तिच्या डायरीची पाने/हिबाळून टाकलेल्या लक्ष्म्या...

विकिस्रोत कडून

१०
हिबाळून टाकलेल्या लक्ष्म्या...


 ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट. मृत्यूचे धुवांधार थैमान घेऊन अंधारलेली. सर्व बधीर करून टाकणारी दृष्ये… आकान्त. आणि शब्द.. काही तास जणू गोठलेले. त्यानंतर चक्रावून टाकणारा वर्षाव … सहानुभूतीचा; पैशांचा; वस्तूंचा; करुणाकार माणसांचा, मग 'पळापळा कोण पुढे पळतो' अशी पळापळ. त्यानंतर प्रचंड ओघ बघ्यांचा अश्रूचेही साजरे होणारे उत्सव!! त्यांची रकाने भरभरून व वीस इंची निळा पडदा भरून होणारी प्रदर्शने. एकाच रस्त्यावरून धावणारी हजारो माणसे.... एखादी दिशाहीन दौड. तशीच या भागातही एकमेकांना मागे टाकणारी "सेवाभावी" दौड. एकमेकांशी स्पर्धा करीत, अधून-मधून एकमेकांना टांग मारीत. सर्वांच्या पुढ्यात "सरकारी आश्वासनांची" मशाल घेऊन धावणारी, एक सावली.
 दिवसही पळत असतात. भूकंपानंतरच्या सुरवातीची बधीरता रक्त हरवून गेलेल्या अशक्त प्राणांसारखी होती. तीही पहाता - पहाता दगड बनून गेली. नात्यांचे धागे करपून गेले. आता जिकडे - तिकडे दिसतात 'डोळे' चालणारे; बोलणारे; श्वासागणिक काहीतरी शोधणारे!! शोध कशाचा? वस्तूंचा… धान्याचा… घरांचा… मनगटातील बळ शोषून घेणाऱ्या अखंड आश्वासनांचा… सरकारी घोषणांचा आणि कधी कधी आंतरिक दुःखाचा… आणि खरे तर खूप काही देऊन जाणाऱ्या स्पर्शाचा, शब्दांचा आणि स्वतःच्या असण्याचा.
 हजारो पायांनी … दहा दिशांना एकाच वेळी धावू पहाणारा ऑक्टोपस. प्रचंड चलबिचल करीत कणभरही पुढे न सरकणारा. फक्त हलणारा! तिथल्या तिथे रुतून
 तसेच काहीसे भूकंपग्रस्त परिसराचे रूप.
 भूकंप होऊन काही वर्षे उलटून गेली आहेत. शेकडो सिमेंटी घरांचे ठिपके माणसांची वाट पहात उभे होते. या घरांना कुरवाळण्याचे धाडस .. बळ त्यावेळी माणसांत नव्हते. पण ती घरे आता माणसांनी गलजबजू लागली आहेत. तरीही हरेक सिमेंटी घरासमोर आहे पत्रे नाहीतर झावळांची झोपडी. वाज .. मातीची चूल .. पाण्याचा रांजण आणि, भिरभिरती माणसे. मग त्या कोऱ्या करकरीत घरात रहाते कोण? गेल्या चार वर्षात जमा झालेल्या सामानाचे ते कोठीघर झाले आहे.
 "अ" संस्थेने अमुक इतकी अनाथ मुले दत्तक घेतली. "ब" संस्थेने तितकी अनाथ मुले नेली. "क" संस्थेने एवढी.. "ड" संस्थेने तेवढी… अशा अ ते ज्ञ पर्यन्त संस्था. नेमकी अनाथ मुले किती? "अनाथ" शब्दाची व्याप्ती विशाल झाली आहे. एकाकी पालकांची मुलेही अनाथच. धरणीनेच कूस बदलली. सारा परिसरच अनाथ केलाय. म्हणजे हरेक मूल अनाथच की!!! पण आजही पांच ते दहा वर्षांची कितीतरी मुले ढुंगणावर फाटलेली चड्डी नि चिठ्या लावलेला ढगळ सदरा पांघरून जनावरांमागे हिंडणारी, दिसतातच. मग त्या अनाथ मुलांचे नेमके झाले काय?
 वर्ष दोन वर्षात आठशे विधूरांचे विवाह झाले म्हणे. वयाची पुछताछ नस्से. पण एकही विधवा - विवाह नाही. एक सन्माननीय अपवाद. विधुर, वय वर्षे पंचावन्न (किंवा थोडा पुढे) नि पत्नी परित्यक्ता. ( वय वर्षे बावीस ते चोवीस). "हेही नसे थोडके." असे म्हणणारे परिवर्तनवादी 'क्रांतीवीर'!!!
 तर दिवस भरारा पळताहेत. या परिसरातील स्त्रिया किती हलल्या आहेत? विधवांच्या उरातली जखम अजूनही वहातेय का? परित्यक्तांचे वेगळेच दुःख. पुन्हा एकदा लक्ष्यांचा सर्वात मोठा सण अंगणात येऊन उभा आहे. या वर्षी त्यांचे स्वागत करताहेत का घरातल्या लक्ष्म्या? लक्ष्मी कुणाला म्हणायचे? अनेक प्रश्न … अनेक भावना.
 कितीही म्हंटले तरी "घर" शेवटी बाईचेच असते. ते मांडायचे कसे हा प्रांत तिचाच. अगदी आठवडी पगारा सारख्या मार खाणाऱ्या … त्या माराच्या रडून कहाण्या सांगणाऱ्या आमच्या महिला, चूल या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात कशी नि कां मांडली, इथला पसारा तिकडे कसा छान दिसतो हे उत्साहाने सांगत
असतात. एरवी दबून बोलणाऱ्या या बाया ही कणगी इथल्या पेक्षा तिथेच ठेवणे कसे योग्य आहे, हे चांगल्या रितीने आणि ठणकावून पटवून देत असतात. या लक्ष्म्यांचा विचार … त्यांच्या आशा अपेक्षांची नोंद या परिसरातली घरे बांधतांना घेतली कां? निदान घ्यायला हवी होती. त्या वेळी या परिसरात भेटलेल्या एकदोघींची घरांबद्दलची प्रतिक्रिया अशी होती. … "शेतातून आलेला माल ठेवाया चांगली सोय झाली. शिमिटाच्या भिती हाईत. उंदरं बी कमी येत्याला. त्या इतकुशा खोलीत चूल तरी कशी मांडावी वो? चूल म्हटली की धूर व्हणारच. भिती काळ्या व्हनार. त्या शेणान कशा सारवता येतील? तवा चूल तर भाईरच मांडली आमी आन आमचा पोरवडा … नि आमी दोघं त्या इलूशा खोलीत कसे झोपणार? गुरं बांधाया जागा न्हाई. कुनी आलं गेल तर त्याला कुठं बसवावं? वगैरे …"
 प्रत्येक गावाचे एक वेगळेपण असते. आगळी मांडणी असते. त्यातला गोडवा हरवलाय. वेशी बाहेरची घरे …? आता वेसच उध्वस्त झालीय. नव्या वस्तीत "दिसणारी" वेस नाही. पण "मनातली वेस" कोसळती आहे का? भूकंपानंतर उभारलेल्या तात्पुरत्या वस्तीत ज्याला जी जागा वा खोली मिळाली तिथे त्याने संसार थाटला मुसलमानाशेजारी हिंदू ब्राम्हणांचं घर नि शिवलिंगधारी लिंगायताच्या घराशेजारी रोज अंड्याचा खुराक लागणाऱ्या एखाद्याचं घर, अशी सरमिसळ होती. ती सालभर निभली. नव्या घरात जातांना या "वेशी" चं काय झालं? रितीप्रमाणे त्या उभ्या राहिल्याच.
 "ताई, काळ्या आईला लेकरं सारखीच. मालदाराची गढी कोसळून मानसं गडप झाली तशी मजुराच्या घराची भिंत पडून त्याची बी लेकरं मेली. वेशीबाहीर रहानारी बी खर्चली. नि आत रहाणारी बी. मागल्या बापजाद्यांनी डोकीत बशीवलं ते आजवर पाळत आलोय. जलम सारखा .. मरन सारख. सुखाच्या घडीला जात नि पात. दुखात कसली आली जात? समदे जिमनीवरच हुबे हाईत याचा खुलासा दुखातच मिळतो.
 पन आता नव्या घरात रहाया जायचं तवा पुन्ना जुनी रीत पाळावीच लागणार. ती कशी वलांडता येईल?" मंगरुळच्या एका म्हाताऱ्या आजीचे हे विचार. अर्थात ते सर्वांचेच. ते बदलण्यासाठी लागणारा पाया भूकंपाने नकळत
रचला होता पण त्यावर दगड व विटा ... वा फेरोक्रेटच्या भिंती किंवा गोल घुमटाकार न हलणारी "इमारत" रचणारे रचनाकार भेटले का? त्याचे भान कुणाकुणाला होते? एक बरिक खरे. सरकारने जाहीर केले की नवे घर पतीपत्नीच्या नांवे होणार. चांगली बाब. क्रांतीकारी निर्णय वगैरे घेतला. तो पारही पाडला. पण रेबे चिंचोलीतली मैत्रिण विचारत होती,"ताई … जिथं भिंतीला तडे गेले, त्या गावांनापन सरकार घरामागं पंधरा हजार रुपये दिले, त्ये पैसे बी दोगांच्या नावानं द्यावेला हवे होते. अव घर तर बाईलाच मांडावं लागतया. ते आडोशाला असेल, नाय तर उनात असेल. पुरुषांचं कसं आसतया, बाराला येऊन तुकडा खायचा की निघाले बाहीर. आता बगा पैसा यायला लागला तवा पासून पिनाऱ्यांचं पीक लई जोरात आलया. सारा पैसा दारूत पार झाला. बायांच्या नावानं बँकेत टाकला असता तर तिला हानमार करून तिची सही नाय तर अंगठा घेईस्तो तरी टिकला असता!!" तिला उत्तर मिळाले का?
 ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या एक बाई आणि त्यांच्या दोन मैत्रिणी भेटल्या. एकूण पाचजणी निवडून आल्या होत्या. पैकी या तिघीजणी. बाईनी पन्नाशी पार केली आहे. अनुभवी, गेल्या १५ वर्षापासून सातत्याने निवडून येणाऱ्या. या एस. एस. सी. पास. इतर दोधी ७ वी झालेल्या. "तातडीची मिटींग" आहे म्हणून निरोप आल्याने या निघाल्या. पंचायतीत येऊन पाहतात तर कुलुप. तेवढ्यात आम्ही दिसलो म्हणून आमच्याशी बोलायला आल्या. पंचायत राज्यात स्त्रियांना तीस टक्के जागा दिल्या तरी, प्रत्यक्ष सहभाग घेऊ देत नाहीत ही त्यांची तक्रार होती. "भूकंपग्रस्त भागाच्या अडचणी सांगणारी शिष्ट मंडळे मुंबईला जातात. त्यात स्त्रिया किती असतात? ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळात आम्हा बायकांना स्थान का नाही?" आणि त्याला जोडून एक खास सवाल "यांनी नाही नेलं तर ते समजतं हो. त्यांना ती सवयच नाही. पण कायदा नि धोरण करणाऱ्या मंत्र्यांनी तरी विचारावं की, शिष्ट मंडळात बाया कां नाहीत म्हणून? प्रश्न विचारणाऱ्या, बोलणाऱ्या महिला कुणाला चालतात?"
 भुकंप होऊन सहा वर्षे झाली. लोक; विशेषतः स्त्रिया मानसिक दृष्या सावरल्या का? भूकंपग्रस्त भागातली एक सुजाण, कर्तबगार, राजकारणी, तळातून काम करणारी महिला तिच्याशी मोकळेपणी बोलण्याची संधी ही पर्वणीच.
तर तिचे उत्तर असे - "पैसा झालाय जास्त. मग काय? पिणे नि शिव्या देणे हा कार्यक्रम जोरात चाललाय. भूकंपानं दिलं नि दारूनं रिचवलं." गांजनखेडच्या एका घराचा दरवाजा उघडून आत गेलो तर लक्ष्मीचा निरामय देखणा मुखवटा डोळे उघडे ठेऊन आमच्याकडे पहात होता. ते डोळे आताही आठवताहेत. तिथल्या एका वयस्क विधवेचे उद्गार असे, "ताई गणपतींत घरातल्यांच्या गवऱ्या रचल्या. कसला आता गणपती नि कसले काय? लक्ष्यांना तवाच हिबाळून .. ववाळून भाईर टाकलंया आमी. पुढचं पुढे पाहू … लेकरांच्या जीवनात पुन्ना आनंद आला तर बशिवतील लक्ष्म्या … पुढचं कुणी सांगाव?"
 तर या लक्ष्म्यांच्या जीवनातून हरवलेली 'लक्ष्मी' पुन्हा भरल्या पावलांनी कधी येणार आहे?....?
 …कमलने विशीही ओलांडलेली नाही. नाजुक बांध्याची गोल हसरा चेहरा. गालांची ठेवणच अशी की जणू ते बोलताहेत. पण डोळे? ते मात्र उदास … थरथरणारे .. ही ११ वी पास आहे. लग्न होऊन वर्षही झाले नाही तोवर भूकंप झाला नि ही विधवा झाली. "माहेर" संमेलनासाठी आली होती तेव्हा कपाळ कोरं होतं. तिच्या बरोबरच्या प्रतिभा, सविता, लतिका अशा अनेक. तिशीच्या आतली प्रतिभा तर विशीचीच वाटणारी. पण प्रत्येकीच्या पदरात ३ ते ४ लेकरं. एखादं भूकंपात बळी गेलेलं.
 "कुंकवाची टिकली तर कुमारिका असतांनाही लावतो आपण. मग आताच का नाही लावायची?"... त्यावेळी एका तरुण कार्यकर्तीने विचारलेला प्रश्न आणि भरून आलेले डोळे … वर्षभरानी गेले त्या वेळी मात्र प्रतिभा, कमल यांच्या कमाळावर काळी टिकली आहे. नव्या जोमाने शाळेत जाणाऱ्या, अभ्यासात मन गुंतवून ठेवणाऱ्या सविताने तर सुरेख उभी लाल टिकली लावली आहे.
 या अनेकविध सखींशी सुरू केलेल्या संवादाचे सुचिन्ह जाणवले की मनाला क्षणभर हिंमत येई. कमलला १२वीत जायचे आहे. पुढे शिकायचे आहे. पण घरून परवानगी नाही. "न्हात्याधुत्या तरुण विधवा पोरीला साळेत घालून काय मोकाट सोडू?" असा आईचा त्रागा. दमयंती… सुशीला .. उत्तमा … केवळ बाई अशा अनेक तिशीच्या पुढच्या विधवा भगिनी. कुणाची मुलगी अठराची तर कुणाची पंधराची. मुलं बारा चौदाची.
 दमयंतीला तीन मुली, दोन मुले, पती, ती स्वतः असा ७ माणसांचा संसार पती नि दोनही मुले भूकंपात चिरडून गेली. मागे फक्त बाया. "कामाची माणसं गेली नि बिनकामाची शिल्लक राहिली." तिची प्रतिक्रिया होती. आज साऱ्यांना सावरणारी दमयंती बिनकामाची होती का?
 "भूकंपाच्या निमित्तानं पुस्पाताई सारख्या अनेक ताया आणि भाऊ इथे आले. त्यामुळंच आमी बदललो. भूकंपाने निर्माण केलेली ही एक नवी संधी होती. लक्ष्मी ९ वी पास तिला १८ वी पर्यंत शिकून मोठी मास्तरीण व्हायचंय.
 तर भूकंप होऊन वर्षे उलटून गेली आहेत. हिंडतांना कुठेही गणपतीचा दणदणाट .. थाट अजूनही जाणवत नाही. साधीशी नोंद कुठेतरी असते एवढेच. दुसऱ्या दिवशी लक्ष्म्या जेवायच्या होत्या. मराठवाड्यात लक्ष्म्यांचा सण अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा होतो. सगळे कुळ एकत्र जमते. हा सण म्हणजे शेतात उभ्या असलेल्या धान्य लक्ष्मीच्या स्वागताचा लोकोत्सव जुन्या धान्याच्या राशी घालून त्यांची पूजा करायची आणि "हे अन्नपूर्णे भरल्या पावलांनी माझ्या घरादारातून फीर. धान्याच्या पोत्यांनी घर भरून जाऊ दे." अशी प्रार्थना करायची. सोळा भाज्या, पाच पक्वांन्ने असा प्रचंड थाट. स्त्रियांचा सर्वात लाडका सण. पण हा सण आता साजरा होतो का? त्यावेळी उदतपूरची सुशीला उसवलेल्या काळजातून बोलत होती. "त्या साली आरास मांडली. हळदीकुंकवानं रांगोळी सजवली. धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली. नवरा होता. तोवर मी हे विधी करण्याला लायक होते. नि तो जगातून निघून जाताच सारे संपले का? घरात स्वैपाकाला आमचे हात चालतात. धान्याची उठाठेव करायला आमी चालतो. शेतीची कामंही आमी करायची. पण सणाला मात्र तोंड लपवून अंधारात बसायचं नि पोरीसोरींकडून लक्ष्म्या मांडून घ्यायच्या. राशी घालून सजवायच्या. हे सारं लई अवघड वाटतंया. पायातली जोडवी वाजवीत, कोऱ्या साड्या नेसून केलेली पूजा ... नटूनथटून लावलेलं हळदीकुंकू सारं आठवले की जीव गलबलून जातो हो !!" सुशिलाचं दुःख कापीत जाणारं. आता ती सावरलीय. वाचायला शिकलीय. वर्तमानपत्रांचे मथळे वाचण्याचा नाद लागलाय. मैत्रिणींना ती 'तेज डोक्याची' वाटते.
 हे दुःख केवळ सुशिलेचे नाही. नि ते आजचे नाही. हजारो वर्षापासूनचे हे ओझे अजूनही मानेवर वसलेले आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधतांना, हरवून जाणे एवढेच हाती आहे आमच्या. भिंतीवरचे जुनाट कळाहीन चित्र बदलायचे तर दुसरे नवे चित्र कोणते लावता येईल याचा विचार करावाच लागतो. कोऱ्या भिंतीचा स्वीकार करण्याची हिंमत सर्वाच्यात नसते.
 केवळाबाईचे दःख चटका लावणारे. "मानूस कंदीतरी मरायचाच हो. पण निदान शेवटच्या सुखदःखाच्या गोष्टी तरी करायला मिळाल्या का? आजारी असते तर डोक्यावर हात फिरवून म्हणाले असते की "पोरांना सांबाळ". डोळंभरून बघताबी आलं नाही हो. पाच वरसं झाली, पन वाटतया आताच घडलय." सालेगांव जवळच्या कोराळहून शिवण क्लासमध्ये येणाऱ्या त्या दोन तरुण विधवा. दोघींची कहाणी एकच. दोघीही निरक्षर. निसर्ग नियमानुसार शहाण्या झाल्या. वयात आल्या नि लगेच लग्न करून दिले. दोघीचे नवरे मुंबईत मजुरी करणारे. तुर्भ्याजवळच्या झोपडपट्टीत रहात असत. एकीला मूलबाळ नाही तर दुसरीला दोन लहानगी आहेत. त्याही मोलमजुरी करीत. एक दिवस एकीचा नवरा घरी आलाच नाही. अपघाती मरण झाले. ते दोन दिवसांनी कळले. दुसरी माहेरी होती. बाळंतपणासाठी. नवऱ्याने का कुणास ठाऊक पण आत्महत्या केली म्हणे. दोघींनी जेमतेम विशी पार केलेली. गेल्या दोनअडीच वर्षापासून माहेरी रहातात. या भूकंपामुळे त्यांना वेगळीच वाट सापडली. अनेक स्वयंसेवी संस्था या परिसरात स्त्रियांसाठी; त्यांच्या विकासासाठी काम करतात. शिवणवर्ग, अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यातली इंदुकला म्हणते "मी धाकट्या लेकराला जवळ घ्यायची न्हाई. बापमाऱ्या वाटायचा. बाप गेला नि दोन महिन्यांनी जलमला. कुनाशी मी बोलायची नाई. मरेस्तो काम करायची. व्हता तेव्हा नवरा बी दारू पिऊन तरास द्यायचा. पन कंदीतरी त्याला हवीशी वाटले की डोईवरून हात फिरवी. आता काय आहे? जगण्यात रामच नाही. पण ताईंनी लईच आग्रेव केला. शिवण शिकायाचा निमित्तानं इथं यायला लागले. नी जग दिसाया लागलं. परकर … टोपडी … निकर… सारं शिवते. आता मशीन साठी बी थोडे पैसे साठवलेत. थोडे ताई देणारेत …" आज तिचे शिवणाचे काम झोकात उभे आहे. विवेक तिसरीत गेला आहे. लक्ष्मीचाही असाच अनुभव. ती सतत झोपून
रहायची. कामाला हात लावत नसे. दोनदा जीव देण्याचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी कच खाल्ली. आज ती शिवणकामातून चार पैसे मिळवते. तेलाच्या गिरणीतले तेल विकते. लेकरांसाठी दुःखाच गठूडं बाजूला ठेवावं हेच खरं. पण मन मात्र मरून गेलय ते पुन्ना जिवंत कसं व्हावं? पण कुणी सांगाव? मुलं मोठी होता होता ते पुन्हा झालंय असे ती आज म्हणतं.
 जयश्री जेमतेम सोळा वर्षाची. चांदणी डोळ्यांची. मॅट्रिकला २ विषयात नापास झाली होती. इंग्रजी आणि मराठीत हिची मातृभाषा कानडी आहे. ३० सप्टेंबरची रात्र. जयाला काहीच आठवत नाही. पहाटे सात वाजता जाग आली तेव्हा लोक अंगावरचे दगड काढीत होते. अर्थात हे तिला जाणवतच नव्हतं. ती बडबडत होती.
 "आई सगळ्यांनी आपल्या गाद्या नि पांघरुणं माझ्या अंगावर का टाकली ग? मी उशिरा उठले म्हणून?..." आई वडिलांजवळ उत्तर नव्हते. घरातील कर्ता भाऊ, भावजय नि त्यांची दोन लेकरं जागीच गाडले गेले. जयाच्या पाठीवर आणि कमरेखालच्या भागावर भिंत कोसळून सारे दगड पडले. पाठीचा मणका नि मणका चेचला गेला. हातात कला आहे. ताकद आहे. सुरेख विणकाम करते. पण बसायचे झाले तरी पट्टा बांधावा लागतो. कमरेखालचे अवयव … पाठ… यातील ताकद मातीने गिळून टाकलीय. मण मन? ते मात्र अजून दवात भिजलेल्या रानफुलासारखे टवटवीत नि टणक आहे.
 जयाचे भविष्य उभे रहावे यासाठी आई वडिलांनी प्रयत्न केले. मी तिला भेटायला गेले तेव्हाचे तिचे शद्ध, "ताई, बरं झालं, माझं लगीन झालं नव्हतं. एकांदी लगीन झालेली बाई माज्यासारखी झाली असती तर नवऱ्याने तिची शेवा केली असती? तिला इथवर आणली असती? की …" पॅराप्लेजिकची रुग्ण जयाने, कपड्यांचे दुकान टाकले आहे. अशा अनेक पॅराप्लेजिक रुग्ण मुले व मुली. उद्या उगवणारे २१ वे शतक कसे असेल त्यांच्यासाठी?
 ही मंगरूळची परित्यक्ता. चार वर्षापूर्वीच नवऱ्याने आवडत नाही म्हणून घराबाहेर काढले. लहानग्या लेकराला घेऊन ही बापभावांच्या घरात राही. स्वैपाकपाणी करावे, शेताला जावे. दोन वेळची रोटी सुखाने मिळे. पण आता बापभावाचे घरच उलथून गेले तर हिला आसरा कुठून मिळणार? भूकंपाने लेकरू
गिळले. तिघी वहिन्या आणि नऊ भाचरेही जमिनीत गडप झाली. आता दोघा भावांची लग्ने झाली आहेत. वाळाच्या मृत्यूची भरपाई पंचवीस हजार रुपये नावावर जमा झालीय. त्या पैशाची आठवण सुद्धा नको वाटते. भाऊ म्हणतात, "आमच्यात वाईचं लग्न एकदाच होतं. डागाची बाई कोणीच पत्करत नाहीत. आमी ते वंगाळ मानतो. आता आमचा संसार नव्याने सुरू झालाय. पण बहिणीकडे पाहिलं की तोंडाची चव जाती. तुमी तिच्यासाठी काही बघा. लगीन नाही पण शिवन अगर काही धंद्यासाठी शिक्षण द्या." भूकंप झाल्यानंतर त्यांचं शेत पेरून देतांना मी विनंती केली होती की तिशीही न ओलांडलेल्या, टाकलेल्या बहिणीला शिवण क्लासला पाठवा म्हणून. पण तेव्हा नकार दिला होता. "तीन भावांच्यात एका बहिणीची काय ती अडचण? आमी खाऊ ते ती खाईल. आमच्या चुलीलाही आधार" असे उत्तर मिळाले होते. पण आता जग बदलते आहे.
 भूकंप होऊन सहा वर्ष झाली. अशीच वर्षे पुढे सरकतील. दर साली लक्ष्यांचा सण जखमांच्या खपल्या सजवून, दारी येत राहील. भूकंपाने हिबाळून टाकलेल्या… उतरवून टाकलेल्या लक्ष्म्यांना त्यांची सन्मानाची जागा पुन्हा कधी भेटणार? आणि अशा हिबाळून टाकलेल्या लक्ष्म्या काय फक्त भूकंपच निर्माण करतो का?