दासबोध/दशक अकरावा

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध

<poem> ॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक अकरावा : भीमदशक समास पहिला : सिद्धांतनिरूपण

          ॥ श्रीरामसमर्थ ॥

आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यये येतो । वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥ वायोची कठीण घिसणी । तेथें निर्माण जाला वन्ही । मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जालें ॥ २ ॥ आपापासून जाली पृथ्वी । ते नाना बीजरूप जाणावी । बीजापासून उत्पत्ति व्हावी । हा स्वभावचि आहे ॥ ३ ॥ मुळीं सृष्टी कल्पनेची । कल्पना आहे मुळींची । जयेपासून देवत्रयाची । काया जाली ॥ ४ ॥ निश्चळामधें चंचळ । ते चि कल्पना केवळ । अष्टधा प्रकृतीचें मूळ । कल्पनारूप ॥ ५ ॥ कल्पना तेचि अष्टधा प्रकृति । अष्टधा तेचि कल्पनामुर्ती । मुळाग्रापासून उत्पत्ति । अष्टधा जाणावी ॥ ६ ॥ पांच भूतें तीन गुण । आठ जालीं दोनी मिळोन । म्हणौनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते ॥ ७ ॥ मुळीं कल्पनारूप जाली । पुढें तेचि फापावली । केवळ जडत्वास आली । सृष्टिरूपें ॥ ८ ॥ मुळीं जाली ते मूळमाया । त्रिगुण जाले ते गुणमाया । जडत्व पावली ते अविद्या माया । सृष्टिरूपें ॥ ९ ॥ पुढें च्यारी खाणी जाल्या । च्यारी वाणी विस्तारल्या । नाना योनी प्रगटल्या । नाना वेक्ती ॥ १० ॥ ऐसी जाली उभारणी । आतां ऐका संव्हारणी । मागील दशकीं विशद करूनि । बोलिलें असे ॥ ११ ॥ परंतु आतां संकळित । बोलिजेल संव्हारसंकेत । श्रोते वक्ते येथें चित्त । देऊन ऐका ॥ १२ ॥ शत वरुषें अनावृष्टि । तेथें आटेल जीवसृष्टि । ऐशा कल्पांताच्या गोष्टी । शास्त्रीं निरोपिल्या ॥ १३ ॥ बाराकळीं तपे सूर्य । तेणें पृथ्वीची रक्शा होये । मग ते रक्शा विरोन जाये । जळांतरीं ॥ १४ ॥ तें जळ शोषी वैश्वानरु । वन्ही झडपी समीरु । समीर वितुळे निराकारु । जैसें तैसें ॥ १५ ॥ ऐसी सृष्टिसंहारणी जाली । मागां विस्तारें बोलिली । मायानिरासें उरली । स्वरूपस्थिति ॥ १६ ॥ तेथें जीवशिव पिंडब्रह्मांड । अटोन गेलें थोतांड । मायेअविद्येचें बंड । वितळोन गेलें ॥ १७ ॥ विवेकेंचि बोलिला क्शये । म्हणोनि विवेकप्रळये । विवेकी जाणती काये । मूर्खास कळे ॥ १८ ॥ सृष्टि शोधितां सकळ । येक चंचळ येक निश्चळ । चंचळास कर्ता चंचळ । चंचळरूपी १९ ॥ जो सकळ शरीरीं वर्ते । सकल कर्तुत्वास प्रवर्ते । करून अकर्ता हा वर्ते । शब्द जया ॥ २० ॥ राव रंक ब्रह्मादिक । सकळांमधें वर्ते येक । नाना शरीरें चाळक । इंद्रियेंद्वारें ॥ २१ ॥ त्यास परमात्मा बोलती । सकळ कर्ता ऐसें जाणती । परि तो नासेल प्रचिती । विवेकें पाहावी ॥ २२ ॥ जो स्वानामधें गुरुगुरितो । जो सूकरांमधें कुरुकुरितो । गाढवीं भरोन भुंकतो । आटाहास्यें ॥ २३ ॥ लोक नाना देह देखती । विवेकी देहांत पाहाती । पंडित समदर्शनें घेती । येणें प्रकारें ॥ २४ ॥ ॥ श्लोक ॥ विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥ देह पाहातां वेगळाले । परंतु अंतर येकचि जालें । प्राणीमात्र देखिलें । येकांतरें ॥ २५ ॥ अनेक प्राणी निर्माण होती । परी येकचि कळा वर्तती । तये नांव जगज्जोती । जाणतीकळा ॥ २६ ॥ श्रोत्रीं नाना शब्द जाणे । त्वचेमधें सीतोष्ण जाणे । चक्षुमधें पाहों जाणे । नाना पदार्थ ॥ २७ ॥ रसनेमधें रस जाणे । घ्राणामधें वास तो जाणे । कर्मैंद्रियामधें जाणे । नाना विषयस्वाद ॥ २८ ॥ सूक्श्म रूपें स्थूळ रक्शी । नाना सुखदुःखें परीक्शी । त्यास म्हणती अंतरसाक्शी । अंतरात्मा ॥ २९ ॥ आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । चैतन्य सर्वात्मा सुक्श्मात्मा । जीवात्मा शिवात्मा परमात्मा । द्रष्टा साक्शी सत्तारूप ॥ ३० ॥ विकारामधील विकारी । अखंड नाना विकार करी । तयास वस्तु म्हणती भिकारी । परम हीन ॥ ३१ ॥ सर्व येकचि दिसती । अवघा येकंकार करिती । ते अवघी माईक स्थिती । चंचळामधें ॥ ३२ ॥ चंचळ माया ते माईक । निश्चळ परब्रह्म येक । नित्यानित्यविवेक । याकारणे ॥ ३३ ॥ जातो जीव तो प्राण । नेणे जीव तो अज्ञान । जन्मतो जीव तो जाण । वासनात्मक ॥ ३४ ॥ ऐक्य जीव तो ब्रह्मांश । जेथें पिंडब्रह्मांडनिरास । येथें सांगितले विशेष । चत्वार जीव ॥ ३५ ॥ असो हें अवघें चंचळ । चंचळ जाईल सकळ । निश्चळ तें निश्चळ । आदिअंतीं ॥ ३६ ॥ आद्य मध्य अवसान । जे वस्तु समसमान । निर्विकारी निर्गुण निरंजन । निःसंग निःप्रपंच ॥ ३७ ॥ उपाधीनिरासें तत्वता । जीवशिवास ऐक्यता । विवंचून पाहों जातां । उपाधि कैंची ॥ ३८ ॥ असो जाणणें तितुकें ज्ञान । परंतु होतें विज्ञान । मनें वोळखावें उन्मन । कोण्या प्रकारें ॥ ३९ ॥ वृत्तिस न कळे निवृत्ति । गुणास कैंची निर्गुणप्राप्ती । गुणातीत साधक संतीं । विवेकें केलें ॥ ४० ॥ श्रवणापरीस मनन सार । मननें कळे सारासार । निजध्यासें साक्शात्कार । निःसंग वस्तु ॥ ४१ ॥ निर्गुणीं जे अनन्यता । तेचि मुक्ति सायोज्यता । लक्श्यांश वाच्यांश आतां । पुरे जाला ॥ ४२ ॥ अलक्शीं राहिलें लक्श । सिद्धांतीं कैंचा पूर्वपक्श । अप्रत्यक्शास कैंचें प्रत्यक्श । असोन नाहीं ॥ ४३ ॥ असोन माईक उपाधी । तेचि सहजसमाधी । श्रवणें बळावी बुद्धी । निश्चयाची ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धांतनिरूपणनाम समास पहिला ॥

दशक अकरावा : भीमदशक समास दुसरा : चत्वारदेवनिरूपण ॥ श्रीराम ॥ येक निश्चळ येक चंचळ । चंचळीं गुंतलें सकळ । निश्चळ तें निश्चळ । जैसें तैसें ॥ १ ॥ पाहे निश्चळाचा विवेक । ऐसा लक्शांमधें येक । निश्चळाऐसा निश्चयात्मक । निश्चळचि तो ॥ २ ॥ या निश्चळाच्या गोष्टी सांगती । पुन्हां चंचळाकडे धांवती । चंचळचक्रीं निघोन जाती । ऐसे थोडे ॥ ३ ॥ चंचळीं चंचळ जन्मलें । चंचळाचि मधें वाढलें । अवघें चंचळचि बिंबलें । जन्मवरी ॥ ४ ॥ पृथ्वी अवघी चंचळाकडे । करणें तितुकें चंचळीं घडे । चंचळ सांडून निश्चळीं पवाडे । ऐसा कैंचा ॥ ५ ॥ चंचळ कांहीं निश्चळेना । निश्चळ कदापी चळेना । नित्यानित्यविवेकें जना । उमजे कांहीं ॥ ६ ॥ कांहीं उमजलें तरी नुमजे । कांहीं समजलें तरी न समजे । कांहीं बुझे तरी निर्बुजे । किंचित मात्र ॥ ७ ॥ संदेह अनुमान आणी भ्रम । अवघा चंचळामधें श्रम । निश्चळीं कदा नाहीं वर्म । समजलें पाहिजे ॥ ८ ॥ चंचळाकरी तितुकी माया । माईक जाले विलया । लहान थोर म्हणावया । कार्य नाहीं ॥ ९ ॥ सगट माया विस्तारली । अष्टधा प्रकृति फांपावली । चित्रविचित्र विकारली । नाना रूपें ॥ १० ॥ नाना उत्पत्ती नाना विकार । नाना प्राणी लाहान थोर । नाना पदार्थ मकार । नाना रूपें ॥ ११ ॥ विकारवंत विकारलें । सूक्श्म जडत्वा आलें । अमर्याद दिसों लागलें । कांहींचाबाहीं ॥ १२ ॥ मग नाना शरीरें निर्माण जालीं । नाना नामाभिधानें ठेविलीं । भाषा परत्वें कळों आलीं । काहीं कांहीं ॥ १३ ॥ मग नाना रीति नाना दंडक । आचार येकाहून येक । वर्तों लागले सकळ लोक । लोकाचारें ॥ १४ ॥ अष्टधा प्रकृतीचीं शरीरें । निर्माण जालीं लाहानथोरें । पुढें आपुलाल्या प्रकारें । वर्तों लागती ॥ १५ ॥ नाना मत्तें निर्माण जालीं । नाना पाषांडें वाढलीं । नाना प्रकारीचीं उठिलीं ॥ नाना बंडें ॥ १६ ॥ जैसा प्रवाह पडिला । तैसाच लोक चालिला । कोण वारील कोणाला । येक नाहीं ॥ १७ ॥ पृथ्वीचा जाला गळांठा । येकाहून येक मोठा । कोण खरा कोण खोटा । कोण जाणे ॥ १८ ॥ आचार बहुकाचेंत पडिला । कित्येक पोटासाठीं बुडाला । अवघा वरपंगचि जाला । साभिमानें ॥ १९ ॥ देव जाले उदंड । देवांचें मांडलें भंड । भूतादेवतांचें थोतांड । येकचि जालें ॥ २० ॥ मुख्य देव तो कळेना । काशास कांहींच मिळेना । येकास येक वळेना । अनावर ॥ २१ ॥ ऐसा नासला विचार । कोण पाहातो सारासार । कैचा लहान कैंचा थोर । कळेचिना ॥ २२ ॥ शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गल्बला जाला । लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ॥ २३ ॥ ऐसें अवघें नासलें । सत्यासत्य हारपलें । अवघें अनायेक जालें । चहूंकडे ॥ २४ ॥ मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥ २५ ॥ असत्याचा अभिमान । तेणें पाविजे पतन । म्हणोनियां ज्ञाते जन । सत्य शोधिती ॥ २६ ॥ लोक वर्तती सकळ । तें ज्ञात्यास करतळामळ । आतां एइका केवळ । विवेकी हो ॥ २७ ॥ लोक कोण्या पंथें जाती । आणि कोण्या देवास भजती । ऐसी हे रोकडी प्रचिती । सावध ऐका ॥ २८ ॥ मृत्तिका धातु पाषाणादिक । ऐसिया प्रतिमा अनेक । बहुतेक लोकांचा दंडक । प्रतिमादेवीं ॥ २९ ॥ नाना देवांचे अवतार । चरित्रें ऐकती येक नर । जप ध्यान निरंतर । करिती पूजा ॥ ३० ॥ येक सकळांचा अंतरात्मा । विश्वीं वर्ते जो विश्वात्मा । द्रष्टा साक्शी ज्ञानात्मा । मानिती येक ॥ ३१ ॥ येक ते निर्मळ निश्चळ । कदापी नव्हेति चंचळ । अनन्यभावें केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥ येक नाना प्रतिमा । दुसरा अवतारमहिमा । तिसरा तो अंतरात्मा । चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥ ऐसे हे चत्वार देव । सृष्टीमधील स्वभाव । यावेगळा अंतर्भाव । कोठेंचि नाहीं ॥ ३४ ॥ अवघें येकचि मानिती । ते साक्श देव जाणती । परंतु अष्टधा प्रकृति । वोळखिली पाहिजे ॥ ३५ ॥ प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव । भावातीत माहानभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥ जो निर्मळास ध्याईल । तो निर्मळचि होईल । जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥ क्शीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजेती । सारासार जाणती । ते माहानभाव ॥ ३८ ॥ अरे जो चंचळास ध्याईल । तो सहजचि चळेल । जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥ ३९ ॥ प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्वत वोळखावें । सत्य होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चत्वारदेवनिरूपणनाम समास दुसरा ॥

दशक अकरावा : भीमदशक समास तिसरा : शिकवण निरूपण ॥ श्रीराम ॥

बहुतां जन्मांचा सेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नितिन्यायें ॥ १ ॥ प्रपंच करावा नेमक । पाहावा परमार्थविवेक । जेणेंकरितां उभय लोक । संतुष्ट होती ॥ २ ॥ शत वरुषें वय नेमिलें । त्यांत बाळपण नेणतां गेलें । तारुण्य अवघें वेचलें । विषयांकडे ॥ ३ ॥ वृद्धपणीं नाना रोग । भोगणें लागे कर्मभोग । आतां भगवंताचा योग । कोणे वेळे ॥ ४ ॥ राजिक देविक उदेग चिंता । अन्न वस्त्र देहममता । नाना प्रसंगें अवचिता । जन्म गेला ॥ ५ ॥ लोक मरमरों जाती । वडिलें गेलीं हे प्रचिती । जाणत जाणत निश्चिती । काये मानिलें ॥ ६ ॥ अग्न गृहासी लागला । आणि सावकास निजेला । तो कैसा म्हणावा भला । आत्महत्यारा ॥ ७ ॥ पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसंग्रह उदंड जाला । येमयातनेचा झोला । कठीण आहे ॥ ८ ॥ तरी आतां ऐसें न करावें । बहुत विवेकें वर्तावें ॥ इक लोक परत्र साधावें । दोहीकडे ॥ ९ ॥ आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे । सुख म्हणौन आवडे । आळसी लोकां ॥ १० ॥ साक्शेप करितां कष्टती । परंतु पुढें सुरवाडती । खाती जेविती सुखी होती । येत्नेंकरूनी ॥ ११ ॥ आळस उदास नागवणा । आळस प्रेत्नबुडवणा । आळसें करंटपणाच्या खुणा । प्रगट करिती ॥ १२ ॥ म्हणौन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा । अरत्रीं परत्रीं जीवा । समाधान ॥ १३ ॥ प्रेत्न करावा तो कोण । हेंचि ऐका निरूपण । सावध करून अंतःकरण । निमिष्य येक ॥ १४ ॥ प्रातःकाळी उठावें । कांहीं पाठांतर करावे । येथानशक्ती आठवावें सर्वोत्तमासी ॥ १५ ॥ मग दिशेकडे जावें । जे कोणासिच नव्हे ठावें । शौच्य आच्मन करावें । निर्मळ जळें ॥ १६ ॥ मुखमार्जन प्रातःस्नान । संध्या तर्पण देवतार्चन । पुढें वैश्यदेवौपासन । येथासांग ॥ १७ ॥ कांहीं फळाहार घ्याव । मग संसारधांदा करावा । सुशब्दें राजी राखावा । सकळ लोक ॥ १८ ॥ ज्या ज्याचा जो व्यापार । तेथें असावे खबर्दार । दुश्चितपणें तरी पोर । वेढा लावी ॥ १९ ॥ चुके ठके विसरे सांडी । आठवण जालियां चर्फडी । दुश्चित आळसाची रकडी । प्रचित पाहा ॥ २० ॥ याकारणें सावधान । येकाग्र असावें मन । तरी मग जेवितां भोजन । गोड वाटे॥ २१ ॥ पुढें भोजन जालियांवरी । कांहीं वाची चर्चा करी । येकांतीं जाऊन विवरी । नाना ग्रंथ ॥ २२ ॥ तरीच प्राणी शाहाणा होतो । नाहींतरी मूर्खचि राहातो । लोक खाती आपण पाहातो । दैन्यवाणा ॥ २३ ॥ ऐक सदेवपणाचें लक्शण । रिकाम्या जाऊं नेदी येक क्शण । प्रपंचवेवसायाचें ज्ञान । बरें पाहे ॥ २४ ॥ कांहीं मेळवी मग जेवी । गुंतल्या लोकांस उगवी । शरीर कारणीं लावी । कांहीं तरी ॥ २५ ॥ कांहीं धर्मचर्चा पुराण । हरीकथा निरूपण । वायां जऊं नेदी क्शण । दोहींकडे ॥ २६ ॥ ऐसा जो सर्वसावध । त्यास कैंचा असेल खेद । विवेकें तुटला समंध । देहबुद्धीचा ॥ २७ ॥ आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें । मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥ प्रपंचीं पाहिजे सुवर्ण । परमार्थीं पंचिकर्ण । माहावाक्याचें विवरण । करितां सुटे ॥ २९ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । येणें राहे समाधान । परमार्थाचें जें साधन । तेंचि ऐकत जावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिकवणनिरूपणनाम समास तीसरा ॥

दशक अकरावा : भीमदशक समास चवथा : सारविवेकनिरूपण ॥ श्रीराम ॥ ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार । विकार नाहीं निर्विकार । तेंचि ब्रह्म ॥ १ ॥ ब्रह्म म्हणिजे निश्चळ । अंतरात्मा तो चंचळ । द्रष्टा साक्शी केवळ । बोलिजे तया ॥ २ ॥ तो अंतरात्मा म्हणिजे देव । त्याचा चंचळ स्वभाव । पाळिताहे सकळ जीव । अंतरी वसोनी ॥ ३ ॥ त्यावेगळे जड पदार्थ । तेणेंवीण देह वेर्थ । तेणेंचि कळे परमार्थ । सकळ कांही ॥ ४ ॥ कर्ममार्ग उपासना मार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । देवची चालवी ॥ ५ ॥ चंचळेविण निश्चळ कळेना । चंचळ तरी स्थिरावेना । ऐसें हे विचार नाना । बरे पाहा ॥ ६ ॥ चंचळनिश्चळाची संधी । तेथें भांबावते बुद्धि । कर्ममार्गाचे जे विधी । ते मग ऐलिकडे ॥ ७ ॥ देव या सकळांचे मूळ । देवास मूळ ना डाळ । परब्रह्म तें निश्चळ । निर्विकारी ॥ ८ ॥ निर्विकारी आणि विकारी। येक म्हणेल तो भिकारी । विचाराची होते वारी । देखतदेखतां ॥ ९ ॥ सकळ परमार्थास मूळ । पंचीकर्ण माहावाक्य केवळ । तेंची करावें प्रांजळ । पुनःपुन्हां ॥ १० ॥ पहिला देह स्थूळकाया । आठवा देह मूळमाया । अष्ट देह निर्शलियां । विकार कैंचा ॥ ११ ॥ याकारणें विकारी । साचाऐसी बाजीगरी । येक समजे येक खरी । मानिताहे ॥ १२ ॥ उत्पत्ति स्थिती संव्हार । यावेगळा निर्विकार । कळायासाठीं सारासार । विचार केला ॥ १३ ॥ सार असार दोनी येक । तेथें कैंचा उरला विवेक । परिक्शा नेणती तंक । पापी करंटे ॥ १४ ॥ जो येकचि विस्तारला । तो अंतरात्मा बोलिला । नाना विकारीं विकारला । निर्विकारी नव्हे ॥ १५ ॥ ऐसें प्रगटचि आहे । आपुल्या प्रत्ययें पाहे । काय राहे काय न राहे । हें कळेना ॥ १६ ॥ जें अखंड होत जातें । जें सर्वदा संव्हारतें । रोकडें प्रचितीस येतें । जनामधें ॥ १७ ॥ येक रडे येक चर्फडी । येकांची धरी नरडी । येकमेकां झोंबती बराडी । दुकळ्ळले जैसे ॥ १८ ॥ नाहीं न्यावे नाहिं नीति । ऐसे हे लोक वर्तती । आणि अवघेंच सार म्हणती । विवेकहीन ॥ १९ ॥ धोंडे सांडून सोनें घ्यावें । माती सांडून अन्न खावें । आणि आवघेंचि सार म्हणावें । बाष्कळपणें ॥ २० ॥ म्हणौनि हा विचार करावा । सत्यमार्ग तोचि धरावा । लाभ जाणोन घ्यावा । विवेकाचा ॥ २१ ॥ सारगार येकचि सरी । तेथें परीक्शेस कैंची उरी । याकारणें चतुरीं । परीक्शा करावी ॥ २२ ॥ जेथें परीक्शेचा अभाव । तेथें दे घाव घे घाव । सगट सारिखा स्वभाव । लौंदपणाचा ॥ २३ ॥ घेव ये तेंचि घ्यावें । घेव न ये तें सोंडावें । उंच नीच वोळखावें । त्या नाव ज्ञान ॥ २४ ॥ संसारसांतेस आले । येक लाभें अमर जाले । येक ते करंटे ठकले । मुदल गेलें ॥ २५ ॥ जाणत्यानें ऐसें न करावें । सार तेंचि शोधून घ्यावें । असार तें जाणोन त्यागावें । वमक जैसें ॥ २६ ॥ तें वमक करी प्राशन । तरी तें स्वानाचें लक्शण । तेथें सुचिस्मंत ब्राह्मण । काय करी ॥ २७ ॥ जेहि।म् जैसें संचित केलें । तयास तैसेंचि घडलें । जें अभ्यासीं पडोन जडलें । तें तों सुटेना ॥ २८ ॥ येक दिव्यान्नें भक्शिती । येक विष्ठा सावडिती । आपुल्या वडिलांचा घेती । साभिमान ॥ २९ ॥ असो विवेकेविण । बोलणें तितुका सीण । कोणीयेकें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारविवेकनिरूपणनाम समास चौथा ॥

दशक अकरावा : भीमदशक समास पांचवा : राजकारण निरूपण ॥ श्रीराम ॥ कर्म केलेंचि करावें । ध्यान धरिलेंचि धरावें । विवरलेंचि विवरावें । पुन्हा निरूपण ॥ १ ॥ तैसें आम्हांस घडलें । बोलिलेंचि बोलणें पडिलें । कां जें बिघडलेंचि घडलें । पाहिजे समाधान ॥ २ ॥ अनन्य राहे समुदाव । इतर जनास उपजे भाव । ऐसा आहे अभिप्राव । उपायाचा ॥ ३ ॥ मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥ चौथा अत्यंत साक्शप । फेडावे नाना आक्शप । अन्याये थोर अथवा अल्प । क्श्मा करीत जावे ॥ ५ ॥ जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर । नीतिन्यायासि अंतर । पडोंच नेदावें ॥ ६ ॥ संकेतें लोक वेधावा । येकूनयेक बोधावा । प्रपंचहि सावरावा । येथानशक्‌त्या ॥ ७ ॥ प्रपंचसमयो वोळखावा । धीर बहुत असावा । संमंध पडों नेदावा । अति परी तयाचा ॥ ८ ॥ उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपडावें । नीचत्व पहिलेंच घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥ दोष देखोन झांकावे। अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥ १० ॥ तऱ्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाये । नव्हे तेंचि करावें कायें । दीर्घ प्रेत्नें ॥ ११ ॥ फड नासोंचि नेदावा । पडिला प्रसंग सांवरावा । अतिवाद न करावा । कोणीयेकासी ॥ १२ ॥ दुसर्याचें अभिष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें । न सोसे तरी जावें । दिगांतराप्रती ॥ १३ ॥ दुखः दुसर्याचें जाणावें । ऐकोन तरी वांटून घ्यावें । बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ १४ ॥ अपार असावें पाठांतर । सन्निधचि असावा विचार । सदा सर्वदा तत्पर । परोपकारासी ॥ १५ ॥ शांती करून करवावी । तऱ्हे सांडून सांडवावी । क्रिया करून करवावी । बहुतांकरवीं ॥ १६ ॥ करणें असेल अपाये । तरी बोलोन दाखऊं नये । परस्परेंचि प्रत्यये । प्रचितीस आणावा ॥ १७ ॥ जो बहुतांचे सोसीन । त्यास बहुतेक लोक मिळेना । बहुत सोसितां उरेना । महत्व आपुलें ॥ १८ ॥ राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच नेदावें । परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥ १९ ॥ लोक पारखून सांडावे । राजकारणें अभिमान झाडावे । पुन्हा मेळऊन घ्यावें । दुरील दोरे ॥ २० ॥ हिरवटासी दुरी धरावें । कचरटासी न बोलावें । समंध पडता सोडून जावें । येकीकडे ॥ २१ ॥ ऐसें असो राजकारण । सांगतां तें असाधारण । सुचित अस्तां अंतःकरण । राजकारण जाणे ॥ २२ ॥ वृक्षीं रूढासी उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें । कारबाराचें सांगावें । आंग कैसें ॥ २३ ॥ पाहातां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना । आलें वैभव अभिळासीना । कांहीं केल्यां ॥ २४ ॥ येकांची पाठी राखणें । येकांस देखो न सकणें । ऐसीं नव्हेत कीं लक्षणें । चातुर्याचीं ॥ २५ ॥ न्याय बोलतांहि मानेना । हित तेंचि न ये मना । येथें कांहींच चालेना । त्यागेंवीण ॥ २६ ॥ श्रोतीं कळोन आक्षेपिलें । म्हणौन बोलिलेंचि बोलिलें । न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ २७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे राजकारणनिरूपणनाम समास पांचवा ॥

दशक अकरावा : भीमदशक समास सहावा : महंत लक्षण ॥ श्रीराम ॥ शुद्ध नेटकें ल्याहावें । लेहोन शुद्ध शोधावें । शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥ विश्कळित मात्रुका नेमस्त कराव्या । धाट्या जाणोन सदृढ धराव्या । रंग राखोन भराव्या । नाना कथा ॥ २ ॥ जाणायाचें सांगतां न ये । सांगायाचें नेमस्त न ये । समजल्याविण कांहींच न ये । कोणीयेक ॥ ३ ॥ हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण । वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ॥ ४ ॥ पुसों जाणे सांगों जाणे । अर्थांतर करूं जाणे । सकळिकांचें राखों जाणे । समाधान ॥ ५ ॥ दीर्घ सूचना आधीं कळे । सावधपणें तर्क प्रबळे । जाणजाणोनि निवळे । येथायोग्य ॥ ६ ॥ ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिमंत । यावेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥ ७ ॥ ताळवेळ तानमानें । प्रबंद कविता जाड वचनें । मज्यालसी नाना चिन्हें । सुचती तया ॥ ८ ॥ जो येकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर । अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भींचें ॥ ९ ॥ आधींच सिकोन जो सिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥ १० ॥ अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर । भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर । करून दावी ॥ ११ ॥ जयास येत्नचि आवडे । नाना प्रसंगीं पवाडे । धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥ सांकडीमधें वर्तों जाणे । उपाधीमधें मिळों जाणे । अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥ १३ ॥ आहे तरी सर्वां ठाईं । पाहों जातां कोठेंचि नाहीं । जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाईं । गुप्त जाला ॥ १४ ॥ त्यावेगळें कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे । न दिसोन वर्तवीतसे । प्राणीमात्रांसी ॥ १५ ॥ तैसाच हाहि नानापरी । बहुत जनास शाहाणे करी । नाना विद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्मा ॥ १६ ॥ आपणाकरितां शाहाणे होती । ते सहजचि सोये धरिती । जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥ राखों जाणें नीतिन्याय । न करी न करवी अन्याये । कठीण प्रसंगीं उपाये । करूं जाणे ॥ १८ ॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे महंतलक्षणनिरूपणनाम समास सहावा ॥

दशक अकरावा : भीमदशक समास सातवा : चंचळ नदीई ॥ श्रीराम ॥ चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करीं जगा । प्रचित रोकडी पाहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥ केवळ अचंचळीं निर्माण जाली । अधोमुखें बळें चालिली । अखंड वाहे परी देखिली । नाहींच कोणीं ॥ २ ॥ वळणें वांकाणें भोवरे । उकळ्या तरंग झरे । लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं ॥ ३ ॥ शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ । चिपळ्या चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥ फेण फुगे हेलावे । सैरावैरा उदक धावे । थेंब फुई मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥ वोसाणे वाहती उदंड । झोतावे दर्कुटे दगड । खडकें बेटें आड । वळसा उठे ॥ ६ ॥ मृद भूमी तुटोन गेल्या । कठीण तैश्याचि राहिल्या । ठाईं ठाईं उदंड पाहिल्या । सृष्टीमधें ॥ ७ ॥ येक ते वाहतचि गेले । येक वळशामधें पडिले । येक सांकडींत आडकले । अधोमुख ॥ ८ ॥ येक आपटआपटोंच गेली । येक चिरडचिर्दोंच मेलीं । कितीयेक ते फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥ येक बळाचे निवडले । ते पोहतचि उगमास गेले । उगमदर्शनें पवित्र जाले । तीर्थरूप ॥ १० ॥ तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें । उफराटी गंगा पाहातां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥ त्या जळाऐसें नाही निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ । आपोनारायण केवळ । बोलिजे त्यासी ॥ १२ ॥ माहानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकाळीं । स्वर्गमृत्युपाताळी । पसरली पाहा ॥ १३ ॥ अधोर्ध अष्टहि दिशा । तिचें उदक करी वळसा । जाणते जाणती जगदीशा । सारिखीच ते ॥ १४ ॥ अनंत पात्रीं उदक भरलें । कोठें पाझपाझरोंच गेलें । कितीयेक तें वेचलें । संसारासी ॥ १५ ॥ येक्यासंगे तें कडवट । येक्यासंगें तें गुळचट । येक्यासंगे ते तिखट । तुरट क्षार ॥ १६ ॥ ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे । सखोले भूमीस तुंबळे । सखोलपणें ॥ १७ ॥ विषामधें विषचि होतें । अमृतामधें मिळोन जाते । सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥ गुणीं अवगुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे । त्या उदकाचा महिमा न कळे । उदकेंविण ॥ १९ ॥ उदक वाहे अपरंपार । न कळे नदी कीं सरोवर । जळवास करून नर । राहिले कितीयेक ॥ २० ॥ उगमापैलिकडे गेले । तेथें परतोन पाहिलें । तंव तें पाणीच आटलें । कांहीं नाहीं ॥ २१ ॥ वृत्तिसुन्य योगेश्वर । याचा पाहावा विचार । दास म्हणे वारंवार । किती सांगों ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चंचळ नदीईनिरूपणनाम समास सातवा ॥

दशक अकरावा : भीमदशक समास आठवा : अंतरात्माविवरण ॥ श्रीराम ॥ आतां वंदूं सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता । त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥ १ ॥ तेणेंविण कार्य न चले । पडिलें पर्ण तेंहि न हाले । अवघें त्रैलोक्येचि चाले । जयाचेनी ॥ २ ॥ तो अंतरात्मा सकळांचा । देवदानवमानवांचा । चत्वारखाणीचत्वारवाणीचा । प्रवर्तकु ॥ ३ ॥ तो येकलाचि सकळां घटीं । करी भिन्नभिन्ना राहाटी । सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणोन सांगावी ॥ ४ ॥ ऐसा जो गुप्तेश्वर । त्यास म्हणावें ईश्वर । सकळ ऐश्वर्य थोर थोर । जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥ ऐसा जेणें वोळखिला । तो विश्वंभरचि जाला । समाधी सहजस्थितीला । कोण पुसे ॥ ६ ॥ अवघें त्रैलोक्य विवरावें । तेव्हां वर्म पडेल ठावें । आवचटें घबाड सिणावें । नलगेचि कांहीं ॥ ७ ॥ पाहातां ऐसा कोण आहे । जो अंतरात्मा विवरोन पाहे । अल्प स्वल्प कळोन राहे । समाधानें ॥ ८ ॥ आरे हें पाहिलेंच पाहावें । विवरलेंचि मागुतें विवरावें । वाचिलेंचि वाचावें । पुन्हापुन्हा ॥ ९ ॥ अंतरात्मा केवढा कैसा । पाहाणाराची कोण दशा । देखिल्या ऐकिल्या ऐसा । विवेक सांगे ॥ १० ॥ उदंड ऐकिलें देखिलें । अंतरात्म्यास नवचे पुरविलें । प्राणी देहधारी बाउलें । काय जाणे ॥ ११ ॥ पूर्णास अपूर्ण पुरेना । कां जें अखंड विवरेना । विवरतां विवरतां उरेना । देवावेगळा ॥ १२ ॥ विभक्तपणें नसावें । तरीच भक्त म्हणवावें । नाहींतरी वेर्थचि सिणावें । खटाटोपें ॥ १३ ॥ उगाच घर पाहोन गेला । घरधनी नाहीं वोळखिला । राज्यामधूनचि आला । परी राजा नेणे ॥ १४ ॥ देहसंगें विषये भोगिले । देहसंगें प्राणी मिरवलें । देहधर्त्यास चुकलें । नवल मोठें ॥ १५ ॥ ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी । बरें ज्याची जैसी टाकी । तैसें करावें ॥ १६ ॥ मूर्ख अंतर राखों नेणे । म्हणौन असावें शाहाणे । ते शाहाणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७ ॥ अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागलें । तैसें अज्ञानास जालें । देव न कळे ॥ १८ ॥ या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण सृष्टीवरी । वृत्ती येकदेंसी तर्तरी । पवाडेल कोठें ॥ १९ ॥ ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरूपें बहुवाणी । भूगर्भीं आणि पाषाणीं । कितीयेक ॥ २० ॥ इतुके ठाईं पुरवला । अनेकीं येकचि वर्तला । गुप्त आणि प्रगटला । कितीयेक ॥ २१ ॥ चंचळें न होईजे निश्चळ । प्रचित जाणावी केवळ । चंचळ तें नव्हे निश्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥ तत्वें तत्व जेव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे । निर्मळ निश्चळ चहुंकडे । निरंजन ॥ २३ ॥ आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकचा । प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें कळेना ॥ २४ ॥ भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा । अवघा वंशचि उधरावा । हरिभक्ती करूनी ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अंतरात्माविवरणनिरूपणनाम समास आठवा ॥

दशक अकरावा : भीमदशक समास नवावा : उपदेश निरूपण ॥ श्रीराम ॥ आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केलें पाहिजे सांग । कदाचित पडिले व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥ म्हणौन कर्म आरंभिले । कांहींयेक सांग घडलें । जेथजेथें अंतर पडिलें । तेथें हरिस्मरण करावें ॥ २ ॥ तरी तो हरी आहे कैसा । विचार पाहावा ऐसा । संधेपूर्वीं जगदीशा । चोविसां नामीं स्मरवें ॥ ३ ॥ चोवीसनामी सहस्त्रनामी । अनंतनामी तो अनामी । तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥ ब्राह्मण स्नानसंध्या करून आला । मग तो देवार्चनास बैसला । येथासांग तो पूजिला । प्रतिमादेवो ॥ ५ ॥ नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती धरून प्रेमा । ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥ ऐसें वोळखिलें पाहिजे । वोळखोन भजन कीजे । जैसा साहेब नमस्कारिजे । वोळखिल्याउपरी ॥ ७ ॥ तैसा परमात्मा परमेश्वर । बरा वोळखावा पाहोन विचार । तरीच पाविजे पार । भ्रमसागरचा ॥ ८ ॥ पूजा घेताती प्रतिमा । आंगा येतो अंतरात्मा । अवतारी तरी निजधामा । येऊन गेले ॥ ९ ॥ परी ते निजरूपें असती । तें निजरूप ते जगज्जोती । सत्वगुण तयेस म्हणती । जाणती कळा ॥ १० ॥ तये कळेचे पोटीं । देव असती कोट्यान्-कोटी । या अनुभवाच्या गोष्टी । प्रत्ययें पाहाव्या ॥ ११ ॥ देहपुरामधें ईश । म्हणोन तया नांव पुरुष । जगामधें जगदीश । तैसा वोळखावा ॥ १२ ॥ जाणीवरूपें जगदांतरें । प्रस्तुत वर्तती शरीरें । अंतःकरणविष्णु येणें प्रकारें । वोळखावा ॥ १३ ॥ तो विष्णु आहे जगदांतरीं । तोचि आपुले अंतरीं । कर्ता भोक्ता चतुरीं । अंतरात्मा वोळखावा ॥ १४ ॥ ऐके देखे हुंगे चाखे । जाणोन विचारें ओळखे । कित्येक आपुले पारिखे । जाणताहे ॥ १५ ॥ येकची जगाचा जिव्हाळा । परी देहलोभाचा आडताळा । देहसमंधें वेगळा । अभिमान धरी ॥ १६ ॥ उपजे वाढे मरे मारी । जैशा उचलती लहरीवरी लहरी । चंचळ सागरीं भरोवरी । त्रैलोक्य होत जातें ॥ १७ ॥ त्रैलोका वर्तवितो येक । म्हणोन त्रिलोक्यनायेक । ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा ॥ १८ ॥ ऐसा अंतरात्मा बोलिला । परी तोहि तत्वांमधें आला । पुढें विचार पाहिजे केला । माहावाक्याचा ॥ १९ ॥ आधीं देखिला देहधारी । मग पाहावें जगदांतरीं । तयाचेनियां उपरी । परब्रह्म पावे ॥ २० ॥ परब्रह्माचा विचार । होतां निवडे सारासार । चंचळ जाईल हा निर्धार । चुकेना कीं ॥ २१ ॥ उत्पत्ति स्थिति संव्हार जाण । त्याहून वेगळा निरंजन । येथें ज्ञानाचें विज्ञान । होत आहे ॥ २२ ॥ अष्टदेह थानमान । जाणोन जालियां निर्शन । पुढें उरे निरंजन । विमळ ब्रह्म ॥ २३ ॥ विचारेंचि अनन्य जाला । पाहाणाराविण प्रत्यय आला । तेहि वृत्ति निवृत्तीला । बरें पाहा ॥ २४ ॥ येथें राहिला वाच्यांश । पाहोन सांडिला लक्ष्यांश । लक्ष्यांशासारिसा वृत्तिलेश । तोहि गेला ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेश निरूपणनाम समास नववा ॥


दशक अकरावा : भीमदशक समास दहावा : निस्पृह वर्तणूक ॥ श्रीराम ॥ मूर्ख येकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो । जैसा बहुधा होऊन भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥ तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥ कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळीं सर्व सत्ता । त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणु ॥ ३ ॥ ऐसें महंते असावें । सर्व सार शोधून घ्यावें । पाहों जातां न सांपडावें । येकायेकी ॥ ४ ॥ कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त । वेश पाहातां शाश्वत । येकचि नाहीं ॥ ५ ॥ प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनास कळेना । पाहों जातां आडळेना । काये कैसें ॥ ६ ॥ वेषभूषण ते दूषण । कीर्तिभूषण तें भूषण । चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी ॥ ७ ॥ त्यागी वोळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन । लोक शोधून पाहाती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥ पुर्तें कोणाकडे पाहेना । पुर्तें कोणासीं बोलेना । पुर्तें येके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥ ९ ॥ जातें स्थळ तें सांगेना । सांगितलें तेथें तरी जायेना । आपुली स्थिति अनुमाना । येवोंच जेदी ॥ १० ॥ लोकीं केलें तें चुकावी । लोकी।म् भाविलें तें उलथवी । लोकीं तर्किलें तें दावी । निर्फल करूनी ॥ ११ ॥ लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर । लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिछ्या ॥ १२ ॥ एवं कल्पितां कल्पेना । न तर्कितांहि तर्केना । कदपी भावितां भावेना । योगेश्वर ॥ १३ ॥ ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठाईं पडेना । क्षणयेक विशंभेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥ लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेचि निर्फळ होती । जनाची जना लाजवी वृत्ति । तेव्हां योगेश्वर ॥ १५ ॥ बहुतीं शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें । तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥ १६ ॥ अखंड येकां सेवावा । अभ्यासचि करीत जावा । काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥ १७ ॥ उत्तम गुण तितुले घ्यावे । घेऊन जनास सिकवावे । उदंड समुदाये करावे । परी गुप्तरूपें ॥ १८ ॥ अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग । लोक समजोन मग । आज्ञा इछिती ॥ १९ ॥ आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ । साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ॥ २० ॥ लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे । जाणजाणोन धरावे । जवळी दुरी ॥ २१ ॥ अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नस्तां वेर्थ जातें । जाणोनि शोधावीं चित्तें । नाना प्रकारें ॥ २२ ॥ अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें । आपला मगज राखणें । कांहीतरी ॥ २३ ॥ हें प्रचितीचें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें । मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणीयेकें ॥ २४ ॥ महंतें महंत करावे । युक्तिबुद्धीनें भरावे । जाणते करून विखरावे । नाना देसीं ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृह वर्तणूक निरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक अकरावा समाप्त ॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg