Jump to content

तिच्या डायरीची पाने/कशाला उद्याची बात

विकिस्रोत कडून


कुणी सांगावी उद्याची बात


 पहाट चांगलीच फटफटली होती. खरं तर एव्हाना अंगणात सडा पडायला हवा, रांगोळीच्या चार रेषा रेखायला हव्यात आणि शिवाय चुलीला पोतेरं देऊन चहाचं आधन चढायला हवं. पण सुनीच्या डोळ्यावरची झापड मोकळी होत नव्हती. अंग अंग ठसठसत होतं.
 खरं तर यंदा लग्नाची घाई नव्हतीच. दहावीचं वर्ष पदरात पाडून घ्यावं नि मग लगीन करावं, असं तिला मनापासून वाटे, पण मोठी मायची घाईच लई. तिला नातीचं लगीन पाहून डोळे मिटायचे वेध लागले होते. मग काय? तात्यांनीही मनावर घेतलं. पाऊसकाळ नुकताच सुरु झालेला. तरीही शेवटचा मुहूर्त साधून सुनिताचे लगीन उरकून टाकलं. रमेश बारावी पवतर शिकलेला होता. चार बहिणींपाठचा एकुलता एक मुलगा. पाण्याखालची सतरा एकर शेती, चार एकरात द्राक्षाचा मळा. भरपूर मेहनत करणारे सासूसासरे. सारे काही भरभरून होते. नावं ठेवायला कुठे जागाच नाही. पण तरीही, नववीचे प्रगती-पुस्तक हातात घेऊन सुनिता रडत बसे, वर्गात इंग्रजीत पहिला नंबर होता, गणित मात्र डोक्यात गोंधळ उडवी. जेमतेम दीडशेपैकी साठ गुण मिळत, काठाकाठावर नाव धक्याला लागे. इतिहास ... भूगोल ... या विषयात तर नेहमी पहिली असे, पण या सगळ्याचा उपयोग काय? लग्न झाल्यावर सासरी येतांना नववीचे प्रगती पुस्तक तिने हळुवार मनाने बरोबर आणले होते.
 सुनिताने जडावल्या डोळ्यांनी शेजारी झोपलेल्या रमेशकडे पाहिले, तो गाढ झोपेत होता. त्याच्याकडे पाहून तिने गालातल्या गालात हसत आळस
दिला. क्षणभर मनात आले की, सिनेमातल्या सारखा त्याचा हळूच मुका घ्यावा. त्या कल्पनेनेही ती मनोमन लाजली आणि मनातले असले विचार झटकून सरळ न्हाणीकडे धावली.
 दोन दिवसापूर्वी आत्याबाई आणि मामंजी बालाजीच्या यात्रला गेले. यंदाच्या लक्ष्म्या थाटात उभ्या राहिल्या होत्या. घरात लक्ष्मी आलेली. सुनिताच्या आईने उत्साहाने लक्ष्म्यांचे मुखवटे, इतर सामान, शिधा पाठवला होता. सुनिताची सासू खुशीत होती. लक्ष्म्यांसमोर मांडलेल्या आराशीचं, सुनिताने सजवलेल्या मखराचं कवतिक, अख्ख्या तावशीगडातल्या सासवा – सुना आपसात करीत होत्या. लक्ष्म्यांचे मुखवटे, समोरची खेळणी यांची आत्याबाईंच्या मदतीने तिने आवराआवर करुन ठेवली. दोनच दिवसांनी आत्याबाई आणि मामंजी यात्रा कंपनीबरोवर बालाजीला निघून गेले. लग्नापासून पै – पाहुण्यांनी भरलेलं घर, लक्ष्यांचा सण झाल्यावर शांत झालं होतं. गेल्या दोन दिवसात तर सुनी आणि रमेश यांचेच घर होते. खरी ओळख या दोन दिवसात झाली होती... होत होती.
 'अंनत चतुर्दशी सुनी जाऊ देऊ नका. देवघरातल्या गणपतीला एकवीस मादकांचा नैवेद्य द्यावा.' असे आत्याबाईनी जतावून सांगितले होते. तिने मोदक तळले, तळण काढले, शेवयाची खीर केली, नैवेद्य दाखवून दोघंजण मजेत जेवले.
 आज उमरग्याला लावण्यांचा जंगी कार्यक्रम होता. अख्ख्या तावशीगडातील तरुणमंडळी, उमरग्याला जाणार होती. रमेशने मात्र जाण्याचे टाळले. खूप दिवसांनी मिळालेली सुनिताची संगत त्याला अधिक प्यारी होती. चिडवणाऱ्या मित्रांना त्याने सुनिता घरात एकटीच आहे, आई - तात्या यात्रेला गेलेले, तिला एकटीला घरात ठेऊन उमरग्याला कसे येता येणार ? वगैरे पटवून दिले होते, आणि उमरग्याला लावण्यांच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले होते. त्या रात्री एकमेकांच्या मिठीत कधी गाढ झोप लागली ते कळलेच नाही. आणि पुढे?...? फक्त गाढ झोप... न उघडणारे डोळे... रडण्याच्या आवाजांचा न उकलणारा कोलाहल...
 सुनीने डोळे उघडण्याचा जिवापाड प्रयत्न केला. किलकिल्या फटीतून तिला तात्या नि बंडूचा अंधुक चेहरा जाणवला. म्हाताऱ्या मोठी मायचा हात तिच्या डोक्यावरुन फिरत होता. जरासा हात हलला नि हातातं गच्च कळ आली.
 'वाई पोरीचा हात नीट धरा. कितीदा सांगितलं तुम्हाला, पोरगी डोळे उघडायला लागलीय. इथेच थांबायला सांगा तिच्या वडलांना, मी डॉक्टरांना बोलावून आणते.' नर्स ओरडली. डॉक्टर हा शब्द ऐकून सुनीचे मन दचकून हुशारीत आले. जोर लावून तिने डोळे उघडले.
 हातात सुई खुपसलेली... वर बांधलेल्या वाटलीतलं पाणी नळीतून थेंबथेंव गळतंय. समोर तात्या, बंडू, गावचे सरपंच नाना, एकदोन न पाहिलेले चेहरे. शेजारी मोठी माय, आई... तिला हे चेहरे स्वप्नात आल्यागत वाटू लागले. रमेश, मामंजी, आत्याबाई यांचे चेहरे ती शोधू लागली, आठवू लागली. इतक्यात तिची उमरग्याची नणंद पुढे आली आणि 'वैनिसा असं कसं झालं वोऽऽ' असं ओरडत तिच्या जवळ बसणार, इतक्यात नर्सनी तिला खसकन् ओढून आजूला ढकललं. 'डॉक्टर आलेत, चला इथून गर्दी कमी करा. फक्त वडलांना थांबू द्या,' नर्स कडक आवाजात बोलली. धाकट्या नणंदेचं रडणं... नर्स ... डॉक्टर.. हाताला लावलेली बाटली... सुनीताला कशाचा मेळ लावता येईना. डोक्यात पुन्हा कळ आली. तिने डोळे मिटून घेतले.

 ...कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सुनीताला जीपमध्ये घालून तात्या, मोठी माय, आई, बंडू, सरपंचनाना सगळे तावशी गडाला निघाले होते. तावशीगड येण्या अगोदर मोठी मायने सुनीताला जवळ ओढून घेतले. तिच्या कपाळावरचे कुंकू विस्कटून टाकले, आणि ती मोठ्यामोठ्यांदा रडू लागली.
 'द्येवा, मी कुठं लपले होते का रे? माझ्या नातीचं कुक्कू पुसून काय मिळालं रं तुला? माज्या नातीला घेऊन जायचंस. भरल्या कपाळानं ग्येली असती तर, थाटात अर्थी उचलली असती. धरणीमाय तू तुज्या पोरीवरच कसी कोपलीस गं ऽऽ. कूस बदललीस नि हजारो लेकरं गिळून बसलीस .. भिंताडाचे दगड माज्या नातजावयावरच कसे ढकललेस गं ऽऽ. माज्या
नातीवर तरी फेकायचेस. चार दिवस रडलो असतो नि गप बसलो असतो... आता जलमभर पोरीला रडत बसायचं आलं. पांढऱ्या कपाळाची नात पाहण्यापरीस मला न्ये गंऽऽ."
 सुनिता क्षणभर भांबावून गेली आणि थोडं थोडं डोक्यात उलगडायला लागलं. रमेशच्या मृत्यूच्या कल्पनेनं तिचा जीव घाबराघुबरा झाला. तिने तात्यांकडे पाहिले, ते रुमालात तोंड खुपसून रडत होते. आईला बंडूनं घट्ट धरुन ठेवलं होतं आणि तिला काय उमजायचे ते उमजले. तावशीगडाला जाताना जागोजाग दिसणारी माणसांची गर्दी. इथे तिथे उभ्या असलेल्या गाड्या. विस्कटून गेलेली घरं... गावं... भूगोलाच्या पुस्ताकतला भूकंप तिच्या उंबरठ्यात उभा राहिला होता.
 घरापाशी जीप थांबली, घर कसले? दगडमातीचा ढीगच. नाही म्हणायला मागच्या बाजूला एक विटांची खोली, नव्या नवरानवरीसाठी बांधली होती. वर पत्रे टाकलेले. ती तेवढी जेमतेम उभी होती. आत्याबाई, मामंजी यात्रेला गेलेले, म्हणून रमेश आणि सुनिता बाहेरच्या दगडी ओसरीत झोपत; आणि त्या दगडांनीच घात केला होता.
 एकुलता एक मुलगा, चार पोरींच्या पाठचा. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात दगडाखाली चेचून मेला. आई - वडिलांच्या बहिणीच्या दुःखाला पारावार नव्हता. गावातले आणखी बरेचजण खर्चले होते. त्यांत बाया आणि पोरांचीच भरती जास्त होती. गावांतील तरुण मंडळी उमरग्याचा लावण्यांचा कार्यक्रम बघायला गेली होती, आणि वडिलधारी माणसं शेतात होती. सुगीचा हंगाम जवळ आलेला. मूग, उडीद घरात येऊन पडला होता. तीळ, साळ, सूर्यफूल - पिवळा, शेतात उभे होते. त्यामुळे घरातील वडिलधारे पुरुष रानात झोपायला जात. त्यामुळे दोन म्हातारे पुरुष आणि तरणाबांड रमेश सोडला तर बाकी बाया आणि लेकरंच जमिनीत गाडली गेली होती...
 तात्यांनी मनावर दगड ठेवून सुनीताला हात देऊन खाली उतरवले. मोठीमायने तिच्या अंगावरची शाल नीट केली. डोक्यावरचा पदर जरा पुढे ओढला. ती घरात शिरणार इतक्यात तिची सासू अंगात वारं शिरल्यागत
बाहेर आली आणि कडाडली.
 "ए पांढऱ्या पायगुणाच्चे, काळतोंडे!, माज्या घरात पाऊल टाकलंस तर तंगडं कापून टाकीन. माझा तरणाबांड ल्योक खाल्लास त्यो खाल्लास, आता माज्या नवऱ्याला खायला घरात येऊ नगस माज्या लेकीचं कुक्कू पुसायला हितं थांबू नगंस..."
 बाजूच्या बायांनी तिच्या सासूला बळंबळंच बाजूला नेऊन बसवलं. "झाडच उपटून न्येलं वं ऽऽ. गावातल्या सात तरण्या बाया त्यांच्या लेकरांसकट जमिनीनं गिळल्या, पण झाडं साबुत ऱ्हायली. चार दिस ग्येले की त्यांचे बाप्ये पुन्ना लगीन करतील. नवा डाव मांडतील... नवी येल लावतील.. फुलं येतील... फळं धरतील. समदं व्हईल. पन हितं झाडंच उमळून पडलं होऽऽ" सासू ऊर बडवीत रडत होती.
 'या न्हानग्या पोरीचा जलम कसां जायचा?' भोवतालच्या आयाबाया डोळे पुसत रडत होत्या. सुनीजवळ येऊन बसत होत्या. सुनीचे डोळे फक्क झाले होते. डोळ्यात पाण्याचा थेंब येत नव्हता. मोठी मायने तिच्या डोकीवरचा पदर आणखीन पुढे ओढून घेतला. तिच्या पायातली घट्ट जोडवी मऊ हातांनी काढून घेतली. बळंच तिचे हात धरून जमिनीवर हापटले. बांगड्या फोडून काढून टाकल्या.
 तात्या जवळ आले आणि मोठीमायच्या कानात कुजबुजले. मोठीमाय उठून सुनीच्या सासूजवळ गेली. विनवणीच्या स्वरात पाया पडून विनंती करु लागली.
 "विहिनीबाई हा नशिबाचा भोग हाय. तुमचं पोट जळालं, पन माज्या न्हानग्या नातीचा तर जीव जळाला. तिला दूर करु नका, पोटाशी धरा. आपन देशमुखाची मानसं. देवा-बरामनापासून ज्याच्या नावानं कुकू लावलं, काय मनी बांधले, तो वायदा सात जलम पाळायचा. तिला तुमी दूर लोटलं तर कुठं जाणार ती? मोलकरीन म्हणून ठ्येवा. समदं काम करील, तुमची सेवा करील. कुठं जावं तिनं?"
 "कुटं बी! हिरीत ढकलून द्या न्हाय तर काय बी करा. हितं तिनं
न्हायाचं न्हाई… पांढऱ्या पायाची, आमच्या घरात नको…” सासूचा त्रागा संपणारा नव्हता. सुनीच्या सासरेबुवांनी तात्यांना बाजुला नेऊन काही सांगितले. घोटभर पाणीही न घेता सुनीताला तावशीगडला वेस ओलांडावी लागली.
 सुनीचे माहेर शिंगणगांव लातूर - उमरगा रस्त्याच्या डाव्या बाजूला. किल्लारी पासून अवघ्या सात - आठ कोसावर निसर्गाची करणी अशी की, रस्त्याच्या डाव्या बाजुला धक्का बसला. पडझड झाली, पण माणसं गाडली गेली नाहीत. उजव्या बाजुची गावंच्या गावं मातीत गाडली गेली. सास्तूर, किल्लारी, मंगरुळ, किल्लारवाडी अशी लातूर - धाराशिव जिल्हयातील साठ अेक गावातील हजारो माणसे जमिनीत गाडली गेली होती. शिंगणगावातल्या घरांना धक्का जरुर बसला, पण वाड्यांचा दगड ही हलला नव्हता.
 शिंगणगावात आल्यापासून सुनीच्या अवतीभोवती मोठीमाय राही. तिला वाटे की पोरीला शिकायचं होतं, लगीन करायला राजी नव्हती. पण मोठीमायनेच हेका धरला, नातीचं लगीन लवकर करा म्हणून. सुनीचे तात्या वारावी पास झालेले. कष्टाळू शेतकरी. पोरगी चांगले गुण घेऊन पास होतेय, इंग्रजीत पक्की आहे याचं त्यांना कवतिक होतं. पण आईच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. या सगळ्याची मोठी मायला जाणीव होती. तिला मनोमनी खंत वाटे की, सुनीच्या दुर्देवाला तीच जबाबदार आहे. डोळे मिटायच्या आत सुनीला मार्गाला लावले पाहिजे, असा ध्यास तिच्या मनाने घेतला. पण सुनी ना कोणाशी बोलणार ना कुणाकडे जाणार. कसेबसे दोन घास खाई नि कुठे तरी एकटक बघत नुस्ती बसून राही. सुनीचे पुढचे जीवन चांगले करायचे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र मोठीमायजवळ नव्हते.
 भूकंप झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून अवघ्या जगाचे लक्ष किल्लारीकडे वेधले. शेकडो संस्था मदतीचा हात घेऊन या भागात आल्या. धान्य, भांडीकुंडी, कपडे, पैसे यांचा ओघ नव्हे तर, पाऊस या भागावर कोसळत होता. पहाता पहाता सहा महिने होऊन गेले. काही सेवाभावी संस्था या भागातील मुलांसाठी, स्त्रियांसाठी काम करु लागल्या. त्यांच्या मनातील दुःख कमी व्हावे, मनाला बसलेल्या धक्क्यापासून त्यांनी सावरावे, दैनंदिन जीवन
नव्याने सुरु करावे, यासाठी कार्यकर्ते गावोगांव फिरत होते, घराघरातून जात होते. विविध प्रकारची शिबिरे, प्रशिक्षण वर्ग, सहली यांचे आयोजन होत होते. एका संस्थेने भूकंपात वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांना मदत करण्यासाठी, विविध योजना आखल्या होत्या. मोठीमायच्या हे कानावर येताच, सिध्देश्वर यात्रेचे निमित्त करुन ती लातूरला गेली आणि सुनीताचे नाव एका संस्थेत नोंदवून आली.
 एक दिवस अचानक, एक पन्नाशीच्या बाई आणि एक पंजाबी कुडता, जीन्स घातलेली तरुण मुलगी दारात उभ्या राहिल्या. तात्यांची चौकशी करु लगल्या. तात्या घरात नव्हते, शेतात गेले होते. आजीमायने त्यांना पाहिले आणि ती लगोलग उठून पुढे गेली.
 'सुनी बेटा बाज टाक. सोलापूरच्या ताई आल्याता. आन् च्या बी टाक, साकर कमी टाक बेटा. शेरातल्या लोकानले आपल्या च्याचा काढा जमत नाई…'
 मोठीमायने त्या ताईना आणि बरोबरच्या मुलीला बाजेवर बसविले. सुनी चहा करेपर्यंत तिच्यावर कोसळलेल्या संकटाची माहिती दिली. तिची शाळेतील प्रगती सांगितली. सुनी चहा घेऊन आली. ताईंनी तिला आपल्या जवळ बसवले, पाठीवरून हात फिरवला.
 'तुझा वर्गात नेहमी पाचच्या आत नंबर यायचा म्हणे, निबंधात बक्षीस मिळवलं होतंस? तुझ्या आजी सांगत होत्या. मी किल्लारीला आले होते. म्हटलं, तुला भेटून जावं. तुला वाचायची आवड आहे ना? दोन पुस्तकं आणलीत तुझ्यासाठी. हे आहे, 'एक होता कार्व्हर'. तुला नक्की आवडेल. हे दुसरं आहे मासिक. 'बायजा' नावाचं. जरुर वाच., आणि एकदा सोलापूरच्या आमच्या संस्थेत ये, तुझं मन नक्की रमेल तिथे. ही अनिशा, तुझ्याच वयाची. मुंबईत राहते, तिची परीक्षा झालीय. या भागातल्या मुलींशी दोस्ती करण्यासाठी खास इथे येऊन राहिलीये. सालेगावच्या आमच्या केंद्रात राहते. मुलांना गोष्टी सांगते, गाणी शिकविते. दोन दिवस तिच्याकडे जाऊन रहा, होय अनिशा?' ताई बोलल्या. दुसऱ्या क्षणी अनिशाने सुनीचे हात धरले आणि
आग्रह केला. 'सुने,आमच्या केंद्रावर खूप छान-छान पुस्तकं आहेत, वाचून झालं की तिथे ये नवे बदलून घ्यायला.' ताई आणि अनिशा निघून गेल्या. खूप दिवसांनी सुनीचा चेहरा जरा सैलावला होता. मोठी माय त्यांना दारापाशी सोडून आली. ती जवळ येताच सुनीचा ऊर भरुन आला. तिने मोठीमायला ओढून बाजेवर बसविले आणि तिच्या कुशीत शिरून मोठमोठ्यांदा रडू लागली.
 'मोठीमाय खरंच त्ये पुन्ना दिसणार न्हाईत का ग? फारफार माया लावली ग त्यांनी. लगीन मला नको होतं, पण लई प्रेम केलं ग त्यांनी माज्यावर. मला पुढे बी शिकिवणार होते. बी.ए. करनार होते. कालिज्यात घालणार होते लातूरच्या. तितंच एकादं दुकान टाकू म्हनले होते, समंद… समंद… इस्कटून ग्येलं ग ऽऽ. मोठीमाय मला गच्च धरुन ठेव. काय बी कळंना गं मला ऽऽ.'
 कितीतरी वेळ सुनीता रडत होती. मोठीमाय नातीच्या पाठीवरून हात फिरवीत होती. वहाणारे डोळे आणि नाक पदराने पुशीत होती. आईने तांब्यात पाणी आणले. मोठीमायच्या हातात दिले. मोठीमाय उठली, खळखळ चूळ भरून टाकली. डोळ्यावर पाणी मारले. नातीला उठवीत बोलली, "बेटा, पल्याड ग्येलेलं माणूस कुठं परत येतंय का? त्याला आठवीत रहायचं, नि त्याला जे आवडत व्हतं ते करीत ऱ्हायचं. उट बाय, धू तोंड.'
 त्या दिवसापासून सुनीच्या पायांना, हातांना वेग आला. ती घरात आईला मदत करु लागली. पुस्तकात डोकं खुपसून बसे. कसा वेळ जाई ते कळत नसे. एक दिवस सरकारी माणसं येऊन गेली. सुनीचे नांव नोंदवून गेली. भूकंपात मरण पावलेल्यांच्या अगदी जवळच्यांना सरकार नुकसान भरपाई देणार होते. रक्कम मोठी होती. चारदोन दिवस मध्ये असतील तोच सुनीताचा चुलत दीर आणि सासरा आले. सुनीताला घेऊन जाण्यासाठी. मोठीमाय सामोरी गेली. पाणी दिलं. 'सुनबाईला घेऊन जाया आलाव. तवाच्या दुःखात मंडळींना भान हायलं नाय. घरातली लक्ष्मी माघारी लावली. आता समदी लोकं नावं ठिवाया लागलीता. दुःखी लेकरू पोटाशी धरायचं तर भाजून माघारी लावलं म्हणाया लागलीता. लई पच्चाताप व्हाया लागलाय
त्यांना. घेऊन या म्हणून धाडलंय. करा तयारी. सांजच्या आत गडाला पोचाया हवं. वाट पहातीला.' सासरा विनवू लागला. 'तवाचं आमाला पटलं न्हवतं, पण मोठ्यांसमुर कसं बोलावं? म्हणून गप हायलो. चुलत काय नि सख्खा काय? आमाला काका येवडेच. वैनिला घ्याया मी पन आलोया.' चुलत-दिराने पुस्ती जोडली.
 मोठीमायला क्षणभर सुचेना काय उत्तर द्यावं ते. हे नवं संकट समोर उभं राहीलं होतं. 'इचारा बाबा तुमच्या सुनला. येत असंल तर घिऊन जावा. जिकडचं माणूस तिकडे.' मोठीमाय बळेबळे बोलली. तेवढ्यात डोक्यावर पदर घेऊन सुनी बाहेर आली.
 'मोठीमाय, हिरीत ढकलून द्या न्हाई तर रस्त्यात सोडून जा असं मामंजी नि आत्याबाई बोलले होते न तुला? त्या दिशीच हिरीत ढकलून दिलं त्यांनी मला. मला तिकडं जायाचं न्हाई. माझं मायेचं माणूस तर ऱ्हायलं न्हाई, कुणाच्या भरुश्यावर जाऊ तिकडं? कोन हाय माजं तिथं? मला त्यांचं काय बी नगं. मी जानार नाय. सांगून ठिवते!' सुनी धिटाईनं बोलली, आणि आत गेली. मोठीमायने मनातल्या मनात सुस्कारा सोडला, आणि तिने ठरविले की, सुनीच्या म्हणण्याबाहेर जायचे नाही. चारदोन गोष्टी बोलून मोठीमाय आणि तिच्या लेकानं सुनीच्या सासऱ्याला परत पाठवले.
 सोलापूरच्या ताई अधूनमधून घरी येऊन जात, नवनवी पुस्तके देऊन जात. यावेळी त्या आल्या की त्यांच्याशी सुनीच्या शाळेबद्दल बोलायचे, असे मोठीमायने ठरवून टाकले. अडचणी खूप होत्या. एका तरुण विधवेने शाळेत जाणे समाजाला पटणारे नव्हते. सुनीच्या मनावरचा ताण पूर्णपणे ढिलावला नव्हता.
 शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा हिस्सा रमेशच्या आई-वडिलांना हवा होता. या घेऱ्यातून सुनीला बाहेर काढायचे तर या वातावरणातून बाहेर जाणे महत्त्वाचे होते. नळदुर्ग गाव पुणे-हैदराबाद मार्गावर वसलेले. तेथील शाळा चांगली होती. मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापिका बाईशी सोलापूरकर ताई बोलल्या होत्या. सुनीता भूकंपग्रस्त भागातील असल्याचे, तसेच तिच्यावर
कोसळलेल्या प्रसंगाबद्दल कुणाशीही बोलायचे नाही, तसेच मोठीमाय आणि आई या दोघींनीच दिवाळीपूर्वी नळदुर्गला जाऊन यायचे, असे ठरले.
 …नळदुर्ग जवळ आले: सोलापूरच्या ताईंनी पर्समधून कुंकवाची टिकली काढली आणि सुनीताच्या कपाळावर लावली. सुनीताच्या गळ्यात आवंढा दाटून आला. तिने निकराने तो परतवून टाकला. ३० सप्टेंबरची रात्र उलटून आठ महिने झाले होते. रमेशच्या आठवणी अंधुक होत चालल्या होत्या. मात्र कधीतरी अचानक त्याचे ओढाळ डेळे… त्याचा दणगट स्पर्श आठवे आणि सुनीताचे मन सैरभैर होऊन जाई. अशावेळी पुस्तकात डोळे खुपसले तरी मनावर काही उमटत नसे. सुनीला आशा होती की, नळदुर्गच्या वसतिगृहात गेल्यावर अभ्यास चांगला होईल. तिला पंजाबी ड्रेस खूप आवडे. पण मोठीमाय आणि तात्यांना विचारायची हिंमत झाली नव्हती. ती पहिल्यांदा बाजूला वसली तेंव्हा सातवीची परीक्षा तोंडावर आली होती. पण मोठीमायने त्या दिवसापासून साडी नेसायला लावले होते. नळदुर्गला शाळेत जाताना पंजाबी ड्रेस घातला तर?... या कल्पनेनेही तिचे मन सुखावले. 'ताई, शाळेचा युनिफॉर्म पंजाबी ड्रेस आहे म्हणे! मी तोच घालू ना?' सुनीने विचारले, आणि ताईंनी दुसऱ्याच दिवशी दोन सुरेख पंजाबी ड्रेस पाठवले.
 नळदुर्गच्या शाळेत आणि वसतीगृहात सुनीता चांगली रमली होती. दोन कानांवर, वरती बांधलेल्या केसांच्या वेण्या, निळा पंजाबी ड्रस, सुनीता जेमतेम चौदाची वाटे. तशी होती सतराचीच. झाकोळलेले डोळेही आता निरभ्र होऊ लागले होते.
 दिवाळीपूर्वी मोठीमाय, आई, तात्या भेटून गेले. सुनीताचे नवे रूप पाहून आईने निःश्वास सोडला. तात्यांनाही बरे वाटले. मोठीमाय मात्र निघतांना कानात पुटपुटली. 'पोरी, हितं ये समदं साजरं दिसतंय. वघाया बी चांगलं वाटतं, पन परीक्षा झाल्यावर गावाकडं येशील तवा टिकली लावू नको नि जुनकाट साडी गुंडाळूनच ये बरं…'
 एक दिवस दुपारीच तात्या न सांगतासवरता, सुनीला घेऊन जाण्यासाठी शाळेत आले. शासनाकडून मिळणारी भरपाईची रक्कम घेऊन तहसिलदार
साहेब शिंगणवाडीला येणार होते… सुनीच्या सासऱ्यांनी संपूर्ण रक्कम त्यांना मिळावी म्हणून खूप खटपट केली होती. परंतु त्यांची ही खेळी फसली. नियमानुसार त्यांना जे मिळायचे ते शासन देणार होते. सुनीताला शासनाच्या वतीने पन्नास हजार रुपये मिळणार होते.
 लातूर गाडीत बसताच सुनीताने कपाळावरची टिकली काढून खिडकीबाहेर हळूच फेकून दिली. डोक्यावरचा पदर नीट पुढे ओढून घेतला. बँकेत तिच्या नावाने खाते उघडले. त्यात सर्व रक्कम सुनीताच्या नावाने ठेवली. त्यात तात्यांनी पाचशे रुपये घालावेत आणि पन्नास हजाराची रक्कम सहा वर्षासाठी ठेव म्हणून ठेवावी. ती दामदुप्पट होईल. सुनीताला पुढे उपयोगी पडेल असे ताईचे मत होते. पण तात्यांनी त्यांचे म्हणणे 'पुढे पाहू,' असे म्हणत कानाआड टाकले.
 दहावीची परीक्षा अगदी पंधरा दिवसांवर आली होती. सुनी अभ्यासात गढलेली. इतक्यात तिला भेटायला कोणी आले असल्याचा निरोप आला. बाहेर जाऊन पहाते तर मामंजी आणि चुलत-दीर रमण आलेले. ज्यांची घरे पडली त्यांना शासन घर बांधून देणार होते. त्या घरात मृत रमेशची पत्नी म्हणून सुनीताचा हक्क होता. तिचे संमतीपत्र आणल्याशिवाय घर मामंजींना मिळणार नव्हते. तात्यांना न सांगताच, परस्पर ते सुनीताकडे आले होते. सुनीताचा पत्ता त्यांनी वाहेरूनच मिळवला होता. सुनीताचे नवे रूप पाहून रमणही गोंधळात पडला. मामंजी चक्रावले. त्यांना संतापही आला, पण तो दाखवण्याची ही वेळ नव्हती. त्यांच्या गुळचट बोलण्याला सुनीता वैतागली. ज्या गावात जेमतेम दोन-तीन महिने राहिली, ज्या गावाने अवघे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्या गावाबद्दल काय ओढ असणार, आणि वाटणार! तिने निर्विकार मनाने संमतीपत्र लिहून दिले, आणि ती परत पुस्तकात बुडून गेली.
 परीक्षा मनासारखी झाली. सोलापूरकर ताईंनी सुट्टीत तिला घरी नेले होते. पुण्यातील संस्थेने आयोजित केलेल्या 'व्यक्तिमत्त्वाची जडणघडण' या शिबिरातही ती राहून आली. त्या शिबिरात तिला तिच्यासारखीच एक मैत्रीण भेटली, चित्रा नावाची. चित्रासारखीच देखणी, गोड आवाजात गाणारी. ती
बारावीला असताना गावात नव्याने रुजू झालेल्या, बँकेत अधिकारी असलेल्या तरुणाने तिच्या वडिलांना भेटून तिला मागणी घातली. देखणा तरुण, घरदार, शेतीवाडी, हजारांच्या घरातला पगार. सारे कसे छान… मनपसंद. घरी चालून आलेले स्थळ, चित्राचे त्या तरुणाशी थाटात लग्न झाले. सहा महिने सहा क्षणांसारखे भुर्रकन उडाले. दिवाळीतले तेलकट खाण्याचे निमित्त झाले. ताप आला, तो हटेना आणि ब्रेन ट्युमरचे निदान झाले. लग्नाला वर्ष होण्याआधीच तरणाताठा जीव उडून गेला. सासरच्या मंडळींनी चित्राला पांढऱ्या पायाची ठरवून घरात घेतले नाही. चित्राने आता बी.ए.च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे. तिने ठरवून टाकलेयं, ती कॉम्प्युटर शिकणार आहे. अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.
 '... चार दिवस होस्टेलमध्ये रहावे तशी सासरी राहिले मी! त्यांचा … प्रवीणचा सहवास मला मनापासून आवडे. पण तो तरी किती दिवस लाभला? जेमतेम चार महिन्यांचा! परिकथेतला राजकुमार स्वप्नात येऊन घोड्यावर बसून निघून जातो… तसेच सारे. त्याआठवणींवर आयुष्य कसे निभणार? मला खूप शिकून अधिकारी व्हायचेच… बघू, जमलं तर कलेक्टरसुध्दा!!'
 चित्राच्या सहवासातून सुनीताला खूप काही मिळाले होते. आपल्यात काहीही कमी नाही. विवाहानंतर काही महिन्यात रमेशचा भूकंपात झालेला मृत्यू, हा केवळ योगायोग आहे. त्या मृत्यूला आपण जबाबदार नाही, याची जाणीव तिच्या मनात नकळत रुजली होती. त्यातून तिच्या बोलण्यात, चालण्यात, विचार करण्यात आत्मविश्वास आला होता. सुसूत्रता आली होती.
 भूकंप होऊन सहा वर्षे उलटून गेली आहेत, तेथील जनजीवन आता स्थिरावले आहे. सुनीता सामाजिक प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात शिकते आहे. पदवी परीक्षा संपल्यावर एका सामाजिक संस्थेत तिला नोकरी मिळणार आहे. गेल्यावर्षी पावसात भिजल्याचे निमित्त होऊन,
तिच्या जीवाभावाची मोठीमाय देवाघरी गेली. पण हा आघात शांतपणे स्वीकारण्याची… पचवण्याची ताकद तिच्यात आली आहे. मोठीमायने धांदल करून सोलापूरकर ताईला, तात्यांना पाठवून बोलावून घेतले होते. सुनीताचा हात त्यांच्या हातात देत मोठीमायने तिला बजावले, 'पोरी, आता मी सुखानं डोळं मिटीन. तुला कुणाच्या तोंडाकडं बघावं लागणार नाय इतकं शिकिवलं हाय. तरुण वय लई वढाळ असतं. मी विधवा झाले तवा तुज्याच वयाची व्हते. तुज्या बापाच्या आशेवर जीव जगवला मी. पन आता काळ बदललाया, आपन बी बदलाया होवं. मोटारीतून हिंडया लागलो तर विचारपन मोटारीगत धावले पाहिजे. तुज्या मनाला जाननारा कोणी जिवाभावाचा भेटला तर, पुढे मागे अनमान न करता लगीन कर. मोठीमायचा आसीरवाद हाय तुला. मात्र कंची वी गोठ सोलापूरकर ताईला इचारूनच कर.'
 आजही, सुनीताला मोठीमायची आठवण आली की तिचे बोल आठवतात, आणि हसू फुटतं.