विचार । पिंडब्रह्माचा संव्हार । होतां कळे ॥ २८ ॥ अथवा पिंड ब्रह्मांड असतां । विवेकप्रळये पाहों जातां । शाश्वत कोण हें तत्वता । उमजों लागे ॥ २९ ॥ करून अवघा तत्वझाडा । सारासाराचा निवाडा । सावधपणें ग्रन्थ सोडा । सुखिनावें ॥ ३० ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणनिरूपणनाम समास तिसरा ॥


समास चौथा : अनुमाननिरसन

॥ श्रीराम ॥ बहुत जनासी उपाये । वक्तयास पुसतां त्रासों नये । बोलतां बोलतां अन्वयें । सांडूं नये ॥ १ ॥ श्रोत्यानें आशंका घेतली । तै तत्काळ पाहिजे फेडिली । स्वगोष्टीनें सगोष्टी पेंचली । ऐसें न व्हावें ॥ २ ॥ पुढें धरितां मागें पेंचला । मागें धरितां पुढें उडाला । ऐसा सांपडतचि गेला । ठाइं ठाइं ॥ ३ ॥ पोहणारचि गुचक्या खातो । जनास कैसा काढूं पाहातो । आशय लोकांच राहातो । ठाइं ठाइं ॥ ३ ॥ आपणचि बोलिला संव्हार । आपणचि बोलिजे सर्वसार । दुस्तर मायेचा पार । टाकिला पाहिजे ॥ ५ ॥ जें जें सूक्ष्म नाम घ्यावें । त्याचें रूप बिंबऊन द्यावें । तरीच वक्ता म्हणवावें । विचारवंत ॥ ६ ॥ ब्रह्म कैसें मूळमाया कैसी । अष्टधाप्रकृती शिवशक्ती कैसी । शड्गुणेश्वराची स्थिति कैसी । गुणसाम्याची ॥ ७ ॥ अर्धनारीनटेश्वर । प्रकृतिपुरुषाचा विचार । गुणक्षोभिणी तदनंतर । त्रिगुण कैसे ॥ ८ ॥ पूर्वकक्ष कोठून कोठवरी । वाच्यांशलक्ष्यांशाची परी । सूक्ष्म नाना विचार करी । धन्य तो साधु ॥ ९ ॥ नान पाल्हाळीं पडेना । बोलिलेंचि बोलावेना । मौन्यगर्भ अनुमाना । आणून सोडी ॥ १० ॥ घडी येक विमळ ब्रह्म । घडी येक सर्व ब्रह्म । द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म । क्षण येक ॥ ११ ॥ निश्चळ तेंचि जालें चंचळ । चंचळ तेंचि ब्रह्म केवळ । नाना प्रसंगीं खळखळ । निवाडा नाहीं ॥ १२ ॥ चळतें आणी निश्चळ । अवघें चैतन्यचि केवळ । रूपें वेगळालीं प्रांजळ । कदापी बोलवेना ॥ १३ ॥ उगीच करी गथागोवी । तो लोकांस कैसें उगवी । नाना निश्चयें नाना गोवी । पडत जाते ॥ १४ ॥ भ्रमास म्हणे परब्रह्म । परब्रह्मास ह्मणे भ्रम । ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दावी ॥ १५ ॥ घाली शास्त्रांची दडपण । प्रचितिविण निरूपण । पुसों जातां उगाच सीण । अत्यंत मानी ॥ १६ ॥ ज्ञात्यास आणि पदार्थभिडा । तो काय बोलेल बापुडा । सारासाराचा निवाडा । जाला पाहिजे ॥ १७ ॥ वैद्य मात्रेची स्तुती करी । मात्रा गुण कांहींच न करी । प्रचितिविण तैसी परी । ज्ञानाची जाली ॥ १८ ॥ तेथें नाहीं सारासार । तेथें अवघा अंधकार । नाना परीक्षेचा विचार । राहिला तेथें ॥ १९ ॥ पाप पुण्य स्वर्ग नर्क । विवेक आणि अविवेक । सर्वब्रह्मीं काये येक । सांपडलें नाहीं ॥ २० ॥ पावन आणि तें पतन । दोनीं मानिलीं तत्समान । निश्चये आणि अनुमान । ब्रह्मरूप ॥ २१ ॥ ब्रह्मरूप जालें आघवें । तेथें काये निवडावें । आवघी साकरचि टाकावें । काये कोठें ॥ २२ ॥ तैसें सार आणि असार । अवघा जाला येकंकार । तेथें बळावळा अविचार । विचार कैंचा ॥ २३ ॥ वंद्य निंद्य येक जालें । तेथें काये हाता आलें । उन्मत्त द्रव्यें जें भुललें । तें भलतेंच बोले ॥ २४ ॥ तैसा अज्ञान भ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला । माहांपापी आणि भला । येकचि मानी ॥ २५ ॥ सर्वसंगपरित्याग । अव्हासवा विषयेभोग । दोघे येकचि मानितां मग । काये उरलें ॥ २६ ॥ भेद ईश्वर करून गेला । त्याच्या वाचेन न वचे मोडिला । मुखामधें घांस घातला । तो अपानीं घालावा ॥ २७ ॥ ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी येथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ २८ ॥ अवघी भ्रांतीची भुटाटकी । प्रचितिविण गोष्टी लटकी । वेड लागलें जे बटकी । ते भलतेंचि बोले ॥ २९ ॥ प्रत्ययज्ञाता सावधान । त्याचें ऐकावें निरूपण । आत्मसाक्षात्काराची खूण । तत्काळ बाणें ॥ ३० ॥ वेडें वांकडे जाणावें । आंधळें पाउलीं वोळखावें । बाश्कळ बोलणें सांडावें । वमक जैसें ॥ ३१ ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे अनुमाननिर्शननाम समास चौथा ॥


समास पांचवा : अजपानिरूपण

॥ श्रीराम ॥ येकवीस सहश्र सासें जपा । नेमून गेली ते अजपा । विचार पाहातां सोपा । सकळ कांहीं ॥ १ ॥ मुखीं नासिकीं असिजे प्राणें । तयास अखंड येणें जाणें । याचा विचार पाहाणें । सूक्ष्मदृष्टीं ॥ २ ॥ मुळीं पाहातां येक स्वर । त्याचा तार मंद्र घोर । त्या घोराहून सूक्ष्म विचार । अजपाचा ॥ ३ ॥ सरिगमपदनिस । सरिं मात्रुका सायास । प्रथम स्वरें मात्रुकांस । म्हणोन पाहवें ॥ ४ ॥ परेवाचेहून आर्तें । आणि पश्यंती खालतें । स्वराचे जन्मस्थान तें । तेथून उठे ॥ ५ ॥ येकांतीं उगेंच बैसावें । तेथें हें समजोन पाहावें । अखंड घ्यावें सांडावें । प्रभंजनासी ॥ ६ ॥ येकांतीं मौन्य धरून बैसे । सावध पाहातां कैसें भासे । सोहं सोहं ऐसे । शब्द होती ॥ ७ ॥ उच्चरेंविण जे शब्द । ते जाणावे सहजशब्द । प्रत्ययायेती परंतु नाद । कांहींच नाहीं ॥ ८ ॥ ते शब्द सांडून बैसला । तो मौनी म्हणावा भला । योगाभ्यासाचा गल्बला । याकारणें ॥ ९ ॥ येकांतीं मौन्य धरून बैसला । तेणें कोण शब्द जाला । सोहं ऐसा भासला । अंतर्यामीं ॥ १० ॥ धरितां सो सांडितां हं । अखंड चाले सोहं सोहं । याचा विचार पाहातं बहु । विस्तारला ॥ ११ ॥ देहधारक तितुका प्राणी । श्वेतजौद्विजादिक खाणी । स्वासोस्वास नस्तां प्राणी । कैसे जिती ॥ १२ ॥ ऐसी हे अजपा सकळासी । परंतु कळे जाणत्यासी । सहज सांडून सायासी । पडोंच नये ॥ १३ ॥ सहज देव असतचि असे । सायासें देव फुटे नासे । नासिवंत देवास विश्वासे । ऐसा कवणु ॥ १४ ॥ जगदांतराचें दर्शन । सहज घडे अखंड ध्यान । आत्मइछेनें जन । सकळ वर्तती ॥ १५ ॥ आत्मयाचें समाधान । घडे तैसेंचि आशन । सांडिलें फिटले समर्पण । तयासीच होये ॥ १६ ॥ अग्नपुरुष पोटीं वसती । तयास अवदानें सकळ देती । लोक आज्ञेमधें असती । आत्मयांचे ॥ १७ ॥ सहज देवजपध्यानें । सहज चालणें स्तुती स्तवनें । सहज घदे तें भगवान्नें । मान्य कीजे ॥ १८ ॥ सहज समजायाकारणें । नाना हटयोग करणें । परंतु येकायेकीं समजणें । घडत नाहीं ॥ १९ ॥ द्रव्य चुकतें दरिद्र येतें । तळीं लक्ष्मी वरी वर्ततें । प्राणी काये करील तें । ठाउकें नाहीं ॥ २० ॥ तळघरामधें उदंड द्रव्य । भिंतीमधें घातलें द्रव्य । स्तंभीं तुळवटीं द्रव्य । आपण मधें ॥ २१ ॥ लक्ष्मीमध्यें करंटा नांदे । त्याचें दरिद्र अधिक सांदे । नवल केलें परमानंदें । परमपुरुष ॥ २२ ॥ येक पाहाती येक खाती । ऐसी विवेकाची गती । प्रवृत्ति अथवा निवृत्ती । येणेंचि ज्ञायें ॥ २३ ॥ अंतरीं वसतां नारायेणें । लक्ष्मीस काये उणें । ज्याची लक्ष्मी तो आपणें । बळकट धरावा ॥ २४ ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे अजपानिरूपणनाम समास पांचवा ॥


समास सहावा : देहात्मनिरूपण

॥ श्रीराम ॥ आत्मा देहाअध्यें असतो । नाना सुखदुखें भोगितो । सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥ शरीरीं शक्ति तारुण्यपणीं । नाना सुखें भोगी प्राणी । अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगी ॥ २ ॥ मरावेना ऐसी आवडी । हातपाये खोडून प्राण सोडी । नाना दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥ देहआत्मयांची संगती । कांहींयेक सुख भोगिती । चर्फडचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥ ऐसा आत्मा दुःखदायेक । येकांचे प्राण घेती येक । आणी सेवटीं निरार्थक । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ ऐसा दों दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म । नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥। ६ ॥ दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें कोण समाधान जालें । कांहींयेकसुख भोगिलें । तों सवेंचि दुःख ॥ ७ ॥ जन्म दारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें । नाना दुःख मोजावें । काये म्हणोनी ॥ ८ ॥ ऐसी आत्मयाची संगती । नाना दुःखें प्राप्त होती । दैन्यवाणे होऊन जाती । प्राणीमात्र ॥ ९ ॥ कांहीं आनंद कांहीं खेद । जन्मवरी पडिला समंध । नाना प्रकरीं विरुद्ध । तडातोडी ॥ १० ॥ निद्राकाळीं ढेकुण पिसा । नाना प्रकारीं वळसा । नाना उपायें वळसा । त्यांस होये ॥ ११ ॥ भोजनकाळी माश्या येती । नाना पदार्थ उंदीर नेती । पुढें त्यांची हि फजिती । मार्जरें करिती ॥१२ ॥ वा चामवा गोंचिड । गांधेलें कानटें उदंड । येकास येक चर्फड । दोहिकडे ॥ १३ ॥ विंचु सर्प वाग रिसें । सुसरी लांडिगे माणसास माणसें । परस्परें सुखसंतोषें । येकहि नाहीं ॥ १४ ॥ चौर्यासि लक्ष उत्पत्ती । येकास येक भक्षिती । नाना पीडा दुःखणी किती । म्हणौन सांगावें ॥ १५ ॥ ऐसी अंतरात्म्याची करणी । नाना जीव दाटले धरणीं । परस्परें संव्हारणी । येकयेकांची ॥ १६ ॥ अखंड रडती । चर्फडिती । विवळविवळों प्राण देती । मूर्ख प्राणी त्यास म्हणती । परब्रह्म ॥ १७ ॥ परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं । स्तुती निंदा दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥ उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या । विचार पाहतां प्रत्यया आल्या । येथातथ्य ॥ १९ ॥ धगडीचा बटकीचा लवंडीचा । गधडीचा कुतरीचा वोंगळीचा । ऐसा हिशेब सिव्यांचा । किती म्हणोनि सांगावा ॥ २० ॥ इतुकें परब्रह्मीं लागेना । तेथें कल्पनाचि चालेना । तडातोडीचें ज्ञान मानेना । कोणीयेकासी ॥ २१ ॥ सृष्टीमधें सकळ जीव । सकळांस कैचें वैभव । याकारणें ठायाठाव । निर्मिला देवें ॥ २२ ॥ उदंड लोक बाजारीचे । जें जें आलें तें तें वेंचे । उत्तम तितुके भाग्याचें । लोक घेती ॥ २३ ॥ येणें न्यायें अन्न वसन । येणेंचि न्यायें देवतार्चन । येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥ अवघेच लोक सुखी असती । संसार गोड करून नेती । माहाराजे वैभव भोगती । तें करंट्यास कैचें ॥ २५ ॥ परंतु अंतीं नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें । पूर्वीं भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना ॥ २६ ॥ कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडिना । मृत्यदुःख सगट जना । कासाविस करी ॥ २७ ॥ नाना अवेवहीन जालें । तैसेंचि पाहिजे वर्तलें । प्राणीं अंतकाळीं गेलें । कासाविस हौनी ॥ २८ ॥ रूप लावण्य अवघें जातें । शरीरसामर्थ्य अवघें राहातें । कोणी नस्तां मरतें । आपदआपदों ॥ २९ ॥ अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान । ऐसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥ भोगून अभोक्ता म्हणती । हे तों अवघीच फजिती । लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥ अंतकाळ आहे कठिण । शेरीर सोडिना प्राण । बराड्यासारिखें लक्षण । अंतकाळीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे देहात्मनिरूपणनाम समास सहावा ॥


समास सातवा : जगजीवननिरूपण

॥ श्रीराम ॥ मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लिमधें जातें । संगदोषें तैसें होतें । आंब्ल तिक्षण कडवट ॥ १ ॥ आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो । साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ॥ २ ॥ बरी संगती सांपडली । जैसी उंसास गोडी आली । विषवल्ली फांपावली । घातकी प्राणी ॥ ३ ॥ अठराभार वनस्पती । गुण सांगावे ते किती । नाना देहाचे संगती । आत्मयास होये ॥ ४ ॥ त्यामधें कोणी भले । ते संतसंगें निघाले । देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥ उदकाचा नाशचि होतो । आत्मा विवेकें निघतो । ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहा ॥ ६ ॥ ज्यास स्वहितचि करणें । त्यास किती म्हणौन सांगणें । हें ज्याचें त्यानें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥ आपला आपण करी कुडावा । तो आपला मित्र जाणावा । आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥ ८ ॥ आपले।म् आपण अन्हित करावें । त्यास आडवें कोणें निघावें । येकांती जाऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥ जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी । याकारणें विवेकी । धन्य साधु ॥ १० ॥ पुण्य्वंतां सत्संगती । पापिष्टां असत्संगती । गति आणि अवगती । संगतीयोगें ॥ ११ ॥ उत्तम संगती धरावी । आपली आपण चिंता करावी । अंतरी बरी विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥ इहलोक आणि परलोक । जाणता तो सुखदायेक । नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥ जाणता देवाचा अंश । नेणता म्हणिजे तो राक्षस । यामधें जें विशेष । तें जाणोन घ्यावें ॥ १४ ॥ जाणतां तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य । जेणेंकरितां होईजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥ साक्षपी शाहाण्याची संगती । तेणें साक्षपी शाहाणे होती । आळसी मूर्खाची संगती । आळसी मूर्ख ॥ १६ ॥ उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख । आनंद सांडुनियां शोक । कैसा घावा ॥ १७ ॥ ऐसें हें प्रगट दिसे । जनामधें उदंड भासे । प्राणीमात्र वर्ततसे । उभयेयोगें ॥ १८ ॥ येका योगें सकळ योग । येका योगें सकळ वियोग । विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जवे ॥ १९ ॥ अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें । निघोन जातां जालें । परम समाधान ॥ २० ॥ नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनभंग । याकारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥ शाहाणा येत्‌न त्याच्या गुणें । पाहों जातां काये उणें । सुख संतोष भोगणें । नाना श्लाघ्यता ॥ २२ ॥ अतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमधें वर्तताहे । जो कोणी समजोन पाहे । त्यास घडे ॥ २३ ॥ बहुरत्न वसुंधरा । जाणजाणों विचार करा । समजल्यां प्रत्ययो अंतरा- । माजीं येतो ॥ २४ ॥ दुर्बळ अणि संपन्न । वेडें आणि वित्पन्न । हें अखंड दंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥ येक भाग्यपुरुष मोडती । येक नवे भाग्यवंत होती । तैसीच विद्या वित्पती । होत जाते ॥ २६ ॥ येक भरे येक रितें । रितें मागुतें भरतें । भरतेंहि रितें होतें । काळांतरीं ॥ २७ ॥ ऐसी हे सृष्टीची चाली । संपत्ति दुपारची साउली । वयेसा तरी निघोन गेली । हळुहळु ॥ २८ ॥ बाळ तारुण्य आपुलें । वृधाप्य प्रचितीस आलें । ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणियेकें ॥ २९ ॥ देह जैसें केलें तैसें होतें । येत्‌न केल्यां कार्ये साधतें । तरी मग कष्टावें तें । काय निमित्य ॥ ३० ॥ इति श्रीदासभोधे गुरुशिष्यसंवादे जगजीवननिरूपणनाम समास सातवा ॥


समास आठवा : तत्त्वनिरसन

॥ श्रीराम ॥ नाभीपासून उन्मेषवृत्ती । तेचि परा जाणिजे श्रोतीं । ध्वनिरूप पश्यंती । हृदईं वसे ॥ १ ॥ कंठापासून नाद जाला । मध्यमा वाचा बोलिजे त्याला । उच्चर होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥ २ ॥ नाभिस्थानीं परा वाचा । तोचि ठाव अंतःकर्णाचा । अंतःकर्णपंचकाचा । निवाडा ऐसा ॥ ३ ॥ निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण । तें जाणावें अंतःकर्ण । जाणतीकळा ॥ ४ ॥ अंतःकर्ण आठवलें । पुढें होये नव्हेसें गमलें । करूं न करू ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥ संकल्प विकल्प तेंचि मन । जेणें करितां अनुमान । पुढें निश्चयो तो जाण । रूप बुद्धीचें ॥ ६ ॥ करीनचि अथवा न करी । ऐसा निश्चयोचि करी । तेचि बुद्धि हे अंतरीं । विवेकें जाणावी ॥ ७ ॥ जे वस्तुचा निश्चये केला । पुढें तेचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ॥ ८ ॥ पुढें कार्याचा अभिमान धरणें । हें कार्ये तों अगत्य करणें । ऐस्या कार्यास प्रवर्तणें । तोचि अहंकारु ॥ ९ ॥ ऐसें अंतःकर्णपंचक । पंच वृत्ती मिळोन येक । कार्येभागें प्रकारपंचक । वेगळाले ॥ १० ॥ जैक्षे पांचहि प्राण । कार्येभागें वेगळाले जाण । नाहीं तरी वायोचें लक्षण । येकचि असे ॥ ११ ॥ सर्वांगीं व्यान नाभी समान । कंठी उदान गुदीं अपान । मुखीं नासिकीं प्राण । नेमस्त जाणावा ॥ १२ ॥ बोलिलें हें प्राणपंचक । आतां ज्ञानैंद्रियेंपंचक । श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक । ऐसीं हें ज्ञानेंद्रियें ॥ १३ ॥ वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे कर्मैंद्रियें प्रसिद्ध । शब्द स्परुष रूप रस गंध । ऐसें हें विषयपंचक ॥ १४ ॥ अंतःकर्ण प्राणपंचक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रिये पंचक । पांचवें विषयपंचक । ऐसीं हे पांच पंचकें ॥ १५ ॥ ऐसें हे पंचविस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण । याच कर्दम बोलिला श्रवण । केलें पाहिजे ॥ १६ ॥ अंतःकर्ण व्यान श्रवण वाचा । शब्द विषये आकाशाचा । पुढें विस्तार वायोचा । बोलिला असे ॥ १७ ॥ मन समान त्वचा पाणी । स्पर्श रूप हा पवनीं । ऐसे हे अडाखे साधुनी । कोठा करावा ॥ १८ ॥ बुद्धि उदान नयेन चरण । रूपविषयाचें दर्शन । संकेतें बोलिलें मन । घालून पाहिजे ॥ १९ ॥ चित्त अपान जिव्हा शिस्न । रसविषये आप जाण । पुढें ऐका सावधान । पृथ्वीचें रूप ॥ २० ॥ अहंकार प्राण घ्राण । गुद गंधविषये जाण । ऐसे केलें निरूपण । शास्त्रमतें ॥ २१ ॥ ऐसा हा सूक्ष्म देहे । पाहातां होईजे निसंदेहे । येथें मन घालून पाहे । त्यासीच हें उमजे ॥ २२ ॥ ऐसें सूक्ष्म देहे बोलिलें । पुढें स्थूळ निरोपिलें । आकाश पंचगुणें वर्तलें । कैसें स्थुळीं ॥ २३ ॥ काम क्रोध शोक मोहो भये । हा पंचविध आकाशाचा अन्वये । पुढें पंचविध वायो । निरोपिला ॥ २४ ॥ चळण वळण प्रासारण । निरोध आणि आकोचन । हें पंचविध लक्षण । प्रभंजनाचें ॥ २५ ॥ क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण । आतां पुढें आपलक्षण । निरोपिलें पाहिजे ॥ २६ ॥ शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हा पंचविध आपाचा भेद । पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे ॥ २७ ॥ अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म । ऐसे स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥ पृथ्वी आप तेज वायो आकाश । हे पांचाचे पंचविस । ऐसें मिळोन स्थूळ देहास । बोलिजेतें ॥ २९ ॥ तिसरा देह कारण अज्ञान । चौथा माहांकारण ज्ञान । हे च्यारी देह निर्शितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥ विचारें चौदेहावेगळें केलें । मीपण तत्वासरिसें गेलें । अनन्य आत्मनिवेदन जालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥ विवेकें चुकला जन्म मृत्य । नरदेहीं साधिलें महत्कृत्य । भक्तियोगें कृत्यकृत्य । सार्थक जालें ॥ ३२ ॥ इति श्री पंचीकर्ण । केलेंचि करावें विवर्ण । लोहाचें जालें सुवर्ण । परिसाचेनयोगें ॥ ३३ ॥ हाहि दृष्टांत घडेना । परिसाचेन परीस करवेना । शरण जातां साधुजना । साधुच होइजे ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवाअदे तत्वनिरूपणनाम समास आठवा ॥


समास नवना : तनुचतुष्टयनिरूपण

॥ श्रीराम ॥ स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण । जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ॥ १ ॥ विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्यगात्मा हे अभिमान । नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान । मूर्धनी ते ॥ २ ॥ स्थूळभोग प्रविक्तभोग । आनंदभोग आनंदावभासभोग । ऐसे हे चत्वार भोग । चौंदेहाचे ॥ ३ ॥ अकार उकार मकार । अर्धमात्रा तो ईश्वर । ऐस्या मात्रा चत्वार । चौंदेहाच्या । । ४ ॥ तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्धसत्वगुण । ऐसे हे चत्वार गुण । चौंदेहाचे ॥ ५ ॥ क्रियाशक्ति द्रव्याशक्ती । इछाशक्ति ज्ञानशक्ती । ऐशा चत्वार शक्ती । चौंदेहाच्या ॥ ६ ॥ ऐसीं हे बत्तिस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें । अवघीं मिळोन ब्यासि तत्वें । अज्ञान आणी ज्ञान ॥ ७ ॥ ऐसीं हे तत्वें जाणावीं । जाणोन माइक वोळखावीं । आपण साक्षी निरसावीं । येणें रितीं ॥ ८ ॥ साक्षी म्हणिजे ज्ञान । ज्ञानें वोळखावें अज्ञान । ज्ञानाज्ञानाचें निर्शन । देहासरिसें ॥ ९ ॥ ब्रह्मांडीं देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले । ते हे विवेकें निर्शले । आत्मज्ञानें ॥ १० ॥ आत्मानात्माविवेक करितां । सारासारविचार पाहतां । पंचभूतांची माइक वार्ता । प्रचित आली ॥ ११ ॥ अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पांचहि पृथ्वीचे गुणधर्म । प्रत्यक्ष शरीरीं हें वर्म । शोधून पाहावें ॥ १२ ॥ शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हे आपाचे पंचकभेद । तत्वें समजोन विशद । करून घावीं ॥ १३ ॥ क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे पांचहि तेजाचे गुण । या तत्वांचें निरूपण । केलेंचि करावें ॥ १४ ॥ चळण वळण प्रासारण । निरोध आणि आकोचन । हें पंचहि वायोचे गुण । श्रोतीं जाणावे ॥ १५ ॥ काम क्रोध शोक मोहो भये । हा आकाशाचा परिपाये । हें विवरल्याविण काये । समजों जाणें ॥ १६ ॥ असो ऐसें हें स्थूळ शरीर । पंचविस तत्वांचा विस्तार । आतां सूक्ष्मदेहाचा विचार । बोलिजेल ॥ १७ ॥ अंतःकर्ण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाशपंचकाचा विचार । पुढें वायो निरोत्तर । होऊन ऐका ॥ १८ ॥ व्यान समान उदान । प्राण आणी अपान । ऐसे हे पांचहि गुण । वायोतत्वाचे ॥ १९ ॥ श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हें पांचहि तेजाचे गुण । आतां आप सावधान । होऊन ऐका ॥ २० ॥ वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे आपाचे गुण विशद । आतां पृथ्वी विशद । निरोपिली ॥ २१ ॥ शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पृथ्वीचे गुण विशद । ऐसे हे पंचवीस तत्वभेद । सूक्ष्म देहाचे ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवाअदे तनुचतुष्टयेनाम समास नववा ॥


समास दहावा : टोणपसिद्धलक्षण

॥ श्रीराम ॥ आवर्णोदकीं हटकेश्वर । त्यास घडे नमस्कार । महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥ परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना । विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी ॥ २ ॥ सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे । सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥ सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे । म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥ जें आपणास नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें । मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥ जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥ मध्यें आहे भूमीचें चडळ । म्हणौन आकाश आणि पाताळ । तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥ तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें । जेथें दृश्यमायेच्या नांवें । सुन्याकार ॥ ८ ॥ दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास । मनातीत निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥ दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे । भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥ वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा । निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥ नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश । ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥ जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें । श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥ अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना । अवघें सगट पिटावेना । कोणियेकें ॥ १४ ॥ सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली । चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥ टोणपा नव्हे गुणग्राहिक । मुर्खास कळेना विवेक । विवेक आणि अविवेक । येकचि म्हणती ॥ १६ ॥ उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभासचि बुडाला । नाना अभ्यासें प्राणियाला । सुटिका कैंची॥ १७ ॥ वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ । तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥ ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश । बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥ ईश्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले । आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥ जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव । गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥ खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काय केलें । असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥ उत्तम वस्तूचि परीक्षा । कैसी घडे नतद्रक्षा । दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥ आपलेन वोंगळपणें । दिशाकरून शौच्य नेणे । वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥ आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार। आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥ २५॥ जे नेमकास न कळे । तें बश्कळास केवी कळे । डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥ पापपुण्य स्वर्ग नर्क । अवघेंच मानिलें येक । विवेक आणी अविवेक । काये मानावें ॥ २७ ॥ अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती । कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥ इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्प विवेक । तेथें अवघेच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥ म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि श्रवण करावें । उत्तम गुणास अभासावें । नाना प्रयेत्‌नें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे टोणपसिद्धलक्षणनाम समास दहावा ॥ ॥ दशक सतरावा समाप्त ॥

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.