झूट आहे सब् ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> किती ? - बारा वाजले ! - हेः ! भलताच उशीर झाला आपल्याला ! वाद करायला बसलें, कीं वेळेचं भानच राहत नाहीं बोवा ! - अरे असें काय ! चार कोळसे टाक आणखी बंबांत कीं आतां - हां हां म्हणतां - पाणी तापेल ! उगीच वेळ गेला झालं ! बरं, इतका काथ्याकूट करुन निष्पन्न कांहींच नाहीं ! - ओ हो ! काय ठिणग्या उडाल्या रे या ! ती पहा ! किती उं.... च उडाली आहे ! - पण आ .... लीच शेवटी खालीं ! - लहानपणीं विझली काय, किंवा मोठेपणीं - उंच जाऊन विझली काय, दशा शेवटीं एकच ! - म्हणजे फरक जगली किती हाच काय तो ! एकदां ठिणगी विझली .... लक्षांत आलं का ?.... प्राणी मेला, कीं संपलं सगळं ! - हो हो, सगळं संपलं ! - नाहीं रे बोवा ! कांहीं पुनर्जन्म नाहीं, अन् कांही नाही ! - असतं तसं कांहीं, तर तुझा तो शेक्सपीअर नसता कां आला पुन्हा ? चक्क येऊन सांगितलं असतं कीं, ' हीं नाटकं माझीं आहेत, मीं लिहिलेलीं आहेत ! कांहीं कुणा बेकनचा अन् फिकनचा संबंध नाहीं ! ' कशीं छान सुंदर नाटकें ! आणि तीही कांहीं थोडीथोडकी नाहींत ! ' सोडील होय कोणी ? - पण पत्ताच जिथं नाही त्याचा, तेव्हां तो पुन्हा येतो कशाचा अन् जातो कशाचा ! - हो हो, आहे ना स्वर्गात ! जा, आणा जाऊन मग ! - ठेवला आहे, स्वर्ग अन् नरक ! थोतांडं सगळी ! - अरे कुठला घेऊन बसला आहेस आत्मा ! - काय, आहे तरी काय तो ? - वारा ? का प्रकाश ? - हां, वार्‍यामध्यें किंवा प्रकाशांत मिसळणें, हें जर तुमचें स्वर्गानरकाला जाणं असेल, तर मात्र कबूल ! कारण मग राजश्री मनोविकार कुठले आले आहेत तिथं ! - तें कांही नाहीं ! तुमचा तो आत्मा कीं नाहीं, देहांत आहे तोंवरच त्याची प्रतिष्ठा ! - हो मग ? नाहीं कुठं म्हणतों आहें मी ! देहाचंही तेंच आहे ! दोघं जोंपर्यंत एकत्र तोंपर्यत ती एकमेक जिवंत ! - मेलं कीं दोन्हीही गेली पार ! मागमूस नाही कुठं मग ! - तेंच तर बाबा म्हणतों आहें मी, कीं जेवढे म्हणून प्राणी जन्माला येतात ते सगळे इथून तिथून नवीन ! आणि शेवटही त्यांचा .... ! बरं का ? शेवटही पुन्हा सगळ्यांचा एकच ! - मग पाप करा, नाहींतर पुण्य करा ! - स्वर्ग, नरक आणि तुझा तो पुनर्जन्म, सगळें - सब कांहीं झूट आहे ! ....

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.