Jump to content

तिच्या डायरीची पाने/उगवाईच्या दिशेने जाणारी शांतू

विकिस्रोत कडून


उगवाईच्या दिशेने जाणारी शांतू


 "बाई, बाहेर या ऽऽ" अशी हाक ऐकून आले. तर दारात पोस्टमन दादा उभे. मनात आले, कुणाचे नॉटपेड पत्र आले? की चक्क धनलाभ?... मनिऑर्डर?
 पोस्टमन हातात कार्ड घेऊन अगदी हसऱ्या उत्सुकतेने माझी वाट पहात होता. मी दिसताच म्हणाला, "बाई, तुमच्या तुमच्या मनोशिनी लेकीचं, दस्तुरखुद्द हातांनी लिहिलेलं पत्र आणलंय. चहाचं इनाम हवं, मुद्दाम शेवटी आलोय इथं."
 हा पोस्टमन माझा विद्यार्थी आहे. हे इनाम थंडीच्या गारठ्यात हक्कानी मागणारच तो! पत्र होते शांतूचे. लोणावळ्याहून आले होते. शांतूच्या अक्षरातले. "शयीला लूया, मनोशिनी, अंबाजोगाई." आणि त्याखाली नवशिक्या विद्यार्थ्याची टीप, 'हे पत्र भाभीजवळ जरूर पोचवणे.' अशी.
 चहा घेऊन पोस्टमन गेला. मला मात्र आनंद लपवता येईना. मीही पत्र हातात घऊन 'मनस्विनी'कडे सुटले.
 शांता आमच्या 'दिलासातली पहिली कन्या.' चौऱ्याऐंशीच्या एप्रिलमध्ये दिलासाची रीतसर सुरवात झाली. दिलासाघर जानेवारीत सुरू झाले तरी त्यात यायला कोणी तयार होईना. घरातून हाकलून दिलेली मुलगी नदीचा डोह जवळ करील, स्वतःला पेटवून घेईल किंवा झाडाला टांगून घेईल. पण एखाद्या संस्थेत जाणे कमीपणाचे वाटत असे. आजही थोडीफार स्थिती तशीच आहे. दिलासा घर सुरू झाल्यावर आम्ही सर्वत्र निरोप दिले होते. गरजू एकाकी स्त्रियांना कायद्याची मोफत मदत देऊ, वकील लावून देऊ. तिला काही नवीन कला शिकवू... वगैरे वगैरे, सारे तपशील भरून, निरोप दिले होते. पण उत्तर साधारणपणे एकच असे "आमच्या गांवात आठ-दहा जणी अशा आहेत हो.
पण संस्थेत जाण्यापेक्षा भावाच्या दारात कष्ट केलेले परवडतात त्यांना. भावाच्या दारात अन्नावारी मरेस्तो काम केले तरी अब्रू चार जणात झाकलेली राहाते. संस्थेत जायचे म्हणजे चार माणसांत भावाला नि सासऱ्याला कमीपणाचे." ही अशी भूमिका सर्वांना मान्य असणारी! पहिले दोन तीन महिने असेच गेले आणि एक दिवस एक तरणीताठी, धरधरीत नाकाची बाई विचारीत आली, "लूह्याबाई हितचं राहातात का? मला हस्तकीण बाईंनी पाठवलीया. हाईत का घरात?" बोलण्यातही साधासरळ रांगडेपणा होता. लोहियावाई ती मीच, असे सांगताच पुन्हा पट्टा सुरू झाला.
 "मी शांता. बोरगावची, जातीनं कुंभारीण हाय. नवऱ्यानं टाकलेल्या बायांना वकील देता म्हनं तुमी फुकटात. मला बी त्याच्याशी भांडान धरायचं हाय. ऱ्हायला यावंच लागल का हितं? आठ घरी धुणी भांडी घासत्ये मी. हरेक घरी दोन इसा म्हणजे चाळीस रुपये मिळतात. हितं फुकटात रहायला द्याल तर चोळी बांगडीला वर पैसे बी लागत्यालच, ते देणार का? नि काम काय करावं लागेल? पाठकीणबाईकडे बी भांडी घासत्ये मी. त्यांनी तुमचा जिम्मा…(खात्री) दिला म्हून हितवर आले. काय त्ये लवकर सांगा. मला कामाला जायाचं हाय!" धडाक्यातले बोलणे संपले नि पाणी मीच प्याले....
 दिलासात राहण्यासाठी येणाऱ्या महिलेला जेवण, राहणे आदी मिळेच. शिवाय वरखर्चासाठी पंचाहत्तर रुपये दरमहा देत होतो. त्यामुळे शांताने दिलासा घरी येण्याचे ठरवले.
 दुसऱ्याच दिवशी शांता दिलासा घरात राहायला आली. उंचनिंच, थोराड बांधा, भव्य कपाळ, धरधरीत नाक, पाणीदार डोळे, चालण्यातही वेग आणि झोक. बोलण्यात शब्दांना वजन. अशी ही शांता मनाने मात्र अत्यंत कोमल होती. ती आली नि तिच्या पाठोपाठ सोना, निर्मला आल्या. 'दिलासा घर' भरून गेले.
 शांताला ना शिवणात रस ना खडू तयार करण्यात लक्ष. तिला पाणी भरणे, स्वच्छ झाडलोट करणे यात विशेष आनंद मिळे. पापड लाटण्यातही मजा वाटे. खूपदा सांगूनही शिवणाच्या वाटेला ती फिरकली नाही. बालसदनच्या मुलींना खसखसून आंघोळ घालणे, त्यांच्या तेल चापडून वेण्या घालणे यात मात्र
ती मनापासून रमून जाई. चौघडीच्या पातळ चपात्या करायचे जमत नसे पण थपाथपा भाकरी थापण्यात कोणालाही हार जात नसे. शांताचे मन अतिशय नितळ. खडकातून उसळ्या मारीत वाहात जाणाऱ्या पाण्यासारखे. बालसदनातल्या नंदा, कमल, संगीता तिच्या लाडाच्या. त्यातही नंदावर तिची जास्त माया. नंदा भोकरासाख्या मोठ्या टपोऱ्या डोळ्यांची. रंग काळा कुळकुळीत. नाक सदा वाहाणारे नि भोळीशी. कमा नि संगी तिच्यावर दाब टाकीत. अशा वेळी नंदाची बाजू घेणारी शांता.
 शांता धानोऱ्याच्या कुंभाराच्या घरात जन्मली. सर्वात धाकटी. वर बरीच भावंड. आज पाच शिल्लक आहेत. गावाजवळून झरा वाहात असे. तिथून माती आणावी. त्यात घोड्याची लीद कालवावी. मळूनमळून मऊसूत केलेल्या मातीचे मोठेमोठे रांजण करावेत नि कधी देवळ्याच्या तर कधी पाटवद्याच्या बाजारात नेऊन विकावेत. शांतूच्या वडिलांच्या घरी टंच धंदा होता. अंगावर सावकाराचा बोजा नव्हता. घरात तीन सुना आल्या होत्या. मोठ्या तिघींचे…लेकींचे संसार रांगेला लागले होते. काळजी होती धाकट्या शांतूची. शांतू थोराड हाडाची. नाकीडोळी नीटस. पाचव्या वर्षापासून भाकरी भाजायला शिकली. बापाला वाटे की आपले हातपाय थकले. आपल्या माघारी पोरांचा काय भरोसा? जीव धड आहे तोवर ज्याची वस्तू त्याच्या घरात ढकलून मोकळे व्हावे. असे मनात येतेय तोवर जावई दारात चालून आला. चार कोसावरच्या बोरगावच्या कुंभाराचा धाकटा ल्योक. लातुरात मशिनीवर कपडे शिवायला शिकत होता. सातवी पास होता. चौदा वर्षाची उमर होती. मग बैठक झाली. बैठकीत ठरले की पोरीच्या बापानी नवरा, नवरीचे कपडे द्यायचे. सहा माशाची मुदी जावयाला द्यायची नि लगीन लाऊन द्यायचं. मानकरणीचं एक हिरवं इरकली लुगडं सासूला नेसवायचं. पोरगी आठाची झाली की पुढच्या तुळशीच्या लग्नानंतर लेकीचा बार उडवायचा. सारं काही पक्क ठरलं. शांतूला लगीन म्हणजे छानछान कपडे दिसत. गळ्यात सोन्याची बोर माळ. ढीगभर पाहुणे नि गोडाधोडाचं जेवण, एवढेच कळे. त्या साली पाऊस पडलाच नाही. पोळा उलटून गेला तरी आभाळ कोसळलं नाही. सारीच रानं उजाड.... रिकामी. कुंभाराचा धंदा तरी कसा होणार? कधी नाही ते सावकाराच्या दारात जावं लागलं. इकडचं तिकडचं
करून मार्गशीर्षात लगीन पार पडलं. पण सहा माशाच्या मुदीचा वायदा काही पाळता आला नाही. पटक्यात… डोक्यावरच्या फेट्यात हात बांधून शांतूचा बाप व्याह्यासमोर उभा राहिला नि विनवणी केली. लेक शहाणी झालेली नाही. शाणी झाली की नांदाया पाठवू. तवा सहा माशाची मुदी नि लोखंडी पलंग गादी पाठवू. एवढी वेळ निभावून घ्या. सासऱ्यानं मानलं. 'सासू शहाणीसुरती बाई. त्यातून हवं तसं इरकली लुगड़ मिळालं म्हणून खुशीत होती. ती तोंड भरून म्हणाली,"ईवाईदादा, तुमचा मान ठिवला आमी. सोईनं मुदी करा. बरीक ईस कॅरेट सोनं घाला. चौदा कॅरिट नको. आमच्या सुनंला खारिक खोबरं खाऊ घालून, लवकर आमच्या घरी पोचती करा."
 शांतू बापाच्या घरी, धानोऱ्यातच, होती. लागोपाठ दोन वर्षे पाऊस पडला नाही. गांवातली अनेक माणसे पै-पैशासाठी .... मजुरीसाठी शहराकडे धावली. आधीच थकलेला बाप एक दिवस सकाळी उठलाच नाही. आई तर शांतूला आठवतच नाही. बापाचाही आधार उठला. मोठा भाऊ मुंबईला गेला. गांवात धाकटा राही. एक बहीण बाळंतपणात खर्चली. तशात शांतू शहाणी झाली. भावाने सासरी सांगावा धाडला. शांतूचा मोठा दीर आईला घेऊन आला. शांतूच्या भावाने सांगितले की सहा माशांची मुदी करू शकत नाही. चोळी बांगडी करून तो बहिणीची बोळवण करील. दीर मुदीचा हट्ट सोडीना. शेवटी सासू मध्ये पडली. लोखंडी कॉट नि गादी, जावयाला टॉवेल टोपी नि शांतूला लुगडं चोळी करायची. मुदीचा वायदा पहिल्या डोहाळजेवणापर्यंत पुढे ढकलला भावानेही बहिणीच्या नांदणुकीसाठी थोडीफार अडचण सोसून, तिची पाठवणी केली. शांतू सासू सोबत बोरगावला गेली. पण नवरा मात्र लातूरहून यायला तयार नव्हता. सासू मडकी, पणत्या, भावल्या, बैल आदी खेळणी करण्यात तरबेज होती. शांतू सासूच्या हाताखाली सारे शिकू लागली. मोठा दीरही लेकराबाळांसह पुण्याकडे मजुरीसाठी गेला होता. बोरगावात फक्त शांतू नि सासूबाई. मिळकत बरी होती. शांतूचा कामाचा आवाका जबरदस्त होता, नदीवर जाऊन माती आणणे, वनस्पती तोडणे, माती मळणे आदि सारी कामे ती जीव लावून करी. सासूही सुनेवर बेहद खुश होती. पण जसजसे दिवस जाऊ जागले तसतशी शांतू सुरेख दिसू लागली. तेज चेहऱ्यावर उमटू लागले. अशावेळी
गावातल्या गुंडांची नजर तिच्यावर पडणार या कल्पनेने सासू हैराण होई. शेवटी तिने एक दिवस बैलगाडी केली, लोखंडी कॉट, गादी नि शांतू यांना त्यात कोंबून ती थेट लातूरला आली. नवरा आता चांगला थोराड दिसू लागला होता. बाविशी पार केली होती. आईने लेकाला बजावले, "तुझा माल तुझ्या दारात टाकाया आले. लई दिस सांबाळलं मी. आता तू नि तुजी बायको. कायबी करा."
 असे सांगून निघून पण गेली. त्या रात्रीची हकीकत शांतूनं सांगितली ती अशी-
 "भाभी मनाला लई आशा होती. भीती वाटत होती. शिनीमातला परसंग डोळ्यासमोर येई नि लाज वाटे. रातच्याला मी गोडा भात रांधला. वेणी फणी केली, डोळ्यात काजळ घातलं. कुंकवाचं बोट व्हटाला चोपडलं. पन काय सांगू? त्या रात्री लई उशिरा दादाप्पा ढूस पिऊन आला अन मला सोन्याची मुदी काढ म्हणू लागला. मी रडाया लागले तर पलंगाच्या लोखंडी दांडीनं मरूस्तो मारलं मला. नि ढाराढूर झोपून गेला."
 दुसऱ्या दिवशी शांतू उठली. ती थेट सासूच्या दारात उभी राहिली. नंतर दोन वर्ष सासू सुना एकत्र राहात, कमवत, खात. सासूही थकली होती. शवटी एक दिवस सासूनं शांतूला अंबाजोगाईला मोठ्या बहिणीच्या दारात आणून टाकलं. राहीबाईला सांगितले की सांभाळ तुज्या बहिणीला. सासू दोन दिवस राहून पुण्याच्या लेकाकडे निघून गेली. शांतूच्या आयुष्याला नवे वळण लागले. नवऱ्याने मारले तरी मनात त्याच्याविषयी ओढ होती. दोघी बहिणींनी ठरविले की, शांतूने भरपूर काम करून पैसे साठवायचे. सहा माशाची मुदी नि शर्टचा पीस घेऊन नांदायला जायचे. त्यातच पाठक बाईंचे (शाळेतील शिक्षिकेचे) काम मिळाले. शांतू विश्वासाने बाईकडे पैसे जमा करी. बहिणीचा बारदाना मोठा होता. मेहुणा शाळेत चपराशी. पण चोवीस तास दारूत बुडालेला. त्यात पेन्शनला आलेला. दोन मुकी मुलं नि चार बोलकी मुलं. असा आठ जणांचा संसार. "कितीही कष्ट केले तरी मिळकत पुरत नसे. तरीबी दोन वर्षात हजार रुपये साठले. त्यात थोडी पाठकवाईनी भर घातली." बहीण, मेहुणा शांतूला घेऊन लातूरला गेले. बरोबर सोन्याची मुदी होती. शर्टपीस होता. पण तिथे वेगळाच डाव मांडलेला होता. शांतूच्या नवऱ्याच्या घरात दुसरीच बाई त्याची बायको म्हणून उभी होती. ती
आई होण्याच्या रस्त्यावर होती. मुदी नवन्याच्या अंगावर फेकून शांतू संतापाने. जळत परत माघारी आली. पाठकबाईनी तिला मानवलोकच्या मनस्विनी महिला प्रकल्पाचा पत्ता दिला नि शांतू दिलासा घरातली पहिली मानकरीण झाली.
 शांतूने लिहायवाचायला शिकावे असा वैदेहीचा… मनस्विनीतील संवादिनीचा नेहमी आग्रह असे. पण या बाईसाहेबांचं मन त्यात कधी रमलंच नाही. दिलासात सहा महिने राहिल्यावर आम्ही तिची नेमणूक स्वयंपाक विभागात केली. आमच्या मम्मी… गंगामावशी आता थकल्या होत्या. त्यांचा भारही हलका होणे आवश्यक होते. त्यातून शांतूला बालसदनातील मुलांचा लळा लागला होता. ती त्यांची काळजी घेऊ शकत होती.
 शांतूची विचार करण्याची ताकद विलक्षण होती. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तिच्याजवळं तयार असे. दिलासातील एक महिला एका मुलीची आई होती. मुलगी मामाजवळ होती. जांबुवंतीला शरीरातील भोग छळत. बाई माणूस आहे. तिलाही शरीर वासना…भावनांची ओढ असते. संस्थेत एक तरुण, वॉचमनचे काम करी. पहाटे पाच वाजता मम्मीला जागे करून तो झोपत असे. जांबुवंती त्याची खोली झाडायचे निमित्त करून तिथच रेंगाळत राही. रात्रभर जागलेल्या त्याला तिचे रेंगाळणे, वेगळ्याच नजरेने पहाणे अस्वस्थ करी. शेवटी त्याने त्याची अडचण मला सांगितली. ही अडचण डॉ. लोहियांकडे-बाबूजींकडे सांगायचा संकोच वाटला. माझ्या मनासमोर नवाच प्रश्न उभा राहिला. शरीराच्या नैसर्गिक मागण्या संपन्नतेने पूर्ण करणाऱ्यांनी कोणत्या भाषेत त्यागाच्या नि उपवासाच्या प्रतिष्ठेच्या कहाण्या सांगायच्या? मी बेचैन होते. माझी व्यथा मी शांतूसमोर मांडली. शांतूचे धडक विधान. "आन त्यात काय काळजी हो? अन् एवढं काय मनाला लावून घेता? ज्याच्या त्याच्या कपाळाची पाटी वेगवेगळीच लिहिली जाते."
 तिने जांबूला समजावले ते असे, "जांबू! यकांदा जिलबी खाल्ली काय नि रोज खाल्ली काय तिची चव येकच की! तुज्या नसीबात यकदाच होती. रोजची आठवन आली तर चव आठवावी नि समाधान मानावं. अगं तुला तरी पोटची लेक आहे. तुजं आजचं आयुष्य शिक्षान नाही म्हणून नासलं. लेकीला शिकीव. पायावर हुबी कर. त्यासाठी लई कस्ट करावे लागनार. अशी इकडे तिकडे हुंगत
बसलीस तर पोरीचं जीवन बी नासून जाईल. जरा शानी हो. दिलासात आलोय आपन. नामी संधी मिळाली. तिचा फायदा घे नायतर तुझ्या माझ्यासारख्या कितीतरी बाया ढोराच्या मौतीनं मरताहेत.... चल लाग कामाला!"
 अशा या शांताने आपल्या मोठ्या बहिणीचे घर पूर्णपणे बदलून टाकले. राहीवाई खूप कष्टाळू. नवऱ्याला सतराशे रुपये पगार असला तरी तो सारा दारूतच जाई. दोन मुलं मुकी. दोन वेळेला हातातोंडची गाठ पडण्याची मारामार असे. शांतूने मुलांना शाळेत घालायला लावले. मुक्या मुलाचे नाव मूकबधिर विद्यालयात घालायला लावले. मुकी भाची शिवण शिकायलाही येत असे. वालसदनच्या मुलांची माया करतांना ती त्यातच रमत असे. एक दिवस आमच्याकडे लोणावळ्याहून पत्र आले की तेथील बालग्राममध्ये माता हवी आहे. शांतू जाण्यास उत्सुक होती. पण ना लिहिता येतं की वाचता येतं. मग हिशेब कशी लिहिणार? तरीही आम्ही तिचे नाव पाठवले आणि तिची निवडही झाली. जाण्यापूर्वी तिच्या नवऱ्याविरुद्ध केलेली केसही जिंकली. पण शेवटी तिलाच त्याची कीव आली. त्याने शांतूला भरपाई म्हणून अवघे पाच हजार रुपये दिले. कायदेशीररित्या शांतू वेगळी झाली. तिचे म्हणणे असे, "त्या गाडवाने तिलाबी फशिवलंच की. मी तिला कसा दोस देऊ? तिचं लगीन तिच्या भावानं लावलं. मला न का मिळेना सौंसार कराया. तिने तरी लग्नाची बायकू म्हणून राहावं. तुमीच सांगितलं न्हवं? की पयल्या लग्नाची बाईच खरी बायकू असते. दुसरीला ठिवलेली म्हनतात. भलेही द्येवासमूर हार घातले असतील, मी सोडचिठ्ठी मान्य केली तर तिचं लगीन खरं मानतील नव्हं? मी मायबाप नसलेल्यांचा सौसार करेल. मायवापाविना वाढनाऱ्या लेकरांची माय होयाला आवडल मला."
 शांतू लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राममध्ये खूप चांगल्या रीतीने राहिली. गेल्या दोन तीन वर्षापूर्वी त्यातील एकाने भाज्याला बालग्राम सुरू केले आहे. त्या बालग्राममध्ये शांतू केवळ 'बालसदनमाता' म्हणून काम करीत नाही तर त्या संस्थेच्या कार्यकारिणीची ती सन्माननीय सदस्या आहे. तीन वर्षापूर्वी आदर्श सदनमातेचा पुरस्कारही तिला मिळाला आहे.
 राहीबाईचा दारूडा नवरा आता या जगात नाही. राहीच्या मूकबधिर मुलाला पनवेलच्या मूकबधिर विद्यालयात घालण्याचे काम शातूने केले. उरलेल्या
मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतली. शांतू दिलासात आली, त्याला दहा वर्षे झाली आहेत. शांतू एकटीच उगवाईच्या दिशेने प्रवास करीत नाही तर अनेकांपर्यन्त ही उगवती दिशा तिने पोहोचवली आहे. या दहा वर्षात शांतूचे जग बदलले आहे. कालपर्यंत ती जगासाठी होती. आज जग तिचे आहे. आभाळ तिच्यासाठी आहे.