तिच्या डायरीची पाने

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchतिच्या डायरीची पाने


शैला लोहिया

स्त्री शक्ती प्रबोधन अभ्यास गट
ज्ञान प्रबोधिनी
पुणे
हजारो वर्षांपासूनच्या
प्रथा, परंपरांचे मळभ पेलताना
दगडकाट्यांच्या जखमा झेलत
समर्थपणे पायाखालची
जमीन डोळसपणे शोधणाऱ्या
माझ्या लाख लाख मैत्रिणींना....   शैला लोहिया
कृतज्ञताॲड. गिरिधारीलाल दरगड
श्री. बाबा भांड
श्री. अनंत गुप्ते
प्रा. पुष्पा भावे
गौरी पेंडसे
इनग्रीड मेंडोंसा
जॉर्ज चिरा (T.D.H.)
ज्ञान प्रबोधिनी परिवार
मानवलोक मनस्विनी परिवारआपले सहकार्य आणि कृतिशील बळ
यांतूनच ही 'पाने' साकारली.
मी आपली कृतज्ञ आहे.शैला लोहिया
प्रस्तावना

 सामाजिक प्रश्नांविषयी उभ्या रहाणाऱ्या चळवळींमध्ये; विचारव्यूह, अनुभव आणि संस्थात्मक कार्य यांचे नेमके नाते काय असावे? प्राथमिकता आणि अग्रक्रम कशाला द्यावा? असे प्रश्न सतत पुढे उभे राहतात. कोणत्याही तीव्र सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या चळवळीत, अभ्यास आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाचा मेळ कसा घालायचा? दूर पल्ल्याचा विचार आणि तातडीचे प्रश्न या दोन्हीचा आवाका पेलणारी कार्यपद्धती कशी निर्माण करायची हे निर्णय सोपे नसतात. चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना काहीवेळा दैनंदिन कामाला बांधून ठेवणारे संस्थात्मक काम नकोसे वाटते. पण ज्यांचे प्रश्न असतात त्यांना संस्थांचा आधार हवासा वाटतो. संस्था उभारणीचा आधार खरे तर कार्यकर्त्यांनाही होतो. पण त्यांचे भय वा शंकाही निराधार नसतात. कारण संस्थात्मक कामामध्ये काहीवेळा कार्यकर्त्यांचे प्रशासक होतात - चळवळीतील विचारांची धारा कमी होते, असेही होते. शेवटी प्रत्येक प्रश्नांभोवती उभ्या रहाणान्या चळवळीत परिणामकारकतेचाही मुद्दा महत्त्वाचा! निर्णय अनेकदा त्या अंगाने घेतले जातात.
 आज ही चर्चा करण्याचे कारण माझ्यासमोर प्रा. शैला लोहिया यांच्या ग्रंथाचे हस्तलिखित आहे. शैलाताई आणि त्यांचे पती डॉ. व्दारकादास लोहिया अनेकवर्षे आंबेजोगाई येथे कार्य करीत आहेत. ग्रामीण भागात कार्य करताना एककलमी कार्यक्रम आखता येत नाहीत या जाणिवेने 'मानवलोक' 'दिलासा' 'मनस्विनी प्रकल्प' आणि गांवागांवातील शेतीपाण्याचे प्रकल्प असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. पण या पुस्तकातील लेखांचा संदर्भ आहे तो स्त्रीप्रश्नांचा! वेगवेगळ्या कारणाने डोक्यावरचे छप्पर गेलेल्या स्त्रियांना 'दिलासा' त आश्रय मिळतो. ही येणारी प्रत्येक मुलगी - बाई म्हणजे एक कथाच असते. या विविध मुलींच्या ज्या
वेगवेगळ्या समस्यांनी त्यांना 'दिलासा' त आणले त्या या
लेखांमधून शैलाताईंनी मांडलेल्या आहेत.
 महाराष्ट्रात वीस-तीसच्या दशकात स्त्रीप्रश्नांविषयीची जागृती, हिंगणे स्त्री संस्थेतून संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे संस्थाकारण यातून लेखन झालेले आहे. ठळकपणे लक्षात येण्याजोगी श्रीमती मालतीवाई बेडेकर,श्रीमती कृष्णाबाई मोटे, श्रीमती शांताताई निसळ, श्रीमती शशिकला जाधव अशा लेखिकांनी संस्थेकडे येणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या लिहिलेल्या आहेत समाजशास्त्राच्या अभ्यासात ज्याला 'केस स्टडी' म्हणतात त्याला आपण 'विशिष्ट प्रकरण' म्हणू आणि असे करतांना प्रकरण शब्दाला असणारे कुत्सित अस्तर काढून टाकू. कोणत्याही अभ्यासात सूक्ष्म( Micro)आणि बृहत् (Macro) या दोन्ही स्तरांचा परस्पर अन्वय लावून पाहावे लागते.
 विशिष्ट काळातील स्त्रियांच्या समस्यांचा वा ग्रामीण महिलांच्या समस्या असा कोणताही कालसापेक्ष छेद घेतला तरी त्याच्या गाभ्यात विशिष्ट प्रकरणे आणि त्या त्या प्रकरणातील विशिष्टता असते. शिवाय शैलाताईसारख्या कार्यकर्त्या त्या संस्थांमध्ये काम करतात त्या संस्थांमध्ये येणाऱ्या मुलींचे माणूस म्हणून - व्यक्ति म्हणूनही काही प्रश्न असतात. नोकरशाहीच्या काटेकोर चैकटीत न अडकता कार्यकर्त्याला येणाऱ्या मुलीशी संवाद साधावा लागतो. परिस्थितीने झोडपलेल्या अशा एखाद्या व्यक्तीशी वागताना संयम आणि सहानुभूती असावी लागते. पण केवळ भाबड्या मायेत वाहून न जाता, येणारे नवे माणूस खरे बोलते आहे का? तेही पारखून पहावे लागते. खंबीर राहूनही नैतिक वडिलपणाचा चष्मा चढवून चालत नाही. शैलाताईंनी या संग्रहातल्या लेखात प्रत्येक प्रकरणाच्या विशिष्टतेला स्थान दिले आहे. काहीवेळा विशिष्टमुलगी संस्थेतून बाहेर जाते त्यावेळी तिच्या पुढच्या आयुष्याची दिशा मान्य करतात.
 हे लेख आपण वाचक म्हणून वाचाल. तेव्हा त्यातल्या एकेका लेखाविषयी मी काहीच लिहित नाही. पण हे सारेच लेख वाचताना माझ्या मनात ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याविषयी लिहिते. वाचकांनाही त्यांच्या प्रतिक्रिया पडताळून पहाता येतील. घर, कुटुंब हे स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे असे नेहमी म्हटले जाते. पण हेच घरकुटुंब तिला गरज असेल तेव्हा आधार देत नाहीच.
किंबहुना सतत त्या आधाराची किंमत मागते. मग ते घर वडिलांचे असो. वा नवऱ्याचे - सासऱ्याचे असो. म्हणून तर दिलासा घराची वा परदेशातील 'Home for Battered women' ची गरज भासाते. काहीवेळा अशा प्रश्नांची चर्चा करू लागलो की समाजातील समंजस (?) चेहरा असणारे म्हणतात "असो, या तर जुन्या गोष्टी.......!" हे खरं नाही हे आपल्याला शैलाताईच्या अनुभवातून लक्षात येईल. पाच वर्षापूर्वी निघालेल्या परित्यक्तांच्या मोर्चातील सगळ्यात धाकटी सात वर्षाची होती आणि औरंगाबादला आयोजित केलेल्या परित्यक्ता परिषदेला इतकी गर्दी झाली की व्यवस्था कोलमडून पडली हे वास्तव आहे.
 या साऱ्या कहाण्यांच्या मुळाशी काय आहे याचा विचार केला तर लक्षात येईल की दारिद्र्य, अंधश्रद्धा, जातीयता यांचा हा गुंता आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी किमान आर्थिक सांस्कृतिक सामुग्री नाही. मात्र जातीयता - अंधश्रद्वा यांनी दिलेले सांस्कृतिक अहंकार आहेत. गळ्याला आवळलेला दैववादाचा फास आहे! कोणत्याही नाडलेल्या वर्गाचा आपण विचार करतो तेव्हा त्यातील प्रत्येक व्यक्ती गुणवान आहे, बिनचूक आहे असा आपला दावा नसतोच मुळी. पण प्रश्न विचारणारे अनेक विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात त्यांना 'तसल्याच' गटात ढकलण्याचा प्रयत्न करतात. या लेखसंग्रहात शैलाताईंनी या मुलींवर होणाऱ्या अन्यायांची नोंद जशी केली आहे तशीच त्यांच्या तरूण मनादेहाच्या हेलकाव्यांची सुजाण दखल घेतली आहे.
 अभावग्रस्त घरातील तारूण्य ही अत्यंत केविलवाणी वस्तुस्थिती आहे. घरातले कळंजलेले वातावरण, आजार, दारिद्र्याने गांजलेल्या वडिलधाऱ्यांचे एकमेकातले ताणतणाव या वातावरणात देहाच्या तारुण्याच्या जाणिवेने फुलणारे मन घराबाहेर वाट शोधू पहाते. व्यक्तिमत्त्व फुलविण्याचे शिक्षणासारखे वा कलेसारखे कोणतेच सांस्कृतिक मार्ग खुले नसतात, तेव्हा आपोआप पुरूषस्पर्श हीच आपल्या अस्तित्वाची एकमेव दाद मानणाऱ्या या मुली भरकटत जातात. त्यांच्या आयुष्यातील किमान अपेक्षांची फार मोठी किंमत त्यांना द्यावी लागते. या कहाण्या एकेका मुली-बाईच्या असल्या तरी या लेखसंग्रहात नकळत एक समाजपट उलगडत जातो. कामापाठोपाठ फिरणारा समाज, मध्यमवर्गीय वस्तीच्या कडेकडेला राहून रोजगार करणारा समाज, अज्ञानापोटी अंधश्रद्धेने गांजलेला समाज यामध्ये
दिसतो. पुरूषसत्ताक समाजाची अरेरावी, बाईला वस्तू म्हणून वापरताना मनातं शंकाही न येणारा समाज तसेच बाईचे अप्रश्न पिचत रहाणे या पुस्तकात दिसते.
 रहाणीमानाचा गुणस्तर उंचावण्याची चर्चा आपण समित्यांच्या पातळीवर संतत करत असताना प्राणीपातळीवरचे जगणेही बाईसाठी अवघड होताना दिसते. हे सारे या लेखामधून मांडले गेले आहे. प्रारंभी म्हंटल्याप्रमाणे कुटुंब या सामाजिक संस्थेच्या मर्यादा जाणवतात. या कुटुंबाचे लोकशाहीकरण झाले पाहिजे. हेही जाणवते. पण संस्था हे सुद्धा एक विस्तारित कुटुंबच! त्यामुळे या प्रकारच्या संस्था चालवताना येणारे प्रश्न, कार्याच्या परिणामकारकतेच्या दृष्टिकोनातून त्यात होऊ शकणारे बदल याचीही चर्चा झाली असती तर उपयुक्त ठरले असते. शैलाताईंच्या पुढील लेखनात ते येईल अशी आशा आहे.
 हा लेखसंग्रह वाचताना 'स्त्रीप्रश्न' अलग बेटावर ठेवून विचार करता येत नाही हेही जाणवते. समाजाचा समग्र विचार केल्याशिवाय, जगण्याच्या पोताचा विचार केल्याशिवाय स्त्रीच्या सन्मानाने जगण्याचे प्रश्न उमजत नाहीत. म्हणून तर 'विशिष्ठ प्रकरण' समजावून घेताघेता बृहत् प्रश्नाकडे डोळसपणे जायला हवे.
 या प्रस्तावनेच्या निमित्ताने शैला लाहिया यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी आणि 'दिलासा' मधील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

पुष्पा भावे