Jump to content

तिच्या डायरीची पाने/मनोगत

विकिस्रोत कडून




मनोगत

 स्त्रीच्या असहाय्यतेचे रूप अनेक रंगी नि अनेक तऱ्हेचे असते. शोभादर्शक यंत्राला जरासा धक्का लागला की आतली आकृती अगदी नवे रूप घेते की जे या पूर्वीही नव्हते नि पुढेही नसेल असे. अगदी तसेच बाईच्या 'बाईपणा' तून येणाऱ्या दुःखाचे, वेदनेचे, असहायतेचे रूप आहे. प्रत्येक प्रश्नाचा पोत वेगळा नि रंगही वेगळा.
 मला आठवते तशी ही अनेक विविध रूपे माझ्या मनावर नकळत गोंदली गेली.... मीरा सारळकर, सुरेल आवाजात गाणारी. तिच्या गाण्याचा केवढा दिमाख असायचा, वार्षिक स्नहसंमेलनात आमचे गायनाचे सर मोठ्या अभिमानाने तिला तबल्याची साथ करायचे. जणू त्यांची नजर म्हणत असायची, पहा कशी तयार केली आहे मी ही शिष्या. पण तिचे लग्न ठरले ते एका गावातल्या औरंगजेबाशी. तिचा तंबोरा माहेरी धूळ खात पडलाय. आणि ती? तिच्या 'साहेबांच्या' प्रचंड घरातल्या शो-पीससारखी. सूर हरवून जगतेय, आणि शकू? आम्ही मॅट्रिकला असतानाच तिचे लग्न ठरले. मार्चमध्ये परीक्षा नि लग्नाचा मुहूर्त फेब्रुवारीत. शकू गणित आणि सायन्समधे भलती पक्की. जणू जिभेवर आकडे नाचायचे आणि केमेस्ट्रीतील तापदायक समीकरणंही! पण 'आपले लग्न थोडे पुढे ढकला' असे सांगण्याची हिंमत ती कुठून आणणार? गेली पस्तीस वर्षे. ती उसने हसू ओठांवर घोळवीत आणि पक्क्या गणिताच्या विलक्षण गोड कथा आपल्या मुला-नातवांना सांगत. सुव्यवस्थितपणे संसार करतेय.
 मला नेहमी प्रश्न पडतो, अशा लाखो स्त्रियांच्या फुलण्याआधीच कोमावलेल्या गुणांचा, कलाशक्तीचा, बुद्धिमत्तेचा साठा किती मोठा असेल बरं? त्याचा स्फोट कधीच होणार नाही काय?
 खरे तर आम्ही स्वतःसुद्धा स्वतःला मुरड घालतच जगत असतो! आमच्या शिबिरात आम्ही एकदा चर्चा केली, की आपल्याला स्वतःलाही आपल्याच पतिराजांकडून कशी अन्यायकारक वागणूक मिळते? सुरवातीला सगळ्याजणी जरा बोलायला बिचकल्या. पण एकदा का मात्र झाकणे उघडली गेली नि.... एकीने सांगितले ते असे-
 "आपले पुरोगामी म्हणवणारे पतिराजसुद्धा कधी कधी विचित्र वागतात. एकदा आमच्या शेतातला सालदार यांच्याशी बोलत होता. दोघांचेही आवाज थोडे चढले. सालदाराने सकाळीच माझ्या कानावर त्याची अडचण सांगितली होती. म्हणून मी बाहेर येऊन त्यांना समजावू लागले तर त्यांनी चक्क आवाज चढवला. "बाहेर का आलीस तू? बायकांचं काय काम आहे इथं? आम्ही आमचं पाहून घेऊ. तू पहिले आत जा." वाटले, माझ्यावर वीज पडतेय. पण गप्प बसले नि आत गेले. आत माझी कॉलेजला जाणारी मुलगी होती. तिचेच डोळे भरून आले होते. माझा हात हातात घेऊन ती म्हणाली, "कभी कभी पिताजी कितना अन्याय करते है तुमपर! माँ, कैसे सहेती है तू?" हा झाला एका उच्च विद्याविभूषित कार्यकर्तीचा अनुभव. तर, दुसरा आमच्या सयाबाईचा. ती म्हणाली, "आमी मांग हाव. आमच्यात पुरूष बायकोला मारतातच. न्हाय मारलं तर त्याला बाईलवेडा म्हणतात. आमचे मालक बी उगा मारायचे. कारण नाय की काय नाय. मजुराला जशी हप्त्याला हजेरी मिळते, तसा मला मार मिळायचा. पन जवापासून ते संवस्थेत काम कराया लागले तवापासनं मार बंद झाला. मग मीच इचारलं, "आताशा मार न्हाई काई न्हाय. तुमचं मन दुसरीवर तर न्हाई वसलं?" तवा म्हनाले "वेडी का काय त? बाई बी माणूस हाय. ती काय जनावर हाय? जनावरावर प्रेम करतो आपण. मग लग्नाच्या बायकोला मार कशापायी द्यायचा?". "माझ्या नावानं बँकेत पैसे बी ठिवलेत आता त्यांनी."
 गेल्या ३० वर्षात कितीतरी जणी मला भेटल्या. त्यांच्या नकळत त्यांचे अनुभव मी माझ्या पदरात भरून घेत होते. त्यातूनच १९८४ साली मानवलोक संचलित 'मनस्विनी महिला प्रकल्पा'चा जन्म झाला.
 'मानवलोक' या स्वयंसेवी संस्थेची आधारशिला राष्ट्र सेवादल! विकेंद्रित लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय या
तत्त्वांवर श्रद्धा ठेवून राष्ट्रप्रेमाची शिकवण देणान्या, लहान मुले व तरुण यावर संस्कार करणाऱ्या राष्ट्र सेवादलाने महाराष्ट्रात हजारो धडपडणारी मुलें निर्माण केली. अनेक घरे सेवादलमय केली. अशाच एका घरात मी वाढले. बाईचे माणूसपण आमच्या घरात स्वयंभूपणे मान्य केलेले होते. राष्ट्र सेवादलाचे भाऊ रानडे धुळ्याच्या घरी नेहमी येत. लहानपणी भाऊंबरोबर खेड्यात जायचा योग आला. सभेला एकही बाई नाही. भाऊ म्हणाले, "महिला नसलेल्या सभेत मी बोलणार नाही." मग झाली सुरू चुळबूल. एखादा तरुण असं काही बोलला असता तर खैर नव्हती. बोलणारा, म्हातारा पांढरे केस नि टक्कलवाला. डोळ्यातून नितांत माया वाहणारी. मग कुणीतरी एका वयस्क बाईला, एका आईला आणून बसवले नि सभा सुरू झाली. तर अशा या वातावरणात वाढताना समाजाकडे कुतुहलाने पाहण्याची नजर आपोआप आली. डॉ. व्दारकादास लोहिया बाराव्या वर्षापासून सेवादल संस्कारांनी भारलेले, घडलेले. पाठीवर मायेचा हात दादांचा ऊर्फ नारायणराव काळदातेंचा आणि श्री. किंबहुने गुरुजी, ग.धो. देशपांडे या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांचा. साथीला जुना सेवादलाचा संच. नव्या दमाच्या परिवर्तनवादी तरुणांची नवी जोड मिळाली आणि अशा पारिवारिक वातावरणातूनच 'मानवलोक' आकाराला आले.
 संस्था सुरू करतानाच मनाशी खूणगाठ बांधली होती की, एकाने संस्थेसाठी पूर्णवेळ द्यायचा. दुसऱ्याने भाकरीची सोय पहायची.. १९७४ ते ८० पर्यंत हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाची एक शाखा म्हणून काम केले… या फांदीला नवी पालवी फुटू लागली. आणि १९८२ ला या फांदीतूनच 'मानवलोक' ऊर्फ मराठवाडा नवनिर्माण लोकायत निर्माण झाले. १९७४ ते ८२ या आठ वर्षात माझे घर मला बांधून ठेवण्याइतके चिमणे राहिले नव्हते. 'मानवलोक'च्या कामात मलाही आस्था होती. हे काम करताना असे लक्षात आले की, भाऊ रानडेंच्या काळातले खेडे अजूनही आहे तसेच होते. स्त्रियांचे जीवन जणू अडथळ्यांची शर्यत. आणि ती त्यांना अगदी नैसर्गिक वाटते. डोंगरभागात काम सुरू केले. तिथे मुलांचे रातांधळेपणाचे प्रमाण ६ टक्के होते. नारू होता, घाण, माशा, डास यांचे थैमान. दरसाली पाच-सहा बायका बाळंतपणात मरत. बाई अडली तर दवाखाना चार कोस दूर. रस्ता नाही. अल्प भूधारकांची संख्या जास्त.
दोन पाच एकर जमीन तीही कोरडवाहू. पाऊसबाबा धडपणी आला; तर पहिलं पीक घेऊन गावातील साठ टक्के माणूस पुण्या-मुंबईकडे वा साखर कारखान्याकडे धाव घेई. मग त्यातून होणारे बायका-मुलांचे हाल. हे सारे जवळून पाहिले नि मानवलोकने ठरवले की, स्त्रियांच्यासाठी काम सुरू करायचे. ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय कामाची आखणी कशी करणार? मग त्याला सुरुवात झाली. प्रत्येक गावात एखादा आड वा डोह असे. ज्यातील आसरा तरुण सुनांचा बळी घेत. आणि एखादा पिंपळ असे, ज्यावरच्या मुंजाला तरणीताठी बाई बळी म्हणून हवी असे. शिवाय अंगावर चिमणी पडून भाजून मरणाऱ्यांची संख्याही बरीच. हे सारे समजावून घेताना असे मनोमन वाटले की, अडचणीत आलेल्या बाईला दिलासा' देणारे घर लाभले तर आसरा नि मुंजाचा जोर थोडा कमी होईल. १९८३ मध्ये पुणे येथे कार्यालय असलेल्या तेरे डेस होम्स, जर्मनी या संस्थेने निलंग्यात महिला जागृती शिबीर आयोजित केले होते. तिथे माझ्यावर जबाबदारी सोपविली होती ती भारतीय इतिहासातील स्त्री जीवनाचा आढावा घेण्याची. त्यातून या संस्थेशी नाते जुळले. माझ्या मनातली ओढ आणि मानवलोक संस्थेतील शिस्तबद्धता यांची तेरे डेस होम्सच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली.
 आणि आम्ही महिलांसाठी प्रकल्प सुरू करावा असा आग्रह केला. इन्ग्रीड मेंडोसा, उषा आठल्ये यांच्या सहयोगातून 'मनस्विनी' अवतरली. मी त्या काळात महाभारताने भारलेली होते. इरावती कर्व्याचे 'युगान्त', दुर्गाबाई भागवतांचे 'व्यासपर्व', आनंद साधल्यांचे 'हा जय नावाचा इतिहास', याचा अभ्यास सुरू होता. आणि त्या प्रवासातच 'मनस्विनी' भेटली. महर्षी व्यासांनी द्रौपदीचे माणूसपण भामिनी, मनस्विनी, अग्नी कन्ये या शब्दांतून व्यक्त केले होते. त्या सुमारास स्त्रीच्या देहालाच मोजणाऱ्या समाजाचे चित्र रेखाटणारी 'देहस्विनी' ही माझी कथा 'मेनका' मासिकातून प्रकाशित झाली होती. स्त्रीचे केवळ देहस्विनीपण नाकारण्याचा तो एक प्रयत्न होता, आणि त्यातून 'मनस्विनी' चे ऊर्जस्वल व्यक्तिमत्त्व मनात साकारले. हे नांव सर्वानाच भावले, आणि १ एप्रिल १९८४ ला 'मानवलोक' संस्थेचा महिलांसाठी काम करणारा विभाग म्हणून 'मनस्विनी महिला प्रकल्प' ची सुरवात झाली. प्रकल्पाचा आराखडा तयार करणे तसे सोपे
नसते. मनातल्या कल्पनांचे पाय जमिनीत ठामपणे उभे करायचे असतात. त्यासाठी प्रकल्पाचा हेतू, उद्दिष्टे ती साध्य करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा स्वीकार करणार या बाबींचा डोळसपणे विचार करावा लागतो. तेही एक शास्त्र आहे. त्या शास्त्राची ओळख करून घेतली.
 अडचणीत आलेल्या स्त्रीला अर्ध्या रात्री आधार देणारे 'दिलासा घर' सुरू झाले. महिलांचा प्रतिसाद मिळाला. अवघ्या एका वर्षात लक्षात आले की, दिलासात येणारी बाई लेकुरवाळीही असू शकते. तिच्या मुलांनाही आम्ही दिलासा घरात प्रवेश दिला. 'दिलासा'चे घरपण सुधडपणे सांभाळणाऱ्या गंगामावशी ऊर्फ मम्मी बायकांचे माहेरपण करीत. पोरांच्या आजी होत. गेल्या अकरा वर्षात सुमारे २०० हून अधिक महिला दिलासात राहून गेल्या. बहुतेक महिला खेडयातून येणाऱ्या. अनेकजणी चक्क निरक्षर असत. मग तिथेच त्यांच्यासाठी साक्षरता वर्ग सुरू केला. या महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी, त्यांचे शिक्षण व आवड लक्षात घेऊन प्रशिक्षण देणारा विभाग सुरू केला. त्यात अशिक्षित महिलांना सहजपणे करता येणारे उद्योग शिकवले जात. घायपाताच्या तंतूच्या शोभिवंत आणि गरजेच्या वस्तू करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबादहून शिक्षित शिक्षिका बोलावली. शिवणकाम, आरशाचे पारंपारिक भरतकाम, पापड, मसाले इ. चे प्रशिक्षण दिले जाई. मी पुण्या-मुंबईकडे बैठका वा मेळाव्यांना गेले की, चर्चा ऐकू येई. "अपारंपारीक उद्योग मुलींना शिकवायला हवेत. किती दिवस माणसांनी लोणच्यात बुडायचे, वगैरे." मनाला ते पटत असे. पण लहान गावात अपारंपारिक उद्योगांना विशेष वाव नसे. आम्हीही प्रयोग केले. सायकलचे पंक्चर काढणे, स्टोव्ह दुरुस्ती, इलेक्ट्रिक फिटिंग, विटेला वीट जोडणारे गवंडीकाम इ. व्यवसाय शिकण्याची मोहीम सुरू केली. कारण आमच्या डोक्यात "बाया माणसाची कामे व गडी माणसाची कामे" यांचे विभाजन फिट्ट बसलेले. मग आम्ही एक जोड दिला. तो असा की, शिवण्याच्या कामात स्टोव्ह दुरुस्ती, पंक्चर काढणे, इलेक्ट्रिक फिटिंग यांचा समावेश केला. मुली हे नवे व्यवसाय उत्साहाने शिकत. स्टोव्ह दुरुस्ती, खडू तयार करणे याचा त्यांना पुढे उपयोग झाला. पण सायकल नि इलेक्ट्रिसिटी यांचे नाते महिलांशी असू शकते याला मान्यता मिळाली नाही. आमची खेडी एखाद्या उठावदार शहराजवळ असती तर कदाचित एखाद्या
टी.व्ही. वा रेडिओच्या कारखान्यातील जुळणीची कामे बायका करू शकल्या असत्या.
 दिलासा घरातील महिलांना सन्मानाने घरी परत जाता यावे, ते शक्य नसल्यास पोटगी व संपत्तीत अधिकार मिळावा या हेतूने मोफत कायदा व कुटुंब, सल्ला दिला जाई. दोन वर्षाच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, अशा तऱ्हेची मदत समाजातील अनेकजणींना हवी असते. कोर्टाची व वकिलाची फी देण्याची ! ऐपत घरातून हाकलून दिलेल्या बाईला कशी असणार? खेडयापाडयातून हिंडताना, बापभावांच्या घरात दिल्या अन्नावर जगण्याच्या परित्यक्ता भेटत. दिलासा घरात राहायला येणे त्यांच्या बापभावांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असे. ती हिंमत त्या कशी करणार? उलट त्यांचे जगणे अधिक दुःखमय. या अनुभवातून १९८६ च्या जुलैत मोफत कायदा सल्ला केंद्र उभे राहिले. या केंदाला मात्र समाजाच्या ! प्रत्येक थरातून प्रतिसाद मिळाला. दाखल होणाऱ्या प्रत्येक केसचा आम्ही अभ्यास करत असू. केस कोर्टात दाखल करण्यापूर्वी आम्ही सासरच्यांची, नवऱ्याची बाजू ऐकण्याच्या भूमिकेतून त्यांना पत्र पाठवत असू. ७० टक्के लोक प्रतिसाद देत. त्यांच्याशी बोलताना प्रकरणाचा उलगडा होई. शेवटी प्रश्न माणसाचेच. रूढी, परंपरा, धार्मिक रिवाज, संस्कार यांच्यात हरवलेले माणूसपण वर काढण्यात कधी यशं येई. मग पुन्हा एकदा पती-पत्नीचे सूर जुळून येत. हे यश न आले, हा ग्रहाचा धूर हटवता आला नाही तर मग कोर्टात जाणे आलेच.
 या एकाकी महिलांना केवळ आधार व प्रशिक्षण देण्याइतकेच मानसिक बळ देण्यावर आम्ही भर दिला. तिच्यातील आत्मविश्वास वाढावा; एकट्या स्त्रीलाही जीवनातील आनंद अनुभवता येतो याची प्रचीती यावी यासाठी आम्ही विविध उपक्रम आखीत असू. पंचमीचे फेर, ईदमिलापचा महिला मेळा, नवरात्रातील टिपऱ्यांचा फेर, उखाण्यांच्या स्पर्धा, नवी गाणी, पथनाट्ये, सहली इत्यादीतून बायका धीट होत. आपले एकटेपणाचे अधुरेपण विसरून, आपण सगळ्याजणी एक आहोत, मैत्रिणी आहोत याची जाणीव त्यांना होई. पाहाता पाहाता कळंब, बीड, माजलगाव, सेलू, केज येथे मोफत कायदा सल्ला केंद्रे सुरू झाली. अर्थात त्या गांवातील गट उत्साही असेल तर केंद्र चांगले चाले. एक केंद्र आम्ही बंद केले. आज पाच केंद्रे सुव्यवस्थितपणे सुरू आहेत. गेल्या नऊ वर्षात सुमारे पाच हजार
प्रकरणे नोंदवली गेली. त्यातील अनेकजणी स्वतःचा छोटा व्यवसाय करीत आहेत. बालवाडी शिक्षिका, आरोग्य सेविका म्हणून काम करीत आहेत.
 अगदी पहिल्यांदा आलेली कन्या कांता भाज्याच्या बालग्रामची 'सदनमाता' म्हणून काम पाहाते. या संस्थेची स्थापना करण्यात तिची महत्त्वाची भूमिका असल्याने ती कार्यकारिणीची सदस्या आहे. दिलासात आली तेव्हाचा अवतार आजही आठवतो.... धुळीने माखलेले नऊवारी बिनकाष्ट्याचे लुगडे. उभा आडवा ताठर बांधा. राकट बोलणे. अडुम धुडुक चालणे. "आन मंग? उभा हाय का ह्यो देह? माज्या नोवऱ्यानं पलंगाच्या गजाळीनं मारलं. पन म्या हूंकी चूं केलं न्हाय. मार म्हणलं, तुझा जीव शांत होइस्तो मार. माज्या सासूलाच कीव आली. तिनंच हितं भैणीकडं आणून घातलं. बाईच बाईचा जीव जाणणार!!...." हे ती झोकात सांगत असे. कांता दिलासा घरात रहायला आली तेव्हा आपल्याला कोर्टातून न्याय मिळेल, धुण्याभांड्यापलिकडची नोकरी मिळेल, असा विश्वास तिला वाटत नव्हता. दिलासा घरात आल्यापासून जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलत गेला. ती होमगार्ड झाली. तिथे सर्वोत्कृष्ठ रक्षिका म्हणून ख्याती झाली. कांताला कोर्टातून न्याय मिळाला. ही निर्मळ मनाची. मनमोकळी. परवाच कांताचे स्वतःच्या हस्ताक्षरातले पत्र आलेय. ती केवळ साक्षर नाहीतर सुजाण डोळस झाली आहे. कांताच्या नांवाने चार पैसे बँकेत आहेत. मध्यंतरी भेटायला आली तेव्हा कांताला मी सहज म्हटले, "कांता तरूण आहेस, लग्न करायचं काय? द्यायची का जाहिरात? तिचे उत्तर असे,
 "भाभी, एका बुरकुल्यात शिजलं नाही ते दुसऱ्या बुरकुल्यात शिजेलच याची कोन ग्यारंटी देणार? हाय ती बरी हाय. काय कमी हाय मला? पोटच्याची माय तर कुणीबी होईल पण दुसऱ्याच्या लेकराची माय होनंबी महत्त्वाचं असतंच की!! " या कांता कुंभारणीने जे शहाणपण शिकविले ते कोणता वेद शिकवील?
 अशा अनेक कांता, लता, भागिरथी, शांता, सत्यशीला, पंचफुला, मंगला, सुलताना, ग्रेस.... अनेकजणी.
 हातात सहा महिन्याची प्रीती नि एक जुनकट पर्स एवढंच सामान.
 "ताई मी ग्रॅज्युएट आहे. मला एम्. ए. करायचं" एवढच बडबडणारी
सुधा. एका मध्यमवर्गीय शिक्षित घरात जन्माला आलेली सुधा एका विज्ञान विषयाच्या प्राध्यापकाची पत्नी आहे. पाठोपाठ चार मुलींना जन्म दिला हाच तिचा दोष. सततची मारहाण. माहेरी होणारी कुचंबणा. यामुळे तिचे मन जणू बधिरले होते. प्राध्यापकाशी सततचा संपर्क साधल्यानंतर महोदय संस्थेत आले. गृहस्थ स्वभावाने गरीब. त्यांच्या काही तक्रारी होत्या. सुधा गबाळी राहते, मुलींना स्वच्छ ठेवत नाही, जेवणात केस निघतात, मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष देत नाही… वगैरे वगैरे. पण दोघांच्याही तक्रारी फारशा भयानक नव्हत्या. मारहाण होत नव्हती. पण शिव्या दिल्या जात हेही दोघांनी कबुल केले. मुलींच्या भवितव्याचा विचार उभयतांनी केला. गेल्या नऊ वर्षापासून सुधा संसार करते आहे. कदाचित ती खूप सुखात नसेलही. पण तिने आणि नवऱ्याने त्यांचे तडकलेले घर सांधण्यासाठी, स्वतःचे काही आग्रह सोडले आहेत.
 ".... माझ्या मामाला इथल्या मोठ्या दवाखात्यात ठेवलं होतं. त्याच्या जवळ कोणीतरी हवं म्हणून मला हितं ठेवलं, माज्या बापानी. तेबी यायचे रोज संध्याकाळी. मी कपडे धुवाया जवळच्या तळ्यावर रोज जायची. तिथच ती बाई भेटली मला म्हणाली, तू तरणीताठी पोर, इथं कशाला धुणं धुतीस? माज्या घरी चल. तिथंच आंघुळ करीत जा नि कपडे बी धूत जा. बकूळ पानी हाय. मला बरी वाटली बाई. बामणासारखं राबणं नि बोलणं. मग जायला लागले तिथे. जेवू बी लागले. कंदी कंदी मुक्काम पन करू लागले. बापाला सांगितलं की चांगली मावशी भेटलीय. लयी माया करायची माझ्यावर. तिनंच माझ्या केसांची सागरवेणी घालायला शिकवली. मॅक्सी शिवली. पंजाबी ड्रेस घेतला. एक दिवस मामाकडे गेले न्हाई. बाईजीकडेच राहिले. तिथे रात्री तरुण पोरं येत. मजा करत. व्हिडिओ बघत. चार पाच पोरी पन येत. एक दिवस मी बी एका पोरासंग खोलीत गेले. बाहेरून बायजीनं दार लावून घेतलं.." ती गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमधली नखरेल मुलगी बोलत होती. मी सुन्न होऊन ऐकत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी तिची त्या घरातून सुटका केली होती. काही कार्यवाही न्यायालयातून व्हायची असल्याने व इथे महिलांसाठी कस्टडी नसल्याने तिला दोन दिवस 'दिलासा'त ठेवले. पण त्या दोन दिवसात लक्षात आले की ती पंधराच्या उंबरठ्यावरची पोर गळ्यागत बुडली होती. वैद्यकीय तपासणीतून लक्षात आले
की नको ते रोगही जडले असावेत, दोन दिवसात इथे खूप रमली. बापाचा पत्ता देऊन म्हणाली की, त्याना बोलवा. पहावसं वाटतंय. पोलीस नियमानुसार तिला औरंगाबादला घेऊन गेले. सुधारगृहात ठेवले. पण एक दिवस बाई दिलासात हजर. तिला आमच्याजवळ रहायचे होते. पण ती चार दिवसापेक्षा एक दिवसही इथे राहू शकली नाही. संध्याकाळ झाली की तिचे डोळे लकाकू लागत. टग्या पोरांच्या फेऱ्या आसपास वाढल्या. इथली शिस्त तिला मानवेना. शेवटी . तिची रवानगी परत पोलिस स्टेशनमधे केली. आणि मनाची एक खिडकी बंद करून घेतली. नंतर चारच दिवसांनी तिचे वयस्क वडील काठी टेकीत संस्थेत आले. ही त्यांची सर्वात धाकटी लेक, आई तान्हेपणीच वारली. अति लाडामुळे शाळेत गेली नाही. घरात भाऊभावजया. घरी काम नाही की अभ्यास नाही. वाढत्या वयात मायेची पाखर न मिळाल्याने ती बेफाम बनत गेली. मामाच्या आजारपणाच्या निमित्ताने शहरात आली, तिथून पळून गेली.
 "बाई, तुमचं कार्ड मिळालं, वाटलं लेकरू डोळ्यांनी बघावं. ती काई वळणावर येण्यातली राहिली नाही. तिच्या भावांना न सांगता आलोय मी. पण भेट नशिबात नाही. चिमणीचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं की त्याला पुन्हा घरट्यात घेत नाहीत…" बोलता बोलता म्हाताऱ्याचा आवाज घुसमटून गेला.
 अनेकजणी आल्या. पण या पोरीची आठवण झाली की मन आतल्या आत चिरत जातं. आपल्या मर्यादा खुपायला लागतात.
 हे काम खूपदा चटकेही देतं. आपल्या आसपासची, सहकारी जनांच्या घरची प्रकरणे हाताळतांना जवळच्यांची नाराजी पत्करावी लागते. द्वेशही सहन करावा लागतो. घरच्या मुलांना, कार्यकर्त्या मुलींना त्रास सहन करावा लागतो. पण यास टोचत्या उन्हातही एक हलकीशी सरही सरसरून जाते. जेव्हा ती मदत केलेली महिला चोरून भेटते नि हात घट्ट धरून सांगते, "ताई, लई उपकार वाटून घेतलेत हो. माझ्या लेकरासाठी जिवंत रहायचं बळ दिलंत." अशा प्रसंगातून कर्ते सुधारक आणि बोलके सुधारक यांचेही दर्शन घडते.
 शांता तीन मुलांची आई. लोकसत्तेतील मधुवंती सप्रेचा लेख वाचून तिचे पोस्टातील बंधू संस्थेत आले. तिच्या दोनही मुलांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शांता शिवणकाम, खडू, निर्धूर चुली बनविण्याचे तंत्र शिकली. इंग्रजीचा अभ्यास
मन लावून करी. ती आज स्वतःच्या पायावर सन्मानाने उभी आहे. मुलंही मोठी झाली आहेत. पण तिने टाकलेला प्रश्न अजूनही सतावतो.
 ....ताई, नवऱ्याला जशी बायको लागते, तसा बाईलाही नवरा हवासा वाटतोच की. तुमीच म्हणता ना की बाई माणूस आहे?... - या प्रश्नासाठी कोणते उत्तर आहे आमच्याकडे?
 हरिणीच्या डोळ्यांची, आदबशीर वागणारी वंदना अवधी पंचविशीतील पोर. दोन मुलग्यांची आई. अठरा हजार हुंडा नि दोहो अंगानी खर्च देऊन हिचे लग्न भरपूर पाणथळाची शेती असलेल्या अडाणी पाणथळाशी लाऊन दिले. दीर इंजिनिअर, सरकारी नोकर. शतीत कष्ट करणार हिचा नवरा आणि माल विकणार दीर. हिने एका वहीत हिशेब ठेवला. तो असा, दोनशे पोती हायब्रीड, पन्नास पोती तूर, चाळीस क्विटल कापूस... आणि किंमत? दादांना माहीत. ही वही दिराच्या हाती पडली आणि तिची रवानगी माहेरी झाली. सहा महिने झाले तरी न्यायला कोणी आले नाही म्हणून ही सासरी आली. पण तिला घरात घेतले नाही. बारा दिवस रस्त्यावर नि शेजारच्या ओट्यावर काढले. 'भूमिकन्या मंडळा' च्या बैठकीस ती आली असल्याने संस्थेत आपणहून आली. आज जेवणाच्या डब्यांचा व्यवसाय करणारी वंदना स्वयंसिद्धपणे उभी आहे. दोन खोल्याच्या स्वतःच्या घरांत सन्मानाने राहाते आहे. ती गोकुळला वकील करणार आहे नि अर्जुनला भ्रष्टाचार न करणारा इंजिनिअर बनवायचे आहे. शालन आपल्या मनीषाला नर्सिंगला घालणार होती पण चांगला मुलगा सांगून आला. त्याने बारावी पास झालेल्या मनीला मागणी घातली. पुढे शिकवणार आहे. शालनची बालवाडी सुरू आहे.
 ....अशा या अनेकजणी. अवघ्या पंचविशीत आयुष्याचे धिंडवडे होतांना आतल्या आंत करपणाऱ्या. पण त्यांच्या मनांतही इवलीशी स्वप्ने आहेत. आपली स्वप्ने साकार करण्याची उमेद त्यांना देण्याची शक्ती आहे समाजाजवळ? किंवा संस्थेजवळ?
 शारदाच्या नवऱ्याने पत्नीला स्वतःच्या व्यसनासाठी बाजारात बसविण्याचा प्रयत्न केला. सातवीपर्यंत शिकलेली शारदा नवऱ्याने पाठविलेल्या गिऱ्हाईकाची शिकार बनली. पण दुसऱ्या क्षणी तिथून माहेरी तिघून गेली. माहेरी तरी कोण
होतं? विधवा आई. मग सहा महिने 'दिलासा'त होती. शारदाचा नवरा दारू प्यायला की पशू होत असे. शुद्धीवर असतांना मात्र शारदावर खूप प्रेम केले होते. त्या प्रेमाच्या आठवणी ती विसरू शकत नव्हती. भावाच्या, आईच्या रेट्यामुळे ती कोर्टात गेली. कोर्टातून काडीमोड घेतला. पण तरीही मन त्याच्यातच घुटमळत होतं. ती प्रौढ साक्षरता वर्गाची शिक्षिका झाली. आईकडे राहू लागली. एक दिवस ढगेबाईनी बातमी आणली की शारदा नवऱ्याबरोबर राहू लागली आहे! आम्ही चक्रावून गेलो. दोन चार दिवसांत शारदा स्वतः आली.
 "मी नवऱ्याबरोबर राहण्याचं ठरवलं आहे. त्यांनी दारू सोडलीय, नि गाव सोडून ते इथंच राहायला तयार आहेत. इथेच काहीतरी काम करतील. मी पण कष्ट करीन. त्यांना पश्चात्ताप झालाय. कसं करू मी? तुमचाही धाक राहील." शारदाने सांगितले.... आणि गेले वर्षभर दोघंही सुखाने राहात आहेत. शारदाच्या मामाच्या जोडीने नवरा रंगाच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. मेहनत करतो. आता दारूचं म्हणाल तर ती पूर्णपणे सुटलेली नाही. कधीतरी घेतो. पण पूर्वीसारखा धिंगाणा घालत नाही.
 आता शारदाच्या बाबतीत आम्ही हरलो की जिंकलो? खरे तर इथं हारजीत हा प्रकार नाहीच. प्रत्येक समस्या वेगळी आणि तिचं उत्तरही वेगळं, कोणत्याही पुस्तकात न सापडणारं.
 गेल्या चार-पाच वर्षात झालेल्या कामाचे एकूण मूल्यमापन एका तज्ज्ञ मित्रानी केले होते. आलेल्या स्त्रियांत बहुजन समाजाच्या स्त्रिया मोठ्या संख्येने आहेत. म्हण, मारवाडी, कोष्टी, जैन, मुस्लिम, न्हावी इत्यादी समाजातीलही आहेत. पण दलित समाजातील स्त्रिया त्या मानाने कमी आलेल्या दिसतात. संस्था या स्त्रियांपर्यंत पोचली नाही की या स्त्रियांना हे प्रश्न जाचत नाही? असा प्रश्न समोर ठाकला, प्रश्नाचं उत्तर शोधताना लक्षात आलं की, मागास समाजातल्या स्त्रिया प्रत्यक्ष दिलासा घरात राहाण्यासाठी अवघ्या चारपाचच आल्या असल्या तरी मोफत मदत केंद्रात त्या मोठया प्रमाणावर आल्या आहेत. मध्मवर्गीय वातावरणातील स्त्री पुष्कळदा परावलंबी असते. त्यामुळे तिचा आधार नवऱ्याच्या घरातून बाहेर पडताच पार तुटून जातो. पण मागासवर्गातील स्त्री आर्थिकदृष्ट्या अपंग होत नाहीत. उरतो प्रश्न कायद्यच्या मदतीचा. तो घेण्यासाठी त्या येतात.
परंतु स्वतः कमावत्या - रोजंदारीवर असल्याने माहेरी त्या बिनधास्तपणे राहू शकतात. शिवाय 'नवऱ्याने टाकलेली बाई' ही गोष्ट मध्यमवर्गीयांना जेवढी लपवावीशी वाटते तेवढी सर्वहारा समाजातल्या लोकांना लपवावीशी वाटत नाही.
 "नवरा म्हणतो, तुमची वस्तू डावी आहे, तरी पत्करली मी. तिला जन्मभर सांभाळायचं तर तिच्या बापानी अधुनमधून पैसा लावायलाच हवा. वायको म्हंजे वस्तू वाटते त्याला. कधीपण वापरावी नि कधीपण फेकून द्यावी असं कसं हो?" सुनंदा तडकून विचारते. ही दिसायला खूप काळी. नवरा पुण्याला सरकारी खात्यात ड्रायव्हर आहे. ही बापाची एकुलती एक म्हणून लग्न केलं. एक मुलगाही आहे. नवऱ्याने पुण्याला दोन वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस कोर्टाच्या समन्सला याने दाद दिली नाही. पण आता मात्र समन्स त्याला पोचले आहे. आपल्याला पोटगी द्यावी लागेल या भीतीने तो पुण्याहून गुंड घेऊन येतो आणि सुनंदाच्या घरासमोर जाऊन शिव्या धमक्या देतो. पोलिसांकडे दाद मागितली तर ते लक्ष देत नाहीत. साधा अर्ज दाखल करण्यासाठी कुणाची तरी चिट्ठी लागते. सुनंदा मात्र धीराने उभी आहे. आई - वडिलांच्या सहाय्याने मुलाला वाढवते आहे. मात्र भेटली की एकदा तरी विचारते, “भाभी, माझा मुलगा तर तो नेणार नाही ना? तेवढा माझा मला राहू द्या. मग कशालाच डरत नाही मी. कोर्ट मुलाचा ताबा तर नवऱ्याला देणार नाही ना!" काय उत्तर देणार आपण? शेवटी पोलीस आणि न्यायाधीश या समाजाचेच घटक. समाजातील वकील असोत, खोट्या साक्षी देणारे निविलेले, साक्षीदार असोत, किंवा कायदा करणारे तज्ज्ञ असोत ते या समाजाचे घटक असतात.
 समाजात स्त्री विषयी जी भूमिका रुजली आहे तीच त्यांनी घेतली तर कोणी कोणाला बोल लावायचा? समाजमनातील स्त्रीचे चित्र बदलायचे असेल तर तळापर्यंत पोचायला हवे.
 समाजातील मानसिकता बदलण्याचा प्रयोग म्हणजेच मानवलोक वा मनस्विनीसारख्या सामाजिक संघटना वा संस्था, आज परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरावे यासाठी झगडणाऱ्यांची संख्या वाढतेय.
 या ठिकाणी एक गोष्ट आठवते. जी रामशास्त्री प्रभुण्यांच्या नावाने सांगितली जाते. एक लाल लुगड्यातली विधवा उत्तम प्रवचन करीत असे. प्रवचन ऐकावयास
रामशास्त्री आलेले पाहून तिने प्रश्न केला, “ शस्त्रीजी, स्त्री आणि पुरुष निसर्गतः सारखीच. असे असताना स्त्रिया व पुरुषांना दुहेरी न्याय का? पती मरण पावला तर वाईला विद्रूप केले जाते. अशुभ मानले जाते पण पुरुषाची पली मरण पावली तर पंधराव्या दिवशी तो दुसरा विवाह करतो असे का?" शास्त्रीजी उत्तरले, "बाई, तुमचे म्हणणे खरे आहे. न्याय देणारे आणि न्यायासाठी कायदे करणारे पुरुषच! एक वेळ अशी येईल, त्यावेळी तुमच्यासारख्या स्त्रिया कायदे तयार करतील. न्यायदान देण्यासाठी आसनस्थ होतील तेव्हा स्त्रियांना जरूर न्याय मिळेल."
 स्त्रीमुक्तीसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे संसार, 'कुटुंब नाकारणाऱ्या, मुक्त लैंगिक संबंधाची भलावणी करणाऱ्या बायका.' अशी भूमिका स्वतःला संस्कृतीरक्षक समजणारे सोयिस्करपणे पसरवीत असतात. त्यांना काय माहीत की स्त्रीला घर हवे असते. मात्र ते शोषणमुक्त हवे. जिथे स्त्रीला माणूस म्हणून सन्मान असतो, प्रगतीची संधी असते ते घर तिचेही असते.
 बाईचं 'माणूसपण' समाजाला मान्य करायला लावताना शेकडो कोस अनवाणी चालत जावे लागणार आहे. पण अनेकांचे .... सुजाण स्त्री-पुरुषांचे हात जेवढे वाढतील तेवढे हे अंतर सोपे आणि जवळचे होणार आहे. भारतीय तत्वज्ञान 'आत्म्याचे' अस्तित्त्व मानते. मग आत्म्याला जात असते का? लिंग असते का? स्त्रीच्या सतत जळणाऱ्या आत्म्याची कोणती सोय आम्ही लावली?

आत्मा चालला उपासी, दूरदूरच्या गावाले
माय मातीच्या कानांत, दोन सवाल पुशीले…
गांठ गांठ पदराला, वल्या वढाळ वळखी
माती मातीला मिळता, पुढे निघाली पालखी
पालखीत कोण राणा? त्याले काय रूप रंग?
कुण्या जातीचा पालव,आता डोईवर सांग…
कुंकवाचं देन-घेणं. काळ्या मण्यांचा वायदा
परदेशी पराईण, तिले कोनाचा कायदा?
काया मातीची वाकळ, आता मागेच सुटली

आभाळाच्या अंतरात, एक जखम गोंदली....

 रोज न रोज मरणाऱ्या अशा कित्येक 'परदेशी पराईणी'. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताना लाखो जखमा उरात गोंदल्या जातात. निदान एकीला तरी मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून आपण साऱ्यांनी तिच्या या दोन प्रश्नांना उत्तर द्यायला बांधून घेतले पाहिजे.
 तर, अशा हजारो कहाण्यांपैकी या चार दोन. आपले आभाळ आपणच पेलण्याची उमेद त्यांच्यात निर्माण करण्याच्या एका अधुऱ्या प्रयत्नाचा… धडपडीचा....ध्यासाचा हा त्रोटक आढावा.






प्रकाशकाचे मनोगत

 'सामाजिक परिवर्तनासाठी वुद्धिमत्तेला प्रेरणा' हे सूत्र पायाभूत मानून गेली पस्तीस वर्षे ज्ञान प्रबोधिनी शिक्षण, संघटन, आरोग्य, ग्रामविकसन, उद्योग आणि संशोधन अशा विविध क्षेत्रात काम करीत आहेत. सामाजिक परिवर्तनासाठी 'स्त्री शक्ती प्रवोधन' हे महत्त्वाचे माध्यम मानून ज्ञान प्रबोधिनीतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. स्त्रीयांच्या समस्यांचा अभ्यास करण्यापासून ते त्यांवर कालानुरूप उत्तरे शोधण्यापर्यंत अनेक पातळ्यांवर हे काम चालू आहे. 'मंजुश्री सारडा' अभियानातील सहभाग, राजस्थानातील 'सती' प्रकरणाचा अभ्यास दौरा ते खेड-शिवापूर भागातील महिलांचे बचत गट, 'समतोल' त्रैमासिक, 'संवादिनी गट' अशा निरनिराळ्या माध्यमातून हे काम सुरू आहे. जिथे जिथे अशा प्रकारे स्त्रीच्या आंतरिक शक्तीच्या प्रकटीकरणाचा ध्यास घेऊन काम चालू आहे त्या त्या कामांचा यथार्थ अभ्यास हे ही यातील महत्त्वाचे अंग आहे. डॉ. शैला लोहिया यांनी गेल्या दोन तपाहूनही अधिक काळ पीडित स्त्रीयांच्या पुनर्वसनाचे, त्यांचे आत्मबल जागवण्याचे केलेले काम कथास्वरूपात 'तिच्या डायरीची पाने' यात निवेदन केले आहे. ते प्रकाशित करताना म्हणूनच स्त्री शक्ती प्रबोधन अभ्यास गटाला आनंद होत आहे. रचनात्मक मार्गाने स्त्री समस्यांना शोधलेले एक परिणामकारक उत्तर म्हणून वाचकांनी या कथांकडे पाहावे व त्यातून सहवेदनेचा अनुभव घेत ते समजावून घ्यावे, ही अपेक्षा.

स्त्री शक्ती प्रबोधन अभ्यास गट
ज्ञान प्रबोधिनी
५१०, शुक्रवार पेठ,
पुणे ४११ ००२.